Vrushali Thakur

Drama

3  

Vrushali Thakur

Drama

मोह - भाग ३

मोह - भाग ३

7 mins
552


"कशाची चिंता आहे का...." आचार्यांच्या आवाजाने तो भानावर आला. आश्रमात आल्यावर कुठल्याही कोपऱ्यात विचारमग्न बसून राहणे हल्ली त्याच्यासाठी नित्याचे झाले होते. कधी तिचा विचार करत तर कधी आपण करतोय ते पाप समजून त्यातून बाहेर कसे पडावे याचा विचार करत दिवस कसा पंख लावून उडून जात असे त्याच्या ध्यानीच नसे. त्याच्यासारख्या बुद्धिमान आणि एकाग्र शिष्याला अशा अवस्थेत बघून आचार्यदेखील पीडित होत. आज न राहवून त्यांनी बोलण्याचे ठरवले. 


"आचार्य जी आपण..." त्याने विनम्र अभिवादन केले. त्यांनी मोठ्या प्रेमभराने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. क्षणभरासाठी त्याच्या मनात आले आपण आचार्यांना सगळे सांगून टाकावे आणि क्षमा मागावी. हे असे लपवून सतत अपराधी भाव मनात ठेवण्यापेक्षा एकदाच काय ते मोकळे व्हावे आणि शिक्षा घ्यावी. परंतु...... आचार्य माफ करतील का.... नुसत्या विचारानेच त्याच्या पोटात गोळा उठला. नकोच....


"कशाचे चिंतन चालू आहे...?" त्याला पुन्हा विचाराधीन झालेले पाहून आचार्यांनी जरा मोठ्यानेच विचारणा केली. 


"मी... ते.. काहीच नाही..." काय बोलावे ते सुचेना. स्वतःच्या हृदयाची धडधड एवढ्या जोराने ऐकू येत होती की कोणत्याही क्षणी ते फुटून बाहेर येईल.


त्याची तशी गोंधळलेली मुद्रा आणि मागील काही दिवसांच्या वागण्याने आचार्यही काळजीत होते. सततच्या विचाराने व अपुऱ्या निद्रेने निस्तेज झालेले त्याचे डोळे आणि मलूल झालेला चेहरा पाहून त्यांच्या पोटात गलबलून येत असे. काहीही झाले तरी आज त्याचाशी बोलायचेच असे ठरवून आचार्य त्याला भेटले तर खरे परंतु त्याच्या एकूण हावभावावरून त्याच्या मनातील वादळाचा थांग लागणं त्यांच्यासाठी अशक्य होत.


"तुझ्या मनात नक्की कोणता कल्लोळ चालू हे समजण्यास मी आता तरी असमर्थ आहे. जो शिष्य अत्यंत कठीण अशा पाठांवर नि:संकोच माझ्याशी चर्चा करत असे, कित्येकदा माझ्याही मनात येणाऱ्या शंकांवर विचार विनिमय करत असे त्याच्या मनात असे काय वादळ उठले असावे जे बोलावयास तुला अपुरे व्हावे........ " तो अजूनही शांतच होता. आचार्यांच्या शब्दांनी त्याला मागल्या काही दिवसांचे स्मरण झाले. किती चुकीचा समज करून घेतला होता आचार्यांबद्दल. 


"तुझ्यासारखा सद्गुणी आणि अत्यंत ज्ञानी शिष्य मिळाला हे माझं सौभाग्य. शिष्याच्या गुणवत्तेने तर गुरु महान बनतो. तू तर तुझ्या गुरुबंधूची प्रेरणा आहेस. माझे सगळे शिष्य थोडेफार का होईना तुझ्यासारखे गुणवान व्हावे अशी माझी फार इच्छा आहे. परंतु, त्यांचे प्रेरणास्थान असलेला माझा सर्वात लाडका शिष्य अशा परिस्थतीत पाहून माझ्या मनाला किती वेदना होत असतील....?" आचार्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने आचार्यांना प्रथमच असे पाहिले आणि त्याच्या सर्वांगाला कंप सुटला. आपला वर्तणुकीचे इतके गंभीर परिणाम होतील याची त्याला जाणीव नव्हती. 


"आचार्य... मी चुकलो... " त्याच्या गळा भरून आला. शब्द घशाला चिकटून बसले जणू. खूप काही बोलावेसे वाटत होते. आपल्या मनातील गोंधळ ओरडून ओरडून त्यांना सांगावस वाटत होतं. परंतु, ते सत्य त्याच्या प्रतिमेला तडा देणार होत. 


"बरे ऐक... आपण उद्याच तीर्थयात्रेस निघतोय...." 


त्याच्यासाठी अजुन एक धक्का होता. उद्या निघायचे तर तिला सांगणार कसे. तिला घडलेल्या साऱ्या प्रकाराची माफी मागायची होती. आपल्या भरकटण्याने तिच्या आयुष्यात प्रचंड खळबळ माजली व आता आपल्याच सोडून जाण्याने तिचे काय होईल.....? आजवर आपल्या भरवशावर तिने.... नाही.... जे झाले ते चूक होते... समाज कधीही मान्य करणार नाही. 


त्याचे दुसरे मन लगेच उसळले. "वाह! समाज.... तिच्या गोऱ्यापान कायेत रत होत असताना नाही आठवला समाज, तिच्यासमोर वस्त्रे सैलावताना समाजाचे सर्वच नियम झुगारून दिले मग आता.....”


"तयारीला लाग... या यात्रेचे प्रयोजन खरे तर तुझ्या मन:शांतीसाठी आहे. प्रत्येक साधकाचे मन भरकटतेच... परंतु, आपल्या प्रवासात प्रभूच्या नामस्मरणात तुला तुझ्या जीवनाचे साध्य मिळेल.... अमाप वेळ असेल तुझ्याकडे तुझ्या गुंतलेल्या विचारांचा गुंता सोडवायला..." आचार्यांनी हलकेच त्याच्या पाठीवर थोपटले आणि हळूच डोळ्याच्या कडांवर साचलेले पाणी अंगठ्याने टिपले. "आताच तयारीस लाग... " 


त्याच्या उत्तराची प्रतीक्षादेखील न करता क्षणात ते उठून चालू लागले. शांतपणे चालणाऱ्या आचार्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो पाणी भरल्या डोळ्यांनी पाहातच राहिला. कोपऱ्यात मंदपणे तेवणाऱ्या समयांच्या प्रकाशात ते अजूनच तेजस्वी भासत होते. मात्र, त्याचे विचार मनाला डंख मारू लागले. आपण किती चुकीचे समजलो होतो आचार्यांना. केवळ आपल्या एका शिष्याचा इतका विचार. नाही... मी आचार्यांच्या विश्वासाचा आदर करतो. माझ्या चुकीचे पापक्षालन करेन.... परंतु, या मोहात अजून फसणार नाही. 


आपल्या मनातील विचारांना त्याने बळेच दूर लोटले. व प्रवासाच्या तयारीस सज्ज झाला. त्याला उत्साहाने वावरताना पाहून बाकी लोक पण उत्साहित झाले. जो तो नवीन जोमाने तयारीला लागला. उद्या भल्या पहाटे सर्वांनाच निघायचे होते. 


रात्रभर गोड स्वप्नात गुरफटलेल्या तिला पहाटेच जाग आली. का कोण जाणे ही पहाट तिला काहीतरी सांगू पाहत होती. तिने हळूच कवाडे उघडली. नुकतंच तांबडं फुटत होतं. चहूबाजूला लालसर गुलाबी प्रकाश पसरला होता. अचानक काहीतरी जाणवलं... काहीतरी खूप वेगाने घडल... ती पळतच परसदारी आली. पोटात पिळवटून आलं... काहीतरी तिच्यातून बाहेर पडू पाहत होत... परंतु..... तिच्या अंगावर शहारा आला. नुसत्या जाणिवेनेच तिला नाचावंसं वाटत होत. स्त्री जन्माचं सार्थक वाटावं असा तो क्षण.. ती पुन्हा पुन्हा स्वतःला न्याहाळू लागली. पहाटेच्या धुक्यात अगदी नुकत्याच उमललेल्या अल्लड फुलासारखी फुलून गेली होती. 


अचानक चालण्याचा आवाज तिच्या कानी पडला. या भल्या पहाटे कोणीतरी प्रवासी असावे. उगीचच धावत ती त्या प्रवाशास पाहण्यास दारातल्या पारिजातकामागे उभी राहिली. बहारदार डवरलेला तो पारिजातक आपल्या फुलांचा सडा टाकत होता. दवबिंदूत न्हालेली ती शुभ्र पुष्पे हळूच त्या गौरवर्णीला स्पर्शत होती. आधीच फुललेली ती त्या थंडगार स्पर्शाने अजूनच मोहरत होती. 


किलकिल्या डोळ्यांनी ती हळूच बाहेर डोकावली. शुभ्र वस्त्राधारी साधकांचा मेळाच निघाला होता. गळ्यात उपरणे, भालावर चंदनाच्या रेघोट्या, पाठीवर कसलीशी चुंबळ, कुणाच्या हातात टाळ, चिपळ्या तर कुणाच्या हातात काठ्या.... सर्वच जणू दूरच्या प्रवासाला निघाल्यासारखे वाटत होते. मागे एक साधारण वयस्कर वाटणारे व्यक्ती कदाचित त्यांचे गुरुजन असावे आणि सोबत..... ती डोळे विस्फारून पाहातच राहिली. तिला नदीच्या प्रवाहातून जीवन प्रवाहात सोडणारा तिचा प्राणदाता व ज्याला तिने मनानेच वरले होते तो तिचा प्राणनाथ देखील गुरुजींसोबत निर्विकार चेहऱ्याने चालला होता. कालपर्यंत आपल्यात रत होणारा आणि सर्वस्व उधळून प्रेम करणारा तो इतका निर्विकार..... दूर जायचंच होतं पण त्याच साधं उच्चारणदेखील नाही. तिच्या डोळ्यात अश्रू साचले. सर्वांगाला हलकासा कंप सुटला. दारासमोरून सर्व घोळका निघून गेला पण त्याने साधी नजर फिरवूनदेखील तिच्या घराकडे लक्ष टाकलं नव्हतं.


ती घाबरली... आतल्या आत पिळवटून आल. कालचा निरोप शेवटचाच का... कालची दुपार झरझर तिच्या डोळ्यापुढे आली. काल ते कुठल्याशा विवंचनेत होते... लक्षच नव्हतं त्यांचं.... अगदी मला जवळ घेतल्यावरदेखील बराच वेळ शून्यात बघत होते.... कितीदा खोदून विचारलं मी... पण नाहीच... काहीच बोलले नाहीत.... परंतु, कालची दुपार मात्र नेहमीसारखी रंगलीच नाही.... सतत त्यांच्या मनात काहीतरी खदखदत असल्याप्रमाणे ते माझ्याशी एकरूप झालेच नाहीत.... आणि जातानाही त्यांनी वळून बघितले नाही. म्हणजे.... कालच त्यांनी निरोप घेतला तर... अनाहूतपणे तिचा हात आपल्या पोटावर गेला. भयंकर निराशेने तिने आपले डोळे मिटले. तिच्या भावना तिच्या डोळ्यांतून गालांवर ओघळू लागल्या. डोकं भणाणून उठलं. आता काय....


पुन्हा कसलासा आवाज आला. कोणीतरी धावत होतं. त्याच्यातीलच एखादा असावा. न राहवून तिने हाक मारलीच. तो दचकून जागीच थबकला. या वेळेस अशा गावाबाहेरच्या ठिकाणी कोणाची हाक अपेक्षित नसल्यासारखा तो बावचळून गेला.


"अ... क्षमा असावी.... म्हणजे..... " ती घाबरून अडखळली. त्याची नजर तिच्यावर खिळून होती. नुकतीच पारिजातकाच्या सुवासिक दवबिंदूतून न्हाऊन तीच रूप अजुनच खुलल होत. 


"हं..." तो नुसतच हुंकरला. 


"पदयात्रा...." तिने उभ्या असलेल्या जागेवरून उजव्या दिशेला बोट दाखवले. त्याच्या लक्षात आले आपण चुकीच्या मार्गाने जात होतो.


"धन्यवाद. पदयात्रा नाही तीर्थयात्रेचे प्रयोजन आहे. बरे झाले आपण मार्ग दाखविला नाहीतर आता वर्षभरानंतरच भेट झाली असती.... "


"वर्षभरानंतर....." तिच्या मोठाल्या डोळ्यात प्रश्नचिन्ह उभ राहील. 


"तीर्थयात्रेच्या निमित्त आता भारतभ्रमण होईल. साधारण वर्षाचा कालावधी लागेल पुन्हा परतायला..." तो तिने दाखवलेल्या दिशेने पळतच बोलला. 


"हं... " ती जागेवरच कोसळली. खूप काहीतरी आपल्या हातून निसटून चालल्याच्या भावनेने तिच्या आसवांचा बांध फुटला.


सायंकाळ कधी झाली तिला समजलेच नाही. म्हणजे कधीपासून ती अशीच बसून होती. डोक्यात विचारांनी फेर धरला होता. पुन्हा ती अश्या वळणावर होती जिथून पुढच्या वाटा कठीण तर होत्या परंतु कोणत्या वाटेने चालायचं हे पण तिलाच ठरवायचे होते. नियतीने तिचे काम चोख केले होते. तिच्या नशिबाच्या गाठीच अशा विणल्या होत्या की सोडवताना त्या अजूनच गुंतल्या जात. 


एक आयुष्य संपता संपता अचानक त्याचा हात काय मिळतो. नशिबाच्या आगीत होरपळून गेलेल्या तिच्या मनावर प्रेमाचं अमृत शिंपडून ती तरारतच होती की अजून एक नशिबाचा खेळ मांडला गेला. नवीन मिळालेलं आयुष्यदेखील अळवावरचं पाणीच निघालं. त्याने त्याचा मार्ग निवडला व निघून गेला. तिचं काय....? कोण चूक कोण बरोबर हे शोधायची वेळच नव्हती. त्याचं माहीत नाही पण तिच्या सुखाचा शोध बहुतेक संपलेला.


ती नशिबाच्या फेऱ्यात अडकली की मोहाच्या मृगजळात. लग्नाच्या पहिल्याच रात्री हरवलेल्या सुखाच्या शोधात तिच्याही नकळत ती अडकत गेली. समाज नियमानुसार दोघेही चूक होते परंतु स्वतःच्या शोधात, सुखाच्या शोधात ते दोन हरवलेले जीव एकमेकांना भेटले. प्रेम आणि शरिरसुखाच्या ओढीमध्ये भान हरपून डुंबून जात होते. सृष्टीच्या परिमितीमध्ये त्यांची एक वेगळीच दुनिया होती. जगरहाटीच्या नियमांना मोडीत काढत त्यांची स्वप्न साकारत होती. परंतु, वास्तवाच्या लाटेने त्यांच्या स्वप्नांच्या वाळूच्या इमाल्यांना एका फटक्यात जमीनदोस्त केले. मागे उरला तो भावनांचा फेसाळणारा समुद्र, तुटून विखुरलेले त्यांच्या स्वप्नांचे तुकडे व त्या प्रत्येक तुकड्यांच्या टोचण्याने भळभळून वाहणाऱ्या जखमा.


"पाणी... स्वप्न.... " असंच काहीसं बरळत ती कधी निद्राधीन झाली तिलाच कळल नाही. तिच्या मनातील खळबळ आता शांत झाली होती. दुसऱ्याच दिवशी नदीच्या दुसऱ्या टोकाला तिचं निर्जीव शरीर सापडलं. जिथून तिचं नवीन आयुष्य सुरु झालेलं तिथेच येऊन तिचा अंत झाला. एक मोहाचं मृगजळ आता विरून गेलं.


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama