मातृत्वाची झुंज
मातृत्वाची झुंज


आर्या चल उठ ग लवकर, डॉक्टर दुपारी नसतात आणि आज जाण गरजेचं आहे बाळा. उशीर नको व्हायला आवर". नेहा तिची मुलगी आर्याला उठवत होती.आज डॉक्टरांनी बोलवलेलं नेहमी प्रमाणे पण आर्या मॅडम लोळत होत्या. कंटाळा आलेला तिला डॉक्टर कडे जायचा. "आई बघू नंतर जाऊ ग. मला फार कंटाळा येतो डॉक्टर कडे जायचा. पुढंच्या आठवड्यात बघ ना ते आहेत का तेव्हा जाऊ." आर्याच्या तोंडून हे वाक्य ऐकताच नेहा ओरडलीच तिला "तुला कळत का उशीर करून चालत नाही सांगते ना?आवर दहा मिनिटात निमूटपणे." आईच जगदंबेच रूप पाहून आर्या ताडकन उठली आणि आवरायला घेतलं. दहा मिनिटात मॅडम तयार. दोघी पोहचल्या अर्ध्या तासात डॉक्टर कडे. आर्याला नर्स आत घेऊन गेली. नेहा बाहेर खेळणाऱ्या मुलांकडे टक लावून बघत बसली. त्या मुलांकडे बघत बघत ती तेरा वर्ष मागे भूतकाळात गेली.
लग्नानंतर चार पाच वर्षांनी डॉक्टर, देव असे कैक उपाय करून तिला दिवस गेले. त्यावेळी आकाश ठेंगण झालं तिला आणि तिचा नवरा अभयला. स्वतःचे सगळे लाड, हट्ट, डोहाळे पुरवून घेतले नेहाने नऊ महिन्यांत. घरी नवीन पाहुणा येणार म्हणून सगळ्यांच्याच आनंदाला पारावार उरला नव्हता. नेहाची आई आणि सासू तर नेहाच्या दिमतीला असायच्या. गरोदरपण अगदी मस्त मजेत गेलं नेहाच. आता वेध लागले होते बाळाचे. नववा महिना संपत आलेला आणि नेहा रोजच विचार करायची आज होईल का डिलिव्हरी. आज येईल का बाळ.?? आई सांगायची तरी की ते यायच्या वेळेस येणार ग पण शेवटी नवीन होणारी आई ती, उत्सुक होती बाळाला कुशीत घेण्यासाठी. अखेरीस तिच वाट बघणं थांबलं आणि आर्यांचा जन्म झाला. असह्य कळा सहन करून ती आई झाली आणि कधी आर्याला कुशीत घेते अस झालेलं तिला. आनंदाने घर न्हाऊन निघालेलं. पाहुण्यांची रेलचेल,सगळ्यांच्या शुभेच्छा याकडे तीच फारसं लक्ष नव्हतं. तिचे डोळे आर्याला शोधत होते. काही वेळाने नर्स आली पण बाळ नव्हतं तिच्या हातात. डॉक्टरांनी भेटायला बोलावलंय असाच निरोप घेऊन ती आली. नेहाचा चेहरा रडवेला झालेला पण अभयने धीर दिला. नेहाला सारखं वाटत होतं काही झालं तर नसेल माझ्या बाळाला. या विचारचक्रातच ती डॉक्टरच्या केबिनमध्ये पोहोचली. डॉक्टरांनी फार वेळ न दवडता नेहा आणि अभय ला सांगितले की बाळाला आम्ही under observation ठेवलंय. बाळाला श्वास घेताना त्रास होतोय. जन्मल्यानंतर बाळ रडलं तेही उशिराने. आमच्या असं निदर्शनास आले आहे की तिला जन्मतःच रक्तपुरवठा कमी होतोय. सध्या आम्ही सगळे प्रयत्न करून तिला वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय हे ऐकून अर्थातच नेहा आणि अभयला काही सुचत नव्हते. आधीच मुलासाठी एवढी वाट पाहिली, नऊ महिने तळहातावरच्या फोडासारख जपलं आणि जन्माला येऊन अस का व्हावं? नेहा ओक्साबोक्शी रडायलाच लागली. एवढा वेळ आवरून ठेवलेला बांध फुटला होता. बाळाच्या पहिल्या भेटीसाठी आसुसलेले तिचे डोळे आता अश्रू गाळत होते.
एक दिवस गेला या सगळ्यात. दुसऱ्या दिवशी डॉक्टर परत आले आणि बाळाची पुर्ण तपासणी करून नेहा आणि अभयला सांगितले की आता बाळाचा धोका पूर्णपणे टळलाय. आता ते सुरक्षित आहे. नेहा आणि सगळ्याच घरच्यांच्या चेहऱ्यावर हास्याची रेष उमटली. डॉक्टरांच्या 'पण' या शब्दाने सगळ्यांचे चेहरे परत चिंतातुर झाले. डॉक्टरांनी सांगितलं की ती आता बरी झाली असली तरी तिचा हा धोका कायमचा टळला नाही. तिच्या शरीराला रक्तपुरवठा कमी होण्याचा त्रास नेहमी असणार. यासाठी महिन्याला तिला रक्त पुरवठा करावा लागेल. महिन्याला रक्त चढवाव लागेल आणि हे कधीपर्यंत आम्ही निश्चितच सांगू शकत नाही. पुढे मागे तिची प्रकृती बघून ट्रीटमेंट बदलू शकते पण सध्या तरी हे महिन्याला चालू ठेवावं लागेल. कोणी काहीच बोलले नाही कारण बाळाचा जीव महत्वाचा होता. नेहा धावत बाळा जवळ गेली तिला कुशीत घेतलं. तिच्या त्या लोभस,निष्पाप चेहऱ्याकडे बघून म्हणत होती, "कसलं नशीब घेऊन आलीस ग बाळा. तुझ्या आगमनासाठी आम्ही किती उत्सुक होतो,किती तयारी केली आणि तू येतानाच ही जीवाची लढाई घेऊन आलीस. तूझ्या या लढाईत तुझी आई सोबत आहे तुझ्या. ही आई तुला कधीच काहीच होऊ देणार नाही. ही मातृत्वाची झुंज मी जीवात जीव असेपर्यंत लढेन". सगळेच भावुक झालेले पण स्वतःचे अश्रू आवरून सगळ्यांनी नेहा,अभयला आधार दिला. बाळाचं स्वागत घरी दणक्यात केलं. त्या दिवसापासून नेहा रोजच मातृत्वाची लढाई लढते. आर्याला ताप जरी आला तरी ती खूप कासावीस होते. कळत नाही त्या दिवसापासून दर महिन्याला आर्याला सुई टोचताना पाहून तिचं हृदय पिळवटून निघायचं. अभयची अवस्था तरी काय वेगळी होती. सगळं सांभाळून आर्थिक बाजूही त्याला सांभाळायची होती. त्यासाठी तो दोन दोन शिप मध्ये काम करायचा. नेहाने आर्यासाठी नोकरी सोडलेली. दोघे थकायचे पण आर्याला कधी काही कमी पडू दिल नाही. दर महिन्याला दोघेपण तिला डॉक्टर कडे घेऊन जायचे. आर्याच रडणं ऐकून दोघांना तो त्रास तिला द्यायला नको अस वाटायचं पण पर्यायच नव्हता.
आर्याची झुंज तिच्या जीवासाठी होती तर या दोघांची झुंज आर्यासाठी, तिच्यावरच्या प्रेमासाठी, त्या चिमुकलीने दिलेल्या मातृत्व आणि पित्तृत्वासाठी होती. या लढाईला सामोरं जायचं आणि नियतीला हरवायचं असा पणच केलेला नेहा आणि अभयने आणि सोबत आर्यानेही. या सगळ्या वातावरणात आर्याच बालपण त्यांनी हरवुन नाही दिल. तिला फार खेळायला पाठवता येत नव्हतं कारण तिला दम लागायचा मग हे दोघेच तिचे मित्र बनून घरात वेगवेगळे खेळ खेळायचे. तिचे सगळे हट्ट पुरवायचे. आर्यानंतर नेहा काही कारणास्तव कधी परत आई बनू शकली नाही. आर्याची दुडुदुडू पळणारी पावलं आता ही लढाई लढत लढत आता वेगाने धावू लागली आहेत. बरीच वर्षे आर्याला प्रत्येक महिन्याला रक्तपुरवठा करावा लागला आता तिला गोळ्या चालू आहेत आणि डॉक्टर नेहमी महिन्याला तपासणीसाठी बोलवतात. तो दिवस नेहा कधीच चुकवत नाही. एक दिवस उशीर झाला तरी काय होईल की काय ही भीती नेहाच्या मनात घर करून बसले. आणि का नसेल भीती, आर्याच्या जन्मापासून तिच्या एक एक श्वासासाठी ती लढले,रात्र रात्र जागले. तिच्यातलं मातृत्व कधीच झोपू देत नाही तिला. आर्या झोपली असली तरी रात्रीत उठून ती बऱ्याचदा तिच्या डोक्यावर हात फिरवत बसलेली असते. आज अशीच डॉक्टर सोबत मिटिंग होती आर्याची आणि आर्या त्यासाठी नको बोलत होती. ती तरी काय करेल बिचारी, आधी महिन्याला रक्त चढवायचे आणि आता आठवणीने रोज गोळ्या घ्याव्याच लागतात. इतर मुलांसारखं सामान्य आयुष्य नाही तिचं म्हणून तिलाही कुठेतरी दुःख होतं पण आई बाबाकडे बघून ती कधी दाखवत नाही. त्यांच्यासाठी ती सगळं हसत सहन करते.
तिची मुलगी इतक्या मनसोक्तपणे खेळू शकत नाही हे त्या खेळणाऱ्या मुलांकडे बघून नेहाला आठवलं आणि ती भावुक झाली. भूतकाळात गेली. आर्यांचा जन्मापासून आतापर्यंतचा प्रवास नेहमीच अस हॉस्पिटलमध्ये आली की तिच्या डोळ्यासमोरून तरळतो. भरलेल्या डोळ्यांनी ती पुन्हा मात्तृत्वाची झुंज दयायला उभी राहते. आर्या आई म्हणून धावत तिच्याकडे येते आणि हसतमुखाने दोघी हॉस्पिटल बाहेर पडतात. कथा काल्पनिक नसून सत्य आहे. पात्रांची नाव बदलण्यात आली आहेत. ही मातृत्वाची झुंज आज ही नेहा देते अगदी धीराने, धीटाने आणि हसऱ्या चेहऱ्याने. मुळातच स्त्री खुप सहनशील आणि धीट असते पण आई झाल्यावर मातृत्वाच वेगळं बळ येत तिच्यात. आई होते तेव्हाच तिने मनाशी शपथ घेतलेली असते की माझ्या बाळाला कितीही वाईट परिस्थिती आली तरी मी काही होऊ देणार नाही. मी ढाल बनून बाळाचं संरक्षण करेन. नेहाही तेच करते आणि तिच्या जीवात जीव असेपर्यंत ते ती करेलच.