Niranjan Niranjan

Inspirational Others

4  

Niranjan Niranjan

Inspirational Others

कर्मबंध

कर्मबंध

8 mins
242


पावसाळ्याचे दिवस होते. समुद्र शांत होता. आकाशात काळे ढग साचले होते व एरवी डोळ्यांना सुखावणारा, आकाशी रंगाने नटलेला समुद्र गडद राखाडी रंगाच्या उग्र ढगांचे प्रतिबिंब पाण्यात उमटल्यामुळे भेसूर वाटत होता. तुरळक पर्यटकांच्या हालचालीमुळे व पक्ष्यांच्या किलबिलाटामुळे समुद्र थोडाफार जिवंत भासत होता. एरवी पर्यटकांनी गजबजलेला किनारा पावसाळ्यामुळे अगदीच रिकामा पडला होता. हाताच्या बोटांवर मोजता येतील एवढेच पर्यटक जणू टक्कल पडलेल्या डोक्यावरील तुरळक केसांप्रमाणे भासत होते. तिथे झोपळ्यावर अंग सैल सोडून विश्रांती घेणारी जोडपी होती. वाळूत बीळ करून त्यात लपलेल्या खेकड्यांना पकडण्यासाठी खेकडे बिळातून बाहेर यायची वाट पाहणारी खोडसर मुलं होती. तसेच निसर्गाचा आस्वाद घ्यायचा सोडून मोबाईलमध्ये डोकी खुपसून बसलेली तरुण मुलं देखील होती. 


या सगळ्यांपासून दूर, खडकावर एक वृद्ध मनुष्य बसला होता. त्याचा देह चांगलाच उंचापुरा होता. पाठ मात्र वृद्धापकाळामुळे थोडी झुकली होती. डोक्यावरचे पांढरे लांब केस वाऱ्यामुले हलत होते. त्याचा चेहेरा रुंद होता व कपाळ भव्य होते. चेहेऱ्यावर सुरकुत्या उमटल्या होत्या. पांढरीशुभ्र झुपकेदार मिशी चेहेऱ्याला शोभत होती. त्याचा चेहेरा गंभीर दिसत होता व नजर समुद्राच्या पाण्यावर स्थिरावली होती. त्याचे डोळे……….त्याचे डोळे मात्र भयंकर दुःखी दिसत होते. जणू काही या जगातलं सारं दुःख त्याच्या डोळ्यात एकवटलं होतं.


पाहता पाहता दुपार झाली. इतका वेळ न हलणारे चिवट ढग हळू हळू दूर जाऊ लागले व थोड्याच वेळात नाहीशे झाले. ढगांच्या आड लपलेल्या सूर्याने दिवसभरात पहिल्यांदाच दर्शन दिलं. तो वृद्ध मनुष्य मात्र अजूनही खडकावरच बसला होता. जणूकाही तो त्या खडकाचाच एक भाग झाला होता. त्याच्या नजरेतील दुःख तसूभरही कमी झालं नव्हतं.


सूर्य समुद्राला स्पर्श करण्यास आतुर झाल्याप्रमाणे खाली येत होता. इतक्या वेळात पहिल्यांदाच खडकावर हालचाल दिसली. तो वृद्ध मनुष्य खडकावरून उठला व समुद्राच्या दिशेने चालू लागला. तो चालत पाण्याजवळ गेला. एक मंद लाट आली व त्याचे पाय भिजवून गेली. तो चालत पुढे गेला. अजूनही तो न थांबता चालत होता. आता त्याचे कपडे भिजले होते व पाणी छातीपर्यंत आलं होतं. पण भान हरपल्यागत तो चालतच होता. मध्येच एखादी लाट येत होती व त्याला भिजवत होती. त्याच्या नाकातोंडात पाणी जाउ लागलं तरीदेखील तो पुढे जात होता. अचानक कोणीतरी त्याचा हात पकडला व त्याला मागे ओढलं. आता तो वृद्ध मनुष्य भानावर आला व त्याने मागे वळून पाहिलं. एका तरुणाने त्याचा हात पकडला होता व तो तरुण त्याला किनाऱ्याच्या दिशेने ओढत होता. त्या तरुणाची अंगकाठी तशी साधारणच होती मात्र त्याच्या मनगटात असाधारण ताकद होती. वृद्ध मनुष्याच्या शरीरातील ताकदच जणू नाहीशी झाली होती. तो कोणताही प्रतिकार न करता हतबलपणे ओढला जात होता.


थोड्या वेळात ते किनाऱ्यापाशी पोहोचले. त्या तरुणाने वृद्ध मनुष्याला जवळच्याच एका झाडाखाली बसवलं व अंग पुसण्यासाठी खांद्याला अडकवलेल्या पिशवीतून एक कापड काढून दिलं. वृद्ध मनुष्य अंग पुसत पुसत त्या तरुणाला न्याहाळत होता. सावळ्या रंगाचा, मध्यम उंचीचा तो तरुण वृद्ध मनुष्याकडे कुतूहलाने पाहत होता. सावळा असला तरी त्या तरुणाच्या चेहेऱ्यावर एक प्रकारचं तेज होतं. तसेच त्या तरुणाच्या चेहेऱ्यावरील हास्यदेखील वृद्ध मनुष्याचं लक्ष वेधून घेत होतं. कित्येक वर्षात त्याने असं हास्य पाहिलं नव्हतं. त्या तरुणाने नाविकाचे कपडे घातले होते.


बराच वेळ कोणीच काही बोललं नाही. शेवटी त्या तरुणाने विचारलं, “काय रे म्हाताऱ्या, एवढ्या खोल पाण्यात कशाला चालला होतास? जीवनाला कंटाळलास काय?” “होय, कंटाळलोय मी जीवनाला. म्हणूनच जीव द्यायला निघालो होतो.” वृद्ध मनुष्य उदासपणे म्हणाला. “मुलाने हाकलले की काय घरातून? शरीराने चांगला धडधाकटा दिसतोयस.” तरुणाने विचारलं. वृद्ध मनुष्याने इकडे तिकडे पाहिलं, जवळपास कोणी नाही याची खात्री होताच तो तरुणाला म्हणाला, “मी यम आहे.” हे ऐकून तो तरुण मोठमोठ्याने हसायला लागला. हसतहसतच तो वृद्ध मनुष्याला म्हणाला, “म्हाताऱ्या कालची उतरली नाही वाटतं अजून का दिवसाढवळ्याच घेतली आहेस?” तो पुढे म्हणाला, “तु यम आहेस ना, ठीक आहे. मग मी पण कृष्ण आहे.” एवढे बोलून स्वतःच्याच विनोदावर तो पुन्हा हसू लागला. “ठीक आहे. मला माहित आहे इतक्या सहजासहजी तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. तो पहा माझा रेडा तिथे उभा आहे.” असे बोलून त्या वृद्ध मनुष्याने जवळच उभ्या असलेल्या एका दांडग्या, चकचकीत रेड्याकडे बोट दाखवलं. तरुण हसायचा थांबला व त्याने गंभीर आवाजात विचारलं, “बर, थोड्या वेळासाठी तू यम आहेस असं मी मानतो. पण इतरांचे जीव घेणारा तू यमदेव असून तूला स्वतःला जीव द्यावासा का वाटतोय? आणि जीव देण्यासाठी तू इथे का आला आहेस?” 


यम बोलू लागला, “मी जे काही सांगणार आहे ते कदाचित तुला खरं वाटणार नाही. तरीसुद्धा ऐक. गेली शेकडो वर्षे मी एकच काम करत आलोय. जेव्हा माणूस किंवा कोणताही जीव मरण पावतो तेव्हा त्याचा आत्मा शरीराचा त्याग करतो. आत्म्याला अंत नाही. तो सतत शरीर बदलत राहतो. शरीर जरी नष्ट झाले तरी आत्मा नष्ट होत नाही. आत्म्याचं किंबहुना त्याने धारण केलेल्या शरीराचं या जन्मातलं आयुष्य हे त्या आत्म्याने पूर्वजन्मी केलेल्या कर्मावर अवलंबून असतं आणि हा पूर्वजन्म केवळ एकच असेल असं नाही तर अनेक जन्मांच्या कर्मावर त्याचं या जन्मातलं जीवन कसं असेल हे ठरतं. जर त्या आत्म्याने पूर्वीच्या जन्मांमध्ये पुण्यकर्म केलं असेल तर त्याच्या पुढच्या जन्मातील आयुष्यात चांगल्या घटना घडतात किंवा त्याला कमी कष्ट कमी त्रास होतो असेही आपल्याला म्हणता येईल. जर त्या आत्म्याने पूर्वजन्मात दुष्कर्म म्हणजेच वाईट काम केलं असेल तर त्याला पुढच्या जन्मात कष्टाचं यातनामय आयुष्य जगावं लागतं. जेव्हा एखाद्या मनुष्याचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या आत्तापर्यंतच्या कर्मानुसार त्याला म्हणजेच त्याच्या आत्म्याला स्वर्गात किंवा नरकात जावं लागतं. त्याचा स्वर्गातील किंवा नरकातील काळ हा त्याने केलेल्या चांगल्या किंवा वाईट कामांच्या प्रमाण आणि दर्जावरून ठरतो. ठराविक वेळ संपताच त्याला पुन्हा एकदा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो.


प्रत्येक आत्म्याला त्याच्या कर्माचा हिशेब करून त्याला स्वर्गात किंवा नरकात पोहोचवण्याचं काम मी करतो.” “हे सगळं मला माहित आहे.” तरुण म्हणाला. “तू भगवत गीता, उपनिषदे, पुराण वगैरे वाचलयस वाटतं.” यम म्हणाला. यावर तरुण काहिच बोलला नाही. तो केवळ हसला. यम पुढे सांगू लागला, “तर मी माझं हे काम युगानुयुगे न चुकता करत आलोय. पण जेव्हा पासून कलियुग सुरू झालय तेव्हा पासून मी खूपच अस्वस्थ झालोय. स्वर्गात बसून पृथ्वीतलावर घडणाऱ्या सर्व घटना मी पाहत असतो. मी पाहतो, लहान लहान मुलींवर बलात्कार होतात, वाईट गुंड लोक सज्जन असहाय लोकांना त्रास देतात, लुटतात, भ्रष्ट राजकारणी जनतेच्या पैशांची लूट करतात, कित्येक गुन्हेगार गुन्हा करून देखील पैशांच्या सत्तेच्या जोरावर मोकाट सुटतात, धर्माच्या नावाखाली धर्मांध लोक निष्पाप लोकांचा जीव घेतात. या सर्वांचा जीव घेऊन त्यांच्या आत्म्यांना नरकात ढकलून द्यावं असं मला सारखं वाटतं, पण त्यांच्या पूर्वजन्मीच्या सत्कर्मामुळे त्यांनी कमावलेल्या पुण्यामुळे की काहीच करू शकत नाही. मी नुसता असहाय्यपणे समोर जे घडतंय ते पाहत राहतो. आणि याउलट गरिबीमुळे, पोटात अन्न न गेल्यामुळे, थंडीच्या दिवसात अंगात घालायला कपडे नसल्यामुळे तसेच उघड्यावर झोपून लहान लहान मुलांना मरताना पाहिले की; येताना आईस्क्रीम आणतो असे आपल्या पाच वर्षाच्या मुलीला सांगून घराबाहेर पडलेला बाप जेव्हा रात्री घराच्या वाटेवर असताना बॉम्बस्फोटात मृत्युमुखी पडतो तेव्हा त्याचं छिन्नविछिन्न झालेलं शरीर पाहून त्याच्या बायको-मुलीने केलेला आक्रोश पाहिला की; जेव्हा एखादा नराधम अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करतो आणि तिची हत्या करून तिला कुठेतरी दुर्गम भागात फेकून देतो तेव्हा तिचं रक्ताळलेलं शरीर पाहिलं की; जेव्हा एखादा मुलगा आपल्या वयोवृद्ध आई-बापाला ज्या हातांनी त्याचा हात धरून त्याला चालायला शिकवलं तेच हात धरून घराबाहेर काढतो, त्या आई-बापाच्या डोळ्यातील असहाय्यता पाहिली की, मला प्रचंड वेदना होतात.


हे सर्व मी इतकी वर्ष सहन केलं. पण आता माझी सहनशक्ती संपली. इतकं मोठं ओझं मनावर घेऊन मी नाही जगू शकत. त्यामुळे मी हे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. याआधी मी स्वर्गात देखीलं जीव द्यायचा प्रयत्न केला पण मला यश नाही मिळालं. म्हणून मी पृथ्वीवर आलो. पृथ्वीवर आल्यावर इथे येण्याआधी दोन वेळा मी जीव द्यायचा प्रयत्न केला पण दोन्ही वेळा मी वाचलो. एकदा मी एका उंच पर्वतावरून दरीत उडी मारणार होतो पण ऐनवेळी एका साधूने माझा हात धरून मला मागे खेचलं. दुसऱ्यावेळी मी एका रेल्वेस्टेशनवर गेलो ब रेल्वेची वाट पाहत थांबलो. एक रेल्वे येताना दिसली. रेल्वे जवळ येताच रुळावर उडी घेण्यासाठी मी धावलो तर तिथेसुदा एका माणसाने मला मागे खेचले आणि मी वाचलो. मग शेवटचा पर्याय म्हणून मी इथे आलो होतो तर तू मला वाचवलेस. बहुतेक मरण माझ्या नशिबातच नाही." एवढे बोलून यम थांबला.


तो खूप निराश दिसत होता. त्या तरुणाने सगळं शांतपणे ऐकून घेतलं होतं. तो यमाला म्हणाला, "आधी तूच मला कर्मयोग सिद्धांताबद्दल सांगितलस आणि तुला सगळं माहिती असून देखील तू असा का वागतोयस?" त्यावर यम म्हणाला, "तुझं अगदी बरोबर आहे. पण तू माझ्या बाजूनं विचार करून बघ. मला किती यातना सोसाव्या लागतात याची तुला कल्पना येईल.” “पृथ्वीवरील मनुष्य तुझ्यासारख्या देवांकडे एक आदर्श म्हणून पाहतात. जरा विचार कर. समजा, न्यायालयामध्ये न्यायाधीशाचा मुलगा आरोपी म्हणून उभा आहे आणि आपल्या मुलालाच फाशीची शिक्षा देण्याचं दुर्दैवी काम न्यायाधीशाला करायचं आहे. आपल्या मनाला होणाऱ्या यातना सहन न झाल्यामुळे जर त्या न्यायाधीशाने आत्महत्या केली तर ते योग्य असेल?” यम त्या तरुणाचं बोलणं शांतपणे ऐकत होता.


तरुण पुढे बोलू लागला, "आणि जर तुच जीव दिलास तर तुझं काम कोण करेल? या सगळ्याचे काय परिणाम होतील याचा तू विचार केला आहेस का?" यमाने नकारार्थी मान हलवली. ठीक आहे, मी तुला एक उदाहरण देतो. एका गुन्हेगाराला फाशीची शिक्षा झाली आणि त्याच्या आत्म्याने शरीराचा त्याग केला. आता जर तूच नसशील तर त्या आत्म्याला नरकात नेण्याचं काम कोण करेल. हे फक्त एक उदाहरण झालं. पृथ्वीतलावर रोज कित्येक लोक मरण पावतात. त्यातले काहीजण स्वर्गात जातात तर काही नरकात. पण जर त्यांना स्वर्गात किंवा नरकात पोहोचवण्याचा योग्य तो निर्णय घेऊन त्यांना पोहोचवण्याचं काम करणारा तूच जर मेलास तर किती अराजकता माजेल याचा जरा विचार कर आणि तू घेतलेल्या निर्णयाचा पुनर्विचार कर.” त्या तरुणाने सांगितलेलं सर्व काही यमाला पटलं होतं.


तो म्हणाला, "तू जे काही मला सांगितलस ते मला पटतय. या सगळ्या गोष्टींचा मी याआधी विचारच केला नव्हता. भावनेच्या आहारी गेल्यामुळे माझी मती कुंठीत झाली होती. पण तू माझे डोळे उघडलेस. मला माहीत नाही तू नक्की कोण आहेस, पण तू सामान्य माणूस नक्कीच नाहीस." बोलता बोलता यमाचं लक्ष्य तरुणाच्या पायांकडे गेलं. त्याच्या एका पायावार एक काळा डाग होता. तो पाहून यमाने त्या तरुणाला विचारलं, "तुझ्या पायावरचा तो काळा डाग कसला?" "जुन्या जखमेचा डाग आहे. जखम भरली पण डाग तसाच राहिला तरुण म्हणाला. हे ऐकून यम हसला व म्हणाला, "मला आता जायला हवं. इतक्या दिवसांची कामं मला करायची आहेत. अजून वेळ दवडून चालणार नाही. मी निघतो. यम जवळच उभ्या असलेल्या रेड्याच्या पाठीवर बसला व तिथून निघाला. तो तरुण यमाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत थोडावेळ तिथेच उभा होता. त्याच्या चेहेऱ्यावरचं निर्मळ हास्य अजूनही कायम होतं. यमाची आकृती नाहीशी होताच तो तरुण जवळच्याच एका झाडाच्या बुंध्याला टेकून बसला. सूर्य आता मावळतीला आला होता. गडद भगव्या रंगाचा सूर्याचा गोळा समुद्राच्या निळ्याशार पाण्याला टेकल्यासारखा दिसत होता. हे विलोभनीय दृश्य पाहत तो तरुण झाडाला टेकून निवांत बसला होता. तो जुन्या आठवणीत हरवला होता. सूर्य आता दिसेनासा झाला. त्याच्या गडद भगव्या रंगाने मात्र सारा आसमंत व्यापला होता. तरुणाने त्याच्या जवळच्या पिशवीतन एक बासरी काढली व ती ओठाला लावून वाजवू लागला. बासरीतून निघणारे मधुर स्वर पक्ष्यांच्या किलबिलाटात मिसळत होते. समुद्र अजूनही शांतच होता.


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational