मी अविनाश
मी अविनाश


मीच का? हा प्रश्न ते स्वतःला सतत विचारत होते. हा प्रश्न त्यांनी आपल्या बायकोला आणि आपल्या आईला पण विचारला. त्यावेळेस ते दोघेही रडू लागले..त्यांनी देवाला हा प्रश्न केला, तिकडून कुठलेही उत्तर आले नाही. फक्त सर्वत्र शांतता होती. ती भयाण शांतता त्यांना अस्वस्थ करत होती. ते अशांत झाले होते.
अविनाश गुरव हे पन्नाशीमधील व्यक्तिमत्व होतं. सरळ मार्गाने चालणारे अविनाश कधी कोणाच्या मध्ये विनाकारण कधीच पडले नाही. त्याचे छोटे पण सुखी कुटुंब होते. देवाची भीती बागळणारे ते सरळमार्गी व्यक्तिमत्व होते.
आपण आणि आपली नोकरी या छोट्या विश्वामध्ये अविनाश सुखी होते. बायको आणि मुलांबरोबर ते प्रेमाने राहत होते. आणि अचानक एक वादळ आले.. एका साध्या तापाचे निदान किडनीच्या रोगामध्ये झाले. बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावे लागले. या आजारपणा मध्ये शरीराची आणि पैशाची पूर्ण वाताहत झाली. मीच का? हा प्रश्न त्यांनी हॉस्पिटलमधून देवाला अनेक वेळा विचारला.अचानक आलेल्या या शारीरिक व्याधीमुळे ते मानसिक रुग्ण पण बनले. त्यांच्या मनाची चिडचिड होत होती. रंगवलेली अनेक स्वप्न साकार करण्याचे खरं तर हे दिवस होते,. त्या स्वप्नामध्ये हा काळा रंग अचानक प्रकटला होता. सर्व काही रंगहीन वाटत होते. जीवनाची भरारी घेण्याच्या अगोदरच पंख कापले गेले होते
अविनाश हॉस्पिटलमधून घरी आले, पण आजार पण घेऊनच. डॉक्टरांनी सक्तीची बेड रेस्ट सांगितली होती काळजी घेतली नाही तर किडनीचा अटॅक येऊ शकतो. हे ही सांगितले. शारीरिक हालचालींवर बंधने आली होती. औषधांची लिस्ट वाढली होती. दर पंधरा दिवसांनी होणाऱ्या चाचण्या तर नित्याच्या झाल्या होत्या. जीवनामध्ये सर्वत्र अंधार पसरला होता, कुठलाही मार्ग समोर दिसत नव्हता.
अविनाश म्हणजे कधीही विनाश न पावणारा, हार मानेल ते अविनाश कसले ? ते विचार करू लागले उर्वरित आयुष्य आणि आपण याच समीकरण जुळवू लागले. एक एक गणिते सुटत गेली. आयुष्यात अनेक गोष्टी अजून करायच्या होत्या. फक्त क्रम बदलायचा होता. त्यांनी कथा लिहायला सुरवात केली. अस्वस्थ मन कथेमधून मोकळे होत गेले. चित्रकला हा त्यांचा शौक नव्हता, पण हात कॅनव्हासवर रंगत गेले. न पाहिलेले सिनेमे ते आता आवडीने पाहत होते. गाणी ऐकत होते. लहान मुलांबरोबर ते पत्ते, चेस खेळत होते. दुःखाचा विसर पडत गेला आणि मीच का? याचे उत्तर पण सापडत गेले.