The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Vasudev Patil

Horror

4.0  

Vasudev Patil

Horror

महावस्त्र - भाग ४

महावस्त्र - भाग ४

9 mins
601


माधवरावांना सारा पट आठवताच त्यांच्या डोळ्यात पाणी दाटलं. त्यांना वसंताचा येण्याआधी फोन आला होता. पण तो आलाच नाही तर उलट त्याच्या तिरडीला खांदा देण्याची पाळी त्यांच्यावर आली. वसंता गेला हे निदान कळलं तरी पण घनशा गायब झालाय तो आजतागायत गायबच. तो आता येईल ही आशा ही...... कसा गेला, कुठे गेला हे काळाच्या गर्भातच गडप आहे. माधवरावांनी डोळे पुसले. आता चिमा, गोपालरावाच्या पुढे काय वाढून ठेवलंय यानं त्यांना धास्ती वाटू लागली.

    

दुपारून त्यांनी ड्रायव्हर पाठवत गोपालरावांना तालुक्याला पाठवलं. गोपालनं अंगणात गाडीवर बसताना चिमाकडं पाहिलं. माधवरावांना गलबलून आलं. त्यांनी गाडी थांबवत चिमालाही पाठवलं. त्यांना गोपालराव व चिमाला वाटवीत धोका जाणवू लागला.

   

संध्याकाळी गोपाल तालुक्याला पोहोचताच दवाखान्यात जाऊन चेक अप करून आला. सारे रिपोर्ट नाॅर्मल आल्यावर मानसिक ताण वा थकव्यानं त्रास होत असावा म्हणून डाॅक्टरानं किरकोळ औषधी दिल्या. त्यानं गाडी पोर्चमध्ये लावायला लावत ड्रायव्हरला बाईकवर परत पाठवलं. गाडीच्या डिक्कीत बस्त्याचं गाठोडं जे वाटवीत उतरावयाचं होतं ते तसंच डिक्कीत परत आलं होतं व विशेष म्हणजे ते गाठोडं सुटून सारे कपडे डिक्कीत अस्ताव्यस्त पसरले होते व महावस्त्राचा तर चोळामोळा झालेला होता. त्याच्याकडं पाहताच त्याला उडणारा पदर आठवला व थंड घाम सुटला. त्यानं ते तसंच राहू देत डिक्की जोरात लावत वर आला. चिमानं त्याला जेवण खाऊ घालत औषधी दिल्या. त्यानं तो हाॅलमध्येच झोपला. त्याला शांत झोपलेला पाहून आई-वडील व चिमा मागच्या बेडमध्ये गेले. बाराच्या आसपास गप्पा मारून झोपण्याआधी आई व चिमानं हाॅलमध्ये येत त्याला पाहिलं. तर त्याला दरदरून घाम फुटल्यानं अंग थंडगार झालेलं. चिमाचा स्पर्श होताच तो उठला. ताप उतरल्यानं त्याला हुशारी जाणवत होती. त्यानं पाणी मागवत घटाघटा प्याला व आई, चिमास झोपायला पाठवलं. त्याच्या अंगावर शाल पांघरताना चिमा हसली व येतेय म्हणून इशारा केला. 

  

चिमा गेली पण त्याला झोप येईना. तीन तास गाढ झोप झाल्यानं आता तो छताकडं पाहू लागला. आई- वडील, चिमा झोपली असावीत कदाचित; त्यांची चाहूल बंद झाली. तोच त्याला गाडीच्या इंडिकेटरचा साऊंड ऐकू आला. त्यानं उठत खिडकीतनं पाहिलं तर पोर्चमधल्या गाडीची डिक्की उघडी दिसली व साईड इंडीकेटर सुरू. गाडीची डिक्की तर आपण लावली होती मग? तो दार उघडत खाली येऊ लागला तर डिक्कीतून पाठमोरी बाई काही तरी काढताना त्याला दिसली. तो थबकला.. अंगावर सरसरून काटा आला नी पुन्हा घाम सुटला. अंगातून गरम वाफा निघू लागल्या. तो तसाच माघारी परतण्याचा विचार करू लागला. पण त्याचे पाय हालेतच ना. तोच ती बाई सरळ उभी राहिली.

 

तिच्याकडं पाहताच तो विस्मयानं उद्गारला."चिमे तू? काय करतेय तू? किती घाबरवलंस तू मला?"

"अरे ही डिक्की उघडी होती, ती लावायला खाली उतरली तर बघ इथं हा पसारा. आणि या महावस्त्राची घडी विस्कटलीय रे! तीच नीट करत होते. तोच तू आलास. अन घाबरायला काय झालंय तुला!" म्हणत चिमेनं मंद स्मित केलं.

 "अगं नाही पण या वेळेस तू खाली असशील ही कल्पना नव्हती ना म्हणून घाबरलो!"

"लब्बाड खोटं बोलू नकोस काल तुला नलूनं चांगलंच घाबरवलंय म्हणून घाबरतोय तू !"

चिमेनं साडीची घडी नीट ठेवत डिक्की लावली.

"चल थोडं रस्त्यावरून फिरून पाय मोकळं करून येऊ! मस्त चांदणं पडलंय!"

"अगं तुझ्यासोबत फिरायला आवडेलच पण या वेळेस ?"

"म्हणजे तू काल खरंच घाबरलास?" म्हणत चिमा खट्याळपणे हसत त्यास आव्हान देऊ लागली.


गोपाल निघाला. गल्लीतनं दोघं चालत मुख्य रस्त्यावर व तेथून हायवेवर आले. तेथून मात्र गोपालला काहीच सुधरेना. फक्त चंद्र ,चांदणं, चिमा बस्स! बाधा झाल्यागतच तो चिमेसोबत चालू लागला.. कुठं चाललोत ही सुधच राहिली नाही त्याला.


"गोपाल! आबांनी काल तुला नलूबाबत सांगितलं पण वसंता व घनशाबाबत सांगितलंच नाही..."

"अगं हा ना तोच मलाही प्रश्न पडलाय! त्या दोघांचं काय?" गोपाल अधिरतेनं विचारू लागला.

 "सांगते..."

चिमा चालत चालतच सांगू लागली.


वसंता मुंबईवरून ताम्हनपेठेत यायला दहा वाजले. श्रावणझड एक सारखी बरसत होती. पण नलूचं प्रकरण ताजं असताना तो ताम्हनपेठेत थांबायला घाबरला.

नदीला तर पाणी आलंय. पण तरी पाहू काठावर कुठंपर्यंत पाणी आलंय अंदाज घेऊ नी मग उतरू. तो काठावर आला. नदी दुथळी आलेली. त्यानं विचार केला इतक्या पाण्यात आपण उतरलोय आधी बऱ्याच वेळेला. टाकूच उडी. कारण उन्हाळ्यात वाटवीकाठच्या खोल भागात सिमेंटचे पाईप टाकून त्यावर दगड मुरुम टाकुन तात्पुरता भराव केल्याचं त्याला माहित होतं. तो आता पुराच्या पाण्यानं जरी वाहून गेला असेल तरी जड पाईप असतीलच. आपण काठाकाठानं वर जाऊन उडी टाकली तर पाईपाच्या भरावापर्यंत पोहोचलो म्हणजे मग काठ गाठूच.

 

तो ताम्हनपेठेकडंच्या काठानं वर निघाला. रातकिडे किरकिरत होते. बेडकं मध्येच 'डराॅंव डूर' डुरकत होते. पहाडातल्या खडकातून वाहून आलेले किडूक, खेकडे पाण्यातून भांबावून काठ गाठत होते. बरंच अंतर पुढे आल्यावर अदमास घेत तो पाण्यात उतरला. सपाक, सपाक करत तो पात्र मागे टाकू लागला. पाणी गुडघा, कमरेपर्यंत आलं. कमरेच्या वर येताच पाण्यातील गोट्यांवरून त्याचे पाय सटकायला लागले. कमरेच्या वर पाणी चढताच ओढ वाढली. हे लक्षात येताच त्यानं पाण्यात सूर मारला. नी त्याला पाण्याच्या वाढत्या प्रवाहाचा परिचीत आवाज आला. अंधारातही त्यानं ओळखलं आता अचानक पाणी वाढेल. पण माघारी फिरलं तरी पाण्याचा घोंगावत येणारा प्रवाह घेरेलच. त्यापेक्षा पाईप टाकलेला उंच भाग गाठू. तो पावेतो पहाडातून वाहत आलेली छोटी मोठी लाकडं, फांद्या पुरसंग त्याला धडकू लागलं. नी मग....


त्याच्या हाताभोवती त्याला कपडा लागला. तो बाजुला करू लागला. पण तो त्यातच गुरफटला गेला. साडी की महावस्त्र! पण कंबर, मान, हात साडीत अडकले. त्याचं हात मारणं बंद झालं व तो खाली वर होत प्रवाहात वाहू लागला. त्यातच कुण्या कुंभारानं मडके, रांजण भरलेली बैलगाडी पाण्यात टाकली असावी व अचानक आलेल्या लोंढ्यात ती वाहून आलेली असावी. पाण्यात मडकी, डेरे, लहान मोठे रांजण वाहून येत होते. काही पाण्यानं भरून तळाशी जात वाहत फुटत होते. वसंता पाईप टाकलेल्या भागात आला. पण पाईपही वेडेवाकडे होत वाहत होते तर काहींचा काही भाग वाळूत दबत होता. वसंता साडीत गुरफटला व तो खाली पाण्यात बुडू लागला. तोच पाईपवर बसलेली व्यक्ती त्याला, "वसंता, वसंता इकडून ये..." म्हणून जोरात ओरडत होती. त्याला पाण्यात मात्र लवकर समजेना. तो तिकडंच निघाला नी ज्या पाईपाचं दुसरं टोक रेतीनं पुरसंगानं बंद होतं, त्या पाईपात घुसला तोच त्याच्या तोंडाचा भाग रांजणात गेला. मागून भले मोठे रांजण वाहत येतच होते व वसंतामागनं पाईपात घुसत होते.. वसंता रांजणात व रांजण पाईपात, तर पाईप पाण्यात. तेथेच त्याला नलू दिसली. त्याच्या श्वासाची लड तुटू पाहत होती. तो हाता-पायानं धडका मारत होता.


"हे वसंता! ऐक ना, कितीही धडका मार तू पण हे रांजण नाही टिचणार रे! श्वास घुदमरतो का? माझाही महावस्त्रातल्या फासात असाच गुदमरत होता रे आणि अजूनही तुम्ही घातलेल्या त्या टाकीत तसाच गुदमरतोय." नलू त्याला सांगत‌ होती.

जोराच्या प्रवाहात त्याचा श्वास मंदावला. हालचाल थंडावली. पण पाईपात माती, रेती घुसतच होती व पाईपाचं दुसरं टोक ही बंद झालं.

  

वसंता आला नाही म्हणून सकाळी आबा एकसारखा फोन करत होते पण फोन बंदच येत होता. दुसऱ्या दिवशी त्यांनी मुंबईत केला. तिथंनं तो निघाल्याचं कळालं. दुसरा दिवसही गेला. 

 

श्रावण झड थांबली. सोनेरी ऊन पडलं. तसा पारणीस उतार पडला थोडा व नंतर पाणी कमी होताच पाईपाचा काही भाग उघडा पडला. जाणाऱ्या येणाऱ्या माणसांना कुबट वास जाणवू लागला. नाक दाबत, "काही तरी मरुन सडलंय..." बोलत ते निघू लागली. पण खेकडं धरणाऱ्या पोरांनी दुर्गंधी असह्य झाल्यानं पाईपातला गाळ, कचरा बाजूला केला. लाथ मारून रांजण फोडला. पुढचाही फोडला. नी बोंब ठोकली. लोकं गोळा झाले. तट्ट फुगलेल्या देहाची दुरुनच पाहणी होऊ लागली. एकानं धिटाई करत अंगावरची टरकलेली कापडं तपासली पाकीट पाहिलं. नी ओळख पटताच आख्खी वाटवी पारणीत उतरली.

 

पुरात वसंता गेला बोलत लोक काही दिवसांनी विसरले. 


एक वर्ष झालं. शालीचं वय वाढू लागलं तसं नामूनं लग्नाचा तगादा लावला. माधवराव पोराचं दु:ख विसरत घनशाच्या लग्नाच्या तयारीत गुंतले.

 

पाच सुवासिनींनी भाऊबंदकीच्या घरांना पिवळ्या हातांनी हाताचे ठसे उमटवले. घरासमोर खांब उभारला. आंब्याच्या पानाचा मांडव आणला. परवा तेरवा लग्न असं घनशाच्या लग्नाची चक्रपुजा (चतुर्थीचा थाट भरला). त्यासाठी ताम्हनपेठेतून शाली लाजत साजत थाट पुजण्यासाठी आली. रात्री जेवणं आटोपली. करवल्यांनी गाणी सुरू केली. कर्त्या पुरूषांनी मंडळाची भांडी आणत मागच्या घरात ठेवली. पाण्याच्या टाक्या, कढया, वरणासाठी मोठी डेग, काही बाही आणलं. पुढे गाणी चालूच होती. मधल्या घरात बस्त्याचं सामान पडलेलं. ओट्यावर गाणी म्हणत थकणाऱ्या करवल्या आपल्या तान्ह्या लेकरांना घेऊन झोपवू लागल्या. काही हौशी अजूनही गाणी म्हणतच होत्या नवी नवेली नवरी होऊ पाहणारी शाली उठली झोपण्यासाठी आली. घनशाला कुठं बसावं, कुठं उभं राहावं याचा संकोच. तो ही थकला व मागच्या घराकडं निघाला.


" घनशा मागं नको झोपू बाबा, तू पुढंच झोप. वारा नी भारा, नेम नसतो..." नायजाताईंनं काळजीनं टोकलं.

 

पण पुढे गर्दी असल्यानं त्यानं हो म्हणत डोळा चुकवला व मधलं दार लावत शांतता असलेल्या मागच्या घरात आला व झोपला. हळू हळू गलका कमी होऊ लागला. साऱ्यांनी आपापल्या जागा पकडत झोपेची लय पकडली.

  

घनशाला मागच्या बाजूला कुत्र्यांची झुंबड उडालेली ऐकू आली. तो उठला. तोच मागनं शाली येताना दिसली. त्याही स्थितीत घनशा प्रसन्न झाला.


"अहो मागं ठेवलेल्या भांड्यांना खरतटं असेल. कुत्री खाण्यासाठी झुंबड करताहेत. मी गेली हुसकायला पण ती अंगावर आली म्हणून परतले. हाकलता का त्यांना!"

शाली घनशाला लाडीक विनवू लागली.

 

घनशा उठला व मागं जाऊ लागला. पाठोपाठ शाली. त्यानं घनशाला अधिकच चेव आला. तो त्यांना पडलेल्या काठीनं हाकलू लागला. तोच पाण्याच्या टाकीत शाली वाकुन काही तरी काढू लागली.

तो परत आला...


"काय शोधतेय गं टाकीत!"

"काही नाही हो माझं कानातलं पडलं तेच शोधतेय!"

"दूर सरक मी पाहतो!" घनशा म्हणाला.


घनशा पायऱ्यावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीत वाकला. तोच मागून लाथ बसली व तो मान मुडपत टाकीत कोलमडला. तोच शालीनं की नलूनं, जवळची वरणाची डेग उचलत तोंडाचा भाग टाकीत अडकवला.

ओझरती दिसणाऱ्या नलूला, "नलू तू?" म्हणत तो पाय वर करणार तोच पाय डेगीत अडकले. त्याच्या अंगाची घडी झाली. नलूनं पायऱ्यावरची टाकी लाथ मारून जोरात ढकलताच गरगर घुर्र्रर्र आवाज करत टाकी घरंघळत खाली आडाकडं आली. मध्ये घनशा घुसमटू लागला. त्याला फासावरून उतरवून आपण टाकीत कोंबलेली नलू दिसू लागली. नलूनं आडाच्या कठड्यावर डेग अडकवलेली पाण्याची टाकी चढवली व आडात ढकलली. 'भम्मsss' आवाज आला व पाणी उडवत टाकी आडाच्या तळाशी गेली. डेगीच्या व टाकीच्या बारीक फटीतून हळू हळू पाणी शिरू लागलं पण त्या आधीच घनशाचा श्वास फुलू लागला. पण लाथेचा जोर लावून डेग वर ढकलण्यासाठी त्याच्या अंगाची घडी उलघडलीच नाही. 

 

आडात टाकीचा जो भम्म आवाज झाला त्यानं आडाची नदीकडच्या रेताड भिंतीला मोठं विवर (भुयार) पडलं. जी पोकळी पार शिवालयाखालून नदीकडं उतरणारी होती. त्यात घनशा अडकलेली टाकी सरकली.


आवाजानं लगीन घर उठलं. माणसं आडाकडं पळाली. पण त्यांना वरून आडात काहीच दिसलं नाही. तोच घरात बायांचा गलका उठला.

घरात शाली झोपेतच ओरडत होती... "मला महावस्त्र मिळालं नाही तर मी तुमच्या भाऊबंदकीत कसं भेटू देईन? नाही... कदापि शक्य नाही."

सकाळी घनशाच दिसेना. शोधशोध शोधलं. लगीन घराचा नूर बदलला. भाऊबंदकीनं निर्णय घेत माधवरावांची जवळची चार घरं सोडत सुतकच तोडलं. जेणेकरून ही ब्याद नको.


चिमेनं सारं सांगताच गोपालला आणखी घाम फुटला. त्याला आता आपल्याला पायऱ्यावरून टाकी का दिसली व नंतर आडाजवळच गायब झाली हेही लक्षात आलं. पण त्याला मनात एक शंका उद्भवली.


"चिमे तुला हे सारं कसं कळालं गं मग घनशाबाबत, वसंताबाबत?" तो खुळ्यागत शहाणपणाची शंका विचारून गेला.

चिमा हसली.

"गोपाल तुला हे अजूनही कळलं नाही!" नी ती त्याच्याकडं पाहू लागली.


गोपालच्या मनात पाल चुकचुकली. तोच त्याला मागून ट्रकवाला जोरजोरात हाॅर्न वाजवत होता व लाईटच्या उजेडात त्याचे डोळे दिपत होते.


ट्रकमधून शंकर ड्रायव्हर खाली उतरला. त्यानं आपल्या मालकास ओळखलं. तो केळीचा ट्रक खाली करून दिल्लीवरून येत होता व रस्त्यात वेडवाकडं चालत झुकांड्या देणाऱ्या गोपालरावास त्यानं गाडीत बसवलं. गोपालची डोळ्याची फुललेली व लाल झालेली खळी त्यानं ओळखली व ट्रक वाटवीकडं आणला. रस्त्यात गोपाल त्याला सारखं सांगत होता.


"अरे ती चिमा तिथंच राहिली ना! तिला पण बसवा! आम्ही सोबतच फिरत होतो!"


माधवरावांनी पुन्हा सकाळीच गोपालरावांना पाहताच तालुक्याला फोन केला तर चिमा भिखूशेठ चालूच उठत गोपाललाच शोधत होते. चिमा तर तिथेच होती. मग गोपालला प्रश्न पडला रात्रभर माझ्यासोबत कोण फिरलं?

 

दहा वाजेपर्यंत वैद्य येताच त्यांनी गोपालला झटकलं. गोपालची धुंदी उघडली. नलू सतत येते पण आपणास मात्र काही करत नाही म्हणजेच तिचं काम आता झालंय. तिला आता मुक्ती हवीय.

घनशाचा उलगडा गोपालला झाला पण इतरांना कुणालाच माहीत नव्हता.

  

वैद्यबुवांनी घर, मंदिर, एजंसी, पारणी, आड सारं फिरून पाहिलं. पण ते विसाव्याचा आंबा व आड या ठिकाणीच घुटमळू लागले. त्यांच्या अनुभवानुसार सारं आड व आंबा इथंच अडलंय. पण काय हे त्यांनाही उलगडता येईना.


हे गोपालनं ओळखलं. नलू येऊन आपणास काही तरी सांगतेय. म्हणून त्यानं दोन दिवसाच्या साऱ्या घटना मनात घोळवल्या. मग त्यानं माणसांना फोन लावत गाळ काढण्याची क्रेन मागवली. क्रेन येताच आडातून गाळ उपसण्यास सुरूवात झाली. त्यानं नदीकडचं धपाड तिरपं खणावयास सांगितलं. सायंकाळपर्यंत रेती काढणाऱ्या क्रेननं पाण्याची टाकी डेगेसहीत बाहेर काढली. क्रेननं पंज्यानं दाब देत जोर लावत डेग काढली व हाडाचा सांगाडा बाहेर आला. गोपालनं माधवराव, नारायणरावास धीर देत हाच तुमचा घनशा हे सांगितलं. रडण्याचे सूर घुमले. मग गोपालनं नारायणराव व आबांना काटवनात नेत जागा विचारत तेथूनही क्रेननं नलूची सांगाड्याची टाकी काढली. गोपालनं लगेच एकास पिटाळत एक अतिशय महागडे व सुंदर उडणाऱ्या पदराच्याच रंगाचं महावस्त्र आणवलं. आता वैद्यालाही लक्षात आलं. मग त्यानं विधीवत तारणी काठावर नलूच्या सांगाड्यावर महावस्त्र टाकत घनशाचा सांगाडा व नलूचा सांगाडा दोघांचं सोबतच दहन केलं. नलूनं मनानं वसंताला कधीच स्विकारलं नव्हतं ती मनातून घनशाशीच जुळली होती.


तद्नंतर विसाव्याचा आंबाही फुलला तो ही मोहरानं बहरला. चिमा व गोपाल लवकरच लग्नबंधनात अडकले. माधवराव व नारायणरावास मुलांच्या जाण्याचं दुःख वाटलंच पण आपल्या पोरांनी नलूला अव्हेरलं व त्यांची सजा त्यांना मिळाली व आपणही त्याच्या पापात सहभागी होतो म्हणूनच विधात्यानं त्याची शिक्षा म्हणूनच आपणास पुत्रवियोग दाखवला असावा...


 समाप्त


Rate this content
Log in

More marathi story from Vasudev Patil

Similar marathi story from Horror