माझ्या घरातील परी
माझ्या घरातील परी
अनन्या अतिशय हुशार, सुंदर, आणि नेहमी हसतमुख राहणारी. सकारात्मकता तिच्या चेहऱ्यावर झळकायची. सगळ्यांची मन सांभाळणं,सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करण, कोणाला काय मदत हवी असेल तर ती सढळ हाताने करणे, कोणाला योग्य अयोग्यची जाण करून देणं आणि कोणालाही दुखवायची नाही पण चूक तिथे बोलायलाही घाबरायची नाही. अशी बहुगुणसंपन्न म्हणतात तशीच होती अनन्या.
आता अनन्याची सासू होती जरा सासुपणा करणारी पण अनन्या कधी तिला पण दुखावत नसे. उगाच वादाला तोंड नको आणि नात्यात कटुता नको म्हणून ती शांतच असायची. अद्विक अनन्याचा नवरा तोही अनन्याला साजेसा असाच होता. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा दोघांचा. कोणाच्याही स्वप्नातला राजकुमार जसा तसाच अद्विक. दोघांचं एकमेकांवर भरभरुन प्रेम. अद्विकने अनन्याला कधी दुखावलं नाही की अनन्या तशी कधी वागली नाही.
अशा दृष्ट लागण्याजोग्या दोघांच्या संसाराला आज सात वर्षे पूर्ण झाली. अनन्याला एक गोड परी होती. होय… परीच नाव ठेवलेलं तिचं. दोघांना मुलगी फार आवडायची आणि वाटायचं मुलगीच व्हावी आणि देवाने त्यांची इच्छा पूर्णही केली परीच्या रुपात. पहिलं मूल आणि तेही लक्ष्मी मग दणक्यात स्वागत झालं परीच. घरात सर्वांची लाडकी. आजी पण परीचे खूप लाड करायची. पण आजीची म्हणजे अनन्याच्या सासूची सुप्त इच्छा होतीच की अनन्याला एक भावंड पाहिजे. त्यातून आपल्या समाजात “वंशाचा दिवा” ही संकल्पना इतकी घट्ट मुळं रोवून बसले की अनन्याची सासू त्याला अपवाद कशी ठरेल.
अद्विक आणि अनन्याच मुलगाच व्हावा अस काही मत नव्हतं. परीमुळे त्यांच्या कुटुंबाला पूर्णत्व आलेलं पण सासुचही मत मोडता येत नव्हतं आणि परीलाही सोबत कोणतरी असावं असं अनन्याला वाटत होतं. अखेरीस दोघांनी दुसरा चान्स घेतला. सासू अनन्याची विशेष काळजी घेत होती. परीलाही सांभाळायची. आता परीला भाऊ मिळेल अस वाटत असतानाच परीला बहीण म्हणजे बाहुली आली. अनन्या आणि अद्विक डबल खुश झाले. दुसरी मुलगी म्हणजे अजून एक लक्ष्मी आली घरात अस त्यांना वाटायचं पण सासूबाईंचं मन जरा खट्टू झालं.पण म्हणून दुसऱ्या नातीचा त्यांनी राग राग केला नाही. तिचेही परीसारखे खूप लाड करायच्या त्या.
एक दिवस बाहुलीला खूप ताप आला.काही केल्या कमी होत नव्हता. डॉक्टरांनी सगळे प्रयत्न केले पण बाहुलीचा ताप कमी होतच नव्हता अशातच अद्विक आणि अनन्याला बाहुलीला गमवाव लागलं. बाहुली दोनच महिन्याची असताना अनन्याला सोडून गेली. अनन्या वर दुःखाचा डोंगरच कोसळला. परी होती पण तरीही बाहुलीलाही तिने नऊ महिने पोटात जीव लावून, असह्य वेदना सहन करून जन्म दिलेला, तिच्या भविष्याची स्वप्न पाहिलेली आणि अचानक ती सोडून गेली हे तिला खरंच वाटत नव्हतं. हे कमी म्हणून तिला सांत्वन करायला येणाऱ्या बायका म्हणायच्या “असुदे दुसरी मुलगीच होती गेली बर झालं, एक तर आहे ना आता तरी मुलगा होऊदे तुला” (अश्या विचार करणाऱ्या बायकाही खरंच आपल्या समाजात आहेत याचीच लाज वाटते). अनन्याला प्रचंड मनःस्ताप व्हायचा. तिने त्यानंतर सगळ्यांना भेटणच बंद केलं. अनन्याची सासू तिची अवस्था बघून काहीच बोलायची नाही. या काळात अद्विकने अनन्याला खूप सावरलं. परी मध्ये हळूहळू मन गुंतवून घेतलं अनन्याने.
आज श्रीकृष्ण जन्माष्टमी होती. अनन्या संध्याकाळी जन्माष्टमीची तयारी करण्यात व्यस्त होती. आज परीला तिने छान नटवल होत. श्रीकृष्ण बनवलेलं तिने परीला. परीच्या आजीनेच परीसाठी बासरी,मोराच पीस, श्रीकृष्णचा ड्रेस आणलेला. परीला नटवायची भारी हौस होती दोघींना. थोड्या वेळातच जन्माष्टमी पूजेसाठी सगळ्या बायका जमल्या. पूजा वगैरे झाली आणि त्यातलीच एक बाई परीकडे बघून अनन्याला म्हणाली,”आता खरा श्रीकृष्ण येऊदे अनन्या. किती दिवस परीला कृष्ण बनवणार आहेस?”
आज मात्र अनन्या शांत बसली नाही. ती सगळ्या बायकांसमोर म्हणाली “आता आणि इथून पुढे माझी परीच माझा श्रीकृष्ण आहे आणि असणार. मुलगा मुलगी भेद मी नाही करत. आज मुली चंद्रावर गेल्या, आजच्या मुली क्रिकेट खेळतायत, हॉकी खेळतायत, सैन्यातही आता मुली जातात,पायलट होतात, सातासमुद्रापार जाऊन देशाचं नाव उज्वल करतायत, ग्रामीण भागातही किती मुली, स्त्रिया आज सरपंच होऊन गावाची प्रगती करतायत,इतकच काय तर दहीहंडीची किती मंडळ आज फक्त मुलींचीच आहेत आणि ती मुलींची दहीहंडी तुम्ही अगदी आनंदाने बघता. इतकी प्रगती मुलींनी केली तरी तुम्ही मुलगाच “वंशाचा दिवा” याच जगात जगताय. मुलगा असावा याला माझा विरोध नक्कीच नाही पण म्हणून मुलींना कमी लेखून मुलाला जन्म द्यावा हे मला नाही पटत. माझी परीच आमच्या घरातला श्रीकृष्ण आहे आणि परीलाच सोबत कोणतरी भावंड हवं असं म्हणत असाल तर आम्ही दोघांनी एक मुलं दत्तक घ्यायचा निर्णय घेतलाय आणि तीही मुलगीच. परीला सोबतही होईल आणि एका अनाथ परीला आईवडिलांचं प्रेमही मिळेल. पुढच्या वर्षी अजून एक श्रीकृष्ण असेल आमच्या घरी, या तेव्हाही आनंदाने”.
दुसरी मुलगीच होती,बर झालं गेली अस म्हणणाऱ्यांना अनन्याने आज सडेतोड आणि चोख उत्तर दिलेलं. सासूबाईंनी काही न बोलता फक्त अनन्याला जवळ घेऊन अभिमानाने तिची पाठ थोपटली यातच अनन्याला सासूबाईंचं मत कळलेलं. तेवढ्यात अद्विकही आलेला. परीला श्रीकृष्णाच्या रुपात पाहून त्यालाही खूप आनंद झाला आणि आई आणि अनन्याला म्हणाला उद्या परीसाठी बाहुली म्हणजेच छोटी परी बघायला नक्की जाऊ. आजही मुलगा मुलगी असा भेद बऱ्याच ठिकाणी केला जातो आणि अशा कितीतरी अनन्याना हिणवल जात. अनन्याने घेतलेला निर्णय योग्य की अयोग्य नक्की सांगा. लेख आवडल्यास नक्की लाईक,कंमेंट्स करा. लेख लेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास काहीच हरकत नाही. ©सरिता सावंत भोसले