मनं कधी जुळलीच नाही...
मनं कधी जुळलीच नाही...


"माँ तुझ्यासाठी ना आपण लेहंगा घेऊया अनिव्हर्सरीसाठी..."
"वेडी झाली आहेस का या वयात लेहंगा..."
"अगं तू नेहमी साडी नेसतेस आणि २५ वी अनिव्हर्सरी म्हणजे काहीतरी वेगळं नको का?"
"काही नको मी आणि माझी साडी बरी आणि कशाला हे सेलिब्रेशन वगैरे..."
"कम ऑन माँ, तुमच्या लग्नाला २५ वर्ष होणार मग सेलिब्रेशन नको का आणि हो तुम्ही दोघांनी फक्त उभं राहायचं... बाकीची सगळी तयारी मी आणि माझी गॅंग करणार..."
"अगं कशाला उगीच तुच्या फ्रेंड्सना त्रास..."
"माँ आम्ही नेहमी एकमेकांना मदत करतो, ते तू टेन्शन घेऊ नकोस..."
"बरं बाबा तू थोडीच ऐकणार आहेस..."
'चल माँ मी निघते..."
"आता कुठे?"
"अगं थोडं काम आहे, येते लवकरच..."
रिया गेल्यावर सीमा भूतकाळात पोहोचली. तिचं आणि रमेशचं अरेंज मॅरेज... दोघांचाही स्वभाव एकमेकांविरुद्ध म्हणून नेहमी त्यांच्यात भांडणं व्हायची. रमेशचा अति रागीटपणा तिला नेहमी खटकायचा... असेच नातं टिकवता टिकवता २५ वर्ष लागणार होती. पण आपुलकी त्याच्यात कधीच नव्हती. त्यांना एकुलती एक मुलगी रिया... तिच्या जन्मानंतर नातं सुधारेल, असं सीमाला वाटायचं. पण तसं काही झालं नाही. रिया म्हणजे दोघांचा जीव पण नात्यात असललेली पोकळी त्यांनी तिला कधी जाणवू दिली नाही. सीमाला त्यांचं नातं एक तडजोड आहे असं वाटायचं. पण नशिबात तसेच लिहिले आहे तर मग काय...
एवढ्यात दाराची बेल वाजली आणि सीमाची विचारांची तार तुटली...
दरवाजात रमेश उभा... रमेश फ्रेश होऊन हॉलमध्ये येईपर्यंत सीमाने त्याच्यासमोर चहा आणि बिस्कीटे ठेवली...
"रिया कुठे गेली, दिसत नाही ती..."
"ती जरा बाहेर गेली आहे..."
"आपल्या अनिव्हर्सरीचा घाट घातला आहे तिने..."
"ती आणि एक आहेस तशी लाईफ राहणार आहे, काही बदलणार आहे का?"
"जाऊ द्या पोरीचं मन नको दुखवायला..."
"बरं..."
एवढ्यात रिया येते...
"ही बघा आली..."
"हे बच्चा कुठे गेलेलीस?"
"काही नाही बाबा सीक्रेट आहे ते..."
"बाबाला नाही सांगणार सीक्रेट..."
"नाही, तुम्ही फक्त येत्या बुधवारी संपूर्ण दिवस घरात राहा. मीटिंग वगैरे असेल तर पोस्टपोन्ड करा..."
"अगं पण..."
"मी काहीही ऐकणार नाही, इट्स माय ऑर्डर..."
"ओक्के बच्चा, नाही जाणार कुठे तुझ्यासाठी..."
"माझ्यासाठी नाही... माँसाठी... तो दिवस फक्त तुमचा दोघांचा असेल..."
"म्हणजे?"
"बाबा त्या दिवशी सकाळी तुम्ही गणपतीच्या देवळात जाणार..."
"बेटा मी कधी देवळात वगैरे नाही जात..."
"पण बाबा त्यादिवशी तुम्ही जाणार आणि तेही जोडीने कळलं..."
सीमा मनातून आनंदित होत होती. कधीच रमेश तिच्याबरोबर देवळात गेला नव्हता.
चला माझी पोर माझी इच्छा पुरी करते हे गणराया म्हातारपणी तरी आमचा हा दुरावा संपून जाऊ दे...
आणि तो दिवस उजाडला, सकाळी देवदर्शन झालं. रिया आणि त्यांच्या गॅंगनी पूर्ण घर सजवलं. सगळी तयारी झाली होती. संध्याकाळ होताच निमंत्रित येऊ लागले. पूर्ण घर गजबजून गेलं. डीजेच्या संगीताने घर थिरकू लागलं. केक कट झाला... डान्सपण रियासाठी दोघांनी केला... फोटोसेशन झाले... आठवणीत राहणारा सोहळा पार पडला... हळूहळू निमंत्रित घरी निघाले. रमेशही त्याच्या ऑफिस क्लायंट्सला गेटपर्यंत सोडण्यासाठी गेला. आता घरात फक्त रियाची गॅंग आणि सीमा होती. सीमाला भरून आलेलं. तिने जाऊन रियाला घट्ट मिठी मारली.
"माँ काय झालं?"
"थँक्स आजचा दिवस मी कधीही विसरणार नाही, जो तू मला दाखवलास..."
"माँ थँक्स का?"
"तू एन्जॉय केलंस ना मग झालं..."
"अगं तू रडतेस का?"
"काही नाही गं..."
"माँ माँ रिलॅक्स..."
"ओक्के माझ्या बच्चा, तू तुझ्या फ्रेंड्सबरोबर बस... मी रूममध्ये आहे..."
सीमा तिथून निघून रूममध्ये आली.
आज २५ वर्ष झाली एकमेकांच्या साथीला... जे आम्ही कधीच जगलो नाही ते पोरीमुळे काही क्षणासाठी जगले... मी का रडत होते हे तुला कसे सांगू बच्चा आज आम्ही सेलिब्रेशन केलं २५ वर्षाचं पण आमची मनं कधीच जुळली नाही...