एकांत
एकांत
Coffee चा वाफाळता मग... प्रचंड पाऊस... Laptop वर जुनी गाणी... खुर्चीवर निवांत बसून या सगळ्या वातावरणाचा आनंद घेणारी मी... खूप दिवसांनी मला “मी” सापडले. मला हवा होता आणि अपेक्षित होता तो ‘एकांत’ मला मिळाला. त्या एकांताचं सुख किती विलक्षण! शब्दांत मांडण अशक्य. Distrub करायला दिवसभर कुणीही नसण आणि त्या छोट्याशा, टीचभर खोलीवर फक्त आणि फक्त तुमचचं अस्तित्व, तुमच्या खुणा असणे मनाला फार-फार समाधान देऊन जातात. हा ‘एकांत’ मला फार पूर्वीपासून हवा होता. सरतेशेवटी तो आत्ता मिळाला. किती काळ मिळेल हा प्रश्न आहेच, पण आत्ताच हे सुख त्या प्रश्नाला (सध्या) नजरेआड करायला पुरेसं आहे.
अशा एकांतात मग आठवणी पिंगा घालतात. त्यांचा तो पिंगा मला फार आवडतो. अलिप्तपणे त्यांच्याकडे बघता येत. एक छान समाधी अवस्था लागते. ही समाधी भंग करायला मधेच कुणीही येत नाही. आपल्या व्यतिरिक्त सजीव दुसरं काहीही नसत अशा वेळी. माणसांच्या त्या भाऊगर्दीपेक्षा निर्जीवांसोबतचा हा एकांत माझ्या मनाच्या फार-फार जवळचा आहे. मला कायम अस
ं वाटत की, अशा एकांताच्या क्षणी आपण आपल्यला सापडतो. खूप आतून, मनापासून सापडतो. नवीन, जुन्या गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टीकोनातून बघतो. दुखरी गोष्ट सलण बंद होते, हळवी वाटणारी एखादी जखम खपली धरते, कठोर होतो आपण किंवा अधिक हळवे. असं बरंच काहीसं होत.
आपल्या ठळक अस्तित्वाची जाणीव आपल्याला एकांत करून देतो. आपण का आहोत, कोण आहोत हे सगळे प्रश्न एकांतात पडतात आणि कदाचित आपल्याला त्याची उत्तर सापडतात देखील. भावनेच्या अतीव वेगाने वाहणारे कोमट अश्रू शक्यतो एकांतातच बाहेर येतात. अश्रू पुसायला, सावरायला, खोटी सहानुभूति दाखवायला कुणीही नसतं. आपण असतो फक्त आपल्यासाठी, आणि सोबतीला मनाशी साठवलेलं आणि जगापासून लपवलेलं आपलं दु:ख. एखाद्या द्वाड मुलाने घरी आलेले पाहुणे गेल्यानंतर आपला द्वाडपणा मांडावा तसं हे दु:ख एकांतातचं बाहेर येतं. कारण; त्यावेळी आपण आपले असतो ना! फक्त स्वतःचे, स्वतःसाठी.
आत्ता सध्या तरी आहे हा माझ्या सोबतीला-एकांत. बघूया, किती दिवस सोबत करतो ते!