मी महात्मा जोतिराव फुले बोलतोय
मी महात्मा जोतिराव फुले बोलतोय
पुतळा:या आमदार या, तुम्ही जनतेचे सेवक आहात.त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद देतो. तुम्ही आज आठवणीने मला पुष्पहार अर्पण करण्यास आला. कारण आज माझी जयंती आहे हे तुम्हाला ठाऊक आहे. मी तर असे ही ऐकले आहे की तुमच्याकडे अती महत्त्वाचे खाते दिले आहे.
नेता:अरे इथे तर कोणी दिसत नाही मग हा आवाज कुणाचा आहे?कोण एव्हढे बोलतेय?
पुतळा:घाबरू नको मी दुसरा तिसरा कुणी नसून महात्मा जोतिराव फुले अदृश्य आवाज बोलतोय. मला आता राहवेना म्हणून मला आता बोलायची वेळ आली आहे.
नेता:महात्माजी काय चुकले माझ्याकडून?कृपया सांगा ते मी नम्रपणे ऐकेन.
पुतळा:तुमच्याकडे आता कोणते खाते आहे?
नेता:शिक्षण व सांस्कृतिक खाते.
पुतळा:हे खाते तुम्ही स्वतः स्विकारले की तुमच्यावर जबरदस्तीने माथी मारले?
नेता:मंत्री मंडळाने दिले व ते मी आनंदाने स्विकारले.
पुतळा:म्हणजे अती महत्त्वाचे खाते तुमच्याकड़े आले, होय, ना?
नेता:होय.
पुतळा:मग मी तुम्हाला खरे विचारु?
नेता:होय, होय विचारा.
पुतळा:शिक्षण खात्याचे मंत्री होताना तुम्ही तर प्राध्यापक नाही,शिक्षक नाही. तुमच्या खात्यात दुसरे कोणी प्राध्यापक ,शिक्षक म्हणून ह्या खात्याची माणसे, मंत्री मिळत नाही का?
नेता:मिळतात; पण तसे निवडून तर यायला पाहिजे?
पुतळा:खरेच तुमचा पक्ष गुणवान लोकप्रतिनिधीना संधी देतो?
नेता:होय, म्हणून माझ्या सारख्या माणसाची ह्या खात्यावर निवड झाली आहे.
पुतळा:व्वा!अभिनंदन तुमचे.आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारु शकतो का?
नेता:होय विचारा.
पुतळा:आपल्या देशाचे राष्ट्रगीत, वंदेमातरम, झेंडागीत,पसायदान पाठ आहेत?ध्वजा विषयी माहिती आहे?ते न पाहता सुंदर अक्षरात लिहून दाखवा.
नेता:हे मला आता तरी पाठ नाही. माझे अक्षर देखील तसे सुंदर नाही. प्रयत्न करतो.
पुतळा:हीच तर परीक्षा आहे तुमच्या सारख्या स्वतः ला हुशार समजणारांची.तुमच्या सारख्यांना संधी दिल्यामुळे शिक्षणाचे वाईट दिवस आले आहेत. शिक्षणाची मूल्ये तुम्हाला माहीत नाही.
मग तुम्ही इतरांना काय मूल्ये शिकवणार?शिक्षणाच्या अडचणीची जाण असलेली व्यक्तीच हे करू शकते .एव्हढया मोठ्या राज्याचे आपण शिक्षण मंत्री आहात.आपणास झेपत नसेल तर योग्य व्यक्तीना संधी द्या.<
/p>
अंगरक्षक:होय, महात्मा म्हणतात त्यांच्या बोलण्यात अर्थ दडलेला आहे. त्यांनी शिक्षणासाठी अनेक यातना सहन केल्या. अनेकांचे विरोध सहन केले. सर्वधर्माच्या मुलींचे शिक्षण सुरु करण्यासाठी कर्मठ लोकांच्या शिव्या ऐकाव्या लागल्या. मुलींना शिक्षण मिळावे म्हणून सावित्रीबाईना शिक्षिका केले. पुण्यात भिडेवाडयात पहिली मुलींची शाळा सुरु झाली. हे महान कार्य करताना त्यांना शेणाचा,चिखलाचा मार सहन करावा लागला. तरी ही न डगमगता जोतिरावांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षणासारखे महान कार्य अविरत चालू ठेवले. तेव्हा साहजिकच त्यांचा आत्मा अजूनही शिक्षणासाठी जीवंत आहे. त्यांचे विचार व कार्य अजूनही जिवंत आहे.
दुसरा अंगरक्षक:होय, बंधू तुम्ही बोलताय ते खरे आहे. आज तुमच्या, माझ्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळताना अनेक रकमा डोनेशन म्हणून मोजाव्या लागतात.दर महिन्याची फी ती वेगळीच. शिक्षणात समानता लोप पावत आहेत. गरीबांची मुले आहे त्याच अवस्थेत आहेत. मग गरीब पालकांची मुले बेरोजगार होत आहेत. त्यांच्यासाठी चांगले शिक्षण मिळत नाही. त्यांना
शिक्षणात रस वाटत नाही.ती व्यसनाधीन होत आहेत.
सचिव:होय, मला तुमच्या दोघांच्या विचारातून असे समजते की तुम्ही नोकरदार वर्ग असतांना तुम्हाला एव्हढा त्रास होतोय तर सामान्य माणसाची मुले कशी शिकणार? नक्कीच शिक्षणात बदल केला पाहिजे. शिक्षणात समानता आणली पाहिजे.भारतातील एकही मुलगा शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. तसा मी आमदार साहेबांच्या विनंतीवरुन G. R काढतो.
पुतळा:तुमच्या सर्वांचे विचार ऐकून मी धन्य झालो आहे. माझे मानवतावादी विचार सर्व जाती धर्मात पसरवा. सर्व जातीधर्मातील लोकांना, शेतकरी, कामगार, कष्टकरी वर्गाची दखल घ्या. त्यांनी दिलेल्या एक, एक मताचे मूल्य जाणा. त्यांना फसवू नका. खोटी आश्वासने देऊ नका. जी कामे कराल तेच वचन द्या. अडचण असेल तर स्पष्ट नाही म्हणा. कुणालाही आशेवर ठेऊ नका. मानवतावादी दृष्टिकोन ठेवा. राजकीय फायद्यासाठी लोकांत ,धर्माधर्मात, जातीत भांडण लाऊ नका. दंगल जाणीव पूर्वक घडवू नका.राजकारणात योग्य व्यक्तीला संधी द्या. भ्रष्टाचार करणारे,गुन्हेगार व्यक्तीला ,घराणे शाहीला राजकारणात संधी देऊ नका. हीच माझी जयंती आणि हीच माझी पुण्यतिथी होय. पुन्हा मी पुतळ्यात स्थानापन्न होत आहे.