कोरोनाबाबा की जय
कोरोनाबाबा की जय
परवाच रामनवमी झाली,परवाच ईद झाली,आणि परवाच गुड फ्रायडे आणि क्रिसमस सुद्धा झाली लोकांनी लय मागितलं त्यांच्या त्यांच्या देवांकडे पण तुझा मृत्यू तांडव काय थांबलाच नाही,आता हा संसर्ग सगळं जाळणार, तुला जाळणार मला जाळणार,अगदी त्यालाही जाळणार.
आत्ताच कुठेशी सुरू झाली होती पुन्हाशी जिंदगी पण तू फसवलस, आणि पुन्हा चालू झालं अग्नितांडव, शेवटी अहंकारात पेटलेल्या माणसाला तू लाचार केलस अगदी भिकारी केलस श्वासांसाठी आणि सांगितलं की तू गुलाम आहेस श्वासांचा इथल्या मातीचा.
पण अजूनही काही अहंकार जळायचा बाकी आहे जाती-पातीच्या द्वेषाचा, धर्मा-धर्मांच्या द्वेषाचा, गरीब श्रीमंती मधल्या द्वेषाचा आता त्या अहंकाराला ही म्हसनात ने आणि पार जाळून टाक अगदी राख कर त्याची सुद्धा.
तरी बरं झालं तुला रंग नाही रूप नाही जात नाही आणि धर्म सुद्धा नाही एवढच नाही तर तू कुठल्या पक्षाचा नाहीस आणि कुठल्या पक्षाचा झेंडा ही तुझ्या कडे नाही तरी बरं झालं..! नाहीतर आले असते तुलाही मारायला काट्या,कुऱ्हाडी तलवारी,बंदुका घेऊन आणि तुझाही फडशा पडला असता, नाहीतर दिल्या असत्या सुपाऱ्या जीवे मारण्याची आणि शेवटी तुझ्यासोबत ही मॉबलिंचींग आणि बलात्कार झाला असता भररस्त्यात...
पण बरं झालं तु अदृश्य आहेस अरे तुला यांनी घालवण्यासाठी काय काय नाही केलं सांग, करणी, यज्ञ हवन एवढंच नाही तर अगदी लाईटया घालवून दिवे लावून टाळ्या थाळ्या,दमडी, टमक्या वाजवून तुझ्या नावाचा शिमगाही घातला,पण तू काय नाहीं आवरलास अगदी पुरून उरलास सगळ्यांना.
अरे ते देवांचे ही देऊळ,मंदिर, मशिदी,दर्गे आणि चर्च ही बंद करायला तू लावलसं शेवटी मानलं तुला तू देवापेक्षा ही श्रेष्ठ ठरलास. अर खरी 56 इंचाची छाती तर तुझ्याकडंच हाय खरंच मानलं तुला आणि तुझ्या भ्यान पैशाची हवा करणारे मंत्री-संत्री,गुंड,मवाली बघ सगळी कशी दडून बसल्यात कुठल्या कोपऱ्यात काय माहित. मरणाला तेही भितात त्यांचाही अहंकार आता अगदी चेंदारेदा झालाय बघ फक्त तुझ्यामुळेच.
मात्र आता थोडं रहेम दिल हो, बघ किती तडफडून मरत आहेत लोकं आणि बघ त्यांच्या चितावरचे अग्नीचें आणि धुरांचे लोट आणि शेवटी बघ त्यांच्या नातेवाईकांच्या चेहऱ्याकडे त्यांच्या तोंडाकडे आणि ऐक जरा त्यांच्या रडण्याचा किंकाळ्या आणि ऐक त्यांचा हंबरठा, काही जणांच खूपच हाल केलस तूला आता थोड शांत झालं पाहिजे गरिबांच्या पोटापाण्याच्या प्रश्नासाठी, पोरा,बाळा,लेकरांसाठी तुझ्यामुळं लाचार असलेल्या गरीब लोकांचच लय हाल होतंय रं...
खरंच तू सर्वांपेक्षा श्रेष्ठ ठरला पण आता जरा शांत व्हायला हवं तुला, शांत व्हयला हवं....
कोरोना बाबा की जय....
