Varsha Gaikwad

Tragedy

4  

Varsha Gaikwad

Tragedy

परिघ

परिघ

4 mins
230


नदीवर कपडे धुताना बायकांची चर्चा सुरु झाली. मंगळी म्हणाली हौसाला, "अगं यडे तुला म्हाईत हाय का, त्या खालच्या आळीतल्या म्हाराच्या पोरानं म्हणे बावडीत उडी टाकली. लय गुनाचं प्वार व्हतं गं, का केलं असलं गं त्यानं आस? 


आता गं बया अन हे कवा झालं आनी? कमळीन आश्चर्यानं विचारलं


काल रातच्याला झालं वाटतं. पारुशाला समजलं यास्नी मंगळीनं दुजोरा दिला. 


आन ते काय करायला गेलते पारुशाचं, इति कमळी. 


"गेलते मुतायला बाहेर, म्हणे काय कराय गेलते," मंगळी जरा रागातच बोलली, तवा दिसलं यास्नी. बावडीसमोर लय गर्दी झालेली तवा यांनी चौकशी केली अन आसं समाजलं. 


म्हणून आलेत व्हय पोलीस गावात, तरी म्हंटलं यवड्या सकाळचं पाटील का आलं असावं गावाकडं? "इति, कमळी"


हौसाच्या थोडं थोडं लक्षात यायला लागलं होतं. ती गप्पचं बसली होती. कारण खरं काय ते तिलाच माहित होतं.


हौसा विचारात गढलेली दिसली तशी मंगळीनं कमळीला नजरेनेच खुणावलं. अन तिच्याकडे पाहायला लावलं. 


"ए हौसा का गं गप झालीस", तरीही तीच लक्ष नव्हतं.


हौसाला तो दिवस आठवला. जेव्हा महेश शिंदे नावाचा, नुकताच मिसरूड फुटलेला, हुशार, देखणा मुलगा तिच्या दुकानात पहिल्यांदाच आला होता. घरातलं संपलेलं धान्य विकत घ्यायला.


"सामानाची चिठ्ठी वाचून दाखिवतो तुमास्नी, ते समदं पाव पाव किलो द्या आई".


आई म्हणताच तीन कौतुकानं त्याला पाहिलं, कारण आजपर्यंत तिला कोणीच आई म्हणून हाक मारली नव्हती. काकू, मावशी शिवाय.


"कुणाचं र प्वार हायस तू? कवा पायला नाय तुला हतं"


"मी व्हय, खालच्या आळीतल्या शिरपा शिंदे यांचा मुलगा, ते तालुक्याच्या शाळंत असतो ना मी, कालच आलतो घराकडं. शाळा झाली नव्ह आता. आता कॉलेजात जायचंय. सुट्टीत ऱ्हाईन पंधरवडाभर." तो म्हणाला.


"असं हुई, म्हन्जे त्या रुख्मिच प्वार हायस व्हय तू? लय गुनाची मानस बघ ती, कुनाच्या अद्यात ना मद्यात. आपल काम भलं नी आपन भलं." हौसा म्हणाली.


"व्हय जी, लय कष्ट करत्यात. त्यांना सुखाचं दिस दाखवायचंय मला. म्हणून शिकतुया बघा." तो म्हणाला.


त्याच्या आठवणींच्या तंद्रीत असतानाच कमळींन हौसाला हलवलं, "आ ! काय ग कुठं हरवलीस".


"मी व्हय? काय नाय, जरा इचारात हरवले व्हते". हौसा लागलीच सांभाळून म्हणाली.


"कसला इचार?" मंजुळाने हौसाला विचारलं.


"काय नाय, चला आता घरी, का ऊन टकु-यावर येई पातुर हतचं बसायचं हाय व्हयं?"


"व्हयं व्हयं" म्हणत निम्मे अर्धे सुकवलेले कपडे गुंडाळून, पाटीत भरून सगळ्या आपापल्या घरी रवाना झाल्या.


घरी पोचेपर्यंत हौसा मात्र महेशचाच विचार करत होती. तिचं कोणाच्याच बोलण्याकडे लक्ष नव्हतं. दारातल्या पत्र्यावर कपडे वाळत घालून ती दुकानात गेली. दुकान उघडलं. अन पुन्हा महेशच्या आत्महत्येनं कासावीस झाली.


"कोण व्हता तो माझा?" इतका उशीर आवरलेला हुंदका बाहेर पडला. अन ती ओक्साबोक्सी रडू लागली.


"लय जीवाला चटका लावून गेलास रं लेकरा, का केल असशील बरं आसं? सांगून बी तू ऐकलं न्हाईस. शिक्शान बी झालं व्हतं ना, मग नोकरीधंदा करून आई बापास सुखी करायच हुतस. पोट भराया पिरेम पुरतं व्हय कदी, माती केलीस बग आविष्याची. जवा पेढं घेऊन आलतास पास झालेल्याचं, तवा किती खुश दिसत व्हतास.

"आता इंजियर झालो बग आई आता जवा म्हमईला जाईन नोकरीसाठी तवा तुला बी नेईन म्हमई दाखवायला, येशील ना माझ्यासोबत?" आसं म्हणालास कि रं लेकरा. अन कुठं निगुन गेलास बरं".


हौसाच्या डोळ्याला धार लागली.


कसं बसं स्वतःला सावरत असतानाच समोर पारू दिसली. पारू गुनाची बाय ती. तिच्याकडं बगुन हौसेला रहावलं नाही. पारू देखील मागच्या दारातून आत आली आणि तिला बिलगून रडू लागली.


"आई.! आमच्या प्रेमाला दृष्ट लागली गं जातीची".


"व्हय गं पोरी म्हणूनच तर मी तुम्हा दोगास्नी बी समजावत व्हते ही म्हमई नाय बाई, हे गाव हाय, हित अजून जात पात मानणारी लोक हायत. दाखवत जरी नसली तरी हाय अजून ती जिती. तिला कवा मरण ईल कुणाला गं म्हाईत. मानसापरी मानस मराय लागलीत. पण जात जवा मरल तवाच बग कायतरी चांगल व्हईल. तवर वंगाळचं व्हनार. तू देशपांड्यांची पार्वती, बामनाची लेक अन त्ये म्हाराचा पोर. जमतंय का सांग कुठं? जमत जरी असलं तरी आपल्या गावात नाय जमायचं ते."


"तुमी दोगांनी बी लय जीव लावलासा या वांझोटीला. माय म्हणून माझी कूस उजवली बग त्या लेकरांन, लय जीव लावला. बारीक सारीक काय बी असलं तरी सांगायचं बग लेकरू माझं. त्याच्या आईपेक्षा बी लय जीव लावला त्यानं अन असा माझा जीव टांगणीला लावून निगुन गेला बग." हौसा हुंदके देऊन रडू लागली.


"हो गं आई, तो जीव लावणाराच होता. त्याचे गुण बघूनच तर त्याच्या प्रेमात पडले, मीच पुढाकार घेतला प्रेमाचा. नाही नाही म्हणत शेवटी 'हो' म्हाणालाच मला. तुला सगळं सांगितलंचं कि त्यानं. त्याला माहित होत आमचं प्रेम घरात कळालं तर माझ्या घरातून विरोध नक्कीच होणार होता. म्हणून तर नकार देत होता मला. पण फुललं आमचं प्रेम. बहरत गेलं. नोकरीत स्थिर स्थावर झाल्यावर आम्ही लग्न करणारचं होतो. पण नशिबात काही वेगळंच होत".


"कालची रात्र काळरात्र ठरली गं आमची. आम्ही चोरून भेटलो होतो तेव्हा नेमकं आण्णांनी म्हणजे माझ्या वडलांनी आम्हा दोघांना पाहिलं बोलताना, गावातल्या त्या डेरेदार झाडाखाली. तिथूनच त्यांनी मला घरी ओढत नेलं. तोही मागोमाग आला. विनवण्या करू लागला पण त्याचं कोणीच ऐकलं नाही. मला कोंडून ठेवलं. आणि महेशला खूप मारलं. अर्धमेला झाला गं तो. आमच्या वाडीत त्याचा आवाज कायमचाच बंद केला गेला. अन आत्महत्येचा ठपका त्याच्यावर बसला. पद्धतशीरपणे काटा काढला गेला आमच्या प्रेमाचा."


"आता तर जातीच्या परिघाला छेदून हे दोन जीव केव्हाचं मुक्त झाले आहेत कायमचेच. आता आम्ही आहोत फक्त प्रेमाच्या, सुखाच्या आणि समाधानाच्या परीघात."


ती बोलत राहिली अन् हौसा तिझ्याकडे एकटक बघतच बसली. अवसान गळाल्यागत 'आ' वासून.


हौसाच्या डबडबलेल्या पाण्यात पारूचा चेहरा अस्पष्ट होत गेला. तेवढ्यात धापा टाकत कमळीचं पोर आलं.


"काकू देशपांड्याच्या पारूनं हाताची नस कापून घेतली काल रातच्याला."


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy