स्पर्श
स्पर्श
पृथ्वीवरील 'निसर्गचक्र' म्हणजे एक आश्चर्य. हिवाळा ,पावसाळा आणि उन्हाळा ही त्याचीच देणगी. यामुळेच तर आपल्या जीवनरुपी वृक्षाला नवनवीन पालवी फूटत राहते. या निसर्गचक्राचा एक समांतर दुवा म्हणजे आपले "जीवनचक्र". निसर्गचक्रात येणा-या विविध ऋतूप्रमाणे आपल्या जीवनात आपल्याला बालक-किशोर-वृद्ध या स्थितीतून जावेच लागते. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण आपण आनंद आणि उत्साहाने जगला पाहिजे.
बालावस्थेत असणा-या चंचलतेमुळे आपण आनंदी असतो. अंगात असणा-या जोश व स्फूर्तीमुळे तरुणवयात मन आनंदी राहते. वृद्धापकाळात थकवा आल्याने मात्र आनंदाची गोडी चाखण्यात अनेक अडचणी येतात. 'आपली पाळण्यात रांगणारी मुलं इतकी मोठी झाली!' या विचारात ते आपला आनंद शोधतात.
वृद्धापकाळ अर्थात दुसरे बालपण. बालपणी आपल्याला जसा आईचा वात्सल्यदायी स्पर्श हवाहवासा वाटतो. तसाच घरातील वृद्ध व्यक्तींना आपल्या कुटूंबियांचा प्रेमळ आणि मायेचा ओलावा असणारा स्पर्श आवडतो. मात्र तेथेच आपण कमी पडतो. गरजा पूर्ण करण्याच्या नादात, आपण त्यांना पुरेपूर वेळ द्यायला विसरतो. पण जेव्हा ते आपल्याला कायमस्वरूपी सोडून जातात, तेव्हा मनात राहतात त्या फक्त उणीवा.
म्हणूनच जेव्हा वेळ मिळेल किंबहुना विशेष वेळ काढून त्यांच्याबरोबर मनमोकळेपणाने बोला, हास्यविनोद करा. काही नाही जमले तर निदान 'आपण आहात म्हणून आम्ही आहोत ' ही भावना दर्शवणारा कृतज्ञतापूर्वक स्पर्श जरुर करा.
