Sarita Sawant Bhosale

Inspirational

2  

Sarita Sawant Bhosale

Inspirational

माझा गुरू वसतो चराचरात

माझा गुरू वसतो चराचरात

5 mins
992


गुरूर ब्रह्मा गुरूर विष्णु,गुरु देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म,तस्मै श्री गुरुवे नमः🙏


आपलं आयुष्य म्हणजे एक कसोटीच आहे. एक न संपणारा संघर्ष. या संघर्षापासून यशापर्यंतचा मार्ग खडतरच असतो. आणि या खडतर मार्गावर योग्य दिशा दाखवणारा दिशादर्शक प्रत्येकाला हवा असतो..तो म्हणजेच गुरू,मार्गदर्शक. गुरू साक्षात परब्रम्ह असतो जो आपल्या बुद्धीचा विकास घडवून आणतो. लहानपणापासून प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्यावर असे गुरू भेटतात. मला ही भेटले. माझ्या आयुष्यातील पहिले गुरू अर्थातच आई वडील. ज्यांनी बोलायला,चालायला,पळायला शिकवल. चांगले संस्कार करत मला घडवलं आणि आजही ते या ना त्या मार्गे घडवतच आहेत मला. आई वडील असे गुरू आहेत जे आयुष्यभर आपल्याला चांगलंच देण्याचा,शिकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना धन्यवाद म्हणणं चुकीचं ठरेल, त्यांच्या संस्कारात मी अशीच घडतं जावो हीच सदिच्छा. पुढे शाळेत गेल्यावर खूप चांगले शिक्षक लाभले. तशी शाळेत मी हुशार होते पण खोडकरपण खूप होते😄. त्यामुळे जसे कौतुक करणारे गुरू भेटले तसे छड्या देणारेही. पण त्यांचा कधी राग आला नाही कारण ते माझ्या भल्यासाठीच होत. शिक्षक दिन म्हणजे खूप मोठा सण असल्यासारखं वाटायचे त्यावेळी. कोणत्या शिक्षकाला कोणतं फुल द्यायचं हे आदल्या दिवशीच ठरलेलं आणि दुसऱ्या दिवशी धावत पळत जाऊन पहिल्या नंबरला ते फुल द्यायची भारी घाई हसायची. शिक्षकही तेवढाच लळा लावणारे होते त्यामुळे आपोपाप जीव जडायचा त्यांच्यावर. आज हे मी थोडेफार लिहिते तेही एका शिक्षिकेमुळेच. कविता काय असते, ती कशी करतात,मनातल्या भावना शब्दात कशा उतरवायच्या हे त्या मॅडमनी आम्हाला शिकवलेलं आणि तेव्हापासून मी कविता करायला लागले. आधी फक्त यमक जुळवायचे😄. नंतर मॅडमनी सांगितल्याप्रमाणे भावनांना शब्दात मांडायला लागले. त्या गुरुमुळेच माझा कविता ते लेख प्रवास सुरु झाला😊. त्यांना मनापासून धन्यवाद😊. पुढे कॉलेजला आल्यावर चांगल्या शिक्षकांच्या रुपात,काही मित्र मैत्रिणींच्या रुपात नविन गुरू मिळाले. प्रत्येक व्यक्तीकडून मला काही चांगल्या वाईट गोष्टी शिकता आल्या. नवीन वाटांवर काटेही टोचले त्या अनुभवातूनही माझी मी खूप काही शिकले. गुरू म्हणजे योग्य अयोग्यची जाण करून देणारा, चांगलं वाईट ओळख करून देणारा पण काहीजण गुरू या शब्दाचा अपमान करणारेही असतात. तसे कुत्सित हास्याचे,वाईट नजरेचे शिक्षक मलाही या टप्प्यावर लाभले पण मी खचले नाही. या अनूभवातूनही अश्या प्रसंगांना तोंड द्यायला शिकले. अशा शिक्षक पेशातल्या वाईट प्रवृत्तीच्या माणसांना मी गुरू या यादीतूनच डिलिट केलं. थोडंस दुःखद असलं तरी तोही अनुभव मला कणखर बनवून गेला. नोकरीच्या निमित्ताने परत नवीन मित्रपरिवार मिळाला.नवीन सहकारी लाभले. त्यांच्याकडून तर खूप गोष्टी नव्याने शिकले. कारण माणूस परिपूर्ण नसतो. मी ही नवखीच होते तेव्हा कामाच स्वरूप,कामाची जबाबदारी सगळं काही शिकण्यास या व्यक्तींची मदत झाली. हा आता टीम मेंबर कडून harassment, tourcher असेही प्रकार घडले. पण घरच्यांनी शिकवणच दिलेली, स्वाभिमान जिवंत ठेवुन लढायचं,गहाण ठेवून हरायचे नाही. तेच शिक्षण इथे कामी आलं. खूप जणांनी माघार घे किंवा सोडून दे असे सल्ले दिले पण स्वाभिमान गहाण ठेवून जगायला घरच्यांनी शिकवलच नव्हतं. लढले बिनधास्त आणि विरोधकांना पुरून उरले. सोडून दे अस बोलणारे नंतर माझीच वाहवा करत होते. या कठीण वळणावर मित्रांच्या रुपात मला चांगले गुरू लाभले. ज्यांनी योग्य मार्गदर्शन केलं. थोडी डगमगले तेव्हा मला योग्य साथ दिली. हा अनुभवही मला अशा विकृत माणसांना कस हाताळाव, त्यांना त्यांच्याच भाषेत कस उत्तर द्यावे हे शिकवून गेला. पुढे लग्न झालं आणि नवऱ्याच्या रुपात नवीन गुरू मिळाला. मी तुफान लाटांसारखी आदळणारी आणि तो शांत लहरी. संयम आणि शांतता या दोन अतिमहत्वाच्या शब्दांशी ओळख त्याने मला करून दिली. समजून घेणारा आणि समजावून सांगणारा नवीन शिक्षक मला मिळालाय ज्याची शिष्या मी अजुनही आहे😄. नवीन घरात,नवीन नाती मिळाली तशी गुरू बनून चांगले वाईट अनुभव, माणसंही मिळाली. प्रत्येकाकडून काही ना काहीतरी मी शिकतेच. सध्या माझ्या मुलाच्या रुपात नवीन गुरू लाभलाय.फार छोट्या छोट्या गोष्टींमधुन आंनद मिळवायला मी त्याच्या कडून शिकते. छोट्या चमचापासून ते फिरणाऱ्या फॅन पर्यंत, उडणाऱ्या फुलपाखरापासून ते इवलुश्या मुंगीतही त्याचा आनंद लपलाय. फार त्रागा न करता हसायला शिकते मी त्याच्याकडून आता. माणूस फक्त दुसऱ्या माणसाकडूनच काहीतरी शिकत असतो अस नाही. मी माझ्या पुस्तक वाचनातून,लेखकांकडून खूप काही शिकले. ययाती पासून ते नरेंद्र जाधवांची उपरा, दाभोळकरांची अंधश्रद्धा निर्मूलनाच्या पुस्तकांपर्यंत बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. ही थोडीफार लेखणी त्या वाचनाचीच देण आहे. शिकण्याचा नेहमीच ध्यास असल्यामुळे मी प्रत्येक गोष्टीतून,प्रत्येक वस्तूतून काही ना काही शिकत असते आणि तेही सकारात्मक. सकारात्मक शिकलं तर ते खर शिक्षण(वाईट अनुभवातूनही) या मताची मी आहे. टी. व्ही वरच्या सिरीअलस, गाणी, बातम्या, रिऍलिटी शोज यामधूनही जेवढं चांगलं आत्मसात करता येईल तेवढं करत असते. शेंदूर फासलेल्या दगडाकडूनही स्वतःच अस्तित्व अबाधित ठेवायला शिकले. शेंदूर फासून तो देव तर होतो पण "दगडातला देव" होतो. देवत्व बहाल झालं म्हणून "दगड" म्हणून त्याची स्वतःची ओळख तो जिवंतच ठेवतो. समईतली प्रकाशमान वातही स्वतः जळून इतरांचं आयुष्य तेजोमय करायला शिकवते आणि सोबतच अंधारातही आशेचा किरण असतो याची जाणीव करून देते. वाळवंटात उगवणारा निवडुंगही मला शिकवतो कठीण परिस्थितीत जगायला. चिखलात उगवणार कमळ, काट्यात बहरणार गुलाब,अवघ दोन दिवसाच आयुष्य लाभलेलं फुलपाखरू, अशा निसर्गातल्या असंख्य गोष्टींकडून मी रोजच काहींना काही सकारातत्मक शिकत असते त्यामुळे निसर्ग हा माझा मोठा गुरू आहे. परमेश्वरावर असलेल्या श्रद्धेतही माझा गुरू लपलाय जो मनःशांती शिकवतो😊. आता एक नवीन मस्त गुरू मला मिळालाय तो म्हणजे मोम्सप्रेसो. या निमित्ताने नवीन लेखिका मैत्रिणी झाल्या आणि त्यांच्या लेखातून,त्यांच्या कडून खूप काही शिकायला मिळत. इथे चांगल्या लेखासाठी पाठीवर शाबासकीही मिळते आणि काही चुकलंच तर परत लिखाणासाठी प्रोत्साहनही. मोम्सप्रेसो च्या रुपात लाभलेल्या गुरूला खरच मनःपूर्वक धन्यवाद. सरतेशेवटी आपल्या प्रत्येकात एक गुरु लपलेला असतो. स्वतःकडून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो. रोज येणाऱ्या अनुभवांची शिदोरी सोबत घेऊन चालत असतो तेव्हा हेच अनुभव आपले गुरू बनून आपल्याला पावलोपावली मदत करतात त्यामुळे मी माझीही अनोखी गुरू आहे म्हणून मला माझा अभिमान आहे. माझ्या घरातच शिक्षकांचा भरणा😄 असल्यामुळे उपजतच अनेक संस्कारांचे धडे घरीच गिरवले पण आयुष्याच्या आताच्या वळणापर्यंत मला भेटलेल्या व्यक्ती, वस्तू,गोष्टी,निसर्ग,पुस्तक,लेखक,लेखिका आणि सर्वात महत्वाच माझे आजवरचे चांगले वाईट अनुभव यांनी मला एक चांगला माणूस म्हणून घडायला खूप मदत केली.म्हणूनच माझ्यासोबत माझा गुरू चराचरात वसतो😊. माझा गुरू ध्यानी मनी माझा गुरू तुमच्या माझ्यात माझा गुरू चांगल्या,वाईटात माझा गुरु दगडात माझा गुरु पुस्तकात माझा गुरू काट्यात अन फुलांत माझा गुरू श्रद्धेत माझा गुरू वसतो चराचरात🙏😊.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational