मिस. अश्विनी देशपांडे
मिस. अश्विनी देशपांडे


मनाची द्विधा मनःस्थिती, मनाची चलबिचल आणि विचारांच्या गुंतवळ्यात अडकलेला एक एक विचार तपशीलासहीत अलगद बाजूला सारून पडलेल्या प्रश्नांची उकल शोधण्यात तल्लीन होतो... दोन्ही हातांची बोटे एकमेकांत अडकवून त्याची आडवी उशी तयार करून मानेच्या वरच्या भागाला त्या उशीचा आधार देऊन, काळसर रंगाचे असलेले सागाच्या लाकडापासून बनवलेल्या त्यावर नाजूक नक्षीकाम असलेल्या आराम खुर्चीत, हलकासा झोका घेत मी बसलो होतो. ये-जा करणारी वाऱ्याची झुळूक झाडांच्या फांद्यामधून सळसळ आवाज करत, बागेतील लाल मातीला सोबत घेऊन वाहत होती. अधूनमधून त्या वाऱ्याची झुळूक मलाही स्पर्शून जात होती. ढगांच्या आड दडून बसलेल्या सूर्याची सोनेरी काही किरणे एका कोपऱ्यातून थेट भूतलावर पडत होती, तर काही किरणे ढगांच्या मस्तकालगत वरचेवर लांब लांब पसरलेली होती. विविध पक्ष्यांचे थवे आकाशात उंच उंच विहार करत होते. काही लहान पक्षी माझ्या बाल्कनीच्या समांतर रेषेत घिरट्या घालत होते. पक्ष्यांचा किलबिलाट माझ्या कानी पडत होता. बिल्डिंगच्या खाली तसेच रस्त्यावर एकही चिटपाखरु फिरताना दिसत नव्हते. वेळ सत्कर्मी लागावा म्हणून अधूनमधून कविता, चारोळी नजरेखालून घालत होतो, सभोवतालच्या वातावरणाशी एक रूप होऊन डोळे मिटून शांत बसलो होतो.
लॉकडाउन पुन्हा वाढतच आहे. मनावर वाढत जाणारा ताण त्यामुळे मानसिकतेवर काही प्रमाणात बदल होतानाची अनुभूती प्रत्येकाला जाणवतं आहे. राग राग होणं, भांडण, वादविवाद, तीच तीच तोंड पाहणं. या स्थितीत बाहेरच्या लोकांशी तुटलेला संपर्क, मित्र- मैत्रिणी यांच्याशी न झालेल्या भेटीमुळे येणारी आठवण, होणारी चिडचिड, घरी बसून गेलं जाणारं काम पण पगार मिळेल का नाही याची चिंता, रेल्वे प्रवास, चित्रपट पाहता न येणे, मराठी नाटकं न पाहता येण्याची खंत, शाळा-कॉलेजच्या काही परीक्षा पुढे ढकलल्या तर काही रद्द झाल्या, रोज घरचे तेच-तेच जेवण या सगळ्याच गोष्टींनी लोकांची मानसिकता बदलली आहे. ताण घालवण्यासाठी मग, ऑनलाईन चित्रपट पाहणं, मित्रांना व्हिडिओ कॉल करणं, पुस्तके वाचणं, लेख-कविता लिहिणं, दूरदर्शनवरील जुन्या मालिका पाहणं... प्रत्येकाने भिन्न स्वरूपाचे मार्ग अवलंबले पण आपली सहनशीलता जिथे संपते तिथेच या मार्गांना वाटा फुटतात. अजून किती दिवस हे चालणार.... नुसतं लॉकडाउन...... याच विचारांनी डोळे उघडले व चार ओळी सुचल्या....
अदृश्य या विषाणुचीे अदाच जरा न्यारी,
ना चायनीज ना पाणीपुरी वडापाव ही नाही
उलगडावे दिवस तशी तीची उजळताही गेली,
लॉकडाऊन संपत नाही तोवर, फेअर अँड लवली ही नाही...
वा वा....!!!! क्या बात हैं। खरंतर मला हे कविता वगैरे लिहीणं जमतं नाही, माझे मित्र कविता करत असतात त्यांच्या कविता किंवा चारोळी ऐकून माझ्याही पाठ झाल्या आहेत. तेवढ्यात कानावर अश्विनी ये ना... ये ना... जगू कसा तुझ्याविना मी राणी गं.... हे गाणं पडतं आणि तेच गाणं मी गुणगुणायला सुरुवात केली. त्या गाण्याचे बोल आणि संगीत एक नंबर... तितक्यात माझ्या मोबाईलवर एका (unknow) नंबरवरून कॉल येतो. गाणं गुणगुणतच मी तो कॉल उचलतो. अश्विनी ये ना... ये ना.... प्रिये जगू कसा......माझं गुणगुणन सुरूच असतं..... ऐका दाजीबा... ऐका दाजीबा, गावात होईल शोभा हे वागणं बरं नव्हं..... माझ्या गाण्याला समोरून प्रतिसाद आला... बाप रे माझ्या इथे जशी अश्विनी आली, तसं त्यांच्या इथे दाजीबा वाटतं.
मी परत एक खडा टाकला, तो कबीर सिंगला घेऊनच.... दिल का दर्या... बह ही गया... इश्क़ इबादत... माझं गाणं गुणगुणनं सुरू असतानाच, गोव्याचे किनाऱ्याव , नाखवा व्हरीन नेशील का? निले सागरी दुनियेची सफर देशील का?....परत तसाच प्रतिसाद... आमच्या अनोळखीची एक आवड समुद्रकिनारा जुळतोय, याचे क्षणिक सुख प्राप्त झाले.
हॅलो...हॅलो.... मी कोणाशी बोलतेय मला कळेल का...?
अहो...! तुम्ही कॉल केलात, तर पहिले तुम्ही सांगा, तुम्ही कोण बोलत आहात...? तुम्हाला कोण हवंय..??
मी अश्विनी... अश्विनी देशपांडे.
माझ्या गाण्याचा इतका अचूक नेम लागेल असं वाटलंही नव्हतं. मधलं नाव रत्नाकर आणि आडनाव सागर असतं तर काय संयोग जुळून आला असता.
हॅलो..! अश्विनी आपल्याला कोण हवंय...?
मला संकेत जोशी यांच्याशी बोलायचे आहे..
मला अचानक एका (unknow) नंबर वरून कॉल येतो... कानाला लावलेला फोन मी डोळ्यासमोर धरून पाहतो, की नंबर ओळखीचा तर नाही ना.. ओळखीतला नंबर नव्हता. मी परत कानाला फोन लावला.
हॅलो... हॅलो... आपण संकेत बोलताय का...?
हॅलो...! हॅलो... हो मी संकेतच बोलतोय, बोला...!
अरे...., संक्या मी बोलतेय.
काय गंमत आहे पाहा; सुरुवातीला अनोळखी, दोन सेकंदापूर्वी जाणून घेतले की फोन योग्य व्यक्तीला लागला आहे का...? फोन योग्य व्यक्तीलाच लावला हे कळल्यावर डायरेक्ट 'संक्या'... केवढी ती आपुलकी केवढा तो विश्वास, मी त्याकडे दुर्लक्ष केले...
माफ करा...! मी नाही ओळखलं आपल्याला.
कसं ओळखणार तू किती वर्षानंतर बोलतोय आपण... तू खरंच ओळखलं नाही का मला...? गंमत करतोस...? अश्विनी... रोल नंबर १७.
आज नंबर काय माझा पाठलाग सोडेना... आधी फोन नंबर(unknow) त्यात ही मुलगी आणि आता रोल नंबर... नंबर माझ्या पाचवीलाच पूजलेला दिसतोय... तुमचा १७ रोल नंबर ठीक आहे, पण अजूनही मी आपल्याला ओळखलेलं नाही.
अरे...! असं काय करतोस. अश्विनी.... अजूनही नाही ओळखलंस... अरे..! चिंगी रे...
क्षणभर विचार केला आणि आठवलं ही माझी पहिली क्रश... हिला कसा विसरलो. अगं...! चिंगी तू...? माझ्या बोलण्यातला आत्मविश्वास वाढला. एक तर मुलगी... त्यात वर्गमैत्रिण वरून माझी पहिली क्रश... चिंगी, ओळखलं ओळखलं, आज अचानक फोन...? माझा नंबर मिळाला तरी कुठून...? सध्या आहेस कुठे...? करतेस काय...? एका दमात विचारताना फार दमछाक झाली हो..! परंतु तिने दमा दमाने सगळं सविस्तरपणे सांगितले...!
तिला ओळखल्यापासून माझ्या मनात राहून राहून एकच प्रश्न घोळत होता.... वेळ संधी न दवडता जरा दबक्या आवाजात मी विचारलं, चिंगी तुझं लग्न झालं का....? खणखणीत नाही उत्तर ऐकून तर, माझा आत्मविश्वास अजून द्विगुणित झाला. मग तिने मला काही प्रश्न केले, असं करत करत आमच्या संवादातील प्रवासाची गाडी सुरुवातीला फक्त ट्रॅकवर न्यूट्रलमध्ये उभी होती, जुन्या आठवणींना उजाळा देत संवादाची गाडी पहिल्या गियरवर पडून हळूहळू खऱ्या अर्थाने पुढे जाऊ लागली.
मी आणि चिंगी एकाच परिसरात राहायचो, माझ्या बिल्डिंगपासून बरोबर तिसऱ्या बिल्डिंगमध्ये तिचं घर. आम्ही शाळेत एकत्रच जायचो-यायचो, एकाच वर्गात होतो. खेळायला एकत्र, अभ्यासाला एकत्र, कधी ती माझ्या घरी जेवायला यायची तर कधी मी तिच्या घरी जेवायला जायचो. महाविद्यलयातही एकत्रच होतो. शाळेपासूनच मला ती आवडायची. थोडी रडकी तर खूप मजेशीर अशी होती चिंगी....
हॅलो... संकेत शाळेतले दिवस आठवतात तुला.... मी कधी एकटी असले ना, शाळा कॉलेजमध्ये घालवलेले दिवस आठवत असतात. खूप मस्त वाटतं.
हो, ना... मलाही आठवतात शाळा कॉलेजचे ते दिवस... इतकं सहजासहजी नाही गं, नाही विसरता येऊ शकत. कैरी, चिंच, बोराचे चोचले होते न्यारे शाळा कॉलेजमधले ते दिवसच ते प्यारे मित्र-मैत्रिणी सोबत केले होते... दंगे परीक्षाखेरीज नुसते अभ्यासाचे फंदे नुकत्याच वाचलेल्या कवितां पैकी या चार ओळी आठवल्या लगेच बोलून घेतलं, मोका भी हैं... मौसम भी हैं... दस्तूर भी हैं... लहानपणापासून माझं एकच तत्व संधी सोडायची नाही. हिच्या बाबतीत तेवढी संधी हुकली गेली. असो, संधी पाहून चार ओळी नजरेस पडल्या म्हणून बोललो, काय योग म्हणावा..धन्य तो वैभव एका चुकीमुळे त्याच्या प्रेयसीची कवितांची वही माझ्याकडे राहिली. वैभव नकळत का होईना माझ्या कामी आलास रे!.
अरे... संकेत किती मस्त कविता केलीस तू... सॉलिड यार... तू कधी बोलला नाहीस हं, हे कविता वगैरे कधीपासून...? ही सगळी त्या लॉकडाउनची कमाल, मी मनात म्हटलं... अगं हा एक कवितेचा प्रकार आहे. याला चारोळी म्हणतात, कारण ही फक्त चार ओळींचीच
असते, हे सांगताना काय कमालीचा आत्मविश्वास माझ्यात होता, याच कॉन्फिडन्सने मी तिला विचारलं, तुला खरंच, ही चारोळी आवडली का....?? मला बरं वाटावं म्हणून म्हणतेस...?
छे छे....! खूप आवडली आणि अगदी खरं मनापासून सांगते..... आता तर माझ्या कॉन्फिडन्सची लेव्हलच वाढली. कारण माझ्या हातात कवितेची वही. एक विनंती होती, मला अजून एक ऐकवशील... तिने अगदी आत्मीयतेने विचारलं. समोरून धावत आलेली आयती संधी का सोडायची, म्हणून कानाला लावलेला मोबाईल मांडीवर ठेवला, हातात असलेल्या वहीचे मधले एक पान उघडले, पुन्हा मोबाईल कानाला लावला, आपले बिंग फुटू नये अगदीच घाई नको म्हणून....
तुला खरंच कविता ऐकायची आहे...? मी पूर्ण तयारीनिशी प्रश्न केला.
हो... हो! अर्थात ऐकायची आहे. पण मला एक सांग हे तुला कविता कशा काय सुचतात....? तिने विचारलेल्या प्रश्नात प्रशंसा होती....? का संशय?? एका लेव्हलवर आलेला कॉन्फिडन्स ढासळू न देता, सरळ कानाडोळा करत मी प्रशंसाच असेल हेच गृहीत धरलं....
सगळी तुझीच कृपा सखे आवाज तुझा ऐकता शब्द सहज फुटती चार ओळी लिहिल्या की होते चारोळी मी कवितेरूपी अलंकारिक उत्तर दिलं. त्या वहीची कमाल..... मी मनोमनी वैभवला मिठी मारली, ते जास्त सोपं होतं, वा..काय होतास आधी आणि आता बघ कवी व्वा! व्वाह!! कमाल आहात..., तुमची प्रशंसाच करावी तेवढी कमी... कोण होतास तू, काय झालास तू..... मी कवी नाही तिच्या मते आहे, तिला खोट्या भ्रमात ठेवणं पटत नव्हतं. कवी होण्यासाठी साहित्यिकांच्या साहित्यिक लेखनाचा गाढा अभ्यास लागतो. मी अर्थशास्त्राचा प्राध्यापक अर्थशास्त्र चूक किंवा बरोबर हे सांगत नसतं, Demand = Supply अर्थशास्त्राचा बेसिक नियमानुसार मी फक्त नियम पाळत होतो आणि आता हिच्यासाठी कवी होणं म्हणजे माझ्यासाठी तारेवरची कसरत, नको जाऊ दे तिला वाटतोय ना मी कवी तर सध्या मी कवीच....
हॅलो कवीराज... कुठे गुंतलात...??
मी कुठे गुंतलोय... हॅलो...हॅलो चिंगी... हॅलो... तिचा फोन कट झाला. पुन्हा लावतो तर Switch off. काय झालं असावं....? मी कवी नसल्याचा तिला अंदाज तर... छे छे नाही नाही.... आमचं बोलणं अर्धवट राहील, बोलण्याच्या ओघात किती व कसा वेळ गेला समजलेच नाही. कानाला लावलेला फोन आणि मांडीवर असलेली वही खुर्चीच्या बाजूला असलेल्या एका चौकोनी लहान स्टूलावर ठेवले. बऱ्याच वर्षांनी ऐकलेला अश्विनीचा आवाज सतत कानात घुमत होता. नजरेसमोर उभे राहिले ते कॉलेजमध्ये पाहिलेले तिचे मोहक रुप.. नजरेआड अजिबात होत नव्हते.
तो दिवस मला आज ही आठवतो, जेव्हा तिने कॉलेजच्या गेटमधून आत प्रवेश केला, डोक्यावर केशरी रंगाचा कडक फेटा त्या फेट्यावर शान वाटेल असा अर्धवर्तुळाकार ताठ उभा असलेला तुरा... मुकुट शोभे मस्तकी तेज तेजस्वी नयनी ललाटी चमके चंद्रकोर साजवी सुंदर लटके नथ असे सौंदर्यरूप तिचे चित्त वेधून घेई मज.... चिंगीबद्दलची माझ्या मनी असलेली भावना स्पष्ट, निखळ, निस्वार्थी आणि पारदर्शी आहे म्हणून तर मनातील उत्कट भावनेतून तिच्या सौंदर्याचे वर्णन काव्यात्मक स्वरूपात बाहेर पडले. जिथे माझा आणि काव्याचा आसपासही संबंध नाही तिथे अगतिकपणे काव्य सुचणं, ही गोष्ट मला अचंबित करणारी. जर ही चारोळी चिंगीने ऐकली तर खुश होईल... असं म्हणून मी स्टूलावर ठेवलेला फोन हातात घेतो, आलेल्या नंबरवर पुन्हा फोन करतो फोन Switch Off. आता तर हद्दच झाली. काहीच न सांगता बोलणं अर्धवट ठेवून फोन बंद करणे. मला तिचा रागही येत होता आणि मनांत प्रश्नांची सरमिसळ होत होती. फोन ठेवायचं नक्की कारण काय...? चिंगीचे बाबा स्वभावाने कडक शिस्तीचे फोनवर जास्त वेळ बोलणं आवडतं नसावं म्हणून तर फोन काढून घेतला नसेल ना.. किंवा कोणी एखादा मुलगा सतत कॉल करून त्रास देत असेल म्हणून...? नाही नाही... हे शक्य नाही. माझी अस्वस्थता वाढतच होती.
तितक्यात फोनची रिंग वाजली, पुन्हा unknown नंबर मी फोन उचलला तर समोरून रडण्याचा आवाज येत होता. हॅलो संकेत... हॅलो.. तिचा फक्त रडण्याचा आवाज येत होता, मला काहीच सुचतं नव्हतं, छातीत नुसती धडधड होत होती, काय झालं या विचारानेच हात पाय कापत होते, तरी स्वतःला सावरून तिला बोलायला प्रवृत्त केलं.
हॅलो...चिंगी तू आधी शांत हो, मला नीट सांग काय घडलंय...?
माझं तुझ्याशी फोनवर बोलणं बाबांना आवडलं नाही, त्यांनी माझा फोन भिंतीवर आपटून तोडून टाकला, आता मला आतल्या खोलीत बंद करून ठेवलंय, पण नशिबाने आईचा फोन आतच होता. तिच्या मोबाईलमध्ये तुझा नंबर सेव्ह केला म्हणून तर तुझ्याशी बोलू शकतेय. तिचे हे बोलणे ऐकून तर माझ्याही तोंडातून शब्द फुटत नव्हते, पुढे जे तिने सांगितले ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमिनीच सरली... मी काही न बोलता ऐकत होतो..
हॅलो संकेत... हॅलो, नाव घेतानाही हुंदका देत होती.... मला माफ कर पण जे आपल्यात बोलणं झालं ते शेवटचं बोलणं, यापुढे माझ्याशी कुठल्याच प्रकारे संपर्क करण्याचा प्रयत्न करू नकोस, या नंबरवरदेखील फोन करू नकोस... तिच्या या बोलण्यावर माझा विश्वासच बसत नव्हता. कुठे आम्ही एकत्रे येऊ असा वाटणार विश्वास पार धुळीला मिळाला होता. मगापासून सुरू असलेली मनाची घालमेल तगमग का झाली याचं कारण आता उमगलं, माझ्या अश्रूंना वाट करून देत बाल्कनीत बसून रडू लागलो. तिने फोन ठेवला मी जोर जोरात चिंगी....चिंगी आकांताने हाका मारू लागलो...
माझा आवाज ऐकून आई आतल्या खोलीतून बाल्कनीत आली तिने मला अक्षरशः हलवून उठवलं, अरे काय... झोपेत ओरडतोस....किलकिले डोळे करून पाहिलं तर आईच मला उठवत होती, मी पूर्णतः भानावर आलो, म्हणजे आता जे मी पाहिलं ते स्वप्न होतं, हे कळल्यावर मी सुस्कारा सोडला, स्टूलावर ठेवलेला मोबाईल हातात घेतला. अजूनही अश्विनीचा कॉल आला नव्हता... मी मोबाईल चार्जिंग करत ठेवला. तोंड धुण्यासाठी आत गेलो. अस्वस्थपणे तिच्या फोनची वाट पाहत फेऱ्या मारत होतो. बराच वेळ सरल्यावर माझ्या फोनची रिंग वाजली मी मोबाईल घ्यायला धावलो, फोन उचलला...
हॅलो संकेत.. चिंगीचा आवाज ऐकून मी पूर्णतः सुखावलो. सॉरी संकेत आपलं बोलणं सुरू असतानाच माझा फोन Switch Off झाला, सॉरी तुझ्या मनात नक्कीच नको ते प्रश्न निर्माण झाले असावेत. गैरसमज निर्माण झाला किंबहुना राग ही आला असेल म्हणून आधीच सॉरी म्हणते... खूप आपुलकीने तिने माफी मागितली.
अगं...! त्यात काय सॉरी म्हणतेस, होतं असं... मला कल्पना होती की मोबाईलची बॅटरी उतरली असेल म्हणून फोन Switch Off झाला असणार. माझ्या मनात कुठलेच प्रश्न उद्भवले नव्हते. मला राग अजिबात आला नाही. मी एकदम कूल माणूस आहे, अशा छोट्या छोट्या गोष्टी मी मनावर कधीच घेत नाही. फोनवर बोलता बोलता मी बाल्कनीत गेलो. तिन्ही सांजेला निर्माण झालेले वातावरण एक सुप्त आनंद देत होते. आमचं बोलणंही जास्तच रंजक, मनसोक्त काही प्रमाणात रोमँटिक होत गेले....
तुला एक प्रश्न विचारू का...? प्रश्न जरा वयक्तिक आहे तर चालेल का ...? प्रश्न विचारायची रीतसर परवानगी तिने मागितली....कसलेही आढेवेढे न घेता मी सरळ हो म्हणालो. लग्नासाठी असलेल्या मुलीकडून काय अपेक्षा आहेत...? कशी मुलगी तुला लग्नासाठी हवी आहे. मनाच्या भावनेला सौम्य शब्दांची फुंकर घातली. तिच्या प्रश्नांनी माझ्या मनात दडवलेल्या प्रश्नांना नवी उमेद मिळाली होती. हीच ती वेळ माझ्या मनात असलेली ती मुलगी तूच या विचारानेच मनोमनी मी सुखावलो. निःशब्द झालो... न कळत भविष्यात रमून गेलो.
पुढची स्वप्न रंगवत असताना माझा खांदा आपोआप हलताना जाणवत होता. ओळखीचा आवाज कानी पडत होता. संकेत अरे...! ए संकेत... जरासे डोळे उघडून पाहिले तर आई उठवत होती. सकाळचे किती वाजलेत बघ, अजून किती वेळ असाच लोळत पडणार, उठ....आईचा आवाज ऐकून खाडकन डोळे उघडले गेले.. मी खडबडून जागा झालो, बसल्या जागीच मोबाईल पहिले हातात घेतला कॉन्टॅक्ट लॉग चेक केला, एक ही unknown नंबरवरून कॉल आला नव्हता. घराची बाल्कनी....बाहेरील ते वातावरण...वहीतील त्या चारोळी.....चिंगीचा आलेला फोन... हे सगळं एक स्वप्न.... हे आठवून भारावून गेलो... मला पडलेले एक आल्हाददायक स्वप्न. शोधू किती पाऊल खुणा त्या रणरणत्या उन्हाच्या, आज थंड जमिनीवरी जुळतील वाटा नव्या...