Vrushali Thakur

Drama Romance

2.0  

Vrushali Thakur

Drama Romance

मोह - भाग २

मोह - भाग २

8 mins
804


"अहो..." कोणीतरी अतिशय मंजुळ भेदरलेल्या आवाजात बोललं. तो घाबरला. तिच्या अंगावरचा हात खसकन मागे खेचला. भयाने पांढराफटक पडलेला त्याचा चेहरा त्याच्या चोरीची न बोलता कबुली देत होता.... आता काय... परस्त्रीकडे नजर उचलूनही न पाहणारा मी.... तिच्या दुधाळ कायेत भान हरपून गेलो... त्याच्या हृदयाची धडधड चुकून तिलादेखील ऐकू गेली असावी. त्याच्याकडे पाहून ती ओशाळवानं हसली. 


"क्षमा असावी..." तो स्वतःच ओशाळला. भयानक पश्चात्तापाने त्याने आपले हात जोडले. त्याची नजर खाली जमिनीवर रोखली गेली. भयाने पहाटेच्या थंडीतही त्याच्या सर्वांगाला घाम फुटला. 


"क्षमा.. कशासाठी.... आपण तर माझ्या प्राणांचे रक्षण केले. माझ्यावर जन्मोजन्मीसाठी हे उपकार राहतील." तिने झुकून त्याला चरणस्पर्श केला. तो दचकून दोन पावले मागे सरकला. आता काही काळापूर्वी मनातील उमटलेल्या वासनेच्या तरंगांचे काय..? ती तरुणी मला रक्षक म्हणून गौरविते आणि आपण सहेतुक तिच्या पवित्र कायेला कलंकित करू पाहत होतो... नाही ती वासना नव्हती केवळ तिच्या सुंदर मादक कायेला स्पर्शण्याची अभिलाषा होती. त्याचं मन सत्य मान्य करण्यात कचरत होतं. त्याच्या मनाला वासनेचा झालेला स्पर्श तो अमान्यही करू शकत नव्हता. परंतु, मनच ते.. सतत या ना त्या हिंदोळ्यावर झुलतच राहणार... एखाद्या गोष्टीकडे डोळेझाक करावीशी वाटली की नेत्रांवर अज्ञानाची झापड बांधणार. अज्ञानात सुख असते म्हणे. मनाला कोण बरे आवरू शकलंय. ते तर उधळलेला अश्व. त्या अश्र्वावर काबू मिळणे महान तपस्वीशिवाय तरी शक्य नाही. 


"आपण अशा वेळी, या नदीकिनारी... आत्महत्या करणे शोभा नाही देत. ते महापाप आहे...." त्याच्या कंप सुटलेल्या अंगात उसनं पावित्र्य दाटून आलं.


"आत्महत्या नाही..." ती फिकटसं हसली. "हत्या होती..." सुबक बोलक्या नयानातील आसू तिच्याही नकळत चमकले. एव्हाना पहाटेला जाग आली होती. सूर्यदेव आपला रथ घेऊन नेहमीप्रमाणे फेरफटका मारायला निघाले. त्या कोवळ्या फुटलेल्या किरणांत बराच वेळ अंधारात दडून राहिलेला तिचा चेहरा त्याच्या नजरेस पडला. निर्मात्याने बऱ्याच मेहनतीने आणि स्वतःच्या हाताने तिला घडवलं असावं. त्याच्या समोर उठून बसलेली ती अस्सल बावनकशी सौंदर्याची खाण पहाटेच्या अर्धवट ओल्या प्रकाशात चमकत होती. 


"हत्या...?" तिच्या बोलण्यातील अर्थ न उमजून त्याने प्रतिप्रश्न केला. 


"हो... हत्याच... तेच म्हणावे लागेल." तिने हताशपणे सुस्कारा सोडला. "आपल्या दैवगती फिरवल्यावर बोल तरी कुणास लावायचे. रिकाम्या ओंजळीतील सुरकुतलेल्या रेषांना दोष देत आपल्याच फुटक्या नशिबावर हसावे आणि गप्प बसावे.... बस..... बायकांच्या नशिबी हे असेच जिणे "


"स्वतःस दूषण देणे असे शोभत नाही. व नशिबाचे काय घेऊन बसलात. दैवाचे फासे कसे पडतील कुणास कळले का कधी.. ? आपण प्रत्यक्षात काय घडले ते सांगाल तर मनीचा भार थोडा हलका होईल."


अनोळखी पुरुषास सगळे कथन तरी कसे करावे या विवंचनेत ती अडकली. तरीही रक्षणकर्ता या नात्याने त्याला सर्व सांगणे तिने उचित समजले. पाण्यात भिजल्याने तिचं ओलं शरीर कंप पावत होतं. त्याच थरथरत्या आवाजात तिने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली.


"मागल्या काही दिवसांआधी माझा विवाह समोरच्या गावातील एका मातब्बर कुटुंबात जुळून आला. नशिबाने अगदी सगळे सुख न मोजताच माझ्या फाटक्या पदरात टाकले होते. माझ्यासारख्या अतिसामान्य अठरा विश्वे दारिद्र्यात बरबटुन निघालेल्या घरातील मुलीस मोठाले वाडे, ऐसपैस अंगण, अंगणात फुललेली सुगंधी फुलबाग, गोठ्यात हूंदडनाऱ्या गायी हे सर्व स्वप्नात पाहायचा मोह झाला नाही. आमच्या कपाळावरील दारिद्र्याचा टीका या जन्मात पुसला जाण्याची यत्किंचितही आशा न बाळगलेली माझ्यासारखी कुडाच्या झोपडीत वाढलेली मुलगी आपल्या नशिबावर कसा भरोसा करणार..? विवाह निश्चित झाल्यापासून तर कित्येक रात्री मी तळहाताच्या रेषा चाचपडण्यात घालवल्यात. हळदी, विवाह, देवदर्शन सगळं अगदी कसं निर्विकार पार पडलं होतं मात्र..... अगदी पहिल्या रात्री हे जे झोपी गेले ते पुन्हा उठलेच नाहीत. अंगावरची ओली हळद उतरवण्याआधीच सौभाग्यलंकार आणि सौभाग्य ओरबाडले गेले ते कायमचेच. केवळ एका प्रहराचं संसारसुख आणि आयुष्यभराचं पाठ न सोडणारं वैधव्य पदरात पडलं. परक्याचं धन म्हणून मायबापाने पाठ फिरवली आणि अवलक्षणी म्हणून सासरच्यांनी. सर्वांच्या खांद्यावर एक विधवा म्हणजे भारच असते ना. मग सर्वानुमते या नदीच्या पोटात तो भार उतरवून आपापले खांदे मोकळे करून घेतले. तसेदेखील या प्रहरी कोणी अशा जागी फिरकण्याची तसदी घेणार नाही मग मृत्यू हा एकमेव उर्वरित पर्याय. परंतु, आपण का कसे कोण जाणे माझे रक्षणकर्ता बनून आलात. माझे प्राण वाचविले...." ती थांबली. मनात विचारांची वावटळ घोंघावत असावी. 


"लोभ या कवडीमोल प्राणांचा नाही. परंतु, माझा काहीही दोष नसताना जन्मदात्यानी आणि कर्मदात्यानी नाकारून हा असा मृत्यू द्यावा याहून अधिक दुर्दैव ते काय." बोलताना तिच्या सगळ्या आठवणी उफाळून डोळ्यांच्या डोहात पाणी पाणी साचले. दुःखाने तिची छाती धडधडू लागली. 


त्याच्याकडून सांत्वनाची अपेक्षा तरी कशी करणार... शेवटी तो देखील परपुरूष... अशी आभाळाखाली उघडी पडलेली ती म्हणजे स्त्री चारित्र्य लुटणाऱ्या आणि वासनेच्या आहारी गेलेल्या मनुष्यरुपी लांडग्यांची भर.


उजव्या खांद्यावर झालेल्या स्पर्शाने तिची तंद्री भंगली. त्या स्पर्शात आश्वासकता जाणवत असली तरीही तो स्पर्श अनोळखी होता. त्यावर विश्वास ठेवावा का नाही तिचं मन काही कौल देईना.


"जाऊ द्या.. नको त्या कटू आठवणी... परमेश्वरानेच हे नवे आयुष्य दिलेय. भरभरून जगून घ्या. भूतकाळाची भूतं मानगुटीवर बसायचीच परंतु त्यावर मात करण्यातच मनुष्य जन्माचं सार्थक आहे. "


"आता परतून त्या माणसांत जाणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण... " हताश होऊन तिने पापण्या मिटल्या. पुढचे तिच्याने बोलवेना. 


पायाला बसलेल्या चटक्याने तो वर्तमानात परतला. अजूनही त्याच्या नजरेसमोर तिची ओली प्रतिमा उभी राहिली. अंगभर हट्टाने चिकटून राहिलेल्या तिच्या ओलसर सफेद वस्त्रातून तिच्या शरीराचे उभार अधोरेखित होत होते. तिच्या भरदार केशसंभारातून ओघळणारे जलबिंदू तिच्या खांद्यावरून आत निथळत तिच्या सौंदर्याचं मोजमाप करण्याच्या निरर्थक प्रयत्नात होते. एव्हाना त्याला त्या जलबिंदुंचा राग येऊ लागला. तिच्या सौंदर्याने प्रथमच त्याच्या ब्रह्मचर्याला आव्हान दिले होते. 'हिच्या निर्मितीनंतर देवाचीही एकाग्रता ढळली असेल का...!' नकळत त्याच्या मनात चमकून गेले. 


"पाप आहे हे.." त्याचे मन आक्रंदले. कितीही दूर पळायचा प्रयत्न केला तरीही मन फिरून तिच्याच भोवती रुंजी घालत. बालपणीपासून मोहावर विजय प्राप्त करायच्या उद्देशाने केलेल्या सर्वच तपश्चर्या व्यर्थच झाल्या. कुठे आधार द्यावयास गेलो आणि त्याची परिणीती प्रितीत झाली. त्यात तिचा तरी काय दोष म्हणा. अवघ्या एका रात्रीत संसारास मुकलेली ती.... तिला संसारसुखाची अपेक्षा असणारच. तिच्या भावना उफाळून आल्या तर आश्चर्य ते काय..? आणि मी... तारुण्याचं रक्त सळसळत असताना आणि समोर अशी मदनिका प्रितिगीते गात असताना कोणास स्वतःस आवरता येईल.


"का बरे आवरावे मी स्वतःस...?" त्याचे मन पुन्हा उसळले. कोणीतरी आश्रमात सोडले म्हणून का मी ब्रह्मचर्य आचारावे. राग, लोभ, सगळेच तर वर्षानुवर्षे मनाच्या तळाशी साचत गेलेत. आचार्यांच्या भीतीने तर कित्येकदा भावनांचा निर्दयीपणे गळा घोटावा लागला. आचार्य सांगतील तेच पुण्य व उर्वरित सगळे पाप. मृत्यूनंतरचे जीवन कोणास ठावूक.... केवळ पुराण शास्त्रांच्या आधारे त्यास सत्य मानून मृत्यूनंतरच्या पाप-पुण्याचा हिशोब मांडताना जिवंतपणी मात्र अज्ञात मितीतील परिघात अडकून तिथेच फिरत बसायचे ही तर अतिशयोक्ती मानावी लागेल... मान्य आहे.. 


एका बाजूला त्याच्यावर सर्वस्व ओवाळून टाकलेली ती आणि दुसऱ्या बाजूला समाजाने घालून दिलेल्या रुढी-परंपरा आणि त्याचा सांभाळ करणारा आश्रम आणि आचार्य. त्याचे मन विचारातच अडकून पडले.... छे.... या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडणे अशक्य वाटतेय. तिचा स्वीकार करावा तर हा समाज जगणं असह्य करेल आणि आचार्य... त्यांच्या केवळ विचाराने तो नखशिखांत हादरला. नकोच... परंतु, तिला नाकारणे म्हणजे पळपुटेपणा होय. निदान मी केलेल्या कृत्यांची तरी जबाबदारी घेणे मला भाग आहे. काय सत्य काय असत्य.... विचारांच्या तंद्रीत तो केव्हाच आश्रमात येऊन पोहोचला. मनातील चलबिचलता त्याच्या चेहऱ्यावर ठळकपणे खुणावत होती. त्याचे गुरुबंधू कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त होते. त्याला मात्र त्यांच्यात जावेसे वाटेना. आजकाल सतत असेच होत असे. त्याचे असे स्वतःच्या विचारांत बुडून जाणे सर्वानाच विचारात पाडणारे होते. परंतु, तो कोणत्यातरी गहन विचारात बुडालेला असावा असा समज करून कोणीही त्याला फार खोलात जाऊन विचारले नव्हते. त्यालाही त्यांच्या प्रश्नांची उत्तरे टाळण्यासाठी त्यांना टाळणे प्रशस्त वाटत होते. 


आपल्या छोट्याशा झोपडीवजा पर्णकुटीत ती स्वतःलाच न्याहाळत बसली होती. कुठे काही दिवसांपूर्वी पांढऱ्या पायाची म्हणून हिनवली गेलेली मी, आयुष्य संपता संपता अचानक परमेश्वराने कसं पसाभर सुख पदरात घातलं. ती स्वतःवरच खुदकन हसली. ती पुरेपूर सौंदर्य ल्यालेली लावण्यवती, जिच्या सौंदर्यावर भले भले लुब्ध होऊन केवळ तिचीच मनीषा बाळगून असत. त्या सर्वांना टाळून घराण्याच्या प्रतिष्ठेपायी बालपणी बोलल्याप्रमाणे तिचा विवाह ठरवला गेला. तिच्या स्वप्नांचा राजकुमार

व नवरा यांच्यात अगदी जमीन-अस्मानाच अंतर. तिच्या स्वप्नातला राजकुमार सफेद घोड्यावर भरधाव धावत येणारा उमदा तरुण, ज्याच्या पिळदार शरीरयष्टीवर आपण अवघा जीव ओवाळून टाकावा. त्याच्या घनदाट कुरळ्या केसातुन हात फिरवताना आपली लांबसडक बोटे अडकून पडावी. आपण लटकेच 'काय बाई हे केस.. मी तर पुन्हा हातच नाही लावणार’ म्हणावं आणि त्याने जोराने जवळ खेचून त्याचं डोकं माझ्या चेहऱ्यावर घासाव. 'इश्य....' केवळ विचारानेच ती आताही लाजली. परंतु, वडिलांच्या हट्टाने आणि तिच्यासमोर पर्याय नसल्याने तिच्या पदराची गाठ अर्धवट टक्कल पडलेल्या व बेढब वाढलेल्या माणसाच्या शेल्याशी बांधली गेली. आभाळाने कोसळून जावे अथवा धरणीने दुभंगून पोटात घ्यावे असे तिला वाटत होते. ती काही सीतामाई नव्हती ना. हाच संसार पदरात घेऊन चालावं लागेल या विचारात ती विधी चालू असतानाच मनसोक्त रडली आणि सप्तपदी घेताना उसळणाऱ्या ज्वालांमध्ये तिने आपल्या प्रियकराच्या स्वप्नांना कायमचा अग्नी दिला. स्वतःचा जोडीदार निवडायचा हक्क द्रौपदीनंतर कुणाला मिळाला असेल की नाही तो परमेश्र्वरच जाणे. आता ज्याच्याशी गाठ बांधली गेली तोच सर्वस्व मानून ती सासरची वाट चालू लागली.


लग्नाचे विधी इतर सोपस्कार होई तो ती आपल्या घाबरलेल्या मनाला समजावतच होती की लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्यावर तुटून पडायच्या तयारीत असतानाच अचानक आवेग सहन न होऊन का कोण जाणे तिच्या अर्धवट उघड्या शरीरावर तो निपचित पडला. त्या प्रसंगाला घाबरून तिची शुद्ध हरपली. त्या धक्क्यातून बाहेर येताच आपलं पांढरं पडलेलं कपाळ तिला खिजवू लागलं. एका नुकत्याच लग्न करून गृहप्रवेश केलेल्या नववधू साठी किती हा मोठा धक्का असावा. ज्याच्या भरवशावर ती आपलं माहेर सोडून परप्रांतात आली तोच साधी ओळख होण्याआधीच देवास प्रिय व्हावा. नियतीने आपली इतकी क्रूर चेष्टा का करावी. लग्नाआधी सारे उपास सारी व्रत-वैकल्ये न चुकता मनापासून केली तरीही पदरात करंटेपणाचे वाण यावे. 


नवऱ्याच्या जाण्याच्या दुःखासोबतच काहीतरी कायमचे गमावल्याची जाणीवही पाठ सोडत नव्हती. भयंकर एकटेपणा आणि असहाय्यता तिच्या वाट्याला आली होती. कुंकू पुसलं गेलं आणि गावाच्या वखवखलेल्या नजरांना मेजवानीच मिळाली. आधीच तिचं ओझं झालेल्या घराला अशाने ती विटाळ तर करणार नाही ना याच भीतीने गंगेला अर्पण केलं. त्यांच्या आयुष्यातील तिचा अध्याय मिटला गेला. त्याच्या हळुवार स्पर्शाने तिच्या आयुष्यात त्याचा अध्याय नव्याने उमलू लागला.


आयुष्यात प्रथमच तिने इतका आश्वासक स्पर्श अनुभवला होता, अगदी दैवी अनुभूती वाटावी असा. कोण इतका निर्मळ स्पर्शतो. त्याच्या त्या सायीसारख्या स्पर्शाने कांती कशी मोहरुन उठली. अंगाअंगावर फुलणाऱ्या रोमांचाने काळीज कसं हुरळून गेलं होतं. नवऱ्याच्या स्पर्शात अशी ओथंबलेली काळजी नाहीच ना जाणवली. त्याच्या ओझरात्या स्पर्शात देखील हुकूमत आणि दरारा जाणवत राहिला अगदी तो जाईपर्यंत. नवऱ्याच्या आठवणीने उगाचच तिला गलबलून आले. आठवणी म्हणजे विषारी नागीण असते. त्यांना कितीही विसरायचं ठरवलं तरीही त्या एकांतात फणा काढतातच. 


दैवाने सारी सूत्रे ठरविल्याप्रमाणे तो भेटला. निखळ प्रेम ज्याला ती पारखी झाली होती त्याच्या कुशीत तिला ते गवसलं. त्यांच्या एकत्र येण्यात काळजी होती, प्रेम होतं, आसही होती आणि ओढही. शारीरिक आकर्षण भलेही केंद्रबिंदू का असेना पण लग्नाच्या पहिल्या रात्री बहरलेला मोहोर तसाच होता. तिचं अंग प्रत्यंग फुलण्यासाठी आतुर होत. वैधव्याच्या काळीज चिरणाऱ्या वेदनेसारखीच प्रितीची व प्रणयाची आस तिला जाळत होती. अंगाअंगात उभारून आलेलं तारुण्य ताठरल्यावर ती तिचीदेखील राहत नसे. 


माहित होते हे पाप आहे. पतीच्या मृत्युपश्चात परपुरूषाचा विचारदेखील अक्षम्य आहे. परंतु ज्या तरुणीने विवाहाच्या अवघ्या एक दिवसात आपला पती गमावला. जिने तारुण्याचं बहरणं देखील अनुभवलं नाही तिचे आजन्म उजडलेलं कपाळ का बरे मिरवीत बसावे...? अंगाच्या अणुरेणुंतून उठणाऱ्या हाकेला का बरे कानाडोळा करावे...? तिचे तर आयुष्याच आरंभ झाले नव्हते. समाजाने काही आखाडे नेमून दिलेत परंतु त्यात प्रवेश करायच्या आधीच केवळ प्रतिस्पर्ध्याची कमतरता म्हणून हार का मानावी...? खेळ तर झालाच नव्हता.


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama