मोह - भाग १
मोह - भाग १


नदीच्या संथ वाहणाऱ्या विशाल पात्रात पाय रोवून तो मागच्या बऱ्याच काळापासून हात उंचावून उभा होता. हातातील पाणी केव्हाच नदीपात्रात विलीन होऊन गेले होते. परंतु, आपल्याच विचारांत हरवलेल्या त्याला कशाचे भान उरले नव्हते. वर आलेल्या तप्त सूर्यकिरणांनी त्याचा चेहरा लाल झाला होता. शेंडीचे तलम केस उष्ण वाऱ्यासोबत भुरुभुरू उडत होते. काठावर ठेवलेला पंचा केव्हाचा उडून गेला होता. सगळ्यापासून अनभिज्ञ तो डोळे मिटून स्वतःच्याच विचारांत गुरफटून गेला होता. विचारांची शृंखला अधिकच गुंतत चाललेली वाटून त्याने डोळे उघडले. सूर्याची तप्त किरणे एखाद्या बाणासारखी त्याच्या डोळ्यात शिरली. इतका वेळ हात वर करून उभं राहिल्याने त्याच्या हाताला रग जाणवत होती.
परतीच्या वाटेवर फिरून तो आपला पंचा शोधू लागला. पण तो तर आधीच उडून गेला होता. आता अशा अवस्थेत वस्त्राविना आपल्या आश्रमात परतून जाणे अशक्य होते. त्याच्या गुरुजींनी जर असे पाहिले तर काही खरं नाही. आता एकच पर्याय उरला होता. तो मनातून चुकचुकला. आताच थोड्या वेळापूर्वी त्याचं मन एक निर्णय घेत होतं परंतु आता लगेच त्याच निर्णयावर सहजरीत्या पाणी सोडावं लागणार होतं... फक्त आजचा एक दिवस... मनाशी पक्क ठरवून तो गावाबाहेर चालू लागला.
सूर्य बराच वर आला होता. गरम झालेली वाळू त्याचे पाय भाजून काढत होती. पण पंचा महत्वाचा असल्याने तो धावतच निघाला. गावाबाहेर असलेल्या एकुलत्या एक साधारण अवस्थेतील घराबाहेर उभं राहून त्याने कोणाला तरी आवाज दिला. आतून नाजुक पैंजण किनकीनले. पाठोपाठ मुख्य दरवाजा उघडला गेला. दरवाजात आरस्पानी सौंदर्य लाभलेली आणि साक्षात अप्सरा भासणारी तरुणी उभी होती. अंगावरच्या निळसर साडीने तिचा मुळचा गोरा रंग अजुन खुलून आला होता. तिने केसात माळलेला मोगरा तिच्याभोवती सुगंधाचे रिंगण घालत होता. तो तिच्याकडे पाहतच राहिला. खरंतर तिच्या उजव्या गालावरच्या तीळाने त्याला आकर्षित केले होते. आपण नेमके कोणत्या कामानिमित्त आलो हेच तो विसरला. सौंदर्याची मोहिनीच तशी असते. भल्याभल्यांची तपस्या भंग करते. शेवटी न राहवून तीच बोलली.
"अहो, असे भर उन्हात बाहेर का उभे.. आत या ना.. कधी पाहिले नाही का मला.." ती गालातच हसली.
"तसे नाही." त्याने स्वतःला सावरण्याचा एक निष्फळ प्रयत्न केला.
"बसा ना... मी तुमच्यासाठी गार दूध घेऊन येते." त्याला बसायचा इशारा करून ती आत वळली.
त्याने नकळत तिचा हात पकडला. तिला आपल्या जवळ ओढली. तिने त्याच्या मिठीतुन सुटायचा नाजुक प्रयत्नही केला. परंतु, त्या नादात तिच्या खांद्यावरील पदर ढळला. तिच्या कंचुकीतून तिचे उभार सुस्पष्ट दिसत होते. लज्जेने तिने आपला हात बाहेर डोकावणाऱ्या वक्षस्थळांवर ठेवला. याक्षणी तिच्या हृदयाची होणारी धडधड त्याच्या कानी पडत होती.
"हा लज्जेचा पडदा का..?" त्याने तिची हनुवटी उंचावत विचारलं.
तिने मूकपणे लाजून पुन्हा मान खाली घातली. त्याने तिला जवळ घेत कुरवाळायला सुरुवात केली. तिच्या लज्जेच्या आणि त्याच्या पुरूषार्थाच्या क्रिडेत वस्त्रांचे बंधन गळून पडले. कामलीला संपताच तो भानावर आला. काही वेळापूर्वीचा दृढनिश्चय पायदळी तुडवला गेला. तिच्या सौंदर्याने त्याला पुन्हा एकदा त्याच्या मार्गापासून विचलित केले. तो गडबडला. तिच्याकडील पंचा घेऊन त्वरेने आश्रमाच्या दिशेने मार्गस्थ झाला. ती मात्र तृप्त होऊन नुकत्याच मृगाच्या सरींनी तृष्णा विझलेल्या धरणीसारखी त्याच्या वाटेकडे बघत मगाच्या मधाळ आठवणीत गुंगून गेली.
त्याच्या डोक्यात पुन्हा विचारांनी फेर धरला... हेच का जीवनाचे साध्य आहे... मी तर बालब्रह्मचारी.... हे पाप आहे.. परंतु, माझे पाऊल घसरते आहे... दुसरे मन म्हणे... पुरुषाच्या जीवनात स्त्रीचा प्रवेश झाल्यानंतर हे सगळे होतेच जसे विस्तवाजवळ ठेवलेले लोणी क्षणार्धात वितळते. तो तर निसर्गाचा नियम आहे. त्यापुढे माझी इंद्रिये कसा काबू ठेवतील.... पहिले मन पुन्हा सावध करी... ब्रह्मचर्याची हीच तर परीक्षा असते... त्याचे मन कोणत्याही निर्णयापर्यंत येईना. तो जर दिवस आयुष्यात आला नसता तर आज काही वेगळेच चित्र असते.
नेहमीप्रमाणेच आजही भल्या पहाटे तो जागा झाला. चारी दिशा अजूनही काळोखाच्या दुलईत गुरफटून झोपल्या होत्या. सगळा आश्रम निद्रेत बुडाला होता. आपले प्रातर्विधी आटोपून, खांद्यावर उपरणं घेऊन त्या काळोखात तो नदीची वाट चालू लागला. गावही निरागस बाळासारखं शांत निजलं होतं. त्याच्या चालण्याचाच काय तो आवाज त्या शांततेचा भंग करत होता.
थोड्याच वेळात तो नदीजवळ येऊन पोचला. नदीच्या पात्रात अजूनही चांदण्यांनी रांगोळी मांडली होती. रोज ती रांगोळी विखुरणं त्याचा छंदच होता जणू. नाहीतर भल्या पहाटे इतक्या किर्र अंधारात कोणता वेडा नदीवर येईल. तो स्वतःवरच हसला. पलीकडच्या काठावरून वाहत येणारा थंडगार वारा हळूच नदीला स्पर्श करून जायचा. त्याच्या स्पर्शाने पाणी शहारून यायचं. त्या इवलुश्या लाटांवर चांदण्यांची रांगोळी मोठ्या ऐटीत हेलकावे खायची. वाऱ्याची आणि पाण्याची एक वेगळीच प्रेमकहाणी होती. आणि तो त्यांचा एकमेव साक्षीदार.
मागे आचार्य कोणत्यातरी अध्यायाच्या पठणात प्रेम भावनेविषयी सांगत होते. त्याच वेळी त्याच्या मनात काहीतरी चमकून गेले. ब्रह्मचर्य पालन करताना प्रेम या भावनेविषयी त्याला काही कल्पनाच नव्हती. परंतु, त्या एका अध्याय पठणाने ती भावना तरारून वर आली. रोज पहाटे नदीवर येऊन वाऱ्या पाण्याचा खेळ बघत त्यांची प्रेमकहाणी रचण्यात त्याला वेगळाच आनंद मिळत असे. खरेतर आश्रमात असे विचार करणं निषिद्ध होत त्यामुळे त्याच्या मनातल्या कविला गोंजारणारी नदीपात्र ही एकमेव जागा होती. तासनतास तो वाऱ्याच्या झुळकिशी बोलत बसायचा. नदीकाठच्या वाळूत त्याच्या बोटांनी कित्येक कविता रेखाटल्या होत्या. परंतु, आश्रमाच्या सोवळ्यातील वातावरणात कवितेसाठी स्त्री पुरुषातील प्रेम हा विषयच न पटण्यासारखा होता. शिष्यांनी ऋचा लिहाव्यात स्तोत्र लिहावीत फारतर मिरेच्या तोंडून कृष्णासाठी पद लिहावीत. परंतु, राधा कृष्णाचं प्रेमगीत गाणं म्हणजे आचार्यांच्या क्रोधाला निमंत्रण देण्यासारखं होत. म्हणूनच त्याच्या मनात उमलणाऱ्या प्रेमगीतांना तो वाळूतच दफन करत असे.
आजही त्याला काहीतरी सुचत होतं. परंतु, नदीला भरती असल्याने पाणी बरच वरपर्यंत आलं होतं. लिहिण्यासाठी त्याला मनासारखी जागाच सापडेना. चालत चालत तो बराच दूर निघून आला. एव्हाना मनात घोळवून त्याची कविता पाठ झाली होती. आता वाळूवर लिहायचे तरी कशाला..? जवळच्याच गुळगुळीत दगडावर तो पाय सोडून नुकतीच पाठ केलेली कविता गुणगुणू लागला.
अचानक काशाच्यातरी आवाजाने त्याची विचारांची शृंखला तुटली. या समयी कोण बरे इथे असावे. पाण्यावर काहीतरी तरंगताना दिसले. क्षणाचाही विलंब न करता तो चपळाईने पाण्यात शिरला. कोणीतरी स्त्री त्या पात्रात बुडत होती. आत्महत्या करणे हे पाप आहे आणि आत्महत्या करणाऱ्याला ती करू देणे हे महापाप आहे. त्याला शिकवलेली सगळी तत्त्व पणाला लावत तो त्या स्त्रीसह काठावर परतला. पाण्यातून बाहेर निघताच त्याने भरून श्वास घेतला. त्या श्वासाने त्याची भरदार छाती खालीवर झाली. खरंतर परस्त्रीकडे पाहणे उचित नाही परंतु ती स्त्री संकटात असेल तर.... त्याने तिच्या दिशेने मान वळवली.
मूर्च्छितावस्थेतील तिच्या सौंदर्याकडे पाहत तो स्तब्ध झाला. इतकं बावनकशी सौंदर्य त्याने आजवर तेही इतक्या जवळून कधीच पाहिलं नव्हतं. परमेश्वराने अपार कष्ट करून तिला घडवले होते. इतकी नितळ आणि गौर कांती की तिला हात लावला तर कुस्करून जाईल. तिचा भिजलेला चेहरा अजूनच उजळून निघाल्यासारखा वाटत होता. त्यावर चमकणारे जलबिंदू त्याला अजूनच मोहक बनवत होते. तिच्या विशाल भाळावर काही कुंतले आरामात विराजली होती. तिचे गुलाबी ओठ उगाचंच थरथरत होते. भिजून अंगावरील साडी तिच्या बाकदार वळणांवर चिकटून बसली होती. खांद्यावरून पदर केव्हाच ढळला होता. आतील कंचुकी तिचं तारुण्य कैद करण्यास अयशस्वी होती. तिचं उघड पडलेलं पोट, त्यावरून घरांगळणारे पाण्याचे ओघळ कोणालाही आव्हान द्यायला पुरेसे होते. तिच्या अनावृत्त नितळ गोऱ्या पोटावरून हात फिरवायचा त्याला मोह झाला. क्षणभरासाठी आपण कोण, कुठले, इथे का आलोय साऱ्याचाच त्याला विसर पडला. तिची मोहक कांती त्याला खुणावत होती.
त्याच्या शरीराचा थरकाप उडाला. खरंच तिला स्पर्श करू का...? परंतु, हे चुकीचं आहे त्याचं मन त्याला दटावत होतं. इतक्या दाट काळोखात कोण बघणार आहे. त्याचा हात पुढे सरसावला. मोह माणसाच्या मनावर हावी झाला की त्याची सद्सदविवेकबुद्धी घायाळ होऊन खितपत पडते. त्यालाही सावरणं अशक्य होतं... अनाहूतपणे त्याची बोटं तिच्या ओल्या दुधाळ कांतीवर रेंगाळली. त्याच्या अंगभर शहारा फुलला. स्त्री स्पर्श.... आजवरच्या आयुष्यात प्रथमच त्याने कोणत्यातरी स्त्रीला स्पर्श केला होता. इतकी कोमल कांती... न राहवून त्याची बोटं तिच्या कोमल शरीरावर रेंगाळत राहिली. तिची कोमलता त्याला आपल्या हातात सामावून घ्यावीशी वाटत होती. ज्या मनाला भावनेचा पुसटसा स्पर्शही झाला नव्हता त्या मनाच्या तारा हळुवारपणे छेडल्या जात होत्या. काहीतरी होत होतं.... सावकाश.... हळुवार... त्याच्या जाणीवा बधीर होत होत्या त्याच्याही नकळत... एक अनामिक ओढीचा भ्रमर त्याच्या मनाला पोखरत होता..
क्रमशः