माफ केलस ना ?
माफ केलस ना ?
सकाळी सुमारे ८ वाजता घरातला फोन घणाणला. 'हॅलो कोण बोलतय?' रमाकाकूंनी उत्सुकतेने विचारले. 'काकू मी अभय बोलतोय, मनोजच्या वाढदिवसाबद्दल शुभेच्छा द्यायला फोन केला होता काकू'.'हा बोल अभय बाळा' रमाकाकू अभयला म्हणाल्या. "मनोज ,ए मनोज बघ अभयचा फोन आलाय. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच म्हणतोय. " 'आई, त्याला सांग मी घरी नाही आहे म्हणून. ' मनोज रागातच म्हणाला. रमाकाकूंना हे नेहमीचच झाल होत. आजही अभयचा प्रयत्न निष्फळ ठरला होता. "अरे मनोज,अभय तूला कितीवेळा फोन करतो, तुझ्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करतो. पण तू त्याच्यासोबत का बोलत नाहीस. सर्वकाही विसरून जा आणि बोल अभयसोबत." 'आई मी त्याच्याबरोबर कधीही बोलणार नाही आणि एक गोष्ट लक्षात ठेव माझे काही बरे वाईट झाले तरीही काही यायची गरज नाही म्हणून सांग त्याला.' 'अरे, वाढदिवसाच्या दिवशी काय बोलतोयस हे? चल जाऊ दे , मी तुझ्या आवडीचा शिरा केलाय तो खाऊन घे पटकन. 'मनोज ने न्याहारी केली आणि ऑफिसला जाण्यासाठी निघाला. 'चल येतो आई' 'हा बाळा सावकाश जा.' रमाकाकू उत्तरल्या.मनोजने बाईक स्टार्ट केली. वाटेत अनेकजण फोन वरून मनोजला शुभेच्छा देत होते.एकामागोमाग एक फोन चालूच होते. मनोज सर्वांचा लाडका होता. त्याची मोठी मित्रमंडळी होती. पुन्हा एकदा फोन दणाणला.मनोजने पाहिले तर अभयचा फोन होता. "एवढ सांगूनही कळत नाही याला" म्हणत त्याने फोन कट केला. तरीही पुन्हा पुन्हा अभयचा फोन येतच होता. आता मात्र कंटाळून अभयने फोन उचलला. " कळत नाही का तुला, मला नाही बोलायचयं तुझ्यासोबत ." " हॅलो आपण ज्यांच्याबद्दल बोलत आहात त्यांचा B.K रोडवर अपघात झाला आहे. आपला नंबर last dialled असल्याने आपणास फोन केला. कृपया आपण सरकारी रुग्णालयात याल का? आम्ही या गृहस्थांना तेथे घेऊन जातोय."त्याचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच मनोजने बाईक वळवळी आणि रुग्णालय गाठले.
दरवाजासमोर उभा असलेला एक व्यक्ती समोर आला आणि म्हणाला "आपल्याला मीच फोन केला होता. हा घ्या त्यांचा मोबाईल फोन. त्यांना आत्ताच ICU मध्ये हलवलयं." मोबाईल फोन वर अभयने मनोजसोबतचा फोटो wallpaper म्हणून ठेवला होता. मनोज ICU च्या दिशेने धावला. त्याला कहीच सुचत नव्हते.तो डाॅक्टरांची वाट बघत ICU च्या बाहेर उभा राहिला.तेवढ्यात डाॅक्टर खोलीतून बाहेर आले." डाॅक्टर, अभय ठिक आहे ना?काळजी करण्याचे काही कारण नाही ना?" मनोजचे सवाल चालूच होते. 'अहो , शांत व्हा. त्यांची स्थिती अतिशय गंभीर आहे. मात्र आमचे प्रयत्न चालू आहेत." मनोज खाली कोसळला. त्याचे मन भूतकाळात डोकावू लागले.
मनोज आणि अभय खूप छान मित्र होते. ते शाळेत एकत्र जात, एकाच बाकावर बसत ,एकत्र खेळत आणि गृहपाठही एकत्रच करत.अभय अतिशय शांत, गुणी,अभ्यासू होता तर त्याविरुद्ध मनोज खोडकर व अभ्यासात मुळीच रस नसलेला असा होता. एकदा मनोजला वाईट संगतीने घेरले. तसा तो अभयपासून दूर जाऊ लागला.मनोज गृहपाठ ही करत नसे. अभयच्या कानावर मनोजच्या वाईट संगतीची खबर आली. त्याला खूप वाईट वाटले. त्याने सर्व हकीकत रमाकाकूंना सांगितली. त्यामुळे मनोजला घरी खूपच मार पडला .या कारणास्तव मनोजने अभयशी बोलणे पूर्णपणे बंद केले. त्याच्या मनात अभयविषयी राग वाढतच होता.अभय नेहमीच मनोजशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत असे मात्र मनोज आपल्या हट्टावर कायम होता. मनात विचारांचा हा घाळमेळ चालू असताना ,आपल्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवल्यासारखे त्याला वाटले. मनोजने वर पाहिले आणि काय आश्चर्य साक्षात अभय समोर उभा होता. "मनोज,अरे मित्रा तुझ्याबरोबर खूप काही बोलायचं होत रे. तुझ्याकडून काही ऐकायचे होते. माझे काही तुला सांगायचे होते. पण आता माझी वेळ संपलीय रे. मला जायला हवं आता " हळूहळू अभयची ती प्रतिमा अदृश्य होत होती.मनोज इतरत्र अभयचा शोध घेत होता. तेवढ्यात डाॅक्टरसाहेबांनी त्याला भानावर आणले."we are sorry सर आम्ही तुमच्या पेशंन्टला वाचवू शकलो नाही. " मनोजला रडू आवरेना. तो अभयच्या मृतदेहांसमोर उभा राहिला.त्याचे पाय थरथर कापत होते. तोंडातून शब्द फुटत नव्हते. डोळ्यातून वाहणा-या अश्रूधाराही थांबत नव्हत्या. " माझ्या वाढदिवसादिवशी चांगलेच गिफ्ट दिलेस मित्रा. चुकलं माझं,मी माझा हट्ट सोडायला हवा होता. तुझ्याबरोबर मनभरुन बोलायला हव होते.अभय सांग तू मला माफ केलस ना?बोल ना रे मला माफ केलस ना? अभयचा स्तब्ध चेहरा कोणतेही उत्तर देत नव्हता.सर्वत्र स्मशान शांतता होती.मनोजचे मतपरिवर्तन झाले होते मात्र आता वेळ निघून गेली होती.
