Vasudev Patil

Horror

4  

Vasudev Patil

Horror

महावस्त्र - भाग ३

महावस्त्र - भाग ३

9 mins
621


नलू....!

नलू.....

माधवराव आबांनी उसासा टाकला. त्यांना सारा पट आठवू लागला.


ताम्हणपेठ मधील तुकाची मुलगी नलूला वयाच्या दहाव्या वर्षापासूनच नायजाताईनं आपल्या जवळ ठेवलं. नायजा व बनू या चुलतबहिणी जावा झालेल्या. नायजाचा वसंता, बनूचा घनशा व नलू एक दोन इयत्ता मागेपुढे. भाऊ तुका गरीब असल्यानं त्याला हातभार म्हणून ती भाचीला घेऊन आली व वसंताशी नातं लावत आपली भावी सून म्हणूनच शिकवू लागली. वसंता, घनशा, नलू पारणी पार करून ताम्हनपेठेतच हायस्कुलात जाऊ लागले. त्या वेळेस माधवराव व नारायणराव यांची परिस्थिती आजच्यासारखी नसली तरी तुकापेक्षा खूपच चांगली होती. दिवस जाऊ लागले तशी केळीच्या उत्पादनानं श्रीमंती येऊ लागली. नायजा, माधवरावास नलू पोरीचा पायगुण चांगला वाटला. त्यांनी वसंतासाठी नलूचं सून म्हणून पक्कं ठरवलं. हायस्कुलातून ही पोरं तालुक्याला काॅलेजला गेली. नलू दोनेक वर्ष मागे. पुढे वसंता इंजिनिअरींग होत एम.बी.ए.साठी मुंबईस गेला. इकडं घनशा व नलू कला शाखेत पदवीधर झाले. तो पावेतो नलूसही आपणच या घरची सून म्हणून मन:स्थिती झालेली. पण वसंतानं मुंबईतच कोकणातली मुलगी पसंत केली. त्याच्या मनात नलूला जागा करताच आली नाही. सर्व गाव, नातेवाईक घरानं त्यांना जोडीदार म्हणून स्विकारलेलं पण ऐन वेळेस वसतानं नकार देत सारं सारं खुलं सांगत कोकणातील मुलगीच आपण फायनल करणार असल्यानं नलूचं काय करायचं ते तुमचं तुम्ही पाहा म्हणत साऱ्यांना त्यानं बुचकळ्यात टाकलं. माधवरांवांनी संताप करत त्यास भरपूर मनवलं पण तरी उपयोग झाला नाही. तुकाला तर आपली एकटी पोर, नायजाताईनं उगाच नातं लावून खोडा अडकवल्यागतच झालं. त्याही स्थितीत माधवरावांनी तुकास धीर दिला.


"नलूला आम्ही या घरची सून म्हणूनच वाढवलं, शिकवलं. नाही वसंता तरी ती याच घरची सून होईल. वसंता काय नी घनशा काय! नलूचं घनशाशी पक्कं करून टाकू."

त्यांनी आधीच आपला भाऊ नारायणचा सल्ला घेतलाच होता.

  

घनशा-नलूच्या कानावर या साऱ्या घडामोडी पडतच होत्या. आजपर्यंत घनशानं तिला वसंताची जोडीदार म्हणूनच पाहिलं होतं व तिनंही चुलत आत्याचा मुलगा म्हणूनच पाहिलं होतं. दोघांची मने स्वच्छ बिलोरगत होती. येथूनच नलूच्या कोऱ्या मनात रंग भरायला अचानक सुरूवात झाली. कारण वसंता आपला जोडीदार होणार हे लहानपणापासून ऐकून इतकं बोथट झालं होतं की वसंताबद्दल तिच्या मनात अंकुर फुटलाच नव्हता. फक्त याचीच जोडीदार होणार इतकंच. कारण चार वर्षापासून तोही मुंबईलाच असल्यानं सुटीपुरताच घरी येई. पण वसंतानं नकार देताच पंधरा दिवसात ज्या घडामोडी घडल्या त्यानं कोऱ्या जमिनीत वळिवानं मृद्गंध सुटावा तसंच घडलं. नलू घनशाबद्दल अचानक विचार करू लागली.

   

नलूला गेल्या पावसाळ्याचा प्रसंग आठवला. वसंता कामानिमित्त तीन-चार दिवस आलेला होता. तुकानं श्रावण महिन्यात दोन्ही भाच्यांना जेवणासाठी बोलावलं. वसंता, घनशा व नलू ताम्हनपेठला गेली. जेवण आटोपून पाच वाजता माघारी फिरली. पारणीला कमरेपर्यंत पाणी. पारणीचं एक वैशिष्ट्य होतं. सातपुड्यात पाऊस झाला की अचानक पूर येई. त्यात तिच्या पाण्याला ओढ खूपचं. पात्रात गोल गोल गोटे. कमरेवर थोडंही पाणी गेलं की गोट्यावरून पाय निसटला रे निसटला की माणूस सरळ वाहत तापीत जाई. पण नदीकाठाच्या माणसांना सवय असल्यानं पाय वाळू किंवा गोट्यावरून उठू न देणे, किंवा केव्हा चालत जायचं वा केव्हा पोहत तिरपं काठावर निघायचं हे पक्कं ठाऊक असायचं. त्या दिवशी तिघं पारणीत उतरले. अर्ध्या नदीत येताच अचानक वळणावर लोंढा दिसला. तिघांनी पाय उचलायची घाई केली पण तोच रौं रौं करत पाण्याचा लोट आलाच. तिघांनी उड्या घेत पोहायला सुरूवात केली. घनशा पुढे निघत काठावर लागत चढण चढू लागला. वसंतानं काठ गाठला व मागे पाहू लागला. काठावर लागू पाहणाऱ्या नलूला वाढणारा लोंढा पात्रात ओढू लागला व ती धारेत सापडत प्रवाहात गटांगळ्या खात वाहू लागली. तिची शक्ती अपुरी पडू लागली. वसंता काठावरून पुन्हा पाण्यात उडी घ्यायला कचरू लागला. त्याची हिम्मत बसली. पण पुढे गेलेल्या घनशानं मागे वळून पाहताच धावत येत वरून प्रवाहात अंग झोकलं. हात पाय मारत वेगानं जाणाऱ्या नलूला तो जीव तोडून गाठू लागला. पण उशीर झाल्यानं नलू वेगानं पुढं जात होती. बऱ्याच लांबपर्यंत नलूला गाठत त्यानं तिचे केस पकडत हळूहळू तिरकस पोहत काठावर लावलं. काठावर‌ दोघेही पालथी पडली. नंतर वसंता जवळ येताच घनशानं त्याच्या कानाखाली आवाज काढला.


"अरे मला वाटलं ही येईल बरोबर म्हणून उडी घेत नव्हतो व नंतर मी उडी मारणार तोच तू उडी घेतली."


लाल गाल चोळत वसंता पुटपुटला..

नलूला त्या वेळेस वसंताचा राग आला होता पण घनशा बाबत तरीही काही वाटलं नव्हतं. पण आताही वसंतानं नकार दिला तरी घनशा आपणास लगेच स्विकारतोय हे पाहून त्यावेळच्या घनशाचं भर पुरात उडी मारणं आठवलं नी तिच्या कोऱ्या मनात घनशानं प्रवेश केला.


उन्हाळा लागला वसंता आला. तोपर्यंत नलू व घनशाची मनं जुळली तरीही तारुण्यसुलभ अंतर वाढलेलं.

मळ्यातले रायवळ आंबे तोडून लावलेली अढी पिकली. जो तो आंबे खाऊ लागला. दुपारी नलू वसंता घनशा, चिमा एकत्र आंबे खायला बसले. चिमानं हातात आंबा घेत चोळायला सुरूवात केली. आंब्याचं नाकं तुटलं व पिवळ्या गोड रसाची चिरकांडी नलूवर उडाली. मग तर स्पर्धाच उडाली. नलूनंही तिच्यावर उडवली. त्यात घनशा वसंताची भर पडली. नलूचा पुर्ण चेहरा पिवळ्या रसानं भरला. ती धुण्यासाठी बाथरूमकडं पळाली. तोच घनशा मागोमाग गेला. त्यानं तिला पकडत.... चेहऱ्यावरचा रस हातानं....


मागून येणाऱ्या वसंतानं हे पाहिलं. वसंताला प्रथमच जीवनात आपण नलूला नाकारून मोठी चूक केलीय ही जाणीव झाली. आता तिच्या चेहऱ्यावरील आंब्याचा उडालेला रस आपण नाही पुसू शकत या विचारानं त्याच्या हातातला आंबा केव्हाच फुटला व कोय दूर भिंतीवर उडाली. त्याला पिवळ्या रसानं माखलेली नलू दिसू लागली. नलुच्या चेहऱ्यावर घनशाची जणू हळदच लागत होती.

पुढच्या दिवसात त्याला नलूचं बदलतं रूप दिसू लागलं. आपण कोकणाकडच्या हापूस, पायरीच्या नादात पारणी काठचा रायवळ आंबा पायी तुडवला याचा त्याला पश्चात्ताप वाटू लागला व घनशाबद्दल त्याच्या मनात असुया दाटली.

  

माधवराव, नारायणरावांनी घनशा व नलूचा साखरपुडा करत बस्त्याची तारीख ठरवली. त्याचवेळेस वसंतालाही लवकर त्या कोकणातील मुलीच्या घरच्यांचा सल्ला घेण्याचं सांगत दोन्ही लग्न सोबत करण्याचं ठरवलं. पण तो पावेतो वसंताच्या मनातील घनशाबद्दलच्या असुयेनं वणव्याचं रूप धारण केलं होतं. त्यात दोघांचा बस्ता फाटल्यानं वणवा आणखीनच धुमसू लागला. आपण नाकारलं ही चूक. ती घनशानं सावरून आपल्या नाकावर आपल्या सख्ख्या मामाची मुलगी आपल्या समोरच आपल्याच घरात आणेन. नांदताना आपण नाही पाहू शकणार. तेही हयातभर! हे कदापि शक्य नाही. मग त्यानं मुंबईला परतायचं ठरवलं पण त्याआधी त्यानं घनशाला गाठलं. 

  

शिवालयात तो व घनशा बसला. ताम्हनपेठेतून बाजारहाट करून खेड्यावरची व वाटवीतली माणसं परतत होती. पारणीचा चढाव चढून येणाऱ्या कडूच्या मुलाकडं दोन माठ होते. चालता चालता अनावधानाने माठाला माठ लागला व एक माठ टिचला. कडूनं मुलाच्या पाठीत धपाटा घालत उलट्या बोटानं माठ वाजवून पाहिला. एका माठाचा आवाज 'बधबध' येताच तो त्यानं काठावरील विसाव्याच्या आंब्याकडं फेकला.


वसंतानं कडूला मुद्दाम थांबवलं.

"कडुबा नवा माठ का फेकला?"

"आरं वसंता शहाण्यानं घरात टिचलेला माठ ठेवून काय कामाचा!टिचलेली वस्तू ठेवू नये घरात! फेकलेलाच बरा!"

 

वसंता हसला. कडू निघून गेला.

"घनशा समजलं का? त्या कडुबानं काय सांगितलं?" वसंतानं विचारलं.

"नाही! काय सांगितलं!"

"घनशा टिचलेल्या माठात कितीही प्रयत्न केला तरी पाणी टिकत नाही.

व इतर कामासाठीही लोक तो वापरत नाही. कारण टिचलेली वस्तू असो वा..... घरात ठेवणारा मूर्खच...." त्याचवेळी संध्याकाळच्या देवदर्शनासाठी नलू नेमकी शिवालयात आली.


तिच्याकडं हेतूपूर्वक पाहत वसंतानं घनशाच्या खांद्यावर हात ठेवत, "चल भावा, तुझं माझं रक्त शेवटी एक म्हणून तुला हुशार केलं."

वसंता दुसऱ्या दिवशी निघून गेला. पण त्याच्या मनात पेटलेल्या वणव्याची चूड घनशाच्या मनरूपी सुरुंगास लावून गेला. घनशा बिथरला त्यानं नलूशी बोलणंच सोडलं. ती दिसताच त्याची आग होऊ लागली. 'टिचलेलं मटकं! घरात ठेवू नये! ' यानं तो अंगारगत तापू लागला. त्यानं सारा प्रकार आई- वडिलास कथन केला. नारायणराव संतापला. 'वसंताचा हा पराक्रम भावा-वहिनीस माहीत असावा व तो त्यांनी लपवला. नी असली नलू आपल्या पोराच्या माथी मारणार? बस! तेथूनच नलूच्या नशिबास उतरती कळा लागली. नारायणराव -बनू व माधवराव नायजा यांच्यात भांडणं सुरू होत हिस्सेवाटणीची भाषा होऊ लागली व वाटणी ही झाली. नलूला त्या स्थितीत ताम्हनपेठला पाठवलं. माधवरावास कळेना काय बिनसलं. नलूलाही घनशाची बदललेली वागणूक बुचकळ्यात टाकू लागली. नलू सोबतच तिचा फाटलेला बस्ताही पाठवला गेला. पण तो परत पाठवला याची तुका वा नलूस जाण नव्हती. नारायणराव व बनूनं तिचा सख्खा भाऊ-तुक्याचा चुलत भाऊच नामूस बोलवणं पाठवलं. त्याची मुलगी शाली ही पण नलूच्याच वयाची. बनूनं नलू ऐवजी त्या भाचीलाच घनशासाठी ठरवलं. तुक्याला हे माहित पडताच आधी वसंतानं नाकारलं तेव्हा छी थू झाली नी आता जर घनशानंही बस्ता फाटल्यावर नाकारलं तर पोरीच्या इभ्रतीचा कालाच होईल. समाजात नाक जाईल आपलं. तो रडतच वाटवीत आला.


त्यानं माधवरावांची भेट घेतली. नारायणरावास समजावयास लावलं. पण उलट नारायणरावानं, "शालीशी आमचं पक्कं झालं. तुमचा बस्ता तर आधीच परत केलाय..." रागात ठणकावलं.


माधवराव हे ऐकताच चालून गेले.

"नाऱ्या, बनी! पोरीच्या इभ्रतीचं खोबरं करू नका!"

"आबा तुमच्या वसंतानच माती खाल्ल्यावर आम्ही आणखी काय करणार?"

हे ऐकल्या बरोबर माधवरावांना छातीत कळ आली.

  

आठ दिवस ते जळगावला दवाखान्यात राहिले. तुका घरी परतून ढसा ढसा रडू लागला. पोरीच्या बस्त्याचं गठूळं सोडून महावस्त्र हातात घेत रडतच, "पोरी नेसशील का तू हे महावस्त्र! लागेल का तुझं लग्न!" विचारे. नलूही त्या आक्रोशानं रडे.

  

घनशा व शालीचा बस्ता फाटला व नलीच्या उरल्या सुरल्या आशाही धुळीस मिळाल्या. आतापर्यंत तिला वाटत होतं की घनशाला घरच्यांनी दबाव आणला म्हणून तो थांबला असेल पण तो आपणास धोका देणार नाही. पण बस्ता फाटतच तिनं स्वत: भेट घ्यायची ठरवलं. पण त्या रात्रीच तुकानं बाईसमवेत पारणीत उडी घेतली.

  

दोन दिवसांनी शोधणाऱ्यांना तापी काठावर पुरसुंगात दोन्ही सापडली. माधवरावांनी नलूला उचलून वाटवीत आणलं. झिंज्या तोडत ती नाही सांगत असतानाच बळजबरीनं तिला आणलं. तिचा पाया पडत नारायण बनू नायजा साऱ्यांनी तिला समजावत सांगितलं तेच जवाब द्यायला लावले. माधवरावांनी तिला पुन्हा आश्वासन दिलं की घनशा वा वसंता कोणी का असेना पण तू आता या घरातच राहशील. पण तिला आता काहीच सुधरत नव्हतं. आपलं आभाळ फाटल्यानं आता आपणास आधारच नाही म्हटल्यावर याच्या विरोधात जाऊन काय साधणार म्हणून तिनं रडतच आत्यानं सांगितल्याप्रमाणंच पोलिसांसमोर सांगितलं.

 

माधवराव नारायणराव एक होत पोलिसांचं सारं प्रकरण मिटवलं. मामासाठी आलेल्या वसंताला व घनशाला खोलीत घेत माधवरावांनी दोघांनी मजबूत दणके देत बजावलं."तुमच्या दोघांपैकी कोण मला माहित नाही पण एकानं नलूला स्विकारलं तर ठिक अन्यथा दोघांना मीच जवाब देत तुरूंगात पाठवीन..."

माधवराव खोलीतून गेले. दोघे अंग झटकत उभे राहिले.


"घनशा नलूला स्विकार!" वसंता रागात म्हणाला.

"माझा काय संबंध. माझा शालीशी साखरपुडा झालाय. तुझं तूच निस्तर..."

हे ऐकताच वसंता व त्याच्यात फटाफटी सुरू झाली.


"घनशा त्या आधी नलूशी साखरपुडा झालाय तुझा नी गालावरचा आंब्याचा रस जिभेनं पुसताना काय संबंध होता रे तुझा? नी मला वरून सांगतोय?" वसंता फुत्कारला.

"त्या आधी माठ..... टिच..... विसरलास का?" घनशाही फणफणला.


"मुर्खा ते साफ खोटंय"

"ते खरं की खोटं तुलाच माहित. पण मी आता तिला स्वीकारणार नाही"

"मग मी कसं स्वीकारीन?" वसंतानं विचारलं पण तोपर्यंत

घनशा निघून गेला.

 

वसंताचं तर कोकणातील स्वातीशी पक्कं झालेलंच. मग वडिल तर आपणास सोडणार नाही. त्याला आपण खोटं सांगितलं तरी घनशा नाही म्हणतोय व आपण तर यास स्वत:च.... पाहिलंय. मग आपण का स्वीकारावं! नाही बिलकूल नाही.

दशव्यानंतर नलूसमोरच पुन्हा रात्री वाद उफाळले. बारा वाजायला आले नलूला ते सहन झालं नाही. ती ताम्हनपेठेत निघाली. तोच नायजानं दोघांना समजावलं...

"ती जर परत गेली व गावातल्या लोकांनी चिथावणी दिली तर पोलीस पुन्हा प्रकरण तापवतील शहाणे असाल तिला परत आणा..."

  

वसंतानं मनात काही ठरवलं. डोळ्यात आग तरारली.

"ठीक आहे मीच बलिदान देतो.आणा ते महावस्त्र सरळ नेसवतो व आणतो घरात. लग्न होईल नंतर यथावकाश..." त्याच्या या बोलांनी साऱ्यांचाच जीव भांड्यात पडला.

 

घरात पुन्हा परत आणलेल्या बस्त्याच्या गठुळ्यातलं महावस्त्र त्यानं काढलं व तो निघाला.

नलू निघाली होती तरी तिला एवढ्या रात्री काय करावं ते सुचेना म्हणून ती बराच वेळ काठावरच बसून होती.

वसंता गेला त्यानं तिला धरत उठवलं.


"झालं गेलं विसर. मला माफ कर. मीच नेसवतो तुला या महावस्त्राची बोळवणी!"


'बोळवणी' ऐकताच ती थरथरली.

तोच त्यानं तिच्या मानेभोवती फास आवळला. तिची गगन भेदणारी आरोळी घुमली. त्यानं पटकन तोंडात साडीचाच बोळा घातला व तिला फास लावत जवळच्या आंब्याकडं ओढलं. त्याही स्थितीत नलूनं बोळा काढत घायाळ हरणीगत करूण आवाजात ओरडलीच.


"वसंता मला महावस्त्र नाही मिळणार या घरचं! तू आता मला सोडणारच नाही! पण लक्षात ठेव मी मेली तरी तुलाच काय पण तुमच्या पुऱ्या भाऊबंदकीत कुणाला महावस्त्र नेसू देणार नाही..."


तो पावेतो नायजा, बनू, घनशा, नारायणराव व माधवराव आरोळी ऐकून पळतच आले. त्यांना दुरूनच हे कानावर पडलं. पण तो पावेतो त्यानं आंब्याच्या फांदीला खाली खेचत महावस्त्राचं दुसरं टोक फिरवलं नी जोर लावून कच्चकन ओढलं. झटका बसताच लाथा झटकत नलू सरसर वर जाऊ लागली. तिनं हातांनी मानेभोवतीचा फास काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला. जीभ बाहेर पडू लागली. लाथा हवेत झटकल्या जाऊ लागल्या. त्यानं फांदीला गाठ मारत उरलेलं महावस्त्र पदरागत लांबवलं. मानेपासून तो भाग पदरागत हवेत फरफर उडू लागला. लाथा झटकणं बंद होताच वसंता खाली बसला.

सारे पुतळ्यागत सुन्न.


"घनशा! माठ तू टिचवला नी माझ्या गळ्यात अडकवतोस!" नी वसंता रडू लागला.


माधवरावांनी बायांना शांत बसवत घरी काढलं. मागच्या दारातून पाण्याची टाकी आणली घनशा व वसंतानं नलूस फासावरून उतरवत टाकीत टाकलं व आंब्यापासून लांब काटवनात खड्डा खोदत टाकी पुरली. जागा साफसुफ करत परतले.

 

दोन चार दिवसांनी मिसींग केस नोंदवली. तालुक्याला, जिल्ह्याला पैसे घेत माधवराव फेऱ्या मारू लागले. हात ओले करू लागले. त्यांनी चिमा-वसंतास मुंबईत पाठवलं. घनशाचं शालीशी होणारं लग्न तूर्तास एक वर्ष लांबवलं.

पण नंतर वसंता कोकणातील पोर तगादा लावू लागली म्हणून लग्नासाठी घरच्यांच्या मागे लागला.

 

मात्र पावसाळ्यात लग्न होतात का? सांगत नलूच्या भीतीनं घरचे त्याचं लग्न पुढे ढकलू लागले. पण त्यानं पावसाळ्यातच तिकडंच कोर्ट मॅरेज करण्याचं ठरवलं व तशी परवानगी घेण्यासाठी तो वाटवीला पडत्या पावसात आला. नलूस तेच हवं होतं... विसाव्याच्या आंब्यांजवळ ती त्याचीच वाट पाहत‌ होती.


 क्रमश:


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror