किलबिल बाग
किलबिल बाग
आज स्वराजचा १० वा वाढदिवस होता. स्वराज अगदी आतुरतेने त्याच्या दामले आजीची वाट बघत होता..
ए आई, कधी येईल ग आजी?
अरे येईल बाळा, तिची कीलबिल बाग आता बंद होईल.. मग् इकडेच येणार आहे.. अदिती म्हणाली.
अदिती, इतका छान सांभाळ केलाय ना आपल्या स्वरूचा त्यांनी. मला सुध्दा भेटायची इच्छा झाले. अदितीच्या सासूबाई तिला म्हणाल्या..
अदिती म्हणाली मला सुद्धा जीवावर आले होते, स्वराजला सोडून नोकरी करायची म्हणजे पण या पाळणाघराबद्दल ऐकले आणि निश्चिंत झाले.
अहो आई उद्या रविवार आहे ना, आपण नक्की जाऊ या किलबिल बागेत..
पाळणाघराची जागा बघाल ना.. मोकळ्या वावराला योग्य अशी प्रशस्त, स्वच्छ, हवेशीर लख्ख प्रकाशाची आहे. आणि आजकालच्या काळात अत्यंत महत्त्वाचा म्हणून पाळणाघरात CCTV CAMERA आहे आणि त्याचा access पालकांकडे आहे. जेणेकरून करून पालक त्यांना हवे असेल तेव्हा त्यांच्या मुलाला पाहू शकतात त्यामुळे निर्धास्त राहायला होते. या शिवाय महत्वाचा मुद्दा म्हणजे ह्या सर्व सुविधा पालकांच्या खिशाला परवडतील अशाच आहेत. पाळणाघर बघाल तर बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने साफ व स्वच्छ आहे. छोटी मुले शी-सू करतात, काही वस्तू , अन्नपदार्थ यांची पाडपूड करतात. त्यादृष्टीने दररोज त्यांची स्वच्छता करण्यात येते.
मुलांना मायेची ऊब देणारी पाळणे, झोळी, विविध आकर्षक खेळणी, कार्टून चित्रे, प्रतिकृती मनोरंजनासाठी टीव्ही, हे सर्व आहे. जेणेकरून ते आपल्या आईला काही क्षण विसरून रममाण होतात.
बाळांसाठी वयोगटानुसार अन्न, फळे, दूध, इत्यादीची सोय आहे. यावेळेस देखील स्वच्छतेची काळजी घेण्यात येते.
अत्यावश्यक प्रसंगी मेडिकलचे प्राथमिक ज्ञान असणारी परिचारिका आहे.
सगळ्यात शेवटी पण अतिशय महत्त्वाचं म्हणजे तेथील सर्व सेविका या बाळांची चांगले व मायेने काळजी घेतात. छोटी मुलं काहीशी मस्तीखोर व जिद्दी असतात, अशा वेळेस त्यांना त्यांच्या भाषेत व खेळीमेळीने बोलतात. म्हणूनच एक आई आपलं सोन्यासारखं पोर हे येथे सोडून बिनधास्त आपल्या कर्तव्यावर जाऊ शकते.
अहो या सर्व गोष्टी दामले आजींच्या पाळणाघरात आहेत म्हणून तर पाळणाघर या सारखी अवजड वाटणारी बेडी मला सोयीस्कर वाटली.
तेवढ्यात दामले आजी आल्या.. स्वराज आनंदाने उड्या मारू लागला..
दामले आजी घरी आल्या आणि अदितीच्या सासूबाई त्यांच्याकडे बघत बसल्या.. जणू काही जुनी ओळख आहे असेच वाटले त्यांना.. पण वाढदिवसाच्या वेळी उशीर नको म्हणून आजी काही बोलली नाही.. दामले आजीने मात्र बरोबर ओळखले होते.
वाढदिवस झाला, सर्व मुले गेली. स्वराजने मात्र दामले आजीला सोडले नाही. जेवण झाल्यावर गप्पा मारताना अदितीच्या सासूबाई म्हणाल्या तू शकू का ग? तशा दामले आजी हसुन म्हणाल्या हो शुभू.. तुला इतका वेळ लागला का आठवायला.. आणि छानशा हसल्या...
दोघी बालमैत्रिणी.. अगदी जीवा-भावाच्या..
शकू म्हणजे दामले आजी अण्णा गोखले यांची मुलगी, अगदी गर्भ श्रीमंत घराणे.. त्यांच्या सारख्या तोला-मोलाच्या घरात लग्न लावुन दिले.. पण फसगत झाली त्यांची.. कारण नाव मोठ आणि लक्षण खोटे असेच होते. शकूला खूप त्रास दिला. नाव खराब होईल म्हणून अण्णांनी देखील हात वर केले. सर्व तिने सहन केले पण मुलगी झाली म्हणून त्या चिमणीचा जन्माच्या दुसऱ्याच दिवशी जीव घ्यायचा प्रयत्न केला, हे काही शकूला सहन झाले नाही. पण तिला न जूमानता जे हवे तेच केले. आणि शकूला शारिरीक, मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. तो त्रास तिला आता सहन होईना, परत बाळाची चाहूल लागली. तिने कोणाला न सांगता घर सोडले..
वाट मिळेल तिथे जायचं हे तिने ठरवलं.. वाटेत चक्कर येऊन पडली तेव्हा दामले डॉक्टर म्हणून गृहस्थांनी तिला त्यांच्या गाडीतून या शहरात आणले. त्यांची बायको पण डॉक्टर होती. त्यांनी शकूची काळजी घेतली. त्या डॉक्टर दाम्पत्याला मूल होत नव्हते म्हणून तें अस्वस्थ असायचे. शकूची तें सर्व काळजी घेत होते. त्यांच्यामुळे आपल्याला हे नवीन जीवन मिळाले त्यामुळे त्यांचे उपकार कसे फेडावे हे शकूला काही कळंत नव्हते. डॉक्टर बाई मुलाच्या आशेने पार कोमेजली होती. शकूने तिला स्वतःचे बाळ देण्याचे वचन दिले. त्या आशेवर ती बरी होत होती. बाळाला जन्म दिला आणि शकू घर सोडून जाणार तोच डॉक्टर बाईने राहते घर आणि काही इस्टेट शकूला दिले.
तुम्ही आमच्यावर एवढे उपकार केले आहेत त्याची परतफेड कधीच होणार नाही. शकुची अवस्था खूप बिकट होती. पण आपल्या मुलीचे कल्याण होत आहे ना मग् ठीक आहे असे म्हणून तिने मनावर दगड ठेवून बाळ डॉक्टर बाईंकडे सोपवले.. मला ह्यातले काही नको ताई.. असे शकू म्हणाली. पण त्या डॉक्टर दांम्पत्यापुढे काहीच चालले नाही.. डॉक्टर ती जागा सोडून दुसरीकडे राहायला गेले. हळूहळू मुलगी मोठी होऊ लागली तसे डॉक्टर बाई परत प्रॅक्टिस करायला लागली. त्यामुळे मुलीकडे लक्ष ठेवायला म्हणून शकूला तिने हक्काने बोलावले.
एवढी वर्ष झाली तरी शकूची चौकशी ना सासरच्यांनी केली ना माहेरच्यांनी.. त्यामुळे डॉक्टरांशिवाय तिला कोणाचा आधार नव्हता. तिला हे दुसरे आयुष्य डॉक्टरांमुळे मिळाले होते. त्यांचे उपकार ती आणि तिचे उपकार त्या कधीच विसरल्या नाहीत.. लवकर लग्न लावल्यामुळे शिक्षण जास्त नव्हते पण, वाणी मात्र शुद्ध. संस्कृत तर एवढे शुद्ध बोलायची.. सर्व स्तोत्र पाठ..
डॉक्टरांच्या मुलीची प्रगती बघून तिला केअर टेकर म्हणून घरी याल का असे लोकं विचारू लागली. तेव्हा शकू डॉक्टर बाईंना म्हणाली, ताई तुमची गोष्ट वेगळी आहे पण लोकांकडे जाऊन राहणे मला पटणार नाही. मला मांसाहारी वगैरे चालत नाही. त्यापेक्षा मी तुम्ही मला जे घर दिले आहे सांभाळायला तिथे पाळणाघर सुरू केले तर.. अर्थात तुमची परवानगी असेल तर. मला सुद्धा मुलांची किलबिल खूप आवडते, आपल्या सान्वी सारखी किती तरी मुले आहेत ज्यांचे आई बाबा कामा निमित्ताने बाहेर असतात. त्या सर्व मुलांची सोय होईल आणि माझ्या आयुष्यात असलेले रीतेपण सुद्धा कमी होईल.
डॉक्टर बाई म्हणाल्या, तुमचे मन खूप मोठे आहे. मला माफ करा. अहो ताई हात नका जोडू. माझ्यापेक्षा तिला तुमची मुलगी म्हणून जो मान, जे भविष्य मिळेल ना तें मी कधीच देऊ शकणार नाही.. आणि सानूच्या आयुष्यात मावशी म्हणून मी नेहमीच राहील. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मी तिला सत्य कधीच कळू देणार नाही विश्वास ठेवा.
तुम्हाला माझी कल्पना कशी वाटली तें सांगा कारण आजच्या पिढीतील परिस्थिती जरी परिपूर्ण असली तरी घरात कौटुंबिक गोतावळा नसल्याने आता त्याची जाणीव होते. घरात वडीलधारी माणसे नाहीत.
दोघेही नवरा बायको यांना कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. अशावेळी मुलाला चांगले
पाळणाघर शोधणे गरज वाटू लागते. पाळणाघर चालवणारी ती गृहिणी असली पाहिजे. ती
संस्कारक्षम, प्रेमळ स्वभावाची, आपुलकीने आपल्या मुलाला जपणारी इवल्या इवल्या छोट्या बाळाचे बोबडे बोल ऐकायला तयार असणारी, मूल रुसले, रडलं, की त्याच्यासोबत लहानाहून लहान होणारी, चिऊकाऊच्या गोष्टी सांगून घास भरवणारी, झोप आली तर अंगाई गीत गाऊन झोपवणारी, लहान मुलांसाठी खेळणी, पौष्टिक आहार योग्य त्या वेळी देणारी. ० ते १२ वयाच्या वयोगटातील मुलांना जपणारी अगदी अशी मावशी मिळाली तर नक्कीच आईचे पाऊल अडखळणार नाही.
घार हिंडे आकाशी, लक्ष तिचे पिलापाशी असे होणार नाही. ती ठणकावून सांगेन माझं बाळ सुखरूप पणे आहे. पाळणाघर न समजता त्याच्या मावशीकडे आहे. आईवडील बिनधास्त नोकरीवर जातील. असं हसतमुख असणारे, काळजी घेणारे पाळणाघर कुणाला आवडणार नाही. लळा लागलेले ते मूल नक्कीच विसरणार नाही.
डॉक्टर बाईंना शकूची कल्पना खूप आवडली, त्यांनी लागेल ती मदत करायची सर्व तयारी दाखवली... आणि किलबिल बाग जन्माला आली...
शकूनी सर्व कहाणी शुभूला म्हणजेच आदितीच्या सासूबाईंना सांगितले. आपल्या मैत्रिणीच्या आयुष्यात किती तरी गोष्टी घडून गेल्या. आपण काही करू शकलो नाही म्हणून त्यांना वाईट वाटले. तेव्हा अशी काही साधने नव्हती, आणि सर्वांनी संपर्क तोडला त्यामुळे आज एवढ्या वर्षानी सर्व समजले. आपली भेट झाली ना हेच खूप आहे दामले आजी म्हणाल्या.
अगं पण तुला दामले आजी का म्हणतात? अगं दामले डॉक्टरांच्यामुळे माझ्या या पाळणाघराची ओळख झाली ना त्यामुळे ग...
माझे हे पाळणाघर खूप नावारूपास आले, अनेक गरजू बायका ज्यांना त्यांचे हक्काचे घर नाही त्या सर्वांना या किलबिल बागेत आश्रय मिळाला आणि मला मदत होऊ लागली..
बरं आता निघते मी उशीर होईल, अदिती ये हं उद्या शुभूला घेऊन..
हो नक्की येते दामले आजी... अदिती
अगं आता मावशी म्हण ग हक्काने माझ्या या मैत्रिणींची सून म्हणजे माझी पण ग.. लेकच म्हणते सून म्हणण्यापेक्षा.
दुसऱ्या दिवशी दोघी किलबिल बागेत येतात.. खरच स्वप्नात पाहू अशी बाग होती. शुभूला आपल्या मैत्रिणीचे खूप कौतुक वाटले.. तिने दामले आजींना मिठीच मारली, शकू खूप धीराची आहेस तू.. खरच मला अभिमान वाटतो तुझा.. लहान असल्या पासून नेहमीच दुसऱ्यांना मदत करायला तुला आवडायची. अण्णांना आवडत नाही म्हणून लपुन छपून गरजूंना मदत करायचीस.. आणि आज तर काय हा मायेची छाया देणारा वटवॄक्ष उभा केला आहेस.. तेवढ्यात दामले डॉक्टर बाई आणि सान्वी येतात.
शकूला बघताच सान्वी धावत येते मावशी मावशी करत.. डॉक्टर बाईंना त्या ओळख करून देतात. दर रविवारी डॉक्टर बाई आणि सानू येतात इथे. काय हवं नको सगळे बघतात, त्यांच्या मदती मुळे किती तरी जणांनी मदत केली आणि हि किलबिल बाग एवढी मोठी झाली..
डॉक्टर बाई म्हणाल्या, आम्ही फ़क्त निमित्त मात्र पण तुमच्या मेहनतीमुळे हे सर्व शक्य झाले.. नाहीतर पाळणाघर म्हणजे किती तरी आई लोकांनी अवघड बेडी वाटायची.. तुमच्या नवनवीन कल्पना, स्वभाव, मेहनत, मुलांना तुम्ही ज्या पद्धतीने घडवता ते खरच ग्रेट आहे. म्हणूनच तुमचा सत्कार करायचा ठरवला आहे आम्ही. पुढच्या रविवारी या नक्की..
त्या गेल्यावर शुभूचा हात हातांत घेऊन त्यांनी वचन घेतले, सानुचे सत्य बालमैत्रीण म्हणून तुला सांगितलं, माझ्या मनाचा भार हलका झाला. पण आता हे गुपित मात्र असेच ठेवायचे. शुभूने तिचा हात हातांत घेतला आणि विश्वास दिला.
पुढच्या रविवारी सत्कार समारंभ खूप छान झाला. अदितीसारख्या कितीतरी नोकरी करणार्या बायकांनी आपले अनुभव आणि दामले आजी यांचे आभार मानले आणि त्यांच्या किलबिल बागेचे कौतुक केले. कारण मुले आणि नोकरी यामध्ये 'इकडे आड तिकडे विहीर' होणाऱ्या या बायकांची अवस्था ओळखून दामले आजी यांनीं सुरू केलेली किलबिल बागेमुळे आज मुलांना आणि त्यांच्या पालकांनाही पाळणाघरासारखी अवजड वाटणारी बेडी हवी हवीशी वाटू लागली..
कशी वाटली कथा? आवडली असेल तर खाली ❤️ असा आकार आहे तो नक्की प्रेस करा.
अभिप्राय द्यायला विसरू नका हं..!! अर्थात तुमच्या कंमेंटमधून..अजून लेख वाचत राहण्यासाठी मला फॉलो करायला विसरू नका....साहित्य चोरी हा गुन्हा आहे.
सदर कथेच्या प्रकाशनाचे,वितरणाचे आणि कुठल्याही प्रकारच्या सादरीकरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव आहेत. कथेत अथवा लेखिकेच्या नावात कुठलाही बदल हा कॉपीराईट कायद्याअंतर्गत गुन्हा आहे याची नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी नावासकट शेअर करण्यास हरकत नाही.
