कुण्या एकीची गोष्ट
कुण्या एकीची गोष्ट
पहाटे पाचचा अलार्म वाजला तशी ती उठली. तन्मयला उठवायला हवं. नाहीतर ट्रीपला जायला उशीर व्हायचा उगाच. त्याला उठवून, त्याच सगळ आवरून ती ताराला उठवायला गेली. दोघांना उठवून, त्याचं सगळ आवरून देऊन, त्यांना रवाना करून तिने तिचं आवरायला घेतल. सगळ आवरून, मग शेवटी बाबांना उठवलं, त्याचं सगळ मार्गी लावून ती तिच्या रोजच्या वेळात ऑफिसला गेली. तिची रोजची सकाळ अशीच व्हायची. एखादा तास मागे-पुढे, पण फारसा फरक नाही. एका संथ रेषेत आणि प्रवाहात तिचं आयुष्य चाललं होत. त्यात फारसा बदल आता तिला अपेक्षित नव्हता. वाट्याला आलेलं आयुष्य तिने जसाच्या तसं पत्करलं होतं.
एक दिवस तिच्या ऑफिसमध्ये तिला तो दिसला आणि तिचं अवघं आयुष्य ढवळून गेला. मनातल्या त्या गाडून टाकलेल्या सुप्त भावना परत एकदा वर आल्या त्याला बघून. डोळे भरून तिने त्याला पाहिलं. त्याचं मात्र लक्षच नव्हत. अजूनही तसाच, तेवढाच रुबाबदार दिसतं होता तो. काम संपवून घरी निघताना तिला तोच आठवत राहिला. ऑफिसहून घरी आल्यावर बाबा, तन्मय, ताराचं सगळ आवरून ती तिच्या रूममध्ये गेली. उद्या रविवार असल्यामुळे कुणाची काही घाई नव्हती. बेडवर डोळे बंद करून पडून राहिली त्याच्या विचारात, पाणी येत राहिलं मिटल्या डोळ्यांमधून. विचारांमध्ये असताना कधीतरी गाढ झोप लागली तिला.
सकाळी अंघोळीला गेल्यावर शॉवर खाली ती उभी राहिली आणि आपल्या शरीराला न्याहाळत राहिली. त्याचे जुने स्पर्श आठवून शहारत राहिली. आपले ओघळलेले स्तन बघून वाढत्या वयाचा राग आला तिला. डोक्यावरून शॉवरचं पाणी वाहत जात होत, आणि तिच्या डोळ्यांसमोरून तिचाच भूतकाळ. जो त्याच्या दिसण्याने परत जिवंत झाला. कॉलेज मध्ये असताना भेटलेले ते दोघे. आधी मैत्री, मग मैत्रीपेक्षा जरा अधिक काही, मग मैत्री की प्रेम या सीमारेषेवरचे ते दोघे, मग सरतेशेवटी प्रेम. आकंठ प्रेम. या प्रेमात कॉलेजची तीन वर्षे भरकन निघून गेली. पुढच्या दोन वर्षात त्यांच्या या प्रेमाला शारीरिक सुखही हवंय हे त्या दोघांनाही कळून आल. मग कधी मित्राच्या रूम वर, तर कधी तिच्या घरी कुणी नसताना, तर कधी त्याच्या घरी. तो स्पर्श आठवून ती गार पाण्यातही गरम झाली आणि तिला दरदरून घाम फुटला. समर्पणातलं सुख तिला आजही सुखावून गेलं.
अंघोळीच ते पाणी आणि भूतकाळ दोघेही वाहूनचं जाताएत तिच्या डोळ्यांसमोरून. शिक्षण झालं, दोघांनाही नोकरी लागली. आता आपल्या नात्याला अधिकृत नाव द्यायला हवं, घरी सांगायला हवं असं त्या दोघानाही वाटायला लागलं. त्याच्या घरून त्याच्यासाठी मुलगी बघायला सुरुवात देखील झालेली. लहानपणापासून आई तिची अगदी जवळची, जीवाभावाची मैत्रीण. तिने आईला सगळं सांगितलं. अगदी पहिल्या भेटीपासून ते त्याच्याशीचं लग्न करण्याची इच्छा आहे इथपर्यंत सगळं. बाबांशी आई बोलली आणि बाबांनी होकार दिला तो दिवस तिला अगदी जसाच्या तसा आठवला. सगळ कस छान, आखीव-रेखीव होत. आणि अचानक दृष्ट लागावी तशी साध्या तापाने आई तिला सोडून गेली. तिच्याहून सहा वर्षांनी लहान असलेल्या तिच्या जुळ्या बहिणभावाची जबाबदारी तिच्यावर टाकून. आईच्या पश्चात इतकी वर्ष तिनेच तो संसार सांभाळला. तिची स्वतःची संसाराची स्वप्न मात्र फाटून गेली या सगळ्यात. त्याच्या घरचे थांबायला तयार नसल्यामुळे त्याने नाईलाजाने का होईना लग्न केलं. तिला हे कळल तेव्हा आपण किती असहाय आहोत हे तिला जाणवून आलं. आईची खूप आठवण आली आणि ह्यात असलेल्या वडिलांचा प्रचंड राग आला, भावंडांचा राग आला, सगळ जग पेटवून द्याव अशी तीव्र इच्छा झाली तिला पण तिने यातलं काहीही केलं नाही. झालं ते स्वीकारलं आणि जगण सुरूच ठेवलं.
ताराने बाथरूमच दार वाजवलं तेव्हा तिची तंद्री भंगली. विचारातून बाहेर येऊन तिने पटकन अंघोळ उरकली. रविवार तसा कंटाळवाणाचं गेला. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना उगाच ती आरशासमोर जास्त रेंगाळली. काजळ जरा जास्तच दाट घातलं तिने डोळ्यात. ऑफिसला गेल्यावर तिची नजर उगाच त्याची वाट पाहत राहिली. खूप वर्षांनी ही हुरहूर अनुभवत होती ती. तो आला आणि सरळ बॉसच्या कॅबिन मध्ये गेला. तिला क्षणभर वाटल काहीतरी काम काढून जाव आपण बॉसच्या कॅबिन मध्ये. ती तशीच बसून राहिली तिच्या खुर्चीवर. तिने यातलं काहीही केलं नाही. अचानक बॉसने तिला कॅबिन मध्ये बोलवलं. मनात प्रचंड धडधड घेऊन ती कॅबिन मध्ये गेली. त्याने तिला समोर पाहिलं आणि तेच जुनं ओळखीचं हसला. डोळ्यांना डोळे भिडले आणि तेच उदंड बोलून गेले. दिवस सरसर उडून गेला आणि रात्र वस्तीला आली.
घरी जाण्यासाठी ती तयार होतचं होती की, तेवढ्यात तो तिच्या जवळ आला. तिच्याही नकळत ती त्याच्यासोबत डिनरला गेली. त्याच्यावाचून काढलेली मधली सगळी वर्षे अदृश्य झाली जणूकाही. बोलता-बोलता कॉलेजचा विषय निघाला. जुने दिवस परत आले असंच वाटलं दोघांना. ही रात्र सरुच नये, या गप्पा संपूच नयेत असं दोघांनाही वाटत राहिलं पण; दोघांनी हे बोलून दाखवलं नाही एकमेकांना. गप्पांना आणि रात्रीला रंग चढत असताना त्याच्या बायकोचा फोन आला त्याला. दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला. त्या दिवशी कित्येक दिवसांनी रात्री तिला शांत झोप लागली, हरवलेलं सापडलं की जशी झोप लागते ना तसं झालं तिला.
आता त्यांच्या या भेटी वाढल्या. ते जुने दिवस परत आले की काय असं तिला वाटायला लागल. भीतीही वाटायची तिला. हे सगळ कुठे जाणार आहे, कधी आणि कसं थांबणार आहे ही तिलाही माहित नव्हत. थांबावं असं तिला वाटत नव्हत. आज भेटल्यावर त्याने घरी येतेस का? असं विचारलं. काय करावं हे तिला कळेना. शेवटी बाबांना फोन करून आज मैत्रिणीकडे राहते आहे असं सांगून ती त्याच्या घरी जायला निघाली. रस्ताभर दोघेही एकमेकांशी एक शब्दही बोलले नाहीत. आपल्या नात्यात एक अवघडलेपण आहे हे दोघांनाही जाणवत होत. त्याचं लग्न झालं आहे तरीही आपण का निघालो आहोत त्याच्या सोबत, त्याच्या घरी हा प्रश्न तिचं मन तिला विचारत होत आणि उत्तर स्वीकारण्याची तिची हिंमत होत नव्हती. शेवटी नाईलाजाने तिने मान्य केलं की; त्याच्या शरीराची ओढ आजही आहे तिच्या शरीराला. त्याच्याशिवाय कुणीही स्पर्श नाही केला त्या शरीराला, आणि आता तो अचानक परत भेटल्यावर शरीराची ती मागणी दरदरून वर आली. कदाचित त्यालाही हेच हवं होत. म्हणूनच तो तिला घेऊन त्याच्या घरी चालला होता.
गाडी थांबली तशी तिची तंद्री भंगली. त्याच्या मागोमाग निमुटपणे ती घरात गेली. त्याचं घर बघून अवाक झाली ती. कधीकाळी त्यांनी जसं ठरवलं होत ते घर अगदी तसं होत. तिच्या स्वप्नांमधलं घर. तिला हवं होत ते आणि तसं घर. तिच्या डोळ्यात आलेलं पाणी त्याने पाहिलं, आणि हलकेच तो तिच्या जवळ आला. त्याचं जवळ येण तिला लक्षात आलं आणि न राहवून तिने त्याला घट्ट मिठी मारली. इतक्या वर्षांचा एकटेपणा, त्याच्याबद्दल असलेल ते प्रेम, त्याची ओढ सगळ जाणवलं त्याला तिच्या त्या स्पर्शात. त्यानेही न राहवून तिला आणखीन घट्ट मिठी मारली. दोघांचे श्वास अधिक जोरात वाहू लागले, उष्ण झाले. आणि काही कळायच्या आत दोघांचे होठ एकमेकांमध्ये सामावून गेले. त्याचे हात, तिच्या सर्वांगावरून फिरू लागले. तिला इतक्या वर्षांपासून जे हवं होत, जे तिचं होत ते आज इतक्या वर्षांनी तिला मिळत होत. तिच्यावर, तिच्या मनावर, आणि तिच्या शरीरावर फक्त आणि फक्त त्याचा हक्क होता आणि तोच हक्क आज इतक्या वर्षांनी ती परत एकदा त्याला देत होती.
सकाळी तिला जाग आली तेव्हा रात्रीचा शृंगार अजूनही तिच्या डोळ्यांवर होता. तिने बाजूला पाहिलं, तर तो गाढ झोपला होता. त्याचा कपाळाच चुंबन घेऊन ती आवरायला बाथरूम मध्ये गेली. सगळ आवरून ती परत बेडरूम आली. भिंतीवर त्याचा आणि त्याचा बायकोचा फोटो बघून तिला नक्की काय वाटलं हे तिलाही त्या क्षणी समजेना. तो उठला तेव्हा ती नव्हती पण तिचं एक पत्र त्याला मिळालं. तिने लिहिलं होतं की, ‘आज तुझ्या-माझ्यात जे झालं ते परत होऊ नये म्हणून मी तुझ्या आयुष्यातून कायमची जाते आहे. कधीतरी तू मला सोडून गेला होता. आज मी जाते आहे. आपलं प्रेम तेव्हाही अपूर्ण होतं, ते आजही अपूर्ण आहे आणि पुढेही अपूर्णचं राहिलं. कारण ही नियतीची इच्छा आहे. तुझ्या या प्रेमावर आता तुझ्या बायकोचा हक्क आहे, माझा नाही. माझा हक्क तुझं लग्न झालं तेव्हाच संपला होता पण तू परत भेटला या आनंदात मी विसरून गेले. तुझ्या सोबत समर्पणातलं सुख मला एकदा परत हवं होत. ते मिळालं. अनपेक्षितपणे का होईना पण मिळालं. आता आयुष्याकडून मला कसलीही अपेक्षा नाही, आणि तक्रार सुद्धा नाही. तू तुझा संसार खूप छान कर. सुखाचा कर. तुझ्या सुखातचं माझ सुख आहे.’
त्याने पत्र वाचून फाडून टाकलं आणि साश्रू डोळ्यांनी तो दिवसाच्या सुरुवातीला लागला. इकडे तिने घरी सांगून, आपली बदली दुसऱ्या एका लांबच्या गावी करून घेतली. खूप दिवसांनी सकाळी ती तिच्यासाठी उठली, अगदी निर्विकार मनाने. एकटीने आयुष्याची आणि दिवसाची नवीन सुरुवात करण्यासाठी. आता तिला आयुष्याकडून कसलीही तक्रार नव्हती. पुन्हा एकदा वाट्याला आलेलं आयुष्य तिने हसत-हसत जसाच्या तसं पत्करलं होतं. त्याची आठवण, त्याच्या सोबत घालवलेले सगळे क्षण तिच्या सोबत होते, त्यांची शेवटची भेट, त्यांच्यातली ती शेवटची रात्र तिच्या सोबत होती. त्या एका रात्रीत तिने त्याच्यासोबत संसाराचं रंगवलेलं स्वप्न ती त्याच्याचं घरात जगली होती. समाधानी होती ती. आयुष्याने दिलेलं हे सरप्राईज तिला मरेपर्यंत पुरणार होतं. तिची गोष्ट आता अर्धी किंवा अपूर्ण वाटतं नव्हत तिला. जगण्यासाठी जे लागतं ते सगळ तिला आता मिळालं होत. खुश होती ती. अगदी खुश.