वाढदिवसाची भेट
वाढदिवसाची भेट


मालिनीने उगाच खिडकीतून डोकावून पाहिले, वेळ संध्याकाळची होती आणि माणसांची लगबग पण कमी होत चालली होती, पक्षी पण आपापल्या घरी परतले असतील असा विचार तिझ्या डोक्यात आला. ती क्षणभर थांबली तिच्या आयुष्याचा प्रवास तिच्या डोळ्यासमोरून गेला, मोठा मुलगा पार्थ ऑस्ट्रेलिया ला गेला आणि तेथेच स्थायिक झाला, छोटी मुलगी दिव्या तिने मनाविरुद्ध लग्न केले. पतीदेव आपल्या नवीन व्यवसायात व्यस्त आणि मग्न आहेत. आज 50 व्या वाढदिवशी ती आपल्या आयुष्याचा जमाखर्च मांडत होती. काय कमावले आणि काय गमावले याचा विचार करण्याची ही वेळ नव्हे, असा विचार करून तिने आपल्या मानेला एक हलकासा झटका दिला. आयुष्य सुंदर आहे हे तिला माहीत होतं, ते सहजतेने जगण्यासाठी तिला भरारी घ्यायची होती.. आता ऑस्ट्रेलियाला जावे आणि तीन महिन्याचा ब्रेक घ्यावा हा तिचा निर्णय ठाम होता, एकट्याने जगण्याचा आणि जीवनाचा आनंद घेण्यासाठी ती आतुर होती. आरशातले आपले प्रतिबिंब पाहून ती सुखावली. स्वतःबद्दल तिला कधीच तिरस्कार नव्हता, मात्र आनंद मिळवण्याचे फारसे मार्ग तिने अनुभवले नव्हते, आज तिच्या मनाला एक वेगळीच शांतता मिळाली होती.. स्वतःवरती विश्वास आणि दुसऱ्यांकडुन कसल्या अपेक्षा न ठेवण्याचे भान घेऊन तिच्या मनाने भरारी घेतली. आज 50 व्या वाढदिवशी ती स्वतः लाच, प्रथमच भेट देत होती