मायेचा ओलावा - उन्हाळा
मायेचा ओलावा - उन्हाळा
आज सकाळी कधीही न घडणारी गोष्ट घडली. अनूजने हट्ट धरला.ऐरवी शांत आणि सोज्वळ असलेल्या अनूने हट्ट करणे माझ्यासाठी आश्चर्यकारकचं होत. पण त्याचा हट्ट ही योग्यचं होता म्हणा. त्याला या उन्हाळी सुट्टीत आजोळी जायचे होते. माझ्या व माझी पत्नी संगीताच्या प्रायव्हेट जाॅबमुळे अचानक सुट्टी टाकून आजोळी जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे मी अनूला सारखा समजावण्याचा प्रयत्न करत होतो. पण आजपर्यंत राज, स्त्री व बालहट्टासमोर कुणाचे काही चालले आहे का? माझा 'हट्टीपणा' हा गूण अनूमध्ये असल्याचे मला समाधान वाटले. सरतेशेवटी अनूसमोर हात टेकून आम्ही पॅकिंग सुरु केली आणि निघालो आजोळी.
संगीता माझ्या चुलत मामाची मुलगी असल्याने माझं आणि अनूच आजोळ एकच. 'आजोळ' हा माझा आवडता विषय. प्रत्येक उन्हाळी सुट्टीत माझी स्वारी कोकणात असलेल्या ह्या आजोळी असायची. दिनक्रम ठरलेला असायचा. सकाळी लवकर उठून आजोबांसोबत काजू व आंब्याच्या बागेत जायचे.ते तोडून घरी आणायचे.आजीला गोडी लावून बोंडू मागून खायचा आणि जमा झालेले काजू बाजारात जाऊन विकायचे.मिळालेल्या पैशातून चार रूपयांचा गोळा खायचा.उरलेले पैसे आजीकडे नेऊन द्यायचे.दुपारी भात आणि चुलीतला सुका बांगडा खाल्यानंतर मित्रांसोबत रानात हिंडायचं.हिंडून झालं की गार नदीत डुंबायच, पोहायचं आणि पोहून कंटाळा आला की घरी आजीच्या कुशीत शिरुन मजेदार गोष्टी ऐकायच्या.
" प्रवासात काय त्रास जाव्क नाय मा?" पोहोचल्यावर मामा (सध्याचे सासरेबुवा) समोरच उभे होते. अनूज आधीच त्याच्या खांद्यावर ठाण मांडून बसला होता. मोटारीने आम्ही घरी पोहोचलो. अंगणात एकीकडे सुकत घातलेली सोल(कोकम) आणि दुसरीकडे सुकत घातलेल्या मासळीतून वाट काढत घरात शिरलो.अनूज खूपच आनंदी होता.परीक्षेत पहिला नंबर मिळाल्यावर ही नसतो इतका. मी अनूमध्ये स्वतःला पाहत होतो. घरात शिरलो आणि पाहतो तर काय, संपूर्ण घराची कायापालट झाली होती.घरात कोणत्याही जुन्या वस्तू नव्हत्या.आजोबा आणि आजीच्या फोटोला हार घातला होता. माझ्या बालपणीचे आजोळ जणू हरवलेचं होते. तरीही त्या वास्तूत होती आजोबांची प्रेमळ शिस्त, आजीच्या गोष्टी, पोहताना मित्रांच्या मैत्रीची साक्ष देणारी नदी,रानावनात हिंडताना खाल्लेला रानमेवा आणि मला माझ्या बालपणीची आठवण करून देणारा प्रत्येक उन्हाळा.
