अनोळखी भेट
अनोळखी भेट
कधी कशी झाली भेट परकी जागा आपुली भेट वक्ता श्रोता गुंतला एवढा घडली जेव्हा "अनोळखी भेट".... मुंबईहुन सांगलीला काही कामा निमित्ताने जाण झालं.दोन दिवसांच्या मुक्काम नंतर आज तिसऱ्या रात्री मुंबईकडे परतीचा प्रवास करायचा होता.थोडी फार खरेदी बाकी होती.दुपारची मिटिंग आटपून उरलेला वेळ खरेदीसाठी खर्च करावा असा ठरवून सामान अर्धवट बॅगेत भरून पसारा तसाच ठेऊन मिटिंगसाठी निघालो.भारतीय वेळेनुसार एकतास मिटिंग उशिरा सुरू होऊन वेळेत आटोपती झाली. मिटिंग जवळपास तासभर चालली. ९:३०वा.ची मुंबई कडे रवाना होणारी बस होती. अजून तीन तास माझ्याकडे होते.खरेदीसाठी पुष्कळ वेळ होता.बाईक चालवण्याची आवड असल्यामुळे,शेखरची बाईक मी चालवणार हे आधीच सांगून मी मोकळं झालो. शेखर आपला खास माणूस त्यामुळे त्याच्या खाजगी वाहनावर मी डोळेझाकून मालकी हक्क दाखवत गाडीची चावी माझ्या ताब्यात घेतली. माझ्या आणि ऋचा मधील संवाद खूप छान चालु होता. मी बाईकवर बसलो आणि माझ्या मागे ऋचा. मिटिंग मध्ये काही नविन चेहेऱ्यांची ओळख झाली, त्यात माझ्यासाठी नवखा चेहेरा होता तो, “ऋचा” चा....आमच्या संवादाला सुरुवात ती माझ्या लेखन छंदा पासून झाली. माझी आणि ऋचाची पहिलीच भेट. कामानिमित्त सांगलीत एका मिटिंग दरम्यान आमची ओळख झाली. ऋचा मूळची पुण्याची, वास्तुविशारदच्या शिक्षणा निमित्ताने चार वर्षे सांगलीतच वास्तव्यामुळे, पुणेरी भाषेची शैली काहिशी कमी होऊन सांगलीतील मराठी भाषेचा स्वर अचूक पकडला होता, वेळ प्रसंगी पुणेरी भाषेचा तडका आणि वरचा स्वर धरण्यात तिचा कमालीचा हातखंड. ऋचा दिसायला अगदी भरभक्कम पण नाजूक, रंगाने गुलबट गोरी गालावर चिमटा काढला तर, काश्मिरी सफरचंदा सारखा लाल व्हावा इतकी रंगाने गुलबट गोरी. चेहेरा उभा, नाकावरचा चष्मा गुलबट गोऱ्या रंगाला आणि चेहेऱ्याला साजेसा असा. केसांचा सुबक गोल अंबाडा बांधलेला केस मोकळे सोडले तर कंबरेपर्यंत येतील इतके लांब. मला लिखाणाची गोडी कधी आणि कशी निर्माण झाली?? इथून खरंतर आमच्यामधील संवादाला प्रारंभ झाला. संवाद रंगत असताना, अचानकपणे तिने मला स्व:लिखील एखादी कथा ऐकवण्याचा आग्रह केला. फार न ताणता मी लगेच होकार दिला. कारण, मला आयता श्रोता मिळाला. कथा सांगायचे अवचित्य साधून एखादे शांत ठिकाण जे निसर्गाशी समरस असेल, तिथे जाऊन निवांत बसून बोलू असे मी सुचवले. गाडी वरून फिरता फिरता बोलणं सुरूच होत, हरिपूर हे ठिकाण ऋचा ने सुचवलं, गाडी हरिपुरच्या दिशेने वळवली. हरिपूर हे ठिकाण खूप शांत आणि निसर्गाच्या सानिध्यातल. दोन नदीचा संगम पहावयास मिळतो. त्या नदीत थरारक आणि रो
मांचक दृश्य असं होतं की त्यात भिषण मगरी आहेत. बोलण्याचा फाफटपासरा न करता मी कथा सांगायला सुरुवात केली. एक टक माझ्याकडे बघत, जणू काही कथेतील ती स्वतः एक पात्र असून तिच्या समोर ही घटना घडत आहे, अश्या पद्धतीने तल्लीन होऊन ती माझ्या कथेशी एकरूप झालेली. कथा ऐकल्यावर कुठल्याही प्रकारे तिने प्रश्न न विचारता...साय ओल वाक्य तिने केलं की, तु लिखाण कधीच सोडू नये असं मला वाटतं. तिच्या ह्या वाक्याने मला माझ्या नवीन लिखाणासाठी उमाळा मिळाला. मनापासून तिनं माझं कौतुक केलं. सूर्याचे सूर्यास्ताचे प्रतिबिंब हलकेसे नदीच्या पाण्यात पडायला सुरुवात झाली होती. बोलण्या बोलण्यात वेळ कसा सरत होता समजतं नव्हतं, ऋचा ने तिच्या बद्दल सांगायला सुरुवात केली. तिच्या बोलण्यात खूप सकारात्मकता जाणवत होती. कुठे ही कोणा विषयी निंदा किंवा घृणा नव्हती. तिच्या बोलण्यातुन आत्मविश्वास दिसत होता. तिला पडलेले प्रश्न, तिला आलेली संकट त्यात सुद्धा नकारात्मकते मधून सकारात्मक विचार कसा शोधून काढायचा हे तिने अगदी सहजपणे सांगितलं. ऋचा खूप स्वावलंबी, मेहनती आणि स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम असणारी मुलगी आहे, भले निर्णय चुकला तरी चालेल पणं, चुकीचा निर्णय एक मोठा अनुभव देऊन जातो अस तीच मतं होत. बऱ्या प्रमाणात मला ते पटलं. स्वतःला जे आवडतं तेच करायचं नाही तर योग्य संधीची वाट बघायची करायचं म्हणून करायचं अस नव्हे असा काहीसा तिचा थाट. माणसं ओळखण्यात थोडी मागे होती हे मात्र खरं. तिला माझ्याकडून असा काही अनुभव आला नव्हता एकंदरीत व्यक्तित्वातून मी ओळखून गेलो. ऋचा सोबत गप्पा मारण्याचा हुरूप वाढतंच होता. गप्पांचा विषय कधी कसा आध्यत्मिक वळणाकडे वळला ते कळलेच नाही. आमच्यातील संवादाला नवीन जोड लागली आणि बोलण्यातील ओढ वाढतंच गेली. बोलण्याच्या ओघात ७:३०/७:८५ कधी वाजले कळलेच नाही, शेवटी आम्ही तिकडून काढता पाय घेतला, खरंतर दोघांचा ही पाय निघत नव्हता हे निर्विकारपणे दर्शनास येत होतं. एक अनोखळी भेट किती...काय... देऊन जाते सांगून जाते ह्याच ज्वलंत उदाहरण होत आमची भेट. माझी आणि ऋचाची विस्मरणात राहणारी पहिली भेट. हाय....हॅलो शब्दांनी झालेल्या संवादाचा प्रारंभ....एकमेकांना एकमेकांबद्दल जाणून घेण्याची उत्कंटता वाढविणारा चर्चेचा मध्य....अखेरीस नाविण्याने बहरून आलेल्या निखळ मैत्रीतील गप्पांनी रंगलेला शेवट.....आगळीवेगळी आमच्या स्मरणात तेवत ठेवणारी .......पहिली भेट ...... एक भेट...... भेटीतील प्रवास...... प्रारब्ध काळ वेळ एकत्रित येऊन घडवून आणलेली ऋणानुबंधातील “अनोळखी” भेट.