Pradip Joshi

Comedy Others

3  

Pradip Joshi

Comedy Others

मंदी

मंदी

5 mins
853


सकाळचे पाच वाजलेले. कोंबडयांनी आरवायला सुरवात केली तसा समदा गाव जागा झाला. पाचशे घराचा उंबरा असलेल्या नीमगावाला झोपेतन जाग करण्याचं काम गावातले कोंबडे करीत होते. मारुतीच्या देवळातला पुजारी सनई लावायचा अन त्यानंतर हळूहळू सार गाव झोपेतन जाग व्हायचं. गावात कामापुरते शिकलेल्यांची संख्या मोठी. सातवी पर्यंतच्या शिक्षणाची सोय असल्याने गावंच सरपंच काही सदस्य अन चार दोन महिला वगळता समदे अंगठे बहाद्दूर. पारावर किंवा ग्रामपंचायतीच्या कट्ट्यावर बसून गप्पा मारायच्या एकमेकांची उणिदूणी काढायची एवढाच त्यांचा दिवसभराचा उद्योग. गावात तरण्यापेक्षा म्हातारी माणस जास्त. त्यामुळं सकाळ काय दुपार काय अन संध्याकाळ काय गावात तशी शांतताच. 

आज मात्र तराळ जस पहाटे पहाटे गावातन दवंडी देत फिरायला लागलं तस गावातली सारी शांतताच भंग झाली.

ते नुसतच “गावातल्या बाजारात मंदी आलीय. सावधान” अस म्हणत फिरत होत अन समध्यांच लक्ष जावं म्हणून तडम तडम ताशा वाजवत होत. एकतर अर्धवट झोपेतन गाव जागा झालेला. तो काय म्हणतोय कुणालाच काय बी कळना. काही म्हाताऱ्यांना वाटलं आयला गावात पुन्हा नसबंदी आली वाटत. मागचा अनुभव जमेस धरून ती सकाळी सकाळीच घाबरून गेली. काही म्हाताऱ्यांनी नुसता मंदी एवढाच शब्द ऐकला. ते काय समजायचं ते समजले. गेल्या चार दिवसांपासून परिसरात मंदीचा मुक्काम होता. लोकनाट्य तमाशा सुरू होता. आज रातच्याला करमणूक हाय एवढाच अर्थ त्यांनी काढला.

घड्याळात नवाचा ठोका पडला तस ग्रामपंचायतीचा कट्टा, पार गर्दीने अगदी फुलून गेलं. ज्याला त्याला तराळाने दवंडी काय दिली हे जाणून घ्यायची घाई झाली होती. रामन्ना हे गावातील एक पात्रच होत. चौकशा करण्यात ते लई पटाईत होत. गावात कुठं काय घडतंय याकडं त्याच समद ध्यान असायचं. त्यानं कांन टवकारून विषय काढला. समध्याना उद्देशून ते म्हणाल, “ आर तो तराळ पहाटे पहाटे काय केकटत हुता” एक जण म्हणाला ,” आर बाजारात मंदी आलीया अस म्हणत चालला हुता” ही मंदीची काय भानगड या इचारात समधी हुती. पण नक्की काय ते कळत न्हवत. 

तेवढ्यात शंकररावांनी डोकं चालवलं. ते म्हणाले, “ आता आलं समद ध्यानात. बारा वर्षांपूर्वी अशीच मंदी आपल्या गावातल्या बाजारात आली हुती. सारी घर बरबाद करून गेली. दर बारा वर्षांनी तिचा फेरा असतो म्हण. त्यावेळी मंदीला गावाबाहेर जाण्यासाठी लई उपाय करावं लागलं. “

झालं शंकररावांनी एवढं सांगितलं अन चर्चेला रंगतच आली. प्रत्येकजण आता डोळ्यासमोर मंदीच चित्र रंगवू लागला. कुणाला वाटलं मंदी तमासगिरीण आली. कुणाला वाटलं मंदीच्या रुपात गावात हडळीचा शिरकाव झाला.कोण मंदी नावाची नर्स किंवा मास्तरीण आली असा अंदाज बांधू लागले. मंदी म्हणजे नक्की कोण याचाच सारा गाव विचार करू लागला . त्यांच्यात ही चर्चा सुरू असतानाच ग्रामपंचायतीचा शिपाई लगबगीने जाताना दिसला. समध्यांनी त्याला थांबवलं अन घाईघाईत कुठं चाललास म्हणून विचारलं. तो म्हणाला,” सांगतो परत सध्या लई घाई हाय. सरपंच शाळामास्तर तिकडं पंचायतीत वाट बघत्यात. आज एक अर्जंट मिटींग हाय. मंदीन काहीतरी घोळ घातलाय” 

एवढं बोलून ते गेलं अन जो तो आता पुन्हा तर्क लढवू लागला. आयला आपल्याला अंधारात ठेवून सरपंच अन मास्तर त्या मंदीच्या माग लागल्यात. काय तरी केलं पाहिजे अशी आता पारावर कुजबुज सुरू झाली. तेवढ्यात सकाळचं ते तराळ पुन्हा दवंडी देत निघालं” ऐका हो ऐका बाजारात मंदी आलीय. पंचायतीन आज दुपारी मिटींग बोलावलीय. सर्वांनी हजर रहावे हो??” दवंडी ऐकली तशी समधी माणस उठली. घराकडं गेली. घरातल्या बायकांना देखील आखरीत वाटायला लागलं. म्हाताऱ्याना रोज बोलवून जेवाव घालावं लागत हुत. आज आपल्या मनानं जेवायला ही कशी काय आली याचाच बायका इचार करीत हुत्या. 

घराघरातली पुरुष मंडळी जेवताना सांगत हुती. “ गावच्या बाजारात म्हणे मंदी आलीय. पंचायतीत समध्याना बोलावलंय. जरा बघून येतो मंदीला. “ बायकांनी सल्ला दिला, “ जाताय पण जरा जपून. आपल्याला धड नीट उभं राहता येत नाही. लई जवळ जाऊ नका. मंदीचा एक तडाखा देखील सोसायचा नाय.” बायकांचं बोलण ऐकत त्यांनी चार घास कस तरी खाल्लं. मिटींगला जाण्यासाठी सज्ज झाली.

इकडं बायकांच्यात कुजबुज सुरू झाली. साळकाया माळकाया पण एकत्र आल्या. “ अग ये चल की पंचायतीत. बाजारात म्हण मंदी आलीय. समद गडी गेल्यात आपण बी जाऊन बघू या की? आपल्या संसाराचा प्रश्न हाय “ अस सांगत सांगत साऱ्या बाया देखील तिथं येऊन पोहचल्या.

मंदीची भानगड काय हे ऐकण्यासाठी सारा गाव पंचायतीत जमा झाला. जो तो मंदी कुठाय याची विचारणा करू लागला. मंदी कशी असेल याचे चित्र रंगवू लागला. घरातल्या बायांनी बाप्याना मंदीशी लई जवळीक करू नका असा दम देऊनच मिटींगला पाठवले होते. त्यात बाया देखील आल्यानं गडी थोडं नरमलच होत. 

नेहमीच्या पद्धतीनं शाळा मास्तर बोलायला उभे राहिले. ते म्हणाले “ लोकहो साऱ्या जगात मंदी आली आहे. आपलं गाव तरी त्यातून कस सुटणार? ती येऊ नये म्हणून सरपंचानी लई प्रयत्न केले. पण त्यांचे प्रयत्न देखील मंदीला थोपवू शकले नाहीत. ती थेट बाजारात येऊन पोहचली. आपणच आता सर्वांनी मिळून तिचा बंदोबस्त केला पाहिजे.“ 

तेवढ्यात शंकरराव उठले व म्हणाले, “ आयला मला एक कळत नाही सरपंचानी आत्तापर्यंत भल्याभल्याना अडवलं. एका मंदीला ते आडवू शकले नाहीत. त्याच वेळी आम्हाला बोलवलं असत तर काय बिशाद होती मंदीची या गावात येण्याची. आता आलीच आहे तर माज धान्याचं कोठार रिकामच आहे. तिचा बंदोबस्त होइपर्यंत राहू ध्या तिला. “ 

त्यांचं बोलण मध्येच तोडत पांडूनांना म्हणाले” हे बघा आता गावात मंदी आलीच आहे तर राहील महिनाभर. अन तुमच्या गोदामात का? माझं नव घर रिकामच हाय की? नायतर या वयात मला तरी करमणुकीला कोण हाय? ती कशी आहे ते तरी दाखवा. काय तिच्यावर खर्च येत असेल तर मी एकटा तो करीन त्यासाठी आपण वर्गणी काढू नये. पण तिला आता हातची सोडू नका. कधी नव्हे ती संधी गावाला मिळाली आहे?”

त्याच हे बोलण ऐकून राजक्का उभी राहिली. ती म्हणाली,” काय म्हणावं या पुरुषांना. गावाला सवत आणण्याचा इचार हाय का तुमचा? आधीच नवऱ्याना कस संभाळतोय आमचं आम्हाला माहीत. त्यात या बयेची भर कशाला? सरपंच साहेब तिला आजच्या आज गावातन हाकलून ध्या. “

सरपंच व मास्तर एकमेकांकडे बघून हसू लागले. त्यांना अन लोकांना काय बी कळना. शेवटी सरपंच उठले आणि सांगू लागले, “ तुमचा काही तरी गैरसमज झालाय बाबांनो. मंदी ही कोणी बाई माणूस नाही. समदे व्यवहार ठप्प होऊ लागलेत. वस्तुंना मागणी नाही. उठाव नाही. समाजात पैसे फिरत नाहीत. उत्पादनात घट झालीय. मंदीचे सावट गावावर आलंय. त्यातून आपण मार्ग काढला पाहिजे. “ 

सरपंचाचे म्हणणे ऐकले अन एकेकजण हा आपला विषय नाय अस समजून उठून जाऊ लागला. जाता जाता आयला उगाचच येळ खाल्ला असा शेरा देखील त्यांनी मारला. काही मोजकी मंडळी आता उरली. प्रत्येकजण आपापल्या परीने मंदीची माहिती देऊ लागला. एक युवती म्हणाली, “ मोबाईलवर सुद्धा मंदीची लाट आलीय. पूर्वी कसे कमेंट लाईक भराभर मिळत होते आज त्याचे प्रमाण घटल आहे. फेसबुकवर कोणी फोटो टाकत नाही. मेसेज टाकत नाहीत. मोबाईल पहायला सुद्धा नको असे वाटते. त्यावर देखील काय उपाय आहे का बघा. “ तीच हे बोलण मोबाईलवर खेळणाऱ्यांना पटलं. त्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

एका घरकाम करणाऱ्या महिलेने सांगितले,” घरात सुद्धा मंदी आहे. रोज भाकऱ्या बडवून बडवून आमचं कम्बर्ट ढील झालं. ना मटण, ना अंडी, ना गोडधोड. रोज आपली आमटी, पोळी, भाजी, भात. कंटाळा आलाय रोज तेच तेच करून अन खाऊन पण करणार काय घरात मंदी आहे ना?”

शाळा मास्तर म्हणाले, “ अहो मंदी काय फक्त तुमालाच हाय का? शाळेला बी फटका बसलाय. या मंदीन पोरांची गळती सुरू केली. एकेक तुकड्या बंद व्हायला लागल्यात. नोकरी जाते की काय असे वाटते?” 

दामुच किराणा दुकान होत. ते म्हणाले,” आयला दिवाळीसाठी खोलीभर माल भरून ठेवलाय पण कोण फिरकल तर शपथ. या मंदीन अगदी जीव बेजार करून टाकलाय. कधी बया गाव सोडतिया काय माहीत?”

शेवटी मंदी सर्वच ठिकाणी आहे त्याला सामोरे जाणे हा एकमेव पर्याय आहे असा सूर मिटींग मध्ये व्यक्त झाला. समज, गैरसमज दूर होऊन अखेर मंदी प्रकरणावर पडदा पडला. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy