Vasudev Patil

Horror

4  

Vasudev Patil

Horror

महावस्त्र - भाग २

महावस्त्र - भाग २

6 mins
733


कार्तिकी एकादशी होताच शेतकऱ्यांची कांदेबाग लागवडीची लगबग सुरू झाली. खोडातून पील फुटत रोप वाढू लागलं. बांधावरील बोरी काळसर हिरव्या बोरांनी लगडल्या. वाटवीला थंडी आपल्या बाहुपाशात घेऊ लागली. पारणीचं पात्र आकसू लागलं.


माधवराव व भिकुबानं गोपाल व चिमाच्या बस्त्याची तयारी सुरू केली. पण नारळ गोट्याच्या (साखरपुडा) कार्यक्रमापासून गोपालचा पुरता उत्साहच मावळत चालला होता. त्यालाही कळेना अचानक आपली मन:स्थिती का बदलत चाललीय. ज्या चिमाला मिळवण्यासाठी आपण चार महिने ठार वेडा झालो होतो, ती मिळताच जीवनात बहार आली. नी मग साखरपुड्यानंतर एकाएकी मन:स्थितीत बदल का होतोय. एक प्रकारची भितीच निर्माण झालीय आपल्याला. हल्ली चिमाला भेटायचीदेखील भिती वाटतेय. रात्री अपरात्री कसले कसले भास होतात. पूर्वी एजंसीत थांबताना किती प्रसन्न वाटायचं. समोरचं शिवालय, ती गर्दी, आरती, त्या समोरच्या आडावर पाणी शेंदणाऱ्या बाया, नी तो समोरचा काठावरील आंबाही किती प्रसन्न वाटायचा? पण हल्ली त्या आडाकडं नुसतं पाहिलं तरी भीती वाटते. कुणीतरी आत असावं नी सारखं आपणास तिकडंच बोलवतंय असंच. आपलं लक्ष पुन्हा पुन्हा तिकडंच जातंय. नी त्या आंब्यावर तर कुणी तरी झुलतंय. रात्री अपरात्री स्वप्नात त्या आंब्याच्या झाडावर लाथा झटकत कोणीतरी झुलतंय. पदर भरारा हवेनं उडतोय. पारणीकडंनं येणाऱ्या भयाण वाऱ्यानं तो झुला झुलताना दचकून उठतोय आपण नी तिकडं पाहतोय. तर काहीच दिसत नाही. हल्ली तर दिवसाही सतत तिकडंच लक्ष जातंय, एक दोन वेळा त्या आंब्याखालीही जाऊन आलोय आपण. वाटवीतील कुणी मेलं की तिरडी तिकडनंच नेतात नदीवर. त्या ठिकाणी विसावा देतात व खिचडी काढतात. हल्ली मटक्याच्या बऱ्याच ठिकऱ्या पडल्यात तिथे. आंब्याकडं पाहिल्यावर मनाला सुखावणारं काहीच वाटत नाही तिथं. उलट सुतकी कळाच्या वेदनाच जाणवतात. हा बदल साखरपुड्यापासूनच जाणवतोय आपणास. हल्ली तर वाटवीत थांबावंसंही वाटत नाही. पण तालुक्याला घरी गेलं की मात्र तिव्रतेने चिमाची आठवण येतेय. पहिल्या वेळी तिला गाडीतनं आणताना ताम्हणपेठेच्या पुढे रस्त्यावर गाडी थांबवताना जो आगोश होता तसाच आगोश, ओढ निर्माण होतेय व पुन्हा मन वाटवीकडं ओढतं. पण नदी पार करताच तोच आंबा, तोच आड, तोच झुला, त्याच ठिकऱ्या व भयाण जिवाला पोखरणारी उदासिनता.

   

आज बस्ता असल्यानं तो तालुक्यालाच थांबलेला. वाटवीतली बरीच गर्दी आलेली. चिमाला पाहताच गोपालच्या चित्तप्रवृत्ती उल्हसीत झाल्या. बऱ्याच दिवसानंतर त्याला बरं वाटलं. सोनं, भांडी घेतले. कपडे निवडले गेले पण चिमाचं महावस्त्र पसंत होतच नव्हतं. शेवटी झालं एकदाचं फायनल. चिमानं कुणाला लक्षात येणार नाही अशी इशारत करून बोट ठेवत 'हेच घेऊ का?' विचारलं. ती ते खोलून काठ पदर सारं पाहत होती. त्या महावस्त्राचा पदर पाहताना असलाच उडता पदर आपण कुठं तरी पाहिलाय! पण कुठं? गोपालला आठवेना व तो ताण देत आठवू लागला व पुन्हा तीच उदासिनता. साऱ्या उल्हसीत चित्तप्रवृत्ती मावळल्या. त्यानं निमित्त साधत काढता पाय घेतला व घरी येत झोपला. गर्दीत कुणाच्या लक्षात आलं नाही पण माधवरावाचं मन उंदरी (कसर) लागावी तसं कसकसू लागलं. आणलेला बस्ता आधी नवरदेवाकडं पाहण्यासाठी ठेवला. मग दोन-तीन दिवसांनी तो वाटवीत आणला नी मग वाटवीत संकटाचे मेघ घनगोफ करत गोंगावू लागले.

  

दुपारनंतर मळ्यातून येणाऱ्या केळीच्या गाड्या गोपाल एक एक करत पाठवू लागला. आठ वाजेपर्यंत तो मोकळा झाला. जेवणासाठी तो माधवरावाकडं जाऊ लागला. एजंसीच्या पुर्वेला रस्त्यानं सरळ टेकाड चढताना डाव्या हाताला शिवालय, बाग मग थोडी मोकळी जागा मग आड लागे. नंतर शेणा मातीनं सारवलेल्या पायऱ्या चढलं की माधवरावांची भाऊबंदकीची घरं हारीनं दक्षिणेकडे सरकत गेलेली. ही मागची बाजू.


तसंच रस्त्याच्या उजवीकडे एजंसी मग टेकाड. ते चढून पुढे बस स्टॅण्डचा चौक लागे. तोच रस्ता त्यांच्या तालुक्याकडं जाई. चौकातनं डाव्या हाताला वळणारा रस्ता पकडला तर माधवरावाच्या वाड्याचं पुढचं दार. गोपाल जेवायला पुढच्या दारानंच गेला. घरात बस्त्याचा पसारा एका खोलीत मांडलेला. तो पाहताच. त्याला या ठिकाणी काही तरी वावरतंय पण दिसत नसल्याचं जाणवलं. तोच मागून चिमा हसतच येत, "बस्ता पहायला आलेत का?" विचारू लागली. तिकडं दुर्लक्ष करत, "चिमे इथं काही तरी वावरतंय असं तुलाही वाटतं का?" या वाक्यासरशी चिमाचं हास्य उडालं व ती घाबरत वडिलांना बोलवू लागली. माधवरावांनी चिमाचं ऐकताच गोपालरावास पुढे नेत बसवलं. "गोपालरावांना सध्या खूप दगदग होतेय. आरामाची गरज आहे त्यांना!" सांगत विषय पालटवला. जेवण आटोपली. पण माधवराव, नारायणराव घाबरले. आपण करतोय हे पार पडेल की...? या विचारानं त्यांना थंडीतही घाम फुटला.

  

गोपाल जेवण करून एजंसीवर आला. त्यानं बाहेर खुर्च्या मागवत बाहेरच पथारी टाकली. मुनीमही थोडा वेळ बसले. काही मुकादमही होते. गप्पा सुरू झाल्या. इकडच्या तिकडच्या. पण गोपालचं लक्ष आंब्याकडं व आडाकडंच जात होतं. गप्पांवर लक्ष नव्हतंच. बऱ्याच वेळानं अष्टमीचा घडीचा चंद्र उगवला. बसलेले एक एक निघाले. पारणीच्या पात्रातल्या उरल्यासुरल्या पाण्यावरून थंड वारे वाहू लागले. गोपालनं खुर्च्या मध्ये ठेवायला लावत बैठक उठवली. तो आत गेला.

  

चिमाचा मनात विचार आणत तो झोपू लागला. वाटवीच्या नभातला चांद हळूहळू पारणीकडं चाल करत असावा. खिडकीतनं चांदणं आत येत होतं. ते पाहत पाहत त्याच्या डोळ्यात गुंगी दाटू लागली. पापण्या जडावल्या. पारणीच्या पाण्यावर आलेल्या टिटव्या मात्र झोपल्या नव्हत्या. त्यांना काय दिसलं कुणास ठाऊक पण त्या जिवाच्या आकांतानं कोघाट करत घिरट्या घालू लागल्या. गोपालची झोप चाळवली. तोच त्याला काही तरी घरंगळल्याचा जोराचा आवाज आला. तो उठला व दार उघडत बाहेर आला. त्यानं चौफेर कटाक्ष टाकला पण काहीच दिसेना. शिवालयाकडं धीरगंभीरता प्राचुर्यानं नांदत होती मात्र त्यात टिटव्यांचा आवाज विघ्न आणत होता. टिटव्या माधवरावाच्या घराच्या मागील दाराकडं झेपावत होत्या. गोपाल माघारी वळणार तोच गुळगुळ गुळगुळ दडदड दड दडदडाटssss आवाज आला नी गोपाल परत वळला. माधवरावाच्या मागच्या दाराकडच्या पायऱ्यावरून पाण्याची (नांद) टाकी घरंघळत खाली येताना त्याला दिसली. टाकीच्या तोंडाशी उलटं काही तरी अडकलेलं चांदण प्रकाशात दिसलं. गोपाल एजंसीतून बाहेर पडत तिकडं निघाला. तो पावेतो ती टाकी घरंघळत आडापर्यंत आली. गोपाल तिकडं निघताच स्टॅण्डच्या चौकाकडनं पाच सात कुत्री टोळक्यानं विव्हळत रडत, केकटायला लागली. गोपाल आडाकडं आला. त्यानं आजुबाजूला पाहिलं पण आताच घरंघळत आलेली पाण्याची टाकी त्याला दिसेना. त्यानं भरपूर शोधली पण टाकी दिसेचना. काय करावं? ठोठावं का मागचं दार माधवरावांना उठवण्यासाठी? पण उठवून काय दाखवणार? नी या वेळेस खुळ लागल्यागत दार ठोठावणं? असा विचार करत तो आडापाशी‌ रेंगाळला. आडातील पाणी मात्र त्याला शांत पहुडलेलं वाटलं. असेल काही तरी स्वप्नात भास! असा विचार करत तो परतला.


कुत्री एजंसीच्या पुढे सरकत आंब्याच्या झाडाकडं रिसडत रिसडत विव्हळत होती. गोपाल परत आला व दारातून आत गेला. त्यानं पाणी घेतलं. तो आडवा होणार तोच त्याला दरवाज्यावर काही तरी सासूल (चाहूल) जाणवला. त्याची छाती धडधडली. तो स्तब्ध होत कान टवकारू लागला. बाहेर आवाज येत होता. त्यानं अलगद नजर वळवत समोरच्या खिडकीकडं वळवली. कोणीतरी पाठमोरी नऊवारी साडीत- लग्नात महावस्त्र नेसलेली असावी तशीच बाई उभी व पारणीकडंनं येणाऱ्या हवेनं पदर वाटवीकडं फरफर उडत होता. हाच पदर आठवत होतो आपण! बस्ता फाडताना चिमेनं महावस्त्र निवडताना! या वेळेस ही बया कोण व काय करतेय? तो तसाच स्तब्ध उभा! नाडी तडतड तर छाती धडधड. तोच त्याच्या हातातला ग्लास सुटला. आवाजानं ती बाई चालू लागली.


"क क्क कोण? क्का का काय हवंय?" गोपाल उद्गगारला. तिनं चालतच तिरपं पाहिलं. पण तो पावेतो भिंतीची छाया आडवी आल्यानं त्याला चेहरा दिसलाच नाही. बाई रस्त्यानं आंब्याच्या झाडाकडं निघाली. बऱ्याच वेळेनंतर तो घाबरत बाहेर आला. त्यानं मंदिर आडाकडं पाहिलं. सामसुम..... तो वळणार तोच आंब्याकडं त्याला फांदीवर झुलता बंगला दिसला. मान वाकडी, लाथा जिवाच्या आकांताने झटकताना. हातानं मानेभोवतीचा फास सोडवण्याचा आटोकाट यत्न..... नी भरभर वाऱ्यावर फरफर उडणारा पदर....... त्याचा जीव डोळ्यात गोळा होऊ लागला. तोच पाठीमागून त्याच्या खांद्यावर हात पडला. सर्वांग थरथरलं तरी तो सरळ चालूच लागला पण किती वेळ! नजर मागे‌ वळलीच.


"कसं वाटतंय! आपलं महावस्त्र दुसरं कुणी नेसल्याचं समजताना...?”


"क्को..ण?"


"ती बघ आंब्याला लटकलेली महावस्त्रातली नलू....."

 

गोपालच्या छातीत प्राण गोळा होत बिंदू स्वरूपात गरगर फिरू लागला. त्याची शुद्ध हरपू लागली....

तरी कानावर शब्द आदळत होते...

"चिमेला महावस्त्रात पाहायचं असेल तर आधी मला मोकळं कर... फास काढ माझा.."

     

सकाळी आठ वाजता गोपालनं माधवरावाच्या घरात डोळे उघडले. समोर सारी तोहफा गर्दी. बाजूला खांबास रेलून उदास बसलेली चिमा! डोळ्यात पूर. 'आपण इथं कसं!' तो डोक्याला ताण देऊ लागला. पारणी काठाच्या फफुट्यात लोळून लोळून कपडे भरलेल्या अवस्थेत गोपालला विसाव्याच्या आंब्याजवळून मंदिरात दर्शनासाठी गेलेल्यांनी पाहिल्यावर उचलून आणलेलं. गोपाल शुद्धीवर येताच नायजाताईंनी कोरा चहा पाजत मीठ, मिरच्या, ढेप, अंडं, लिंबू उतरवत त्या ठिकाणी फेकावयास पिटाळलं. 

 

चहा पिऊन तरतरी येताच गोपालला आंबा, फास, उडणारा पदर आठवला नी त्यानं जोरानं हंबरडा फोडत "चिमे मी वाचलोच कसा गं?" म्हणत चिमेला बिलगला. त्याला धरत शांत करत माधवरावांनी बसवलं.

तरी तो एक सारखा रडतच होता.

सारं धडकं निघाल्यावर त्यानं आबांकडं पाहत श्वास रोखत पहिला सवाल केला..


"आबा ही नलू कोण......?”


माधवराव, नारायणराव, नायजाताई बनू व सारी भाऊबंदकीच जे नको होतं तेच समोर येतंय म्हटल्यावर धडकीच भरवत विस्फारली. आपल्या घरात लग्न होणारच नाहीत का? या सवालानं जो तो चिंतातूर झाला...


क्रमशः


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror