मण्यार
मण्यार
मी मोखाडा नावाच्या आदिवासी भागांमध्ये कामाला होते. तेथील ग्रामीण रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून काम करत होते.
अक्षरशः मी स्वतः एका कुडाच्या झोपडीत राहत असे, फक्त वरती कौले होती. बाकी भिंती कुडाच्या. तेथे आम्ही फक्त इन मिन तीन परिचारिका होतो. त्यामध्ये एक जण बारा तासाची दिवस पाळी करायची एकजण बारा तासाची रात्रपाळी करायची. तेव्हा कुठे तिसरीला सुट्टी मिळायची.
अशात माझी एकदा नाईट ड्युटी होती. तिथे जास्त करुन पेशंट (लूज मोशन, आणि स्नेक बाईट) .जुलाब आणि सर्पदंश यांचे येत असत. एकदा तर आम्ही टायगर बाईट चे तीन पेशंट ट्रिट केलेले आहेत.
असेच एकदा माझ्या रात्रपाळी मध्ये सकाळी सकाळी 2/3 आदिवासी, एका एकदम दूध पित्या छोट्या बाळाला घेऊन आले. आणि त्याला सर्पदंश झाल्याबद्दल सांगत होते. त्यावेळी त्या बाळाला बघूनच समजले होते की ते गेलेले आहे. परंतु मी त्याला इमर्जन्सी जी काही इंजेक्शन होती, ती टोचली. आणि माऊथ टू माऊथ रेस्पिरेशन (तोंडाने श्वसन) देण्याचा प्रयत्न केला. पण जशी जशी मी त्याच्या तोंडामध्ये हवा फुंकू लागले, तसे त्याच्या तोंडातून दूध बाहेर येऊ लागले. आणि बाळाची जराही श्वसनाची हालचाल होत नव्हती. त्यामुळे त्याला तसेच झाकून बाजूला ठेवले, आणि त्यांना विचारले अजून कोणी आहे का? त्यावर त्यांनी सांगितले की पाठोपाठ मुलाची आई येत आहे .साधारण अर्ध्या तासाने एका झोळी मधून तिला आणले, ती शुद्धीवर होती आणि माझं बाळ कस आहे? हेच विचारत होती. त्यावर तिला मी खोटेच सांगितले की बाळ चांगला आहे. तुझा बाळ छान आहे, झोपला आहे. त्याला काही झाले नाही. आता तुला औषध उपचार करण्याची गरज आहे, तेव्हा तू लवकर एकदा बेड वरती झोप.
मग तिला सलाईन लावले. सर्पदंशाची इंजेक्शन सलाईन मधून दिले. उपचाराला सुरुवात केली, परंतु हळूहळू तिची तब्येत बिघडत चालली होती. तिथून मोठा दवाखाना जव्हार येथे वीस ते पंचवीस किलोमीटरवर ती असेल. मग त्या लोकांनी बाहेरून ॲम्बुलन्स ठरवले किंवा हॉस्पिटल ने मागवली असेल, कारण आमच्याकडे आमच्या हॉस्पिटलची स्वतःची अम्बुलन्स नव्हती. मला आता एवढे आठवत नाही. परंतु त्या वेळी ॲम्बुलन्स मध्ये घालून तिला मोठ्या हॉस्पिटल ला आम्ही घेऊन चाललो. सोबत मी होते, तेथे आम्ही जव्हारला पोहोचलो .परंतु रस्त्यातच पेशंटचे प्राणोत्क्रमण झाले. हॉस्पिटलच्या दारात गेल्यानंतर की डेड बाॅडी असल्यामुळे ती लोक घ्यायला तयार नव्हते. आता काय करायचे हा मोठा प्रश्न, शिवाय सर्टिफाय केलं पाहिजे, पोस्टमार्टेम केलं पाहिजे , अशा विविध गोष्टी कायद्याच्या दृष्टिकोनातून आडव्या असतात. त्या लोकांनी ठरवले की तीला तसेच पाड्यावरची घेऊन जायचे आणि काय असेल ते विधी करून मोकळे व्हायचे. ही गाडी खरे तर रुग्णवाहिका होती. शव वाहिका नव्हती. परंतु दुसरे वाहन कोठून आणणार? त्यामुळे त्याच ड्रायव्हरला पाड्यावर जाण्यासाठी तयार केले.
ते बच्चू तिकडे आमच्याच हॉस्पिटल मध्ये होते. माझा देखील आदिवासी पाड्यावरती जाण्याचा हा पहिलाच प्रसंग, भीती वाटत होती .
यांची बाई पण गेली, आणि मुल पण गेले. त्याचा राग त्यांनी आपल्यावर काढला तर? आपल्याला मारहाण केली तर? कारण इतर वेळी आदिवासींबद्दल अशा बऱ्याच गोष्टी ऐकून होतो. पाड्यावरती गेल्यानंतर रडारड सुरू झाली, आणि त्यांची भाषा मला प्रॉपर कळत नव्हती,पण त्यातून मला घडलेली घटना समजली ती अशी. पहाटेच्या वेळी घराच्या छता मधून मण्यार नावाचा सर्प छतातून खाली पडला,तो त्या तीन चार महिन्याच्या बाळाच्या अंगावर ,त्याने बाळाला दंश केला आणि बाळ रडायला लागले.
बाळ का रडते म्हणून त्या बाईने झोपेतच बाळाला ओढले आणि आपल्या छातीला लावले. परंतु तिच्या दुर्दैवाने अंधारात तिने बाळाबरोबर त्या सापाला पण ओढले आणि त्याने तिच्या छातीला डाव्या बाजूलाच दंश केला.
जेव्हा तिला स्वतःला दंश झाला तेव्हा ती खडबडून उठली, आणि अंधारात कुठून दिवा लावला असता ती मण्यार त्यांच्या बिछान्यात वेटोळे घालून बसली होती .त्या लोकांनी दिला बघताक्षणी मारले. आणि ते लोक हॉस्पिटल साठी निघाले ,परंतु आईचे म्हणणे असे आधी माझ्या बाळाला घेऊन जा त्याला वाचवा. त्यानंतर मला घेऊन जा.
शेवटी तिच्या समाधानासाठी काही माणसं बाळाला घेऊन पुढे आली. आणि काही अंतर चालल्यानंतर तिला जेव्हा चालायला ,उभे राहायला, जमेना तेव्हा झोळी करून त्या झोळीत घालून एका बांबूला लावून तिला हॉस्पिटलमध्ये आणली, परंतु तिच्या चालण्यामुळे विष शरीरामध्ये भिनले होते. शेवटी आई वाचली नाही आणि मुल ही वाचले नाही. मग आम्ही ती बॉडी ताब्यात दिल्यानंतर मात्र, निघण्याची घाई केली. न जाणो त्यांचा राग आपल्यावर निघाला तर? आणि नंतर असे समजले की, एकाच चिते मध्ये आई, बाळ आणि ती मण्यार सर्वांचे एकत्रच दहन केले.
पहाटे चार वाजल्यापासून या पेशंटच्या मागे पिंगा घालणारी मी ,जेव्हा सगळं संपवून परत हॉस्पिटलला मोखाड याला आले, तेव्हा जवळ-जवळ दुपारचे दोन वाजले होते. आणि त्यानंतर मला एकदम थकवा जाणवला. आणि आपल्याला भूक लागली आहे हे जाणवले.
तेव्हा माझ्या लक्षात आले की, गेले दहा तास झाले आपण तोंडात पाण्याचा एक थेंबही न घेता, या पेशंटच्या माझे धावपळ करत होते. परंतु शेवटी त्याचा काही उपयोग झाला नाही. पण आमच्या हॉस्पिटल करून आम्ही मात्र प्रामाणिक प्रयत्न केले होते यश देणे शेवटी परमेश्वराच्या हातामध्ये होते.
