Pranjalee Dhere

Inspirational

2  

Pranjalee Dhere

Inspirational

किनारा...

किनारा...

2 mins
1.3K


आपण कुठे उभे आहोत आणि आयुष्याच्या कोणत्या किनाऱ्यावरून आयुष्याकडे बघतो आहोत यावरून आयुष्याची रंगत ठरत असावी. अशा किनाऱ्यावरून काहींना आयुष्य खूप रंगीबेरंगी दिसतं असावं, काहींना धवल, काहींना काळ तर काहींना राखाडी. आयुष्य ज्यांना छान रंगीबेरंगी दिसतं ना अशी माणसं भाग्यवान! अर्थात त्यांच्या आयुष्याला रंग देणारे, त्यात रंग भरणारे, रंग जपून ठेवणारे ही विरळच! रंगांची उधळण प्रत्येकाच्या आयुष्यात होतेच असं नाही, आणि किनारा प्रत्येकाला मिळतोच असही नाही.

इथे प्रत्येकाच्या आयुष्याला अनेक किनारे असतात. आपला किनारा कोणता हे फक्त कळावं लागतं, शोधावं लागतं. काही किनारे मागे सोडून आपल्याला पुढे चालावचं लागतं. त्या किनाऱ्याशी कितीही थांबावसं वाटलं तरी नाही जमत. काही किनारे हे आपल्याला सोडून जातात. मग एकटेचं उरतो आपण. तसं पाहिलं तर आपण सगळेचं आपापल्या परिने एकटे असतो. पण आयुष्याच्या या वादळात असा एखादा किनारा गवसतो जो आपला असतो, आपल्यासाठी असतो. आयुष्याच्या वादळात तो आपल्याला घट्ट धरून ठेवतो. येणाऱ्या लाटांच्या प्रवाहात तो आपल्याला वाहून जाऊ देत नाही. असे किनारे मिळायला भाग्य लागतं. मग, आपण आपला एकटेपणा विसरतो हळूहळू. किनाऱ्यावर जाऊन, त्याचेच होऊन जातो. त्याच्या कुशीत विसावतो, हसतो, रडतो, मन मोकळ करत जातो. आपण विसरून जातो की, आपल्या किनाऱ्यालाही मर्यादा आहेत. त्याची सहनशक्ती आहे. आपली किती वादळे त्याने पचवावी? आपल्याला किती वाचवावं? आणि आपला आपला असणारा एक जीवाभावाचा एकटेपणा तरी किती वेळ लांब राहणार आपल्या पासून?

किनारा ही थकतो आणि हळूहळू सुटून जातो आपल्या हातून आपल्याही नकळत. मग पुन्हा आपण उरतो, आपलेच, आपल्यासाठी. आणि आपला एकटेपणा, आपल्यासाठी. किनारा सुटण्याचं दु:ख असतचं पण त्याने आयुष्य तर थांबत नाही आपलं? आपण जगतचं राहतो किंबहुना जगावचं लागतं. किनारा लांब असतो, साक्षीला असतो तो. कधीतरी सावरायला येतो. कधीतरी आपण विसावतो त्याच्याजवळ. पण तो सुटलेला असतो हे सत्य मात्र नाही बदलत. त्या सत्याला उराशी घेऊन, एकटेपणाला सोबत घेऊन आणि किनाऱ्याकडे नजर ठेवून आपण जगतचं राहतो... असतो तोपर्यंत...



Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational