Varsha Gaikwad

Comedy

2  

Varsha Gaikwad

Comedy

कु. 'आरती' चुकाचकर'

कु. 'आरती' चुकाचकर'

3 mins
119


श्रावण आला की मला धडकीच भरते. सणासुदीचे दिवस असतात आणि माझी शोधाशोध सुरु होते. हो खरंच, मला शोधत असतात ही गुणवान मंडळी. का? तर मला म्हणून, देवाची आळवणी करायची असते ना यांना. नाहीतर मी कुठल्या मनाच्या अन कुठल्या कपाटाच्या कोपऱ्यात धूळ खात पडलेली असते याचं सोयर सुतकच नसतं कोणाला. 


नाही ओळखलं का? अहो मी कुमारी आरती. अन तुमची आरती चुकाचकर. काही चुकीचं बोलतेय का मी? नाही ना? चुकीचं तर तुम्हीच बोलता मला. बरोबर ना? आलेत जवळ गणपती आता. पुन्हा ओठांवर ओठ आपटून, जिभेला वाट्टेल तिथे फिरवून माझ्या शब्दांच्या चिंध्या करण्याची वेळ देखील जवळ आलीय. शब्दांच्या वस्त्राचे साज चढवून अलंकृत करणाऱ्या या देहाचे पुन्हा विटंबन करणार काही महाभाग. 


शाळेतल्या बोबड्या बोलातून जेव्हा माझी स्वारी निघते. तेव्हा कित्ती कौतुक वाटतं मला. भले त्यांचे उच्चार स्पष्ट नसतील पण भावना आणि कुतूहल यांचा मेळ त्या ओठातून ओघळतो. अन् "शुक कलता, दुक हलता वालता विनाची" म्हणत हे बोबडे बोल मला समाधान देतात. 


याउलट, हजारदा, हातात पुस्तक असूनही माझी पुरती वाट लावतात काहीजण. गणपतीची आरती म्हणता म्हणता पांडुरंगाच्या वाटेवर जातात. "रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा." काय आहे हे? अरे कळत कसं नाही रे तुम्हाला, रखुमाई विठ्ठलाची, आणि गणपतीची गौरी. यांना एकत्र केलेली मिश्रित आरती कधी ऐकली का?  


"युगे अठ्ठावीस विटेवरी उभा"च "तू घे अठ्ठावीस विटेची मुभा" असं त्या वर्षाला बोलताना मी ऐकलं आहे, माझ्या या कानाने. माठ कुठली. 


तिचे मुन्ने पप्पा आरती म्हणताना तिच्यावर संस्कार झालेच असतील ना? पण ते काय म्हणत आहेत. त्यांचे उच्चार कसे आहेत या गोष्टीकडे कधी लक्षच दिलं नाही तिने. हिची हिनेच घातली जन्माला आरती. दुष्ट कुठली. बरं, त्या माईंनी म्हणजे तिच्या शिशुविकास मंदिरामधल्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी किती स्तोत्र अन् आरत्या म्हणवून घेतल्या असतील हिच्याकडून. पण ही वेडी माझ्या शब्दांच्या फोडी करून तिच्या जिभेच्या होडीतून पार ढकलून देते मला. अगं जरा धीरानं घे बाई. कसली घाई झालीय तुला.? हिला तो प्रसाद खायचा असतो ना. खादाड कुठली. संकटी पावावेचे संकष्टी पावावे, रुणझुणती नूपुरे ला झुंझुणती नूपुरे, बंधनाचं वंदना हे असलं काहीतरी बडबडत असते ही वेडी. किती त्रास होतो मला. 


माझी मंत्र पुष्पांजली म्हणताना तर ही बया. 


ओम यज्ञेन यज्ञ मैजन्त देवा स्थानी धर्मानी 

प्रथमान्यासम, देह नाकंम महिमा यहा 

स्वतंत्र यत्र, पूर्वे साध्याहा, संथी देवाहा सर्वायुष्य 

महाराजाधिपथ्यमयं समर्थ पऱ्या ईश्या 

अंतारदा परारडा भृकुटी भरी समुद्र पर्यंत एकराळती 


"समर्थ पऱ्या ईश्या" याचा काय अर्थ होतो बरं? कुठल्या पऱ्या, कुठल्या इशा. हे असलं काहीसं बडबडते. तोडकं मोडक करून टाकते मला. भरल्या देवघरासमोर मला पार विवस्त्र करते ही बया. यातले किती शब्द बरोबर आहेत सांगा बघू? माझ्या मते तर एकही नाही. हिच्यासारखेच अनेक महाभाग माझ्या शब्दांचे वाट्टेल ते भाग करून मला छळतात. अरे कसा देव प्रसन्न होईल तुमच्यावर. तुमच्या तोंडातला शब्द अन शब्दातला भावार्थ जर कळला नाही तर देव काय तुमचं ऐकत नसतो. त्यामुळे स्वतःच भलं करून घ्यायचं असेल तर मला तालासुरात आणि योग्य शब्दात उच्चारा. तुमची मनोकामना नक्कीच पूर्ण होईल. 


भेटूच गणपतीच्या मंडपामध्ये. तूर्तास आज्ञा द्या.


तुमचीच भक्तिमय आरती. 


Rate this content
Log in

Similar marathi story from Comedy