खुशी (एक सत्यकथा)
खुशी (एक सत्यकथा)


"ताई मला वाचव, मला घरी नाही जायचं परत. मला शिकायचंय ग. मला घरी नको सोडूस." खुशी खूप रडून लिनाला सगळं सांगत होती. लिना तिला शांत व्हायला सांगत होती. लिना समुपदेशक होती आणि खूप समाजकार्य करायची त्यामुळे बऱ्याच सामाजिक संस्थांशी तिचे चांगले संबंध प्रस्थापित झाले होते. खुशीला अश्याच एक सामाजिक संस्थेच्या सहकाऱ्याने लीना कडे आणलेलं होत. खुशीचा तो आक्रोश, ती किंकाळी ऐकून लीनाच काळीज पिळवटून निघत होत. तिच्या अंगावर काटे उभे राहत होते. तरी ती तिला धीर देत होती. ती स्वतः हादरलेली असताना खुशीला आधार देत होती. कामच होत म्हणा तीच ते,पण ती एक माणूस पण होती. खुशीसोबत जे घडलं ते ऐकून कोणाचही काळीज पिळवटूनच निघेल. खुशी बारा वर्षांची मुलगी, खेळकर,हसरी पण जरा कुठेतरी हरवल्यासारखी असायची. समजूतदार खूप होती पण मनातून खचलेली वाटायची. एकटी बसून तिची नजर काहीतरी शोधत राहायची. तिच्या या परिस्थितीला कारणही तसच होतं. वर्षापूर्वी अगदी सामान्यांसारखं कुटुंब होत खुशीच. आई,वडील आणि ती. आई,वडील तिचे लाड खुप करायचे. परिस्थिती बेताची असली तरी तिला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिली नाही. वडील शेतकरी होते तिचे. म्हणावं तसं शेतीत पीक नाही यायचं त्यामुळे दुसऱ्याच्या शेतात पण ते मजुरी करायला जायचे. दिवसभर थकून भागून आल्यावर खुशीचा हसरा चेहरा बघितला की त्यांचा सारा क्षीण निघून जायचा. खुशीची आईही खुशीसाठी कोणाच्या शेतात काम असलं तर जायची. त्या दोघांची खूप इच्छा होती की, खुशीला खूप शिकवायचं आणि स्वतःच्या पायावर उभं करायचं. ती जन्माला आल्यावर या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता म्हणून आनंदाने तीच नाव खुशी ठेवण्यात आलं आणि तेव्हापासून ते खुशीला खुशच ठेवत आलेले. एके दिवशी खुशीच्या आईच्या पोटात अचानक दुखू लागलं. तस अधून मधून तिच्या पोटात दुखायच पण नेहमी डॉक्टर कडे जायला पैसे नसायचे. त्यामुळे तिने ते दुखणं अंगावर रेटलं. त्यादिवशी तिच्या सहनशक्तीच्या पलीकडे पोटात दुखत होत म्हणून खुशी आणि खुशीचे वडील तिला डॉक्टर कडे घेऊन गेले. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितल्या. टेस्टसाठी एवढे पैसे नव्हते आणि टेस्ट तर महत्वाच्या होत्या. खुशीच्या आईनेच तिच्याकडे लग्नातली सोन्याची अंगठी होती ती गहाण ठेवायला दिली. तिच्या माहेरची तेवढीच आठवण तिच्याजवळ राहिलेली ती पण आता गेलेली. पैसे मिळाल्यावर सगळ्या टेस्ट झाल्या. रिपोर्ट यायला बराच वेळ होता आणि खुशीला भूक पण लागलेली म्हणून ते तिघे एका साध्या हॉटेलमध्ये गेले. आधी कधी तिघे असे बाहेर नव्हते आले म्हणून खुशीला आनंदही झालेला आणि आई आजारी आहे म्हणून काळजीत पण होती. तिच्यासाठी वडापाव मागवला आणि आई वडिलांनी फक्त चहा घेतला. खुशीने तिच्या वडापावमधील एक एक घास दोघांना भरवला. दोघांचे डोळे पाण्याने भरलेले. परिस्थिती किती पण वाईट येवो पण खुशीमुळे त्याला लढण्याची ताकद मिळत होती. रिपोर्ट्स काय असतील याची काळजी खुशीच्या वडिलांना सारखी सतावत होती पण त्यांनी ते खुशीसमोर दाखवलं नाही. खाऊन झालं की ते रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरांना भेटायला गेले. खुशीला बाहेरच उभं राहायला सांगितलं. दोघे आत गेल्यावर डॉक्टरांनी सांगितले की खुशीच्या आईला पोटाचा कॅन्सर झाला आहे आणि उपचार केले तर काही दिवस आयुष्याचे वाढू शकतात.
कॅन्सरचे नाव ऐकूनच ते दोघेही तिथेच रडायला लागले. खुशीचा चेहरा समोर येत होता. तिच्या आईला तर काहीच सुचत नव्हतं. पुढे सर्व अंधारच दिसत होता. खुशीच्या वडिलांनी स्वतःला आणि तिच्या आईला सावरले आणि दोघांनी बाहेर येताना ठरवले की खुशीला यातलं काही सांगायचं नाही. खुशी बाहेर वाट बघत बसलेली. दोघे बाहेर येताच काळजीने तिने विचारले की आईला काय झालंय. त्यावर दोघे हसतच बोलले,"काही नाही ग कामामुळे थोडा त्रास होतो बाकी काही नाही. डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात त्याने होईल बरं". खुशी म्हणाली,"आई आता तुझी सगळी काम मी करत जाईन.तू आराम कर जरा. मी शाळेत पण जाईन आणि घरचं काम व करेन". तिचा हा समजूतदारपणा पाहून दोघांनी अश्रूंचा आवंढा गिळला आणि घरी गेले. दिवसामागून दिवस जात होते. डॉक्टरने सांगितलं तस उपचार करायला पैसे खूप लागणार होते म्हणून खुशीची आई म्हणायची तिच्या वडिलांना की,"जेवढं आयुष्य आहे तेवढ जगेन. हे उपचार वगैरे आपल्याला झेपणार नाहीत. खुशीसाठीही पैसे साठवायचे आहेत. माझ्यावर नको खर्च करायला". पण खुशीचे वडील ऐकायला तयार नव्हते. ते म्हणायचे की "खुशीला आणि मला तुझी खूप गरज आहे. अस सगळं संपून नाही देणार मी". उपचार जमेल तसं चालू होते. शेतीत पीक काही येत नव्हते पण मशागतीलाच पैसे जायचे. थोडंफार दागिने उरलेले ते गहाण ठेऊन झालेले आतापर्यंत. आता राहिलेला फक्त शेतीचा एक तुकडा.
एक दिवस खुशीच्या वडिलांनी जमिनीचा तुकडाही गहाण ठेवला आणि मिळालेल्या पैश्यात उपचारासाठी साठी डॉक्टर कडे गेले. डॉक्टर अजून पुढच्या वेळी बोलवायचे. आता पुढे कुठून पैसे आणायचे,शेती तर गहाण टाकली,डोक्यावर आभाळा एवढं कर्ज. खुशीच्या वडिलांना काहीच सुचत नव्हतं. त्या टेन्शन मध्येच ते एक दिवस दारूच्या दुकानाकडे वळले. त्यांना जाताना खुशीने पाहिलेलं. ती आईला सांगायला घरी आली. आई आणि ती दोघी वाट बघत बसलेल्या कधी येतील खुशीचे बाबा याची पण अख्खी रात्र सरली तरी आले नाहीत म्हणून दोघी शोधायला घराबाहेर पडल्या. सगळ्या गावात शोधून झालं तरी सापडले नाहीत म्हणून शेतात आल्या आणि तिथे खुशीला तिचा बाबा झाडावर लटकलेला दिसला. खुशीच्या वडिलांनी आत्महत्या केलेली. खुशीला काही समजण्याच्या पलीकडचं होत सगळं. कर्जाचा डोंगर, खुशीच्या आईच आजारपण या सगळ्या संकटांचा सामना करता करता खुशीच्या वडिलांनी स्वतःच जीवन संपवलं. बाबाने काय केलं, का केलं, मी काही त्रास दिलेला का अशा हजार प्रश्नांनी खुशीने तिच्या आईला भंडावून सोडलं. शेवटी तिच्या आईने सांगितलं की तिला कॅन्सर झाला आहे आणि या आजारासाठी बाबांनी सगळं गहाण ठेवलं, शेती पण. आधीच शेतीत काय पिकत नव्हतं आणि त्यावर कर्जबाजारी झालेला तो म्हणून जीवाला कंटाळून आपल्याला सोडून गेला तो. सगळं ऐकून खुशी हमसून हमसून रडायला लागली. बोलायला लागली,"आई बाबा गेलाय आता तू सोडून जाऊ नको ग. मी कोणाकडे राहू,कस राहू तुमच्याशिवाय." त्यादिवशी दोघी खूप रडल्या आणि न जेवताच झोपल्या. आता शेतीही राहिली नव्हती आणि कर्जाचे पैसे मागायला रोज लोक दारात यायचे म्हणून खुशीची आई खुशीला घेऊन तिच्या आईकडे राहायला गेली. तिकडे खुशीचे आजी,आजोबा आणि एक मामा राहायचा. मामा काही काम करायचा नाहीच पण दारू प्यायचा. घरी आला की तमाशा करायचा. खुशीचे आजी आजोबाच पोटाची खळगी भरण्यासाठी अजूनही बाहेर मिळेल ते काम करायचे त्यात आता खुशी आणि तिच्या आईची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडलेली. खुशी इकडे आल्यावरही शाळेत जात होती. तिची आईही जमेल तसं कामाला जात होती. आता तिने उपचार घेणे बंद केलेलं. पैसेच नव्हते तर औषधं आणणारं तरी कशी ती. आलेला दिवस ढकलत होती बिचारी. खुशी बाबाच्या जाण्यानंतर पूर्ण हिरमसून गेलेली. आईला बघून आधार वाटायचा तिला पण तो तरी किती दिवस आहे हे आठवून रडत बसायची कोपऱ्यात. काही दिवसांनी खुशीच्या आईचीही तब्येत ढासळली. अंथरुणावर पडूनच असायची. खुशी तिची सेवा करायची. खेळायच्या,बागडायच्या दिवसात खुशीला किती संकटांना सामोरं जाव लागत आहे हे बघून तिचे आजी आजोबाही हतबल व्हायचे. खुशी आईला जेवण भरवण्या पासून तिची कपडे धुण्यापर्यंत सगळी काम करायची. आणि शाळेतही जायची. शिकण्याची जिद्द तिच्यात प्रचंड होती. एक दिवस शाळेतून येताना तिला तिच्या घराबाहेर खूप गर्दी दिसली. ती धावत पळत आत आली तर तिची आई तिला सोडून गेलेली. खूप रडली खुशी. आता तीच विश्वच संपलेलं. एवढया लहान वयात आई बाबा दोघांचं छत्र हरवलेलं. आधाराला होते तेही म्हातारे आजी आजोबा. मामा असून नसल्यासारखा. एक मावशी होती ती यायची अधेमध्ये भेटायला. अशा परिस्थितीत खुशीला तिच्या आजी आजोबांनी खूप सावरलं. खूप समजावलं आणि पुन्हा शाळेत जायला, जगायला तिला उभं केलं. आता खुशी बऱ्यापैकी जे झालं त्यातून बाहेर पडत होती. एक दिवस खुशी एकटीच घरात होती. आजी आजोबा कामाला गेलेले. ती पुस्तक वाचत बसलेली तेवढ्यात मामा आला. त्याने बाहेरूनच विचारलं,"खुशी घरात कोणी नाही का?" खुशीने फक्त नकारार्थी मान हलवली आणि पुस्तकात डोकं घातलं. मामा घरात आला, खुशीजवळ बसला. खुशीने तिथून उठायचा प्रयत्न केला तर तिचा हात धरून त्याने तिला बसवलं आणि फोन मध्ये तुला पिक्चर दाखवतो म्हणाला. खुशी जबरदस्ती बसली पण लांबच. तो तिच्याजवळ जाऊन पिक्चर दाखवायला लागला. फोनमधील ती घाणेरडी दृश्य बघून खुशी त्याचा हात झिडकारून पळायला लागली. मामाचा दारू पिल्याचा वासही तिला येत होता. ती शेतात पळायला लागली पण मामाच्या ताकदीपुढे तिच काहीच चालले नाही. तो जबरदस्ती तिला घेऊन घरात आला, ती ओरडत होती तर तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबला आणि त्यादिवशी कोवळी कळी चुरडली गेली. काही कळायच्या आत खुशी बेशुद्ध झाली. ते बघून मामा घाबरला आणि पळून गेला.
आजी आजोबा संध्याकाळी घरी आले तर खुशी बेशुद्ध पडलेली जमिनीवर. त्यांनी तोंडावर पाणी मारून तिला शुद्धीवर आणलं. खुशी घडलेला सगळा प्रकार सांगितला. आजी आजोबांना धक्काच बसला. मावशीला बोलवून सगळं सांगितलं. मावशीने एका सामाजिक संस्थेच्या सरांना घरी बोलवून सगळा प्रकार कथन केला. त्या संस्थेतच मावशीची दोन्ही मुलं शिकत होती. सर अर्थातच म्हणाले पोलिसात तक्रार करू पण मावशी म्हणाली," तो तर पळून गेला सर. आलाच परत तरी त्याला कितीशी शिक्षा होईल? आणि शिक्षा होईल आणि शिक्षा होईलच कश्यावरून? काय पुरावा आहे का? या पोरीचं म्हणणं खोटे पण ठरवू शकतात ना. आमच्या सारख्या गरिबाला हे झेपत नाही सर. पोरीने नको त्या वयात खूप सोसलं. आणि तो परत आला,कळलं की पोलीस मध्ये आम्ही गेलो तर धड आई बाबाला पण जगू देणार नाही आणि या पोरीचे रोज लचके तोडील ते वेगळंच. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या संस्थेत हिला घेऊन जा सर. हिची शिकायची तशी पण खूप इच्छा आहे. शिकून तेवढंच तीच आयुष्य सावरलं तर सावरलं. आमच्यासाठी ही असली प्रकरणं गपगुमानच सहन करावी लागतात सर. हिला सुरक्षित ठेवायचंय म्हणून तुम्हाला बोलवलं. तुम्ही तुमच्या संस्थेत जशी माझी दोन पोरं शिकवता तस हिलाही शिकवा. होईल बरी काही दिवसात ती". खुशी शून्यात बघत बसलेली. उध्वस्त झालेली. तिच्यासोबत नक्की काय झालं हेही न कळणार वय होत तिचं. ज्याने हे घाणेरडं कृत्य केलं तो नराधम मात्र उजळ माथ्याने फिरत होता. ते सर खुशीला तेव्हा त्यांच्या संस्थेत घेऊन गेले आणि काही दिवसात लिनाकडे समुपदेशनासाठी घेऊन आलेले. त्या दिवसापासून खुशीचा कोणावरही विश्वास राहिला नव्हता. कोणाशी ती बोलायची नाही. आज लिनाने तिच्या डोक्यावरून जो मायेचा हात फिरवला त्यात तिला आधार, विश्वास दिसला. आपुलकी दिसली. आज तिने घडलेला सगळा प्रकार लिनाला सांगितला. तिच मन आज मोकळं झालेलं. तिला शाळेत जायचंय, शिकायचंय, घरी नाही जायचं अस ती लिनाला सारख सांगत होती. खुशीच्या शरीरावरचे ओरखडे आज ना उद्या जातील पण तिच्या मनावर उमटलेले ओरखडे जन्मभर ती विसरू नाही शकणार. कोणत्याच पुरुषावर ती विश्वास ठेऊ शकणार नाही. लिनाला खुशीची अवस्था बैचेन करत होती. कर्जबाजारी होऊन आत्महत्या केलेला शेतकरी बाबा,आजाराने गेलेली आई आणि अतिप्रसंग झालेली खुशी या सगळ्यांनी तिला गहिवरुन आलेलं. बलात्कार करणारा आजही काहीच केलं नाही असं वागून मर्दानगी दाखवत समाजात फिरत असतो आणि समाज त्याला स्वीकारतोही. पण जिच्यावर बलात्कार झाला तिला प्रेम,माया द्यायची सोडून समाज तिला दोषीच्या नजरेने बघत असतो या गोष्टीची चिडही येत होती लिनाला. खुशीला तिने बऱ्यापैकी सावरलेलं. खुशीच्या शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी लिनाने उचलली आहे. खुशी शिकून नक्की मोठी होईल आणि स्वावलंबी होईल. तिची जिद्द तिच्या आईवडिलांची इच्छा नक्कीच पूर्ण करेल. कथा ही सत्यकथा आहे. आजही आपल्याकडे खुशीसारख्या असंख्य मुलींवर असे अतिप्रसंग घडतात. शिक्षा नक्की कोणाला होते? बलात्कारीला की त्या मुलीला? अश्यावेळी माणसातील जनावर बघायला मिळतो आणि ते जनावर मोकाट फिरतही. मुक्त फिरायची,बोलायची बंदी जिच्यासोबत ही घटना घडली तिलाच का? तिचा काय दोष असतो त्यात? तिने स्वतःहून ही परिस्थिती ओढावून घेतलेली असते का? अश्या नराधमांना शिक्षा कधी? समाज फक्त मुलींच्या छोट्या कपड्यांना,तिच्या वेशभूषेला, वागण्यालाच दूषणं देत राहतो पण अशा विकृत मनस्थिती असणाऱ्या माणसाला शिक्षा के आणि केव्हा? अरुणा शानबागच उदाहरण ओल्या सगळ्यांसमोर आहेच. तिचीही काही चूक नसताना कोमातच तीच आयुष्य संपलं आणि तिच्यावर बलात्कार करणारा मात्र पळून जाऊन जगायचं ते आयुष्य जगत होता. समाजाने अशा मुलींना,स्त्रियांना सन्मानाने स्वीकारून त्यांच्या जखमांवर प्रेमाने फुंकर घालण्याची गरज आहे तेव्हाच अशा कितीतरी खुशी खऱ्या अर्थाने आनंदी,खूश होतील आणि स्वावलंबी होऊन चांगलं जीवन जगतील. लेखाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव. लेख लेखिकेच्या नावासहित शेअर करण्यास काहीच हरकत नाही.