sanket kulkarni

Children Stories Drama Inspirational

3  

sanket kulkarni

Children Stories Drama Inspirational

स्तब्ध

स्तब्ध

8 mins
217


सई घर आवर लवकर, बाबा घरी येण्याची वेळ झाली आहे. बाबांना पसारा अजिबात आवडत नाही. हा असा पसारा जर त्यांच्या नजरेस पडला तर त्यांची किती चिडचिड होईल तुलाही ठाऊक आहे, सध्या ते खूपच धावपळीत आणि काळजीत आहेत त्यात आपण अजून त्यांना असा नाहक त्रास देणं योग्य आहे का...? किती पसारा करून ठेवला आहेस. किमान तुझं काम झाल्यावर घेतलेल्या वस्तू जागेवर ठेवत जा. कितीदा तुला एकच गोष्ट वारंवार सांगायची.


हो, गं आई तुझं म्हणणं पूर्ण पटतंय मला पण, किती आरडाओरडा करशील...? ठेवते म्हटलं ना. माझं काम झाल्यावर वस्तू जागेवरच ठेवत होती, तेवढ्यात तू आलीस, तरी तू असं म्हणतेस.


सई म्हणजे, कॉन्स्टेबल ताम्हाणे आणि शारदा ताम्हाणे याची राजकन्या. यंदा चौथीतून पाचवीत जाणार आहे. राजकन्या म्हणायच्या मागचा उद्देश एवढाच की, ताम्हाणे घराण्यात सर्व मुलंच आहेत, पहिली बेटी धनाची पेटी, मुलगी फक्त कॉन्स्टेबल ताम्हाणे यांच्या घरातच. सई खूप मोठी स्वप्न बाळगून आहे, ताम्हाणे कुटुंब मध्यमवर्गीय स्वतःच्या स्वप्नांचा, हौस मौजेला पूर्णविराम देऊन मुलीच्या योग्य आणि स्वप्नांच्या पूर्वक सर्व इच्छा पूर्ण करता. छोट्या मोठ्याही इच्छा पूर्ण करत नाही असं नाही.


आई झालं आवरून....


सई पटकन आत ये, स्वयंपाक खोलीत. किती वाजलेत सांगशील का...? आईने प्रश्नार्थक उद्देश केला.


आई पाऊण वाजलाय... दिवाणखाण्यातून सईने ओरडून सांगितले...


अरे! बाप रे आज उशीरच झाला... आई स्वतःलाच.


हा बोल आई, काय काम होतं...? त्याआधी सांग... बाबांसाठी हात - पाय धुवायला पाणी आणि साबण बाहेर काढून ठेवलं आहेस का...? सईने आईला प्रश्न केला.


तेच तुला सांगायचं होतं. माझ्याकडून राहून गेलं, बाळा तेवढं पाणी आणि साबण बाहेर गेटजवळ काढून ठेव ना. बाथरूममध्ये पाण्याने भरलेली बादली आहे. साबण पण तिकडेच आहे....


आई ने प्रेमाने काम सांगितले. हो, ठेवते लगेच आणि आई मी अभ्यासाला बसते, बाबांचं जेवायचं पान वाढशील तेव्हाच माझं पान वाढ.... आम्ही एकत्रच बसू.... सई आईला म्हणाली. आईने सांगितलेलं काम करून सई आतल्या खोलीत अभ्यास करायला जाते. काही वेळातच आईच्या मोबाईलवर बाबांचा फोन येतो...


हॅलो!!!! हॅलो....हा बोला...


हा!!!, मी घराच्या बाहेर आहे. सईला बाहेर येऊन गेट उघडायला सांग...? ताम्हाणे मिसेसला सांगतात, मीच येते, ती नुकतीच अभ्यासाला बसली आहे......मिसेस ताम्हाणे बरं ये, असे सांगून ताम्हाणे फोन cut करतात.


मिसेस ताम्हाणे बाहेर येऊन गेट उघडतात, समोरच ताम्हाणे उभे असतात, तुम्हाला यायला आज उशीर झाला. मिसेस ताम्हाणे..... सहज विचारतात. ताम्हाणे काहीही न बोलता फक्त, हम्म..! एवढंच करतात. ताम्हाणे साबणाने हात पाय तोंड स्वच्छ धुवून हाताला sanitizer लावून आत येतात.


अंघोळीचं पाणी तापलेलं आहे, अंघोळ करून घ्या एकीकडे मी जेवण गरम करते, तुम्ही आणि सई एकत्र जेवायला बसा...... मिसेस ताम्हाणेंनी सांगितलं.


तू पण बस जेवायला, नंतर का...? एकत्रच बसू .....ताम्हाणे मिसेसला बोलले, मिसेस ताम्हाणे हो म्हणून उत्तरतात..... ताम्हाणे आंघोळ करून येतात, तोपर्यंत मिसेस ताम्हाणे तिघांच्या ताटात गरमा गरम जेवण वाढतात आणि तिघेही एकत्रित जेवायला बसतात.


बाबा एक विचारू का...? सई बाबांना विचारते...


सई..., त्यांना जेवून दे सावकाश, जेवताना गप्पा नको.... आई जरा वरच्या पट्टीत समजावून सांगते.


का गं आई...? एकतर बाबा दीड दिवसांनी घरी आलेत, मी त्यांना प्रश्न नाही विचारणार मग कोणाला विचारणार?.... सई आईला उत्तरातील प्रश्न विचारते.


अगदी बरोबर आहे जेवताना गप्पा नको, पण मी दिड दिवसांनी घरी आलोय म्हणून आज तेवढं माफ. विचार सई, तुझा प्रश्न काय आहे....? ताम्हाणे दोघांची बाजू सावरत....


बाबा आम्ही बातम्यांमध्ये कोरोनाबद्दल पाहतोय, तो खरंच इतका विषारी आहे....? आणि तो असा कसा पसरतो....? कोवळ्या मनाला पडलेला प्रश्न सई बाबांना विचारते....


हा !.....प्रश्न छान विचारलास, ऐक....ताम्हाणे सांगायला सुरुवात करतात, महाविनाशी, महाप्रलय निर्माण करणारा, जागतिक महामारीचा प्रणेता, महाविध्वंसक, ज्याने जागतिक बलाढ्य असा महासत्ता ते विकसनशील राष्ट्रांचे तोंडचे पाणी पळवले, असा हा कोरोना नामक संसर्गजन्य विषाणू आहे. जो फक्त स्पर्शाने किंवा शिंकताना शिंकतोडे व खोकताना थुंकी चुकून समोरच्या व्यक्तीच्या नाकात किंवा तोंडात गेल्याने पसरतो. पण ते कोरोना रुग्णाच्या सान्निध्यात आल्यावर अन्यथा नव्हे.


बाबा तुम्ही तर दिवस-रात्र बाहेर असतात, मग स्वतःची काळजी कसे घेतात.... सई पुन्हा प्रश्न विचारते...


तोंडाला मास्क लावणं हातात ग्लोव्हज घालणं आणि महत्त्वाचं कोरोनाबाधित लोकांपासून एक मीटर अंतर ठेवणं सर्वात महत्त्वाचं आहे. समजलं तुला आणि बाहेरून आल्यावर हात-पाय-तोंड साबणाने स्वच्छ धुवणं, गरम पाण्याने आंघोळ करणं, आपले कपडे गरम पाण्याने धुणे अशा प्रकारची काळजी घ्यावी लागते....


अहो!!!! ते सर्व बरोबर आहे हो! आम्हाला तुमची खूप काळजी वाटते. हा आता तुमचं काम साधं सोपं नाही तुम्ही सर्व प्रकारे काळजी घेतात पण तरी काळजी वाटतेच ना..... मिसेस ताम्हाणे काळजीपूर्वक बोलल्या.....


अगं, मला तर तुमची काळजी जास्त वाटते, तुमची काळजी घ्यायला मी घरातच हजर नाही. कामावर रूजू असताना मला जर काही झालं तर....? या विचारानेच घाम फुटतो, अस्वस्थ व्हायला होतं. हे सांगताना ताम्हणेंच्या हातातला घास तोंडाजवळ येऊन थांबतो....


बाबा नको ना, असं काही बोलू....आम्हाला तुम्ही हवे आहेत. सई रडायला लागते...


ये वेडा बाई तू एका कर्तव्यनिष्ठ प्रामाणिक निडर कॉन्स्टेबल ताम्हाणेंची वीरकन्या आहेस, तूच अशी रडलीस तर आईला कोण सांभाळणार....... खूप लाडाने आणि प्रोत्साहाने समजावत. सई डोळे पुसत उठते जेवणाच ताट घासायला टाकते, हात धुते, बाबांना पाठून घट्ट मिठी मारते.


बाबा तुम्ही आता लगेच जाणार का...? सई पुन्हा प्रश्न विचारते..


हो गं बाळा, तुझ्यासारख्या अनेक सई आहेत त्यांची आणि त्यांच्या घरच्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी शासनाने आमच्यावर सोपवली आहे. तर जावंचं लागेल, तू काळजी नको करुस मी घरी लवकर येईन मग तर झालं, ताम्हाणे निरागस मुलीला सहज समजवतात.......


सई आतल्या खोलीत अभ्यासाला जाते. अहो!, तुम्ही खरंच घेत आहात ना स्वतःची काळजी. बातम्यांमध्ये दाखवतात पोलिसांवर दगडफेक, पोलिसांवर होणारे लाठीहल्ले, हॉस्पिटलमधील शिपाई कोरोनाबाधित निघतो, खरंतर खूप काळजी वाटते. जिवाला घोर लागून राहतो........ मिसेस ताम्हाणे काळजी व्यक्त करतात.


तुला काळजी वाटण स्वाभाविक आहे. मला तुमची जास्त काळजी वाटते, या गडबडीत माझं जर काही बरं वाईट झालं तर तुमचं कसं होणार, सईचं संपूर्ण आयुष्य माझ्या दृष्टीसमोर येतं. याची भीती किंवा काळजी फक्त मलाच नव्हे तर प्रत्येक पोलिस मित्र, डॉक्टर, सफाई कामगार, जंतू नाशक फवारणी करणारे कामगार प्रत्येकालाच आपापल्या घरच्यांची काळजी वाटते. तुम्ही आहात म्हणून आम्हाला एक भक्कम आधार आहे. घरातील प्रत्येक स्त्री खरंच खूप सक्षम आहे, घर सांभाळून घ्यायला. म्हणून तर आम्ही स्वतःच्या जिवाची पर्वा न करता आपल्या लोकांच्या सुरक्षिततेकरीता अहोरात्र गस्त घालतो. तूच जर खचून गेलीस तर मी माझं काम कसं करू शकेन.....? मिसेस ताम्हाणेंना उत्तरांची सांगड घालताना ताम्हाणेंचं मन खूप अस्वस्थ होतं.


तुम्ही अजिबात काळजी करू नका, समाजातील आपले बंधु - भगिनी त्यांच्या कुटुंबाचे तुम्ही संरक्षण करा. मी समर्थ आहे आपला संसार, सईची आणि तुमची काळजी घ्यायला.....मिसेस ताम्हाणे मिस्टर ताम्हणेंना विश्वास दर्शवतात...


अरेरे, मग तुझी काळजी कोण घेणार....? गुगली प्रश्न मिसेस ताम्हाणेंना करतात.


इश्श.....! तुम्ही आहेत ना..... त्याच गुगली प्रश्नावर ताम्हाणेंची विकेट उडाली.... दोघेही हसतात... दोघांचेही जेवण आटपून कामावर जाण्यासाठी ताम्हाणे तयार होतात. सईला भेटून निघताना, घरी लवकर येण्याचं बाबांनी दिलेल्या प्रॉमिसची सई आठवण करून देते. ताम्हाणे फक्त स्मित हास्य देत कामावर निघून जातात.


साधारणतः संध्याकाळच्या सुमारास ताम्हाणे आपल्या मिसेसला फोन करतात..... मी रात्री डब्बा घ्यायला येतो, तुला फोन करतो तेव्हा डब्बा तयार ठेव. मला वाटत नाही घरी जेवायला यायला जमेल....


हो, चालेल मी जेवण तयार करून ठेवते तुमचा फोन आला की डब्बा भरते... मिसेस ताम्हाणेंनी आपल्या मिस्टरांना सांगितले...


हो! ठीक आहे. ठेवतो मी फोन.... ताम्हाणे फोन ठेवतात. सांगितल्याप्रमाणे ताम्हाणे घरी येऊन डब्बा घेऊन जातात. त्यानंतर ताम्हाणे 2 दिवस घरी येत नव्हते, डब्बाही मागवून घेत नसे. बातम्यांमध्ये देशातील तसेच राज्यातील कोरोनारुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे बिकट परिस्थिती उद्भवताना दिसत होती, त्यामुळे मिसेस ताम्हाणेंना आता काळजी जास्त वाटू लागली. ताम्हाणेंशी फोनवर बोलून दोन दिवस उलटले होते, त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. कारण फोन स्विच ऑफ सांगत होता. मिस्टरांच्या साहाय्यकांच्या मोबाइलवर फोन केला तर ते साहाय्यक वेगळ्या ठिकाणी आणि ताम्हाणे वेगळ्या ठिकाणी गस्तीवर होते. काहीच समजेनासे झाले होते. बाबा कधी येणार या प्रश्नांनी सईने भंडावून सोडले होते. तिच्या प्रत्येक प्रश्नांना उत्तरे देता देता मिसेस ताम्हाणेंना नाकी नऊ आले होते, तरी देखील त्यांनी संयम सोडला नव्हता. आजची सकाळ ओसरून दुपार उजाडली..... मिसेस ताम्हाणे स्वयंपाक करत होत्या.


आई आई...., बाबा आज तरी येणार आहेत का...? तू सकाळी म्हणाली होतीस, की ते दुपारी जेवायला घरीच येणार आहेत. मग अजून कसे नाही आले..... बाबांना न भेटीचा विरह सईला सोबतीने मिसेस ताम्हाणेंना कासावीस करत होता.


अगं....! येतीलच इतक्यात. तुझा पसारा तू आवरून ठेवलास का...? सवयीनुसार आजही उचलला नाहीस, जा बाळ पटकन आवरून घे...... कासावीस झालेल्या मिसेस ताम्हाणे सईला कामात गुंतवण्याचा प्रयत्न करीत होत्या.


हो, थोडंसंच आवरायचं बाकी आहे, ते मी नंतर आवरीन...... टाळाटाळ करत सई म्हणाली.


नंतर नको आताच आवर. किती असा वेळ लागणार आहे...... सईची कशीबशी समजूत काढून तिच्या प्रश्नांवर मिसेस ताम्हाणेंनी उत्तर देऊन समजावून मात केली.


सई आतल्या खोलीत तिचा पसारा आवारत असते. इथे मिसेस ताम्हाणे जेवण करण्यात मग्न असतात. कोणत्याही क्षणी ताम्हाणे घरी येतील. इतक्यात मिसेस ताम्हाणेंना रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज ऐकू येतो. सई आतल्या खोलीतून स्वयंपाक घरात पळत पळत येते. आई आपल्या इथे कोरोनाचा रुग्ण आढळला वाटतं.... बातम्यांमध्ये बघून तिला समजलेलं असतं सध्या रुग्णवाहिकांमधून कोरोना रुग्ण घेऊन जात आहेत.


रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज आला, याचा अर्थ असा नव्हे की कोरोनाचा रुग्ण असेल, इथे कोण अचानक जास्त आजारी पडले असावे, म्हणूनही आली असेल..... मिसेस ताम्हाणे सईच्या मनातील निर्माण झालेला गैरसमज काढायचा प्रयत्न करतात.


रुग्णवाहिकेच्या सायरनचा आवाज बंद होतो... ऐकलंस रुग्णवाहिका निघून गेली, आवाज बंद झाला, जर कोरोनाचा रुग्ण असता तर सायरनचा आवाज सुरूच राहिला असता..... मिसेस ताम्हाणे तिच्या मनातील गैरसमज काढण्यात यशस्वी झाल्या. सईलादेखील आईने सांगितलेलं पटलं.


फोनची रिंग वाजते, पाहतात तर ताम्हाणेंचा फोन... हॅलो....! कुठे आहेत तुम्ही, तुम्हाला 2 दिवस झाले कॉल करतेय तुमचा फोन बंद येतोय... तुम्ही स्वतःहून पण फोन केलाच नाही.... काळजीग्रस्त मिसेस ताम्हाणे जरा रागातच बोलल्या.


आई मला दे ना मला बाबांशी बोलायचं आहे. ए आई दे ना मला.... बाबांशी बोलायला उत्सुक असलेली सई आईकडे हट्ट करते.


अगं...! जरा थांब गं, एक मिनिट मी बोलतेय ना..... नकळतपणे मिसेस ताम्हाणे सईवर ओरडल्या.


हॅलो...! शांत होशील, मी काय म्हणतोय ते ऐक ना..... सौम्य आवाजात ताम्हाणे बोलले.


आवाजाला काय झालं तुमच्या.... मिसेस ताम्हाणे विचारतात, सई तिकडेच उभी राहून बाबांशी बोलायची संधी कधी मिळेल याची वाट पाहत असते.


माझ्या आवाजाला काही झालं नाहीये.. मी बाहेर आलोय दार उघड..... ताम्हाणे सांगतात फोन बंद न करताच, गॅस बंद करून सईचा हात पकडून मिसेस ताम्हाणे दार उघडायला जातात.... समोर पाहतात तर काय...? समोर कुणीच नसतं....


हॅलो..! कुठे आहात तुम्ही.. काय चेष्टा चालविली आहे.... असं म्हणताच गेटसमोर रुग्णवाहिका आली आणि आतमध्ये कोरोना पोझिटिव्ह निघालेले कॉन्स्टेबल ताम्हाणे खिडकीतून आपल्या पत्नी व मुलीला अधाशासारखे पाहत होते. सई बाबांना बघताच त्यांच्याकडे धाव घेणार तोच, मिसेस ताम्हाणेंनी तिचा हात धरला.... सायरन सुरू होतो रुग्णवाहिका पुढे जाते... ताम्हाणे आपल्या कुटुंबाकडे हताशपणे पाहतच राहिले..... सई आईचा हात सोडण्याचा प्रयत्न करत असताना...... मिसेस ताम्हाणे जमिनीवर गुडघ्यांवर बसून जोरजोरात रडू लागल्या.


सई आईचा हात झटकून "बाबा-बाबा" जोरजोरात हाक मारत गेटजवळ पळत गेली. सईच्या निरागस डोळ्यांत वडिलांशी निसटत्या भेटीचा निसटत्या विरहाला अश्रूंनी वाट मोकळी करून दिली. आपल्या बाबांना घेऊन जाणारी रुग्णवाहिका नजरेआड होईपर्यंत सई तिथेच "स्तब्ध" उभी राहिली.


Rate this content
Log in