कुंपण..!
कुंपण..!


रविवारच्या सुट्टीचा आनंद घेत नेहमी प्रमाणे पहाटेच्या अंधारात दोघेही मॉर्निंग वॉकला जाऊन आले. घरात न करता येणाऱ्या अनेक चर्चाना तिथे उधान यायचा. कधी निष्कर्ष निघायचे तर कधी वादविवाद. पण पंचेचाळीस मिनिटांचा वॉक संपल्यावर विषय तिथे थांबायचे. आजही तसेच झाले. शिखा सतत तिला कोण काय बोलेल ह्याच विचारात स्वतःला जास्त झोकून द्यायची आणि मिलन तिला तिची हीच नकारात्मक भूमिका दूर करण्यासाठी मदद करायचा.
सकारात्मकता माणसाला पुढे जाण्याची शक्ती देते तर नकारात्मकता माणसाला कमजोर बनवते...
पायातले शूज काढत मिलन शिखाला सांगण्याचा प्रयत्न करीत होता. तिने दारातला पेपर उचलून हाती घेतला तर मिलनने मस्त तुळशीचा चहा ठेवला. हातात कप होता पण सतत होमेमिनिस्टर कुठेतरी हरवली आहे, हे त्याने चांगलेच ओळखले. एकटक तंद्रीतून डोळ्यासमोर कप धरत तिला तो म्हणाला...
" का ग काय झालं आहे आज..? कुठल्या गहन विचारात गुंतली आहेस.."
" कुठे काय... बस असंच.."
" मी तुला तुझ्या पेक्षा जास्त चांगला ओळ्खतो, का आज इतकी शांत आहेस. "
" नकारात्मक प्रतिक्रिया मनाला छळतात माझ्या.."
" आपण लक्ष नाही द्यायचे, एका कानाने ऐकायचे आणि दुसरीकडे सोडून द्यायचे..."
" होत नाही ना असं...नकारात्मक प्रतिक्रिया ऐकल्यावर आपण खरंच चूक केली का, असा प्रश्न सतत मनात येतो..."
" तुला स्वतः वर विश्वास नाही..?"
" आहे ना.. पण कोणी काही म्हटलं तर जिव्हारी लागतं रे. बघ ना...कालचीच गोष्ट बघ... मी आणि मनू दोघीही पार्लरमध्ये जाऊन आलो. उन्हाळा जवळ आल्याने तिचे केस जर कापून आले. तिची कटिंग होत असतांना मनात आलं ह्या वेळी जरा वेगळी हेअरकट करूया म्हणून तिचे केस तसेच कापले , तर..."
" मला आवडले तिचे कापलेले केस... पण.."
" मी तुझं कुठे बोलत आहे. मस्करी नको मला. माझं ऐकून तर घे. गाडीवरून खाली उतरत नाही तर आपल्या सोसायटीच्या दारात गोखले काकू भेटल्या...काय तुम्ही आज कालच्या मुली, जरा डोक्यावर केस राहू देत नाही मुलीच्या, कापून येता लागलीच. छान वाढू द्यावे त्यांचे केस. छान दिसतात मुली मग...!
तर समोरच रसिका उभी होती... तिने तर मनूचा पापाच घेतला..म्हणाली.. खूप छान हेअरकट मनूची.. कुठे केलीस, मला पण सांग..मी घेऊन जाईल माझ्या सानिकाला..क्षणभर तिला काय बोलावे हेच कळेना.. मी हसूनच तिला सांगते म्हणून निघून आली..!
तर येतांना लिफ्ट मध्ये पुरंदरे काका भेटले... त्यांची नेहमीची चौकशी केल्यावर लागलीच काका मनू म्हणाले...काय वेड्या सारखे केस कापले.. छान नाही दिसत...आपण शहाणं आहोत ,मग असे केस नाही कापायचे...छान शहाण्यासारखं राहायचं, असे म्हणाले..
आपण आपल्या आनंदासाठी आपल्या सोयीनुसार राहायला जातो तेव्हा इतरांच्या प्रतिक्रिया मनाला छेदून जातात. मनू सगळं ऐकत होती, पण मी काहीच न बोलता घरी आल्यावर तिचा छान फोटो शूट केला... तिला पण मज्जा आली... काही वेळाने तिला आणि मला मिळालेल्या प्रतिक्रिया अशा का ?? म्हणून तिने प्रश्न केला. मी फार काही तिला बोलली नाही. विषय बदलून तिला खेळायला पाठवून दिले. नंतर मात्र मन कशातच लागत नव्हते. सतत आपण काही चूक केली का..? असेच वाटत होते... कालपासून हेच चक्र सुरू आहे डोक्यात माझ्या..."
तिला काय आवडतं, तिला काय शोभून दिसते ह्यापेक्षा कोण काय म्हणाले ह्या मुळे शिखा नेहमी दुःखी व्हायची, हे त्याला चांगलेच ठाऊक होते. शिखाचे बोलणे ऐकून मिलनने तिला जवळ घेत म्हणाला,
" हे बघ शिखा, स्वतःच्या आवडी आणि स्वतःची प्रतिमा ही तुमची तुम्हीच घडवत असता, जो आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या मनाचा विचार करतो तोच आपला खरा हितचिंतक असतो. तू काय घालावं, मुलीला कसं ठेवावं हा सर्वतोपरी तुझा खाजगी प्रश्न आहे. त्यामुळे इतरांच्या बोलण्याचा खूप काही त्रास करून घेऊ नकोस. काहींना स्वतःच्या आवडी दुसऱ्या कोणावर लादण्याची सवय सुखावून जाते. त्यामुळे ज्यांनी तुला चांगले कॉम्प्लिमेंट दिले त्यांना बघ. कुणी काहीही म्हणू देत काही फरक पडत नसतो जगण्यात. सर्वांत महत्वाचं म्हणजे आरोग्याबाबत जागरूक रहा फक्त घरच्यांची काळजी अन स्वतः कडे दुर्लक्ष असे होऊ देऊ नकोस, ह्याच भान असू दे.."
मिलनचे बोलणे शिखाला सुखावून गेले. तिला तिच्या आवडीप्रमाणे राहण्याचा जगण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि ती कुठेही चूकली नाही हे स्वतःला सांगत तिने स्वतः चा सुद्धा फोटो शूट मिलन कडून करून घेतला आणि परत एकदा मोकळ्या हवेत श्वास घेण्यासाठी ती सज्ज झाली..!