STORYMIRROR

uday joshi

Classics

5  

uday joshi

Classics

कैदेतून सुटका

कैदेतून सुटका

39 mins
1

हातातलं गाठोड घट्ट धरुन , सांभाळत हलक्या पावलांनी चालत चालत  वसुधाताई निघाल्या. विमानाच्या शिडीवरुन उतरल्यावर दूरवर असलेल्या इमारतीकडे एक नजर टाकत त्यांनी चालायला सुरवात केली. ते अंतर त्यांच्या वयाला खरंतर खूपच होते. तिथल्या कर्मचा-यांनी त्यांना व्हील चेअर हवी आहे का तेही विचारलं,पण नाही, वयामुळे शरीर थकलं होतं, मन नाही. उलट एक वेगळीच उभारी घेतलेल्या त्यांच्या मनाने त्यांना चालण्यास प्रवृत्त केले आणि हा हा म्हणता त्या तिथे पोचल्या देखील.

आपोआप उघडलेल्या दरवाजातून आत आल्यावर थंड हवेच्या झुळक्यामुळे त्यांना बरे वाटले. पदरानेच घाम पुसत त्या एका खुर्चीवर विसावल्या. चेह-यावर एक विलक्षण / तजेला  आनंद... कुठून आला होता तो.. ? काय कारण असावं ?

हातातलं गाठोडं बाजूला फेकून देत वसुधाताई उठल्या आणि खाली वाकून त्यांनी जमिनीवर डोके टेकले. त्या कोणा  एखाद्या देवाला नव्हे तर आपल्या मातृभूमीला / जन्मभूमीला नमस्कार करीत होत्या. उठून समोर बघतांना त्यांचे डोळे अश्रूंनी पूर्णपणे डबडबलेले होते. डोळ्यांतून वहाणा-या धारांनी त्यांना सर्व काही अस्पष्टच दिसत होते.

पदराने डोळे पुसून त्यांनी स्वताला सावरले. त्यावेळी आख्खा एअरपोर्ट त्यांच्याकडे विस्मयाने पहात होता. त्याची पर्वा न  करताच हस-या  चेह-याने त्या बाहेर जाण्यासाठी दरवाजाकडे वळल्या.

हा आनंद होता स्वगृही परतण्याचा !! आणि त्यात मिसळला होता एक प्रकारचा सुटकेचा निश्वास.....गेली सहा सात  वर्षे एक प्रकारचा तुरुंगवास भोगल्याचा थकवाही होता... पण आता तो नव्हता आणि म्हणूनच त्यांचा आनंद द्विगुणित झाला होता.

पण..

पण...

वसुधाताई आणि तुरुंगवास....छे..छे.. काहीतरी चुकतंय.. वास्तविक हा तुरुंगवास कुठल्याही गुन्हेगारीसाठी नव्हता,  तो त्यांना पोलीस, वकील न्यायाधीश यांनी घडविलेला नव्हता, तर त्यांच्या स्वतःच्याच पोटच्या गोळ्याने , अभिषेकने घडविलेला होता.

..............

उच्च शिक्षणासाठी परदेशी गेलेला अभिषेक नंतर नोकरीच्या निमित्ताने तिथेच राहिला आणि त्यानंतर हळूहळू तिथल्या वातावरणाशी जुळवून घेत अधिकाधिक उत्कर्षाच्या मागे लागत, त्याने आपला जम बसवला. त्याचबरोबर तिथल्या सवयीही लागत गेल्या आणि  मायदेशात परतण्याचा विचार क्षीण होत नाहीसा झाला. अभिषेकच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या वसुधाताई दिवसेंदिवस निराश होत होत्या. पण तरीही ती आशा त्यांचा पिच्छा सोडत नव्हती. वारंवार फोन, ई मेल चालूच होते. पण परिणाम मात्र फारसा दिसत नव्हता. चाळीतले शेजारी त्यांची मनोवस्था समजून घेऊन त्यांना धीर देत. पण त्याचा उपयोग तेवढ्यापुरताच  होत होता.

“अरे  तुला जाऊन आता तीन चार वर्षे झाली.”

“आई, आत्ता कुठे चार वर्षे होत आहेत. अजून मला काही गोष्टी शिकायच्या आहेत. त्याला सहा महिने लागतील. तेंव्हा बघू. तू मात्र फार काळजी करतेस.”

“तुझे वयही आता वाढत चालले आहे. किती शिकणार आहेस?”

“वयाबाबतीत तुझे म्हणणे खरे असले तरी थोडासा नाईलाजच आहे. थोडीफार आर्थिक प्रगती करण्याचीही गरज आहे. त्यासाठी आणखी थोडे शिक्षण... तो खर्च... शिवाय घर , वाहन इ. साठीही पैसे जमवतो आहे.”

“आता एकदा लग्न करून टाक. अरे, सर्व गोष्टी वेळच्या वेळीच व्हायला हव्यात. उशिराचे परिणाम त्रासदायक होऊ शकतात.”

“खरं आहे ते. पण एकदा का संसाराची जबाबदारी आली की पुढे काहीच करता येणार नाही. आर्थिक कुवत आणि स्थैर्य आल्याशिवाय लग्नाची जबाबदारी नकोच.”

“बायको तरी भारतीय करणार आहेस का ? नाहीतर बघशील एखादी गोरी गोमटी... सूनमुख पहाण्यासाठी , नातवंडाना खेळवण्यासाठी खूप आसुसले आहे रे मी”

“या बाबतीत मात्र मी तुझ्याशी संपूर्ण सहमत आहे. मला सहचारिणी एखादी भारतीय असावी असे वाटते. फक्त तिने इथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायची तयारी ठेवावी म्हणजे झालं..... हो, आणि आधी लग्न तर होऊ दे...... मग नातवंड..”

“वयोमानाप्रमाणे  मला आता एकटीला काम झेपत नाही. तूच माझा आधार, तुझ्यावरच अवलंबून आहे रे मी”

“त्याची तू मुळीच काळजी करु नकोस. मी जरी इथेच कायमचा स्थाईक झालो तरी तुला वा-यावर सोडणार नाही. अधून मधून किंवा खरंतर कायमचंच तुला इकडे घेऊन यावं असं वाटतंय. एकमेकांचा सहवास आणि आधार , दोन्ही साध्य होईल. इतके वर्ष कष्ट केलेस, आता कर आराम.!”...

......

दूरवर आकाशात जाणा-या विमानाकडे पहात वसुधाताईंनी डोळे पुसले. आता पुन्हा एकदा त्यांचे एकाकी जीवन सुरु होणार होते. पण त्याबरोबरच एक आनंद, समाधानही होते. चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अभिषेक आला होता.त्याच्या सुट्टीच्या एका महिन्यातच असंख्य गोष्टी घडल्या होत्या. वसुधाताईंनी पाहून ठेवलेल्या मुलींच्या गाठीभेठी, मग शर्मिलाची पसंती, लग्न, नातेवाईकांचे येणे जाणे आणि त्यानंतर पुन्हा अमेरिकेला प्रयाण,... सर्वच इतक्या वेगाने घडत गेले की त्यांना अक्षरशः श्वास घ्यायलाही वेळ झाला नव्हता. हुश्श करीत आत येऊन त्यांनी पलंगावर अंग टाकले आणि क्षणार्धात त्या निद्राधीन झाल्या. महिनाभर झालेल्या धावपळीने त्या पूर्ण थकून गेल्या होत्या.

त्यानंतरचे सुमारे १५ दिवस केवळ  आवराआवरीतच गेले. अभिषेकही तिकडे स्थिरस्थावर झाला होता. मग पुढचे काही दिवस.. .. महिने , फोन, मेसेजेस ई मेल , एकमेकांची विचारपूस करण्यात गेले. कशी का असेना, रोज होणारी व्हिडिओ भेट त्यांना सुखावह होत होती. संगणकशास्त्रात पदवीधर झालेली शर्मिलाही हळूहळू आवडू लागली होती. अभिषेकचे प्रमोशन, तिची नवी नोकरी, मग दोघांनी आवश्याक म्हणून घेतलेली कार.... दिवस जात होते. प्रगतीच्या वाटेवर धावत असतानाच त्यांनी अल्पशा कर्जात एक टुमदार घरही घेतले.

“आई, तू ही आता इकडे ये एकदा. आपले घर खूप मोठे आहे. सर्व काही आरामशीर आहे. खूप दिवस रहा म्हणजे  भरपूऱ फिरताही येईल, हे नवे जग बघता येईल.” .... अभिषेक

“अरे माझे आता वय झाले आहे. इतका लांबचा प्रवास  तोही अनोळख्या देशात.. नको रे बाबा, मी आपली इथेच सुखात आहे.”

“तसा इकडे एकटेपणा जाणवत नाही. चाळीतील सर्व माणसे घरच्यासारखीच आहेत. सुखदुःखाची देवाघेवाण होते, वेळप्रसंगी कसलाही विचार न करता मदतीला धावून येतात, छान चालले आहे रे... वसुधाताई”

“अग चाळीतल्या त्या छोट्या घरात किती अडचण होते. शिवाय बाकी सुविधाही कमीच, त्यापेक्षा तू इकडे ये. एकदा इथली सवय झाली की तुला परत जावेसेच वाटणार नाही.” .... अभिषेक

“आई, बघा अभिषेक एवढा सांगतोय तर का नाही तुम्ही विचार करत ?  तुम्हांला अगदी खरं सांगते, लग्नानंतर पहिल्यांदा इथे आले तेंव्हा अक्षरशः बावचळून, भेदरून गेले होते. पण अभिषेकच्या मदतीने हळूहळू सावरत गेले आणि आता तर सर्व सवयीचे झाले आहे. तुमच्यासारखीच माझ्याही माहेरची जागा छोटीशीच होती. आता या घराची सवय झाल्यावर तिथे खरंच अवघडल्यासारखे होणार आहे”..  शर्मिला..

“आणि आई खरं सांगू, मला माणसांची खूप आवड आहे. भरपूर नातेवाईक, मित्रमैत्रिणी यांची सोबत असली की मी अगदी आनंदात असते. पण कसचं काय इथे माणसं कमीच, भेटतात तीही क्षणापुरती, हाय  बाय पुरतीच. सगळ्यांकडे स्वतःची कार असतेच. सार्वजनिक प्रवास साधने नाहीतच. बस, ट्रेन नाही, फक्त महागड्या टॅक्सीच. एखाद्या सुटीच्या दिवशी गेलं तरच चार माणसांची भेट होते. नाहीतर सर्व सुनसान.  त्यामुळे कधीतरी एकटेपणा जाणवतो. तुम्ही आलात तर थोडा विरंगुळा होईल.” शर्मिला..

“आई जागेचं, छोटी किंवा मोठी, जाऊ दे. पण बाकीच्या असंख्य सोयी आपलं रहाणं अगदी आरामदायी करतात. घरसामानासाठी, प्रवासासाठी, बिले भरणे असो किंवा खरेदी असो, प्रचंड साठा असलेले मॉल जागोजागी असतात आणि फोनवरुन होणा-या अर्ध्याअधिक गोष्टी. फार त्रास होतच नाही. कुठे रांग नाही, सुट्या पैशांची चणचण नाही , रस्त्यावरचे अस्वच्छ खाणे नाही, मुख्य म्हणजे गर्दी नाही, धक्काबुक्की नाही...सारं अगदी चकचकीत.” ..अभिषेक

“आई, खरं सांगू, इथे आल्यावर मी इतक्या गोष्टी शिकले आहे म्हणून सांगू.. की जे मला भारतात कधीच शक्य झाले नसते. मी आता बेधडक कार चालवते, अभिषेकलाही माझ्या ड्रायव्हिंगची धास्ती वाटते. प्रत्येक गोष्ट स्वतः करायला लागल्यावर खूप मजा येते.” ... शर्मिला.

“तुमचे म्हणणं पटतंय रे पोरांनो, पण नाही , अजूनही मला इथेच रहावसं वाटतय. आणि २-४ महिन्याकरता एवढ्या लांबचा प्रवास मला कितपत झेपेल कुणास ठाऊक”.... वसुधाताई.

“तिथल्या चालीरिती , नियम अंगवळणी पडतील की नाही...”

“स्वतःची कामे स्वतःच करायची सवय मला इथे आहे. पण तिथे सगळी मशिन्स वापरणे मला कसे जमणार?  नकोच ते.  जाऊ दे... मी आपली इथेच बरी. तुम्ही सुखात  आहात ना,  पावलं मला.. आता तुम्हाला सुखी बघतच उरलेले दिवस काढायचेत मला....”  वसुधाताई.

हो ना करता करता २-३ वर्षे कशी निघून गेली ते वसुधाताईंना कळलेच नाही. त्या आपल्या त्यांच्या चाळीतल्या मैत्रिणींबरोबर मजेत दिवस घालवत होत्या.

पापड कुरडया विकून पै पै जमवणा-या फाटक काकू, अवर्णनीय चवीची पुरणपोळी करणा-या लेले वहिनी, दिवाळीचा फराळ करुन सर्वांना पाठविणा-या जोगळेकर मावशी, मे महिन्यात गावाहून आलेल्या आंब्याचा रस, साठं, शिवाय फणसपोळ्या करणा-या जोग मामी, उत्कृष्ट चित्रकार असलेल्या बापट वहिनींची बघत रहावी अशी रांगोळी, मुळात शिक्षिका पण आता निवृत्त झालेल्या वंदनाताई,.. एक ना दोन.. चाळीतील खेळीमळीचे वातावरण आणि जिवलग  सख्या, यांच्या सहवासात वसुधाताईंना परदेशी जाण्याचा विचारही शिवत नव्हता. .

अन् एक दिवस फोनवरुन अचानक मिळालेल्या त्या बातमीने वसुधाताई हरखून गेल्या. अभिषेकने दिलेल्या त्या गोड बातमीने त्या फुलुन गेल्या आणि इतके दिवस परदेशगमनाला असलेला त्यांचा विरोध साफ गळून पडला.

“चला म्हणजे आता तुम्ही तिघं होणार तर” . वसुधाताई

“हो पण आई, त्या आनंदाच्या क्षणाला तुझी उपस्थिती हवीच. नातू पहायला तरी आता नक्की ये.” अभिषेक

“आई, तुम्ही आता काही झालं तरी यायलाच हवं. पहिलीच वेळ असल्याने मला खूप भिती वाटते आहे. तुमचा आधार असला म्हणजे बरे वाटेल.” शर्मिला.

आनंदाने त्यांनी अभिषेकला होकार दिला. दोघांना झालेला आनंद त्यांच्या आवाजातूनच प्रकट  झाला. अगदी व्हिडिओ कॉलचीही गरज पडली नाही.

“आई, आता लवकर तयारी कर. पासपोर्ट, व्हिसा सगळंच करायला लागणार आहे आणि त्याला खूप वेळ जाईल. ते झाले की मी लगेच तिकिट पाठवतो..”

....

 एका वाटीत साखर घेऊन मग वसुधाताई चाळीतल्या सर्वांकडे जाऊन आल्या. अभिनंदन, विविध सल्ले आणि त्याबरोबरच मदतीसाठी तत्परतेने पुढे झालेले हात पाहून त्यांना अक्षरशः गहिवरुन आले.

पुढचे दोन महिने प्रचंड धावपळीतच गेले. स्पोर्ट्स शू पासून ते पंजाबी ड्रेसपर्यंत सर्व खरेदी झालीच, शिवाय दोन मोठ्या बॅगा, त्याही घ्याव्या लागल्या. आयुष्यात कधीही पुण्या नाशिक पलीकडे न गेलेल्या वसुधाताई त्या जमा होणा-या , वाढत चाललेल्या सामानाकडे नुसत्याच बघत बसायच्या. त्यातही अभिषेकच्या व शर्मिलाच्या आवडीचे लाडू, चकली, चटण्या वगैरे पदार्थ , त्यांनी स्वहस्ते तयार करुन घेतले.

सर्व कागदपत्रांची पूर्तता करुन पासपोर्ट, व्हिसा मिळाल्यावर त्यांनी अभिषेकला फोन केला. फक्त आठच दिवसांचे अंतर ठेवून त्याने तिकीट पाठवले. त्यातले दोन दिवस तर सर्वांचा निरोप घेण्यातच गेले. विशेषतः साठ्यांच्या विकासने केलेली अभूतपूर्व निस्वार्थी मदत.. निरोप घेतांना ओल्या डोळ्यांनी त्यांनी हात जोडले.. लवकरच परत येण्याचा वादा करतच....

विमानतळावरील अडथळ्यांचा (checking) मार्ग पार करत वसुधाताई एकदाच्या विमानात जाऊन बसल्या. एकंदरीत वातावरणानेच त्यांची छाती दडपून गेली होती. तरिही विकासने अगदी बारिक सारीक गोष्टी समजावून दिल्या असल्याने फारसा त्रास झाला नाही. मनोमन त्याला धन्यवाद देत त्या स्थानापन्न झाल्या. त्यानंतर नेहमीच्या सवयीनुसार आपली डायरी काढून त्यांनी आपले घर ते येथपर्यंत घडलेल्या गोष्टी  किंवा परदेशप्रवासाला आवश्यक अशा गोष्टी यांची व्यवस्थित नोंद केली. हीच डायरीची सवय आपल्याला भविष्यात किती उपयोगी पडेल याची त्यांना तेंव्हा तरी कल्पनाच नव्हती. प्रवासातही प्रत्येक गोष्ट – हवाई सुंदरींची लगबग, पायलटच्या सूचना, पुढील सीटच्या मागे असलेला टीव्ही, खानपान सेवा... सा-याच गोष्टी नवीन , प्रथमच पाहिलेल्या  आणि अचंबित करणा-या होत्या. .... डायरीची पाने भरतच होती.

सुमारे २२-२३ तासांच्या प्रवासानंतर विमान उतरले तेंव्हा त्यांना हायसे वाटले. बॅगा सांभाळत आजूबाजूचे निरीक्षण करीत त्या बाहेर पडण्यासाठीच्या दरवाजापर्यंत आल्या.

आणि समोरच थोड्या अंतरावर वाट पहात उभ्या असलेल्या अभिषेकला पाहून त्यांना गहिवरुन आले. धावत  येऊन अभिषेकने जेंव्हा आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करता त्यांच्या पायावर डोके ठेवले तेंव्हा त्यांना अश्रू अनावर झाले.

बोलता बोलताच अभिषेकने सामान उचलून गाडीत ठेवले. त्या आलिशान गाडीकडे बघूनच त्यांची छाती दडपून गेली , पण सारथी आपला अभिषेकच आहे हे लक्षात आल्यावर भिती नाहीशी झाली आणि उर अभिमानाने भरुन आला. गाडी सुरु झाल्यावर मायलेकरांच्या गप्पा सुरु झाल्या.

“आई प्रवासात फार त्रास झाला नाही ना?”

“त्रास नही रे, पण सगळंच नवीन असल्याने थोडंसं बावचळल्यासारखं झाले होतं. त्या एअर होस्टेसनी पण खूप मदत केली.”

“झोप लागली का?”

“विशेष नाही. अर्धवट डुलक्याच जास्त.”

“थकली असशील, आता दोन दिवस पूर्ण विश्रांती घे. जेट लॅगमुळे वेळेची ऍडजस्टमेंट आणि बदललेल्या दिवस   रात्रीची सवय व्हायला हवी.”

“जेवण कसं होतं?  काही जमलं का?”

“नाही रे, अगदीच मुळमुळीत , मी त्यातलं काहीच खाल्लं नाही. फक्त काफीच घेतली”.

“नुसत्या काफीवर २२ तास?”

“नाही. घरुन आणलेले लाडू, चिवडा मात्र खाल्ले. विकासने सांगितले हाते त्याप्रमाणे हॅंडबॅगेतच ठेवले होते. अगदीच सोयीचे झाले. त्याने खूपच मदत कोली रे बाबा”

थोड्याच वेळात अभिषेकचे घर आले आणि उतरताक्षणीच वाट पहात उभ्या असलेल्या शर्मिलाला त्यांनी मिठीच मारली. पुढे होऊन तिने बॅगा हातात घेतल्या.

“अग नको नको, तू आता असे वजन उचलणे योग्य नाही. अभिला सांग.”

“आई, किती काळजी करता. तुमच्या येण्याने माझे टेन्शनच निघून गेले.”

 गाडी गॅरेजमधे ठेऊन अभिषेकही आला.

“बापरे,  केवढे मोठं आहे रे तुझे हे घर!”

“अग इथे बहुतेक सगळीच घरं तशी मोठी असतात. प्रत्येकाला मोकळेपणा स्वातंत्र्य आणि प्रायव्हसी हवी असते.”

“आई तुम्ही आधी जरा फ्रेश व्हा, विश्रांती घ्या , मग बघा सगळं घर. खूप वेळ आहे त्यासाठी.”

विश्रांती आणि चहा कॉफी झाल्यावर त्या सहजच  हुश्श करीत सोफ्यावर आडव्या झाल्या. प्रवासाचा शीण आणि जेट लॅगचा परिणाम यामुळे त्यांना केंव्हा झोप लागली ते कळलेच नाही.

अभिषेकचे घर खरंच खूप मोठं होतं. भारतातल्या चाळीतल्या दोन खोल्यांच्या मानाने तर तो एक राजवाडाच होता. खूप मोठा हॉल, ४ बेडरुम, प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र बाथरुम, दोन स्वयंपाकघरं... सगळं समजून घ्यायलाच वसुधाताईंना दोन दिवस लागले.  फिरुन फिरुन बघतांना पाय दुखून आले. पण त्याबरोबर मुलाच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटला, ऊर भरुन आला , धन्यता वाटली.

...

वसुधाताईंना अमेरिकेत येऊन आता जवळपास एक महिना उलटला होता. सजावटीच्या विविध वस्तू होत्याच पण खूपशी गॅजेटस होती ती त्यांनी आजवर पाहिलीच नव्हती. दरवाजावर कोण आलंय ते दाखविणारा कॅमेरा, तिथूनच संवाद वगैरे बघून त्याची सवय व्हायलाही वेळ लागला. वॉशिंग मशीन माहित असले तरी डिशवाशर मात्र कमी परिचयाचा. सर्वच गोष्टींचे रिमोट, भलामोठा टि.व्ही. किंबहुना संपूर्ण थिएटरचा अनुभव देणारा स्टुडिओ... एक ना दोन. सगळी बटणं लक्षात ठेवणं म्हणजे स्मरणशक्तीला ताणच होता. तरी बरं, आता भारतापासूनच त्यांना मोबाईल वापरायची सवय होती. बाथरुम मधले असंख्य नळ आणि त्यातून पाणी कसे येते , कुठुन येते, गार की गरम... न संपणा-या गोष्टी. सुमारे महिनाभरात त्यांनी सगळ्याची सवय करुन घेतली. त्याचवेळेस शर्मिलाची जवळ येणारी तारीख त्यांना काळजीत टाकत होती. त्यासाठीच आपल्या परीने स्वयंपाकघरातील सर्व वस्तूंचा वापर त्यांनी आत्मसात करुन घेतला.

....

पुढच्याच आठवड्यात तारीख होती. अर्थातच  मुलगा होणार हे अगोदरच माहिती झालेले असल्याने त्याच्या कपड्या खेळण्यांची आणि अन्य सोयीसुविधांची जय्यत तयारी झाली होती. झाली कसली, खरं तर ती संपतच नव्हती. आशुतोष हे नांवही ठरलेलेच होते.

एका गोड, गुटगुटीत बाळासह ठरलेल्या दिवशी शर्मिला घरी आली. त्या दोघांना कुठे ठेवू, कुठे नको, काय काय करु आणि कसे... वसुधाताईंची पूर्ण तारांबळ उडाली होती. छोट्यासाठी अभिषेकने आणलेल्या काही वस्तू हघून तर त्यांना गंमतच वाटली. डायपरपासून ते पोटावरच्या सॅकपर्यंत आणि पाण्याच्या बाटलीपासून ते कार्टून चित्रांच्या डिशपर्यंत, मायलेकरांची खोली भरुन गेली होती. त्याच्या शी-शू साठी आणलेली पोर्टेबल खुर्ची बघून तर त्यांना हसू आवरेना.

दोन तीन दिवस गेल्यानंतर वसुधाताईंनी आपल्या चाळीतल्या मैत्रिणींना फोन केला. अभिनंदन आणि धन्यवाद या दोनच शब्दांची देवाणघेवाण करतानाच त्या मनोमन खूप सुखावल्या होत्या. नंतर एका दिवशी तर सुमारे एक तासभर व्हिडीओ कॉल करुन त्यानी सर्वांना नातवाचे दर्शन घडवले.


“आई, आशु रडतोय,?”

प्रत्येक आवाजाला घाबरणारी शर्मिला.

“अग किती घाबरतेस,  डायपर बघ,   शी – शू  झाली असेल”

“पोटाला हात लाव,   खपाटीला गेलंय,  अग म्हणजे भूक लागली असेल”

“दूध तयार आहे का ?  कोमटच दे.”

“फ्रीजमधले दूध डायरेक्ट देऊ   नकोस”

...

...

“काय बाई ही  हल्लीची पोरं.. एक महिन्याचा झाला नाही तर नुसत्या आवाजाने टी व्ही कडे वळतोय”

“आई, मला भितीच वाटते बाई आंघोळ घालतांना,  तुम्हालाच कसं जमतं ते ? माझे हात काय टोचतात का रे ?”.. शर्मिला

“त्याचे कपडे कुठे आहेत, सगळ्या वस्तू वेळेवर सापडायला हव्यात. बाळाला वातावरणाची सवय होईपर्यंत थंडी  / वारा लागू द्यायचा नाही”  …वसुधाताई

सगळ्या गडबडगोंधळात आणि सर्व स्थिरस्थावर होण्यात जवळपास १५- २० दिवस गेले. आणखी दहाच दिवसात शर्मिलाची रजा संपून तिला ऑफिसला जायची वेळ झाली. आशुला सांभाळायला आणि अन्य छोट्या छोट्या कामांसाठी मग एक मदतनीस येणार होती.

“आई, तुम्हाला जमतंय का आता?  विशेषतः त्या बाईबरोबर?  ट्रेसीबरोबर?  हो तिचे उच्चार समजायला थोडा वेळ जाईलच. बेसिकली तुम्हा दोघींना एकमेकींची सवय होणं आणि एकमेकींना समजून घेणे हेच महत्वाचे आहे.”

“जमेल ग हळूहळू”

“कधी कधी गमती जमती घोटाळे होतात , पण होतेय सवय़ आता”

“अगं एक मात्र कर, तिला अंगभर कपडे घालायला सांग, मला नाही आवडत”

“बरं सांगते,” शर्मिलाचे हसतच उत्तर.  “ खरं आहे तुमचं, ... आपल्या भारतीय संस्कृतीत वाढलेल्या माणसांना ह्या गोष्टी पटत नाहीत, आणि जडच वाटतात.”

........

“आई, किती दमून जाता तुम्ही, ती ट्रेसी काही मदत करत नाही का”

“हे बघ आई,” मधेच अभिषेक, “इथले नियम थोडेसे वेगळे आहेत. पण तरीसुद्धा आपण आपल्या पद्धतीने त्यांच्याकडून काम करुन घेतलंच पाहिजे.”

“पटतंय रे पोरांनो, पण जराजरी आशुच्या रडण्याचा आवाज आला की माझा जीव तळमळतो. धावतेच मग..”

“ट्रेसीला पण खूप आवड आहे. मुलांची. पण तान्ह्या बाळाला सांभाळण्यात थोडी नवीनच आहे.”

.....
ऑफिसमधून दमून आलेली शर्मिला अभिषेकची जोडी  आणि दिवसभर नातवाच्या मागे धावणा-या वसुधाताई,,, मोकळा संवाद करायलाही वेळ मिळत नसे.

दिवस जात होते.

आशु आता जवळ जवळ साडे तीन चार महिन्याचा झाला होता. त्या गोजि-या बाळात वसुधाताई पूर्ण हरवून गेल्या होत्या. मधून मधून वेळ मिळाला की चाळीतल्या मैत्रिणींना फोन करण्यास मात्र  त्या विसरत नव्हत्या. कोणाच्या घरी काय चाललंय याची इत्थंभूत बातमी त्यांना मिळत होती आणि त्या गॉसिपमधेच एकमेकींची सुखदुःखेही कळत होती. अर्थातच वसुधाताईंच्या डायरीत त्यालाही महत्वाचे स्थान होते.

बाळाची खोली आता चारी बाजूंनी रंगीबेरंगी झाली होती. रंगविलेल्या खेळण्यांपासून ते खेळण्यानी कपड्यांनी भरलेली कपाटे.. बापरे , ते बघूनच त्यांचा जीव दडपून जायचा. फोटो तर किती होते त्याची गणतीच नाही. अक्षरशः जन्माला आल्यापासून ते आजपर्यंतच्या प्रत्येक क्षणाचे , मूडचे, वेगवेगळ्या वेषभूषेचे असंख्य फोटो. मोबाईलची मेमरी आणि प्रिंट केलेले फोटो यातूनच  त्या कलाकलाने वाढणा-या बाळाचे आणि तिन्ही मोठ्या माणसांचे दिवस जलदगतीने पुढे सरकत होते.

वीकेन्डला सुट्टी असली की तिघांच्या गप्पा रंगत. अशातच एकदा अभिषेकला अचानक आठवण झाली.

“अग आई, तुझा व्हिसा कधीपर्यंत आहे?”

“लक्षात नाही रे, बघू कधी वेळ झाला की”

“अग तसं नाही. संपला असेल तर तुला इथे रहाता येणार नाही. मी बघतो जरा प्रयत्न करून , एक्स्टेन्शन मिळण्यासाठी.”

“अरे पण सहा महिने झाले असतील तर दिवस वाढवून मिळण्याची शक्यता कमीच आहे..” शर्मिला.

“तेही खरंच”

“थांब , लगेचच बघतो” म्हणत अभिषेक उठला.... “बापरे, दोनच आठवडे राहिलेत.”

“शर्मिलाची आई किंवा कोणी मावशी असती तर बोलावून घेता आले असते.”

“माझं तसं येऊ शकेल असं कोणीच नाही”... शर्मिलाच्या डोळ्यात पाणी.

“ठीक आहे, मी पहातो.” ... वातावरण गंभीर झाल्याचे पाहून अभिषेकने आवरते घेतले.

शेवटी व्हिसा वाढवून मिळाला नाहीच आणि परतीच्या प्रवासाची तयारी सुरु झाली.

पेपर्स , पासपोर्ट, तिकिटे.. सामानाची बांधाबांध यातच दोन आठवडे गेले आणि एका दिवशी वसुधाताई कारमधे बसून विमानतळाकडे निघाल्या.

पुन्हा पुन्हा मागे वळून  बघतच भारावल्यासारख्या , भिजलेल्या आसवांनी सिक्युरिटी चेकला जात त्यांनी निरोप घेतला.  काळजी, दुःख आणि प्रेमाचे अश्रू मागे सारतच अभिषेक – शर्मिलाने हात उंचावून निरोप दिला, पण त्यापूर्वी पुन्हा एकदा लवकरात लवकर परत येण्याचे वचनही आईकडून घ्यायला ते विसरले नाहीत.

पुन्हा एकदो तो दीर्घ पल्ल्याचा प्रवास. एकटीला तर तो कंटाळवाणाच. एकीकडे मुलगा , सून , नातू यांच्या सहवासात घालविलेल्या जवळपास सहा महिन्यातील आठवणी आणि दुसरीकडे पुन्हा एकदा आपल्या स्वतःच्या , हक्काच्या घरी जाऊन सर्व नातेवाईक, मैत्रिणांना भेटण्याची उत्सुकता.

विचाराच्या तंद्रीतच त्यांना डुलकी लागली. मधून मधून येणा-या हवाईसुंदरी, त्यांनी आणलेले पदार्थ वगैरे.  थोडेसे सरावल्यामुळे त्यांना काही वाटले नाही. बेचव पदार्थांपेक्षा बरेचदा फळांचा रस घेऊन वेळ मारुन नेली.

प्रवासाची दगदग अवेळी आणि , अपूर्ण झोप, जबरदस्ती घडलेला उपवास, यांनी त्या पूर्ण थकून  गेल्या.  विमान उतरतांना झालेल्या खडखडाटाने त्यांना जाग आली आणि त्या छोट्याशा खिडकीतून परिचयाचे दृष्य बघतांना त्या सुखावल्या,  थकवा निघून गेला.

सामानाची ओढ, सिक्युरिटी वगैरे सर्व सोपस्कार पार पाडत त्या बाहेर आल्या आणि त्यांना एक सुखद धक्काच बसला. साठ्यांचा विकास एका मित्राला बरोबर घेऊन त्यांच्या स्वागतासाठी हजर !!!

मग विमानतळ ते चाळीपर्यंतचा प्रवास केंव्हा संपला ते कळलेच नाही. रात्रीची वेळ असूनही सर्व मैत्रिणी चक्क वाट पहात गॅलरीत उभ्या होत्या.  सर्वांच्या चेह-यावरील निरागस आनंद, उत्साह आणि आपुलकीचे स्मित बघून  त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले नसते तर नवलच !!!

पुढचा जवळपास एक महिना आवराआवर करण्यातच गेला.  दिवसभर वेगवेगळी कामे आणि रात्री जिन्याजवळच्या सार्वजनिक गॅलरीत गप्पांचा अड्डा, असाच दिनक्रम चालू होता. कधी तिकडच्या स्वच्छतेचे , ट्रॅफिक शिस्तीचे वर्णन तर कधी संपूर्ण स्वकेंद्री , स्वतःच्या जगतात हरवलेली कृत्रिम हसणारी  , बोलणारी खडूस माणसे. तिथल्या सुबत्तेचे वर्णन आणि बरोबरच पैशासाठी धावणारी, जिवाचे रान करणारी माणसे.... सर्वांचा उद्देश एकच.. अधिकाधिक सुख, सुबत्ता.  मग त्यासाठी कष्टही आणि कर्जबाजारीपणाही.

कधी कधी तर त्या चक्क पोरांच्या गराड्यात बसून त्यांना तिकडच्या विविध गंमती जमती सांगण्यत रंगून जायच्या आणि नेहमी प्रचंड बडबड करणारी, कल्ला करणारी ती अवखळ पोरं आ वासून अचंब्याने ऐकत रहायची. रंगून जायची इतकी की त्यांचे आईबाप पोरांना दोन दोन तास गप्प बसविल्याबद्दल मनोमन वसुधाताईंना धन्यवाद द्यायचे.

...

दिवस जात होते. अमेरिकेतल्या आठवणी तर रोजच्याच. त्यात रोजचे व्हिडिओ काल्स. त्याचही आता सवय झाली. आशु आता मोठा होत होता. त्याच्या विविध बाललीला पहातांना वेळ कसा जायचा ते कळत नव्हते.

तिकडे ट्रेसीही आता तशी स्थिरावली .  वसुधाताई गेल्यावर तिलाही एकटेपणा जाणवला. पण नोकरी असल्यामुळे ते सहन करणे भाग होते.. आशुबरोबर वेळ जात होता. नाही म्हणता शर्मिला आणि अभिषेकची धावपळ मात्र वाढली होती. अचूक वेळ पाळणा-या ट्रेसीमुळे दोघांनाही वेळेची कसरत सांभाळावी लागत होती. शिवाय ओव्हरटाईम काम करुन कमाई वाढविण्याचीही सोय नव्हती. हळूहळू वसुधाताईंना परत बोलावण्याचा विचार सुरु झाला. त्याच त्.ची होणारी तारांबळ कमी करु शकत होत्या.

जवळपास वर्षाचा होत आलेला आशु आता घरभर फिरु लागला होता. त्याच्या विविध हरकती आणि कारनामे यांनी हैराण होणारी ट्रेसी कशीबशी संध्याकाळपर्यंत तग धरायची आणि त्यावेळेला दमून आलेल्या शर्मिलाला तो झेपावणारा आशुही जड व्हायचा. त्याने दिवसभर घातलेला गोंधळ निस्तरतांना तिची दमछाक बोऊ लागली.

“आई, तुम्ही या आता इकडे,”

“आशु फार आठवण काढतो आहे. ट्रेसीलाही दमवतो , खेळणी , पसारा तर विचारुच  नका.”  शर्मिला.

“तू आलीस तर आम्हांला जरा विश्राती मिळू शकेल, शारिरीक आमि मानसिकही.” अभिषेक

“थोडा वेळ द्या रे मला, इते अजून थोडी कामे आहेत. घराला रंग लावायचा आहे, थोडे फर्निचरही नवीन करायला हवे आहे. चाळीचीही दुरुस्ती चालू आहे... एक  ना दोन.” “शिवाय  बरेच दिवस ऑपरेट न केल्याने एक दोन बॅंकांची खाती लॉक झाली आहेत. गुंतवणुक, पेन्शन वगैरे सर्व अकौंटस् नीट करायचे आहेत. बघते, थोडी मोकळी झाले की सांगते. अरे, मला तरी तुमच्याशिवाय कुठे चैन पडते आहे”....वसुधाताई

“पण एक मात्र खरं... आपली चाळीतली जिव्हाळ्याची माणसंच खरी. तिकडचा औपचारिकपणा, कृत्रिमपणा मला नाही आवडत...”

“कुठे आता त्या जुन्या चाळीत रहातेस...  इथल्यासारखे ते घर मोठे, ऐसपैस थोडेच आहे... शिवाय वेगवेगळ्या मशिन्स, सोई तिथे नाहीत. प्रवासाचा त्रास नाही की पाणी टंचाई नाही, विजेचा लपंडाव नाही... काही नाही.. तू कशी एकटी रहातेस तेच कळत नाही.”  अभिषेक

“त्या प्रचंड गर्दीत तर माझा जीव गुदमरतो.” शर्मिला

“खरे आहे. पण ती गर्दी माणसांची असते . रोबोट नसतात. आनंद, दुःख, राग लोभ, प्रेम आणि विश्वासघातही,,, सगळे कसं त्या गर्दीत मिसळलेलं असतं. ते अनुभवावच लागतं...”

“हो आणि तू तर इथेच लहानाचा मोठा झालास. आता तिकडचं ऐश्वर्य बघून, मोहात पडून आपल्या जन्मभूमीला नावं ठेवू नकोस.”

“आपल्या चाळीत सर्वांची घरे २४ तास सताड उघडी असतात. एकमेकांकडे जायला, भेटायला फोन करुन अपॉईंटमेंट घ्यावी लागत नाही. सगळेजण दिवाळी होळी यांसारखे सण एकत्र आनंदाने साजरा करतात. दुःखाच्या प्रसंगी, संकटकाळी कोणाला मुद्दाम हाक मारावी लागत नाही. हसतात, मिसळतात, रागावतात, भांडतात, मदत करतात.. सगळं कसं मनापासून..तिथल्यासारखी कृत्रिमता, संकोच अजिबात नाही. मला तर इथेच रहायला आवडतं”....वसुधाताई..

एकीकडे चाळीतल्या वातावरणात रमलेल्या आणि मनमोकळ्या माणसांच्या सहवासाची आवड असलेल्या वसुधाताईंचे मन तिकडे मुलगा ,  सून नातू यांना होणा-या त्रासाने कळवळत होते. शेवटी आवडत नसूनही त्या पुन्हा तिकडे जाण्यास तयार झाल्या.

अक्षरशः पडत्या फळाच्या आज्ञेप्रमाणे अभिषेकने ताबडतोब तिच्यासाठी अवघ्या ८ दिवसात तिकीटापासून सर्व जय्यत तयारी केली. न जाणो काहीतरी व्हायचे आणि आईचा विचार बदलायचा.

 विमानतळावर स्वागतासाठी तर तिघंही अत्यानंदाने हजर. दिसताक्षणी आजीकडे झेपावलेल्या आशुला बघतानाच दोघा नवरा बायकोनी एकमेकांकडे एक सुखाचा कटाक्ष टाकला. चेह-यावरची “हुश्श”ची भावना लपवता येत नव्हती. अर्थात अनुभवी वसुधाताईंच्या नजरेतून ती गोष्ट सुटली नव्हती.

“आले रे मी बाळांनो”

“अग अजून आशु एकटाच आहे..” अभिषेक

“आणि एवढ्या लवकर आम्ही त्याच्यासाठी भावंड आणण्याचा विचारही करत नाही आहोत”... शर्मिला

“अरे, माझ्यासाठी तुम्ही तिघंही बाळंच आहात”

अशा सुखसंवादात घर कधी आले ते कळलेच नाही.

“Hi Aaji, Welcome back”..,ट्रेसीच्या प्रेमळ  स्वागताने त्या सुखावल्या आणि घट्ट मिठी मारुनच त्यांनी तिला प्रतिसाद दिला. थोड्याशा गोंधळलेल्या ट्रेसीने Oh, Oh, करतच स्वतःला सोडवून घेत बॅगा उचलल्या.

...

जेट लॅगचे दोन तीन दिवस गेल्यावर आणि दिवस रात्रीचा मेळ झाल्यावर वसुधाताईंनी कंबर कसली.

“किती रे हा पसारा”   म्हणतच त्यांनी धडाक्याने आवराआवरीस सुरवात केली. इतस्ततः पसरलेले कपडे, खेळणी वगैरे जागच्याजागी लावतांना त्यांची पुरती दमछाक झाली. ट्रेसीने थोडीफार मदत केली पण एकंदरीत त्यांनाच सर्व निस्तरावे लागले.

“आई खरं आहे, पण काय करणार, वेळच नाही मिळत. ऑफिसमधे जास्त काम पडतंय . दमून आल्यावर तर कसलीच एनर्जी नसते. कसेबसे दोन घास गिळून अंथरुणावर पडतो.”

“अरे पण आठवड्याली दोन दिवस सुट्टी असते ना  तेंव्हा करायचे सर्व.”

“शनिवार रविवार कुठतरी जायचे झाले की बस् काहीच करता येत नाही.”

“हे बघ आपले घर हे आपणच नीट ठेवायचे असते. कितीही नोकर चाकर ठेवलेस तरी त्यात आपलेपणा नसतो. घरातील वस्तूंवर आपला हात फिरला तरच त्या नीट रहातात.”

“आई पटतंय हो, पण एकतर वेळ मिळत नाही आणि दुसरं म्हणजे लग्नाआधी मला स्वयंपाकघरात फार जावेच लागत नसे. त्यामुळे सवयही नाही, मग तो पसारा वाढतच जातो. आता तुम्ही आला आहात त्यामुळे बरे वाटते आहे. तुमच्याकडून सर्व शिकून घ्यायचे आहे.”

“हे बघा, माझ्या बरोबरीने घरातली कामे केलीत तर शिकाल, नुसते बघत राहून नाही. लक्षात ठेवा, सायकल चालविण्यासाठी त्यावर बसून प्रॅक्टीस करावी लागते. दोन तीनदा धडपडल्यावर आपोआप तोल सावरता येतो.”

“किंवा , पोहायला शिकण्यासाठी पाण्यात उतरावे लागते, पुस्तक वाचून ते येत नाही. नाकातोंडात पाणी गेलं की आपोआप हातपाय हलू लागतात.”

“आई आता मी लहान नाही. तू आपली पूर्वीसारखी लेक्चर द्यायला लागलीस. होईल आम्हालाही सवय... जमेल हळूहळू”... अभिषेक.

“आई एक मात्र नक्की, मी कितीही शिकले आणि मेहनत केली तरी तुमच्या हाताची चव काही जमणार नाही.”  शर्मिला.

“बरं बरं , उगाच मला हरभ-याच्या झाडावर चढवू नकोस. आधी अंग मोडून , पदर खोचून कामाला लाग.”

“अग आई, पण ती साडी नेसतेच कुठे, पदर बांधायला”

“विनोद म्हणून ठीक आहे, पण माझे बोलणे मात्र मनावर घेतलेत तर बरे होईल.”

सगळ्या गोष्टी सडेतोड आणि परखड बोलणा-या वसुधाताईंनी त्यांना वास्तवाची जाणीव करुन दिली होती हेच खरं.

 वसुधाताईंची डायरी आता  पुढे चालू झाली  होती. काही चांगल्या गोष्टी तर काही खटकणा-या. रात्री झोपतांना संपूर्ण दिवसातल्या घडामोडी, झालेले सुखसंवाद किंवा कटू वादविवाद, आशुच्या बाललीला आणि ट्रेसीचे केलेले निरीक्षण….सर्वच गोष्टींनी (अगदी बारकाव्यासहीत) डायरीची पाने भरत होती. एक बरे होते, ट्रेसीला मराठी वाचता येत नव्हते आणि आशु फारच लहान. बाकी अभिषेक आणि शर्मिलापासून ती डायरी लपवून ठेवण्याची पुरेपूर काळजी त्या घेत होत्या.

 सर्व प्रकारची कामे करतानाच आपणही राहिलेल्या इतर गोष्टी शिकून घ्याव्या असे त्यांना वाटू लागले. पण गुरू कोणाला करायचे?  बाकी जनरल उपकरणांची सवय झाली असली तरी संगणक, मोबाईल वगैरे त्या फक्त कामापुरताच वापरु शकत होत्या. Whatsapp, Youtube वगैरे शिकण्यासाठी त्यांनी मग ट्रेसीलाच गुरू केले. तिनेही उत्साहाने त्यांना सर्व शिकवले, अगदी प्रात्यक्षिकासह. त्याच्या बदल्यात तिने रुचकर , खमंग भारतीय पदार्थांची रेसिपी  वसुधाताईंकडून शिकून घेतली. त्यासाठी वसुधाताईंनी मुद्दाम विविध प्रकारचे मसाले, पिठे वगैरे गोष्टी मागवून घेतल्या.  त्यासाठी त्यांनी शर्मिलाला थोडा मस्काही लावला.

“बघ, तुलाही चांगले थालिपीठ, डोसा यासारखे पदार्थ, डिंकाचे , बेसनाचे लाडू खायला मिळतील.मग तुला एवढे तर करायलाच हवे.” या गोड blackmailing मुळे शर्मिलाला त्यांचा हट्ट पुरवावावच लागला.

“मलाही शिकव ग सगळं प्रोसिजर, म्हणजे तुला त्रास नाही होणार. आधीच तुमची केवढी धावपळ , त्यात माझे हे असले उद्योग आणि मागण्या. एकदा मला ते पॅकिंग, कुरीअरचे ऑफिस वगैरे माहित झाले की बरं.”

“आई, पण पैसे  .. तुमचा तर बॅंक अकौंटही नाही??”

“मग पेमेंट तू किंवा अभि करा, बाकी सर्व मी करीन.”

“खरं सांगू, सध्या कामाचे लोड इतकं वाढलं आहे की श्वास घ्यालाही फुरसत नसते.”

“म्हणूनच म्हणते, छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्हा दोघांना त्रास नको. थोडी जरुरी पुरती कॅश माझ्याकडे दे आणि मला बॅंकेची, Credit card, debit card ची प्रोसिजर सेट करुन दे.”

त्यांचा हट्ट पाहून थोडेसे अविश्वासानेच तिने त्यांच्याकडे पाहिले व काही न बोलताच ती ऑफिसला निघून गेली. पण अभिषेकबरोबर फोनवर बोलूनच तिने निर्णय घेतला. एका शनिवारी तिने आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता केली. पटले नसले तरी नाईलाजाने , नाखुशीनेच ती तयार झाली होती. अर्थात नेहमीप्रमाणे चाणाक्ष वसुधाताईंनी तो ओळखले. चेह-यावरची नाखुशी ती लपवू शकली नाही. तिच्या आवाजाचा बदललेला टोनही त्यांनी चांगलाच जाणवला.  पण स्वावलंबनाचे व्रत लहानपणापासून अंगात रुजवलेल्या , भिनवलेल्या वसुधाताईंनी त्याकडे दुर्लक्ष केले. डायरीत मात्र त्याची रीतसर नोंद झाली.

अचानक खेळत असलेला आशु घरात शिरता शिरताच जोरदार शिंकला आणि चार पावलातच धाडकन तिथेच कोसळला. दचकलेल्या वसुधाताईंनी धाव घेतलीच, पण ट्रेसीलाही हाक  मारली. तापाने फणफणलेला आशु ... चटका बसण्याएवढे अंग तापलेले..  १०४-१०५ च्या जवळ गेला असावा.

वसुधाताईंच्या अनुभवी नजरेने परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. ट्रेसीच्या सहाय्याने त्यांनी प्रथम आशुला त्या थंडगार कार्पेटवरुन उचलून बेडवर ठेवले. जाडजूड ब्लॅंकेट त्याच्या अंगावर टाकून त्यांनी ट्रेसीला बर्फ आणि मीठ आणायला पिटाळले. गोंधळलेली असली तरी ती अत्यंत जलदगतीने कामे करत होती. साधी चिंधीही जेव्हा एवढ्या मोठ्या घरात सापडेना... तेंव्हा फारसा विचार न करता दोघींनी आपापले रुमाल काढून त्याच्या घड्या मिठाच्या पाण्यात बुडवून आलटून पालटून आशुच्या कपाळावर ठेवायला सुरवात केली.  त्याचवेळी त्यांनी ट्रेसीकडे डॉक्टर साठी चौकशी केली. पण अपॉईंटमेंट लगेच मिळणार नव्हती. इमर्जन्सी केस म्हणून जायचे तर गाडी हवी, ड्रायव्हर हवा. ... क्षणभर गोंधळून गेल्या, पण लगेचच सावरत त्यांनी अभि व शर्मिलाला फोन केला.

“ मी लगेच येतो, पण तू धीर धर, घाबरु नकोस, डॉक्टरनाही कळवतो. बघूया काय करता येईल ते.”

“आई,  काय झाले हो असे अचानक?”

“ हे बघ मला बोलायला वेळ नाही आणि कारण शोधत बसायचं नाहीये. प्रथम आशु बरा होऊ दे, मग बघू. तुम्ही दोघं डॉक्टर , औषधे वगैरेची व्यवस्था करा. मी आणि ट्रेसी आहोतच.”

वसुधा ताईंनी मग घरातले कोलन वॉटर शोधले आणि त्याच्या घड्या ठेवायला सुरवात केली. आशुचे कण्हणे कमी होऊन तो आता शांत गुंगीत पडून होता. दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर भरपूर घाम आला. ताप उतरल्याचीच लक्षणे होती ती. पदरानेच तो पुसत वसुधाताईंनी एक सुस्कारा सोडला. तोपर्यंत अभि आणि शर्मिला आले. जवळच्याच भारतीय डाक्टरांची Appointment मिळाल्याने त्यांना हायसे वाटले. मग अर्थातच गाडीतून सर्वांची वरात दवाखान्याकडे निघाली.

 उशीर झाला असल्याने जाता जाताच त्यांनी ट्रेसीला तिच्या घरी सोडले.

सुमारे अर्ध्या तासाच्या अगदी सखोल तपासणीनंतर गोखले डॉक्टर बोलते झाले.

“ताप व्हायरल इन्फेक्शनचाच वाटतो आहे. पण सावधगिरी म्हणून  आपण Blood / Urine test करुयात. तोपर्यंत फक्त ताप उतरण्यापुरतीच औषधे मी देत आहे. अशक्तपणा आहे, पण काळजीचे कारण नाही.”

“तरीही अजून एक गोष्ट मला विचारायची आहे. इतका वाढलेला ताप तुम्ही घरात नसतांना कमी कसा झाला ? खरं तर ही फार धोकादायक परिस्थिती होती.”

उत्तरादाखल दोघांनी फक्त बाहेर बसलेल्या वसुधाताईंकडे बोट दाखवले.

“अरे वा, ही भारतवासी, अनुभवी आजी होती, मग त्यांनीच हे सर्व निभावलेले दिसते आहे. त्यांचा अनुभवच आज आपल्या कामी आला आणि एक मोठे संकट टळले आहे.”

“आजी खरोखर , तुम्हाला धन्यवाद, मनापासून आभार” म्हणत डॉक्टरांनी हात जोडले.

त्यानंतर सुमारे पंधरा दिवसांचा काळ गेला. आशु खडखडीत बरा झाला आणि सर्वांच्याच मनावरचा ताण नाहीसा झाला.

सर्व गोष्टींकडे बारीक सारीक लक्ष देणा-या वसुधाताईंना मात्र काही गोष्टी खटकल्या. डॉक्टरच्या चिठीशिवाय साधी क्रोसिनची गोळीही न देणारा औषधविक्रेता.... वारंवार विनंती करुनही  पेशंट बघितल्या शिवाय  अगदी Temporary / emergency औषध न सांगणारा डॉक्टर, त्यानंतरही औषधे online न देणारी दुकाने... एक ना दोन.... ज्या गोष्टी भारतात सहज करता येतात, जिथे procedure पेक्षाही माणसाच्या जिवाला अधिक महत्व दिले जाते, तो आपला मायदेशच बरा... असेच त्यांचे मत झाले आणि ते त्यांनी तसे बोलूनही दाखवले.

….

या सर्व गोंधळात दिवस भराभर जातच होते. आणि दर वेळेला संपलेला व्हिसा वसुधाताईंना भारतात परत पाठवत होता.  त्रास होत असला तरी पोरांच्या प्रेमाखातर त्या सर्व सहन करत होत्या. किंवा दुर्लक्ष करत होत्या आणि वेळेला , हाकेला,  धावून जात होत्या. पण तरीही वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याचा आनंद होताच. दिवसभर एकत्र असल्यामुळे ट्रेसीची मैत्री घट्ट होत चालली होती. आपापली सुखदुःखे दोघी शेअर करत होत्या. 

दोन तीन अमेरिका वा-या झाल्यावर वसुधाताई कंटाळल्या होत्या . अभि आणि शर्मिलाला भारतात येण्यासाठी त्या आग्रह करु लागल्या. वारंवार नकारघंटाच होती. कसे जमणार नाही याची छप्पन कारणे सांगत दोघंही विषय टाळतच होती.  शेवटी त्यांनी नाद सोडला. नुसते काही दिवस रजा घेऊन यायलाही ती तयार नव्हती, मग कायमचं परतणं तर अशक्यच..

...


वारंवार होणारी दगदग आणि दूरचा प्रवास, वसुधाताईंची तब्बेत थोडी बिघडतच चालली होती. पण आशुकडे बघत त्याची काळजी करत त्या तसेच दिवस काढत होत्या. शेवटी व्हायचे तेच झाले. त्या स्वतःच अंथरुणाला खिळल्या. सर्दी खोकल्याने बेजार होऊन त्यांना काम करणे, फिरणे मुष्किल होऊ लागले. वातावरणातील बदल  आणि सहन न होणा-या थंडीमुळे त्यांची अगदी केविलवाणी अवस्था झाली.

“Sir, please do something for your mother. She is really not well and badly needs medication, bed rest.  “

कळवळा आलेल्या ट्रेसीनेच शेवटी अभिषेकला फोन करुन सांगितले.

“Ok, Ok, we will see in evening. Right now I am in an important meeting”

“Pl forgive me Sir, but right now your mother’s health is more important. You should give priority to that.”

“Tracy, don’t teach me what is more important. Mind your work, do not cross your limits /  boundary.” असे म्हणून त्याने धाडकन फोन ठेवून दिला. थोड्याशा nervous झालेल्या ट्रेसीने मग शर्मिलाला फोन केला. पण तिथेही फारसा चांगला किंवा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. रडतच ती वसुधाताईंच्या बेडकडे गेली.  तिचा चेहरा आणि डोळे बघूनच त्यांनी फोनवर काय झाले असेल याचा अंदाज बांधला.

“Leave it my Friend. It happens. This is how the world behaves. Don’t be sorry.”  आपल्याला जमेल तेवढ्या पण मोजक्याच शब्दात त्यांनी तिचे सांत्वन केले. जाण्यापूर्वी एकदा त्यांची बॅग जवळ आणून ठेवायला  सांगून त्यांनी तिला निरोप दिला.

हळूवारपणे , शांतपणे उठून मग त्यांनी बॅग उघडली. काही घरगुती आयुर्वेदिक औषधे त्यांनी येताना बरोबर आणली होती. खोकला सिरप, Inhaler, तसेच काही चूर्ण वगैरे. एकेक शोधून त्यांनी योग्य उपाय योजना  स्वतःच सुरु केली. थोडे बरे वाटल्यावर त्या पुन्हा पहुडल्या.

....

“आजी, उठ”

“आई, उठा”

पडल्या पडल्या डुलकी लागलेल्या वसुधाताई आशु आणि शर्मिलाच्या हाकांनी जागा झाल्या.

“केंव्हा आलीस ?” क्षीण आवाजात त्यानी विचारले.

“थोडा वेळ झाला. हा आशु बाजूलाच बसलाय. घाबरलाय तुम्ही उठला नाही म्हणून.”

“आई, अहो, आधी नाही का फोन करायचा?  आजारपण एवढे कशाला वाढू दिलेत?  आम्हालाही काळजी वाटते मग”

“काही नाही ग, जराशी सर्दी आणि थोडी कणकण आहे. होईन मी बरी लवकरच. अभि आला का ?”

“नाही , त्याला दोन तीन तास लागणार आहेत. म्हणून मी लवकर आले.”

मी जरा फ्रेश होऊन येते असे म्हणून ती गेली. मग अभि, ट्रेसी सर्वांनी फोन करुन तिने परिस्थिती सांगितली.

“आई, अहो, डॉक्टरांचा फोन लागत नाहीये. तुमच्याकडे काही घरगुती औषधे आहेत ना, तीच तात्पुरती घ्या, मग उद्या बघू.”

बोलत बोलत ती निघूनही गेली. पण तिच्या बोलण्यातला परकेपणा , वरवर दाखवलेली काळजी, कपाळाला पडलेल्या आठ्या आणि एकंदरच निष्काळजीपणा, बेपर्वाई वसुधाताईंच्या नजरेतून सुटली नाही. विचाराच्या तंद्रीतच त्यांना पुन्हा एकदा डुलकी लागली.

आशु आणि वसुधाताई... दोघांच्या आजारपणात जवळपास दोन अडीच महिने गेले.  आजारपणामुळे हळव्या  झालेल्या वसुधाताई मग भारतात परतण्याचा विचार करु लागल्या. अभि आणि शर्मिलाकडे त्यांनी त्यासाठी तगादाच लावला. प्रतिसाद तसा थंडच होता.

……..

“अग आई, आत्ता तर तुला येऊन कुठे ३ महिनेच होत आहेत”

“पण आता मला इथे करमत नाही रे. आपल्या चाळक-यांची  , मैत्रिणींची फार आठवण येते आहे. इथे तर काय बोलायला माणसेच नाहीत. तसं म्हटलं तर ट्रेसी आहे, तिची मदतही खूप आहे, पण गप्पा मात्र फार नाही होऊ शकत.”

“पण तिथे तू एकटीच. परत आजारी पडलीस तर कोण बघणार?” बोलता बोलताच अभिने शर्मिलाकडे पाहिले. त्याच्या नजरेत काही तरी वेगळाच अर्थ असल्याचे त्यांना जाणवले.

“चालेल रे, तिथले शेजारी मला काही कमी पडू देणार नाहीत, कसलाही त्रास होऊ देणार नाहीत”

“काय तुला त्या एवढ्याशा घराचे प्रेम आहे कळत नाही. इथे सर्व गोष्टी हाताशी / फोनशी आणि नेटवर उपलब्ध असतांना बाकी कशाची गरजच नाही.”

“अगदी कंटाळा आला तरी गाणी , सिनेमे , सिरीअल्स सर्व अगदी हाताशी असणा-या बटणात आहे. शिवाय आशुही आहेच. मग तुला कसा काय कंटाळा येतो”

“अरे, ह्या सगळ्या निर्जीव गोष्टींचाच कंटाळा आला आहे. वेगवेगळ्या स्वभावांची प्रेमळ  जिवंत माणसेच बरी. अगदी वादविवाद झाले तरी त्यात एक प्रकारचा जिवंतपणा असतो. भांडणं झाली तरी दोन दिवसात दिलजमाई होऊन पुन्हा एकदा हसत खेळत प्रसन्न चेह-याने भेटी होतात. महत्वाचं म्हणजे संकटकाळी सारं काही विसरुन , स्वतःच्या सुखदुःखाची पर्वा न करता निर्व्याज मनाने धावणारी माणसं. ती आजूबाजूला असली म्हणजे अगदी सुरक्षित वाटते.”

“इथे काय तुम्ही दोघे दिवसभर बाहेर, आशु थोडा वेळ का होईना पण पाळणाघरात. अशा दिवशी ट्रेसी आली नसेल तर तर माझे एकटीचे कसे निभावणार?  तुम्ही दोघे सकाळी गेलात की रात्रीपर्यंत येत नाही. कधी कधी तर फारच उशीर होतो. माझे काही बरे वाईट झाले तर?”

“आई, नका असे बोलू. नाही ऐकवत.” इतका वेळ गप्प बसलेली शर्मिला पुढे झाली.

“कितीही झालं तरी आम्हांला तुमच्याशिवाय कोणाचा आधार?  व्हिसा संपल्यावर तुम्ही जातांना अक्षरशः ब्रह्मांड आठवतं आणि पुढचे सहा महिने कसे काढायचे हीच विवंचना असते. एक एक दिवस मोजत असतो आम्ही.” बोलता बोलता तिचे डोळे पाणावले.

“आई अग माणसं कमी हे मान्य, पण बाकी कसलाच त्रास नाही इथे. थोडे पैसे खर्च केले की सर्व काही मिळतं.”

अभि त्याच्या परीने समजूत घालायचा प्रयत्न करीत होता. पण पैशाकडे त्याचा वाढत चाललेला ओढा त्यांनी चाणाक्षपणे ओळखला.

“तू काही म्हणालास तरी एक गोष्ट मात्र नक्की. पैशाने सर्व गोष्टी मिळतील, पण प्रेम करणारी, आपुलकी असणारी माणसे मात्र विकत घेता येणार नाहीत.”  वसुधाताईंनी त्याला लगेच फटकारले.

थोडा वेळ असेच काहीसे संवाद झाल्यावर तिघेही झोपायला गेली. पण एकंदरीतच होऊ घातलेल्या परिस्थितीचा विचार जरा वेगळ्या दिशेने करायला हवा होता.

दुस-या दिवशी शनिवार. सुट्टीचा दिवस. ब्रेकफास्टसाठी टेबलापाशी जमल्यावर शर्मिलानेच हळूच विषय काढला.

“आई असं कराना, तुम्ही आता कायमच्याच इकडे रहायला या ना, ही सारखी जा जा – ये ये तुम्हालाही त्रासाचीच नाही का?”.. शर्मिला

“हो आणि त्या चाळीतल्या छोट्या जागेला काय एवढा जीव लावून बसली आहेस?”..   अभिषेक.

“मलाही असंच वाटतं. तू आता कायमचंच स्थलांतर करावस. आपल्या सर्वांच्याच दृष्टीने ते सोईचं.”

“ती जागाही विकून टाकू. जे काही पैसे येतील ते तुझेच... तुझ्याकडेच ठेव. आम्हांला त्यात काहीच अपेक्षा नाही. “

“सर्वांची सोय”  हा शब्दप्रयोग मात्र वसुधाताईंना खटकला. अतिशय तल्लख बुद्धी असलेल्या वसुधाताईंनी त्या वरवर सरळ आणि प्रेमळ संवादातल्या खाचाखोचा ओळखल्या.

“नाही रे, कठीण वाटते.” ... पण बघू विचार करून.  असे म्हणत त्यांनी चहाचा कप तोंडाला लावला. दोघात झालेली नेत्रपल्लवी मात्र त्यांनी अचूक टिपली होती.....

................ डायरीची पाने भरतच होती.

पुन्हा एकदा व्हिसाची मुदत  संपली. वसुधाताईंची परतीची वेळ झाली. सुट्टी घ्यायला लागू नये म्हणून अभिषेकने मुद्दामच शनिवारचे तिकिट काढले. विमानतळापर्यंतच्या प्रवासात पुन्हा एकदा “कायमच अमेरिका” या विषयावर चर्चा झाली.

“बघते, विचार करते.”

“अग तू विचार कर , पण इथे कायमचं येण्याचाच. बाकी कसं आणि काय वगैरे सर्व व्यवस्था आम्ही करुच.” अभि

“आई, खरंच. तिथे भारतात आता काहीच राहिले नाही. शिवाय सगळी कामे स्वतःलाच करावी लागतील. इथे तुमच्या जोडीला ट्रेसी आहे आणि लहान मुलांची खूप आवड आहे असे तुम्हीच म्हणता, मग आशुपासून दूर रहावेसे कसे वाटते तुम्हाला?”  शर्मिला.

“ इथेही तशी सगळी कामे स्वतःलाच करावी लागतात की ग, फक्त इथे मशिन्स जास्त आहेत म्हणून थोडे सोपे जाते इतकेच. आणि उद्या आशु मोठा झाला की थोडीच तो मला विचारणार आहे. जाईल मित्र मैत्रिणींबरोबर.” शर्मिलाचे ईमोशनल ब्लॅकमेल ओळखून वसुधाताईंनी तिला निरुत्तर केले. पण एकंदरीतच तिच्या बोलण्यातल्या खाचाखोचा लक्षात आलेल्या वसुधाताईंनी मग पुन्हा एकदा चाळ, प्रेमळ माणसे, निर्व्याज मनाने सहज मिळणारी मदत, वगैरेचा पाढा वाचला आणि जवळपास आपला निश्चय ऐकवला.

नेहमीप्रमाणे चाळीतल्या आपल्या घरी पोचल्यावर त्यांना जरा बरे वाटले. यावेळेस त्या मनाशी काहीतरी ठरवूनच आल्या होत्या. दोन तीन दिवसांनी जेट लॅग जाऊन आराम झाल्यावर त्यांनी एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला व कामाला सुरवात केली,

सर्वप्रथम बॅंकेत , पोस्ट  ऑफिसमधे जाऊन त्यांनी आपल्या आर्थिक स्थितीचा हिशोब मांडला. एकूण त्यांचे पेन्शन, फिक्स डिपॅझिट वगैरे बघता त्यांना महिना ५०-६० हजाराचे उत्पन्न व्याज, डिव्हीडंड स्वरुपात मिळणार होते. म्हणजेच  आर्थिक चिंता नक्कीच नव्हती. खर्चाच्या दृष्टीने विचार करता जुन्या घराचे भाडे कमीच होते.,  वीज बिल,  गॅस वगैरेचा खर्चही फार नव्हता. त्यामुळेच बचतीची काही रक्कम त्यांनी घराला नवीन रंग, फर्निचर करण्यासाठी वापरली. सुरक्षिततेच्या दृष्टीने दागिने, मौल्यवान वस्तूंसाठी बॅंकेत एक लॉकर घेतला. दर महिन्याच्या उत्पन्नातून औषधासाठीही थोडी पैशाची तजवीज करुन ठेवली. थोडक्यात सांगायचे झाले तर संपूर्ण आर्थिक नियोजन करुन त्या निर्धास्त झाल्या.

 चाळीतल्या मैत्रिणी आणि त्यांची सुखदुःखे कोणाची मुले तर तर कोणाची चक्क नातवंडेही. , सगळीच त्यांना आपलीशी वाटायची.  मग काय, गप्पाच गप्पा. कधी एखाद्या लग्नात, मंगळागौरीत तर कधी चक्क पापड करण्यावेळी, रंगलेल्या गप्पांना तोड नव्हती. शिवाय संध्याकाळी बाळगोपाळांना जमवून कधी इसापनिती तर तर कधी अमेरिका--- गोष्टींचे भांडारच त्यांनी उघडले होते.

या सर्वात रमलेल्या वसुधाताईंना मग परत अभिषेक कडे जावेसेच वाटेना. लवकर येण्याचा तगादा लावलेल्या अभि शर्मिला जोडीला त्या विविध कारणे सांगू लागल्या. अगदी बारशापासून ते निधनापर्यंत सगळीकडे वावरल्यामुळे त्यांना वेळच मिळत नव्हता. पण शेवटी अभिषेकने शेवटचे अस्त्र वापरले. धाय मोकलून रडणा-या आणि आजी आजी टाहो फोडणा-या आशुला पाहून त्यांचा निश्चय ढासळला.

२०-२२ तासाच्या परिचित झालेल्या प्रवासानंतर वसुधाताई अमेरिकेत विमानतळावर उतरल्या. सामानाची तपासणी, इमिग्रेशन, पासपोर्ट व्हिसाची तपासणी  वगैरे सोपस्कार झाल्यावर त्या एक्झिट गेटकडे ट्राली ढकलत आल्या. पण त्यांना ओळखीचे कोणी दिसेना. अभिषेकच्या घराचा पत्ता माहीत असला तरी टॅक्सी मिळवणे काही त्यांना जमेना. हताश होऊन मदतीसाठी तिथल्या एका पोलिसाकडे जातानाच त्यांना ट्रेसीचा परिचित आवाज आणि आशुची जोरदार हाक ऐकू आली.  धावत येऊनच दोघांनी त्यांना मिठी मारली.

“हे काय आज तुम्ही दोघं?”

“What to do madam, both of them are busy in office work. They just told me to get you at the eleventh hour. I simply had no time, picked up this boy and got here as fast as I could. I hope you are fine.” धापा टाकत एका दमातच ट्रेसीने सर्व सांगून टाकले. थोडी स्थिरता आल्यावर मग त्या तिघांची वरात घराकडे निघाली.

वाटेत ट्रेसी आणि आशुची अखंड बडबड चालू होती. ट्रेसीची तक्रार.... “Madam, This fellow is getting smarter by the day”

“Why  what did he do?”

“He talks in Marathi whenever he doesn’t want me to understand”

“Ok Ok . Don’t worry. I will teach  you Marathi in spare time..” वसुधाताई हसतच म्हणाल्या. बरेच सुखसंवाद करतच मंडळी घरी पोचली.

२-३ दिवसाचा जेट लॅग गेल्यावर त्या पुन्हा रुळल्या. आता इथले रुटीन थोडे बदलले होते. आशुच्या शाळेची वेळ खूप वाढली होती. त्यामुळे तो जवळ जवळ ५-६ तास घरीच नसायचा. शाळेत जातानाची गडबड , आल्यावर त्याचे कपडे, खानपान व्यवस्था सगळे करता करता त्या थकायच्या.  ट्रेसीच्या मदतीशिवाय ही सर्व कामे करणे त्यांना शक्यच नव्हते. पण त्याचवेळेस दोघींना मोकळा वेळही मिळू लागला. मग ट्रेसीचा मराठीचा क्लास सुरु झाला. इंग्रजी आणि मराठी भाषेतील गमती जमती आणि चर्चा असा खेळ रंगू लागला. त्याबदल्यात ट्रेसीने त्यांना computer / Internet / E-mail वगैरे शिकवायला सुरुवात केली. एकंदरीत दोघीही खूष..

“मला आता इथल्या ब-याच गोष्टी येतात रे अभि.. पण एक गोष्ट राहिली आहे. त्याचे काय करायचे कळत नाही.” ... वसुधाताई

“अग आई, काय problem आहे ?   अशी कोड्यात बोलू नकोस”

“थोडा कंटाळा येतो आता एकटीला.. कधी कधी कुठे बाग म्हणा , चौपाटी म्हणा जावेसे वाटते किंवा अगदी काहीच नाही तर निदान बाहेर पडून एखाद्या मॉल मधे फिरुन येता आले तर  बरे वाटेल, तेवढाच जरा विरंगुळा होईल. बाहेरचे जग बघता  येईल , ओळखी होतील. नुसते घरातल्या घरात म्हणजे तुरुंगात असल्यासारखे वाटते.”

“एवढेच ना, मग जा की.”

“अरे पण पैसे?”

“आई, मी तुला थोडी कॅश देतो. शिवाय एक क्रेडिट कार्ड काढून देतो, मग सोपे होईल... problem solved.”. अभिषेक.

“अरे पण त्यांना कार्ड वापरायची माहिती हवी ना,  शिवाय हरवले तर गोंधळच”.. शर्मिला.... कपाळाला आठ्या..

“आपण एक upper limit असलेले कार्ड काढू. म्हणजे कोणी फसवायचा प्रश्न नाही ,  धोकाही कमी. फक्त त्यासाठी एक बॅंक अकौंट काढावा लागेल...... शर्मिलाची नाराजी आणि कपाळावरच्या आठ्या वाढतच होत्या. तरीही हो ना करता करता त्यांच्यासाठी एक क्रेडिट कार्ड व बॅंक अकौंट सुरु करायचे ठरले.

सुमारे २५ – ३० दिवसांचे ट्रेनिंग, प्रयत्न आणि ट्रेसीची मदच यांच्या एकत्रित परिणामाने वसुधाताई सर्व व्यवहार शिकल्या. मॉल मधे जाऊन खरेदी करु लागल्या. एक दोनदा घोटाळेही झाले, पण विशेष तोटा झाला नाही.

एकंदरीत सर्व गोष्टी वसुधाताईंच्या प्लॅनिंगप्रमाणे चालू होत्या. एक दिवस मग सुटीच्या दिवशी ब्रेकफास्ट टेबलावर त्यांनी विषय काढला.

“अरे अभि माझे Driving licence भारतीय आहे. ते इथे चालणार नाही का?”

“नाही. इथले नियम थोडे वेगळे आहेत. Left hand Driving, speed limits , different specific lanes, symbols वगैरे सगळंच शिकावं लागेल.”

“किती दिवस लागतील”

“त्यासाठी driving school मधे जाऊनच शिकावं लागेल. प्रॅक्टिस करावी लागेल. मग टेस्ट आणि ती पास झाल्यावर लायसन्स. त्यानंतरही तुला कोणालातरी बरोबर घेऊन स्वतःसाठी सराव करावा लागेल. रस्ते बघत नकाशावरुन गाडी चालविण्यासाठी.”

“त्यावेळी ट्रेसीला नेता येईल की”

“अग पण तुला कुठे जायचे आहे  मॉल मधून फोन करुनही वस्तू मागवता येतील.”

“फक्त त्यासाठी नाही रे.  मॉल मधे  Window shopping ची मजाही अनुभवता येईल. आणि ते करत करतच एखादी आवश्यक किंवा विसरलेली वस्तू समोर दिसल्यास फायदाच होईल”

“आई, पण तुम्हाला हा सर्व उद्योग कशासाठी ? आम्ही आहोतच ना सर्व व्यवस्था करायला.”

“नाही गं. काम , विरंगुळा  सोय वगैरे सर्वच दृष्टींनी मला त्याची गरज वाटते आहे.” थोडे थांबून त्यानी सूर बदलला.

“हो, पण तुम्हाला नको असेल तर राहू दे. मी बसेन अशीच सोफ्यावर”. थोड्याशा रागावत, नाराजी न लपवता त्यांनी बोलणे थांबवले.

“ठीक आहे, बघतो आणि विचार करुन काय  ते सांगतो.”

थोडे दिवस मग अबोला, रुसवे फुगवे झाल्यावर एकदाचा अभिषेक तयार झाला. आनंदित झालेल्या वसुधाताईंनी वेळ न घालवता, पडत्या फळाची आज्ञा मानून Driving school मधे नांव नोंदविले.

.....

झालेल्या सर्व घटनांचा आणि त्यातील संभाषणाचा परिणाम थोडा वेगळाच झाला.घरात जवळ जवळ दोन तट पडले होते. वसुधाताई, आशु आणि ट्रेसी एकीकडे  तर दुसरा गट अर्थातच अभिषेक आणि शर्मिला.  दोघंही कमीजास्त प्रमाणात नाराजच. आजीबरोबर काही दिवसांसाठी का असेना , आशु खूष, थोडे श्रम वाचतील , भटकंती होईल म्हणून ट्रेसी खूष आणि वसुधाताई तर काय.... आपला प्लॅन successful  होतोय म्हणून खूष.

... विरुद्ध गटात मात्र... “एवढं सगळं सुख असूनसुद्धा यांना नको ते उद्योग सुचतायत.....जायचाय कुठे Driving   शिकून..”

“अग पण आपला थोडा फायदा आहेच. कधी ट्रेसी आली नाही तर ती आशुला शाळेतून आणेल... थोडं घरचं सामान आणायला मॉल मधेही जाईल... तिला घर कामाची हौस आहेच”

“पण त्यासाठी स्वतः जायची काय गरज आहे फोन करुन online पैसे दिले की  free delivery मिळतेच की.. तू काही म्हण पण मला नाही पटत”... शर्मिलाची टकळी चालूच . “उद्या गाडीला कुठे अपघात झाला तर   मग यांचे आजारपण, गाडीचा दुरुस्ती खर्च. विमा कंपनीच्या चकरा,  legal problems… हे सर्व अवास्तव किंवा अनावश्यकच नाही का?”

“हे बघ फायदे तोटे वगैरे चा सारासार विचार किंवा योग्य अयोग्य , अनावश्यक यांचा विचार करावाच लागेल. आत्ता तिला शिकू दे, मग बघू.”

पंधरा दिवसात असे नाराजी आणि रागाने भरलेले संवाद वसुधाताईंच्या कानावर पडत होते. पण त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करुन त्यांनी आपला क्लास चालू ठेवला, नंतर टेस्ट दिली आणि लायसन्स पदरात पाडून घेतले.

Driving School मध्येच शिकवणारा शेखर नावाचा एक मराठी मुलगा त्याना भेटला, ओळख झाली आणि मग काय... अभिच्या मागे लागून त्यांनी घरच्या गाडीवर प्रॅक्टीस करण्यासाठी शेखरची प्रायव्हेट ट्यूशन चालू केली....

....

....

“अभि हे जरा जास्तच होतंय.. यांचे उद्योग व नखरे वाढतच चालले आहेत, ते आपल्याला परवडणार नाहीत. खर्चाचे प्रमाणही उंचावले आहे.  हे कुठेतरी थांबलेच पाहिजे.”. शर्मिलाचा त्रागा, चीड वैताग दिवसागणिक वाढतच होता.

“तू याला खर्च म्हणतेस, पण मी ही गुंतवणूक समजतो. अभिषेक..”

“गुंतवणूक”

“अग हे सगळं करतानाच ती हळूहळू स्थिरावली, इथली झाली की आपले काम सोपे. आपोआपच ती इथे कायमची रहायला तयार होईल. त्यासाठीच  हा खर्च किंवा गुंतवणूक”

“हे नव्हतं माझ्या डोक्यात आलं”.. शर्मिला  तेच बोलणं पुढे करत म्हणाली, “अरे पण असे किती वर्ष “

“हे बघ, आशु अजून लहान आहे. तो मोठा झाला, सक्षम झाला , स्वतःची सर्व कामे independently करु लागला की झाले. मग  आपल्याला ट्रेसीची गरज लागणारच नाही.”

“आणि मग आईंचे काय...”

खरंतर काही संबंधच नव्हता.. पण दरवाजा जवळून जाता जाता वसुधाताई  काहीतरी खाली पडलेली वस्तू शोधत होत्या.  दाराआडून अर्धवट ऐकू येत असूनही शेवटचे वाक्य ऐकून त्या हादरल्या व पटकन स्वतःच्या खोलीकडे निघाल्या.  त्याचवेळी त्यांची चाहूल लागल्याने दोघांनी बोलणे गुंडाळले, आणि आवरुन  Good Night केले.

थोडे दिवस गेले. वातावरण एकंदरीत तणावाचेच. पण सर्वजण आपापल्या कामात व्यग्र राहून पुढे दिवस ढकलत होते. वसुधाताई मात्र खूष होत्या. शेखर बरोबरची ड्रायव्हिंग प्रॅक्टिस जोरदार चालू होती. आत्मविश्वास वाढत  होता. हळूहळू त्या कोणत्याही सूचनेशिवाय सर्व गोष्टी करु लागल्या. अगदी स्टार्ट करण्यापासून ते व्यवस्थित रिव्हर्स घेऊन पार्किंग  करण्यापर्यंत. सोबतीला शेखर आणि मागे बसलेली ट्रेसी, आशुची जोडी, एकंदरीत धमाल चालली होती.

तिकडे शर्मिलाचा त्रागा वाढतच होता. गाडीच्या पेट्रोलचा खर्च, शेखरची फी, मेंटेनन्स, सर्व खर्चच खर्च.  All Input and no output or benefit.,, at least for her… अभि पण फारसे मनावर घेत नव्हता. शेवटी एकदा तिने एकांतात विषय काढला आणि सर्व मळमळ ओकून टाकली.

“तू उगीच  चिडू नकोस, जरा शांतपणे विचार कर. आईला सर्व गोष्टी जमायला लागल्या की .... किंबहुना आता ती जवळपास व संपूर्णपणे मुक्त आणि independent होत आली आहे. काही दिवसातच शेखर आणि ट्रेसीला बाय बाय करु म्हणजे खर्चाचा एक मोठा भाग कमी होईल.”

“अरे पण त्या एकट्या आशुसकट सर्व घर कसे सांभाळतील?”

“ठीक आहे , अजून काही दिवस ट्रेसीला राहू दे, मग बघू.”

“नुसतं बघू नकोस, action घे. आणि कायमचे इथे येण्यासाठी त्यांच्या मागे लाग, लवकरात लवकर त्यांना राजी कर.”

“तुला खरं सांगतो, माझे प्रयत्न चालू आहेत, पण या जुन्या वळणाच्या माणसांचे मन  व  मत बदलणे फार कठीण असते. होईल ती तयार हळूहळू.”

“अरे एकदा त्या भारतातले पाश तोडून इथे आल्या की मग आपलेच राज्य. परतीचे मार्ग बंद झाल्यावर मुकाटपणे आपले ऐकून घेतील , ताब्यात रहातील.”

“तू काय माझ्या आईला गुलाम बनवायचा विचार करते आहेस काय?”   अभिषेक जरा भडकलाच.

“अरे तसे नाही. पण मग आपल्याला आपले पुढचे आयुष्य स्वतःच्या मनाने , पद्धतीने जगता य़ेईल. त्यांच्यासाठी एक छोटी खोली व आवश्यक ते सामान ठेवलं की आपली कामे मस्त होतील.”

“बरं बरं, बघू.”

“हो पण एक विसरु नकोस. आपण पुढे दोन तीन वर्षांनी , म्हणजे आशु मोठा झाल्यावर जे करणार आहोत त्याचा विसर पडू देऊ नकोस. हळूहळू का असेना ,आत्तापासूनच तयारी  ठेव. कालच माझ्या एका मैत्रिणीने सांगितले की हे सर्व म्हणजे permanent residency वगैरे करायला खूप प्रोसिजर आहे, एक ते दोन वर्ष लागू शकतात.”

“आधी   permanent residency आणि मग old age home… त्यांचे सर्व पैसे त्यासाठी वापरु, उरले तर आपलेच..”

“होय  गं आहे माझ्या लक्षात... झोप आता..”

... आणि त्याचवेळी घोटाळा झाला होता. काहीतरी सांगायचे म्हणून अभिने वसुधाताईंचा फोन फिरवला होता. त्यांनी तो उचललाही, पण मधेच येऊन शर्मिलाने बडबड सुरु केल्याने तो तसाच चालू राहिला.... आणि सर्व संभाषण वसुधाताईंना अगदी स्पष्ट ऐकू आले.

...

त्या रात्री वसुधाताईंना अक्षरशः झोप लागली नाही. पैशाच्या मागे लागलेली ही  पुढची पिढी इतक्या थराला जाईल असे त्यंना स्वप्नातही वाटले नव्हते.  काबाडकष्ट करुन लाडाकोडात वाढवलेला अभिषेक इतका कसा बदलला ? सुनेचे , तिच्या शिक्षणाचे स्मार्टनेसचे त्यांना खूप कौतुक होते. पण ते सगळे गुण आपल्यावर असे उलटतील याची त्यांना कशी कल्पना येणार ? विचार करुन त्यांचे डोके भणभणून गेले. आढ्याकडे बघत डोळ्यांतील अश्रू आवरणे आणि झोपेची आराधना..... आजपर्यंतच्या सर्व घटनांचा एक चित्रपटच त्यांच्या डोळ्यासमोरुन जात होता. .. त्यात मधून मधून लोभसवाणा आशु डोकावत होता. स्वतःच्या आईलाही वा-यावर सोडायला निघालेली ही मंडळी त्या अजाण बालकाची काय काळजी करणार ? त्याच्यावर कोणते संस्कार करणार ? आणि उद्या मोठा झाल्यावर तो त्यांना कसे वागवेल ? ...  त्याला माझी ओढ आहे पण दूर गेल्यावर माझी आठवण होईल का ? शर्मिलाने तिच्या आईवडिलांना असेच वागविले असते का ?

एक ना दोन .. असंख्य भिरभिरुन टाकणारे विचार, प्रश्न. कोण देणार त्यांची उत्तरं ... मध्येच त्यांना डुलकीही लागली.. पण जाग येताक्षणी मात्र ती विचाराची, अनुत्तरीत प्रश्नांची शृंखला पुन्हा घोंघावू लागली.   ... काय करावे.?.. कसे.?.. केंव्हा ?  ...

सकाळी आशुच्या होकेनेच त्यांना जाग आली. जागरणाने जरा थकवाही आला होता.. उठायला थोडा उशीरच झाला होता. पटापट आवरुन त्यांनी आशुची तयारी केली आणि शाळेच्या बसची वाट पहात त्याला घेऊन त्या गेटपर्यंत गेल्या.

“What happened aaji ? you are not looking Ok.. any problem ?   आत येता येताच ट्रेसीचा प्रश्न.

“oh, Nothing”.. “ काही नाही गं.. तिची नजर चुकवत त्यांनी गुळमुळीत उत्तर दिले.”

“पण तुमचे डोळे?”   “झोप लागली नाही का?  any body said anything to you,,, I think I can guess.”   ती इंग्रजी आणि मोडक्या तोडक्या मराठीत बोलत होती.

“काही नाही, थोडा थकवा गं. रात्री वाचन करता करता बराच वेळ झाला, झोपायलाही उशीर झाला... त्यामुळेच डोळेही थोडे लाल झाले आहेत इतकंच. मी जरा फ्रेश होऊन येते” असे म्हणून त्या  बाथरुमकडे केल्या. अधिक चौकशी न करता ट्रेसीही आपल्या रोजच्या कामात गढून गेली.  

थोडे फ्रेश झाल्यावर त्यांनी बाहेर येऊन नाश्ता केला. ट्रेसीही त्यांच्या समोर बसली. काहीतरी  नक्की बिनसले आहे, किंवा प्रकरण फार गंभीर आहे, सिरीयस असावे याची जाणीव होऊन तिने शांत रहाण्याचा मार्ग पत्करला..

नाश्ता झाल्यावर त्या आपल्या खोलीत गेल्या. त्यांचा एक विचार, निर्णय पक्का झाला होता. एक चौपेर नजर दृष्टीक्षेप टाकून त्यांनी व्यलस्थित आवराआवरीस सुरवात केली. अगदी बॅगांवरची धूळ झटकण्यापासून ते सर्व कपडे, आवश्यक वस्तू, औषधे वगैरेंचे नीट वर्गीकरण केले. सर्व कागदपत्रे तपासली आणि त्यांच्या validity ची खात्री केली. सर्वात महत्वाचे म्हणजे बॅंकेतील शिल्लक आणि क्रेडिट कार्डची मर्यादा नीट तपासून घेतली. एक प्रकारचा करारीपणा आता त्यांच्या चेह-यावर दिसत होता.  ट्रेसी मात्र काही न बोलता त्यांच्या मनस्थितीचा आणि काय घडले असावे याचा मनोमन अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत होती..  

वसुधाताईंच्या शांत वागण्याने ट्रेसी थोडा भांबावलीच होती, अस्वस्थ झाली होती.  गरजेनुसार संभाषण किंवा मदतीचा हात. ह्या बदलाचे कारण काही केल्या तिच्या लक्षात येईना. हळूहळू कळेल असा विचार करुन ती गप्प राहिली. आजीचा गंभीर चेहरा त्या निरागस  आशुलाही उमगत नव्हता.  अभि आणि शर्मिलाची गाठ मात्र रात्री उशीरा , फार थोड्या वेळापुरतीच  होत असल्याने त्यांना फारसे काही जाणवले नाही.

 घरामध्ये वावरतानाच त्यांना खूप वाईट वाटत होते. इतक्या वर्षात तिथला प्रत्येक कोपरा त्यांच्या परिचयाचा , ओळखीचा झाला होता. एक दिवस अशीच आवरा आवरी करताना एका दुर्लक्षित कोप-यात त्यांना एक envelope सापडले. बहुतेक ऑफिसला जायच्या घाईत अभिच्या हातून ते पडले असावे. कुतुहल, औत्सुक्यापोटी त्या उघड्याच असलेल्या envelope   मधली कागदपत्रे बाहेर काढली. सहजच वाचता वाचता त्यांना धक्काच भसला, आणि त्या मटकन खाही बसल्या. त्याचवेळेस आपला निर्णय योग्य होता याचीही जाणीव झाली. त्यादिवशी फोनवरुन चुकुन ऐकलेल्या संभाषणाची आठवण झाली.  Permanent residency पासून ते old age home पर्यंतचे सर्व forms असलेले ते   envelope म्हणजे त्या दोघांच्या हेतूचा आणि कारस्थानाचा सबळ पुरावाच होता.

ट्रेसीच्या ट्रेनिंगमधे  तयार झालेल्या वसुधाताईंनी मग सर्व तयारी केली,.. अगदी विमानाच्या तिकिटापर्यंत... भारतात परतायचे   आणि तेही कायमचे.. हा आपला निश्चय त्या पूर्णपणे तडीस नेणार होत्या.

मायदेशी परतण्याचा निश्चय केलेल्या वसुधाताईंची बहुतेक सर्व तयारी झाली होती. पण कुणालाही पत्ता लागू नदेता कसे निघून जायचे हा प्रश्न पडला होता. अतिशय थंड डोक्याने आपली रोजची कामे करत असतांना त्या सुटकेचा मार्ग शोधत होत्या. त्यांचा स्वभाव माहित असल्याने ट्रेसीनेही त्यांना फार प्रश्न सिचारले नाहीत. तरीसुद्धा तिला सारखे काहीतरी खटकत होते.  खोदून खोदून , आडमार्गाने विचारुनही तिच्या हाताला फारसे काही लागले नाही. अभि आणि शर्मिला तर त्यांच्या कामात इतकी व्यस्त होती की काही वेगळेपणा जाणवायची वेळच आली नाही. ...

...

“आजी आता खूप मजा येणार आहे.”

“कसली रे?”

“अग आमच्या शाळेची सहल जाणार आहे. ती सुद्धा तीन दिवस. वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी, खेळ, प्रवास.”.. आशु बोलतच होता.

घरी येऊन बूट काढायच्या आतच उत्साहाने सळसळलेल्या आशुने आजीला बातमी दिली.   पसारा आवरतानाच एक सँडविच करुन त्याला दिले. पण त्याचवेळी विचाराच्या तंद्रीतच त्यांना एक युक्ती सुचली. इतके दिवस त्या ज्या संधीची वाट पहात होत्या ती आपोआपच चालून आली होती. अगदी सहजगत्या त्यांचा प्लॅन पक्का झाला.

आशुची सहल... मग २-३ दिवस ट्रेसीलाही सुट्टी... अभि , शर्मिला तर दिवसभर बाहेरच. काम अगदी सोपे झाले होते. दुस-याच दिवशी आशु शाळेत गेल्यावर त्यांनी सर्व कागदपत्रे पुन्हा तपासली, बॅगा चेक करुन सेट केल्याआणि नेहमीप्रमाणेच कामात गढून गेल्या. मात्र तरीही वेळात  वेळ काढून त्यांनी एअरलाईन्समधे चौकशी, तिकिटाची किंमत online पैसे भरणे  इत्यादी सोपस्कार पार पाडले. पुढचे दहा दिवस त्या अगदी मनमोकळेपणाने वावरत होत्या, हसत, खेळत होत्या. आशुची होऊ घातलेली ताटातूटही त्यांना अस्वस्थ करीत होती. त्यांच्या या अचानक आनंदी चेह-याकडे पाहून ट्रेसी मात्र बुचकळ्यात पडली होती.

सर्व तयारी झाल्यावर त्यांनी अभिषेक व शर्मिला यांना उद्देशून एक चिठ्ठी लिहीली. आपण निघून गेल्यावर खोलीतल्या कपाटात , पण सहज मिळेल अशा जागी ती ठेवून त्यांनी एक दीर्घ सुस्कारा सोडला.  

………..

………

अभि आणि शर्मिला,

ही चिठी तुमच्या हातात पडेल तेंव्हा तुम्हाला काय वाटेल ते माहित नाही. पण मी मात्र परतीच्या वाटेवर भारतात जाणा-या  विमानात बसलेली असेन. आश्चर्य, राग, धक्का पगैरे सर्व विचारांची गर्दी डोक्यात होत असतानाच भविष्याचे चित्रही अंधुकसे डोळ्यासमोर येईल. पुढे वाढून ठेवलेल्या अडचणींची आणि धावपळीची थोडी कल्पनाही येईल आणि हे सगळं आईमुळे होतंय अशी रागाची भावनाही मनात येईल.... पण...पण... असा विचार करा ना की या परिस्थितीला जबाबदार कोण ?  उत्तरही अगदी स्पष्ट आहे.... अर्थात तुम्हीच दोघं…

आपल्या आईला / सासूला गरजेप्रमाणे वागवायचे, हवे तेंव्हा गोड बोलून कामे करुन घ्यायची अन्यथा फटकारायचे, ही शर्मिलाची वृत्ती मी ओळखली आहे. आणि बायकोच्या मनाप्रमाणे,   मग ते अयोग्य असले तरी,  न वागण्याचे किंवा तिला विरोध करण्याचे धाडस न दाखवता, अभि,, तू तिलाच साथ दिलीस. गेली ७-८ वर्षे मी इथे येत असतांना प्रत्येक वेळेस तिच्या वागणुकीत होत गेलेला बदल मी पाहिला आहे.  भंगारात जाणा-या जुन्या वस्तूप्रमाणे मला वृद्धाश्रमात टाकण्याचा विचार तुमच्या डोक्यात येऊ शकतो याचेच आश्चर्य आणि खंत वाटते. पोटची मुलेही अशी वागावीत यासारखे दुसरे दुःख नाही. नव-याच्या आईला गुलाम बनवू पहाणा-या शर्मिलाला माझा एकच प्रश्न आहे..

“तू तुझ्या आईला असेच वागवले असतेस का?”

असो. आता फार लांबण लावत नाही आणि तुमची राग - चिंता मिश्रीत उत्सुकताही ताणत नाही. माझा हा निर्णय अचानकपणे घेतलेला नाही. शर्मिलाचे बदलते वागणे, भारतातली जागा विकण्याचा अट्टाहास आणि त्यायोगे मला इथे अडकवून टाकण्याची तिची योजना.... वर शेवटी वृद्धाश्रम... माझ्या सुदैवाने आणि तुमच्या दुर्दैवाने म्हणा हवं तर.. पण या सर्वाचा मला सुगावा लागला. काही दिवसापूर्वी तुम्ही दोघं हे  सर्व बोलत असतांना अभिने काहीतरी वेगळ्याच कारणासाठी मला केलेला फोन तसाच चालू राहिला आणि तुमचा प्लॅन , विचार मला समजले. त्यातच भर म्हणून permanent residency बरोबरच वृद्धाश्रमाचे आणून ठेवलेले forms ही माझ्या नजरेस पडले.

शांत चित्ताने, भरपून विचार करुन मी निर्णय घेतला आणि कुणालाही न सांगता, अगदी ट्रेसीलाही.. परत जाण्याची योजना आखली. एक मात्र खरे. शर्मिलाचा विरोध असूनही तू मला सर्व काही उपलब्ध केलेस. अगदी computer, internet, credit card या सर्वांचा वापर करतानाच driving चाही आनंद लुटला. त्याबद्दल धन्यवाद.  आणि खरं तर यामुळेच मी कुणाच्याही मदतीशिवाय माझ्या सुटकेची,  ( हो सुटकाच ती... नाही का गं शर्मिला?” ) योजना आखली. आज ती य़शस्वी होत आहे.

आशु रडेल, टाहो फोडेल. पण माझा नाईलाज आहे.  आमच्या ताटातुटीला जबाबदार असणा-या तुम्हीच त्याचा विचार करायला हवा.

एकमेकांशिवाय पुढचे आयुष्य , दिवस कसे जातील माहित नाही. पण म्हणतात ना, काळ हेच सर्व दुःखांवर औषध आहे आणि तोच आधार आहे.

ट्रेसीलाही धक्काच बसणार आहे. खूप चांगली आहे, लाघवी आहे आणि समजूतदारही आहे. कारण समजल्यावर माझ्या या निर्णयाचे ती स्वागतच करेल. तिचा पुढील निर्णय काय असेल ते माहीत नाही. तो सर्वस्वी तिचाच असेल.

फार काही लिहीत नाही आता. आपापल्या विश्वात सुखी रहा, खुश रहा, आनंदी रहा हाच माझा आशिर्वाद. कधी काळी माझी आठवण झाल्यास, मला भेटावेसे वाटल्यास,  भारतात आपल्या घरी या. तुमचे तिथे स्वागतच आहे. माझे दार तुमच्यासाठी  ( मी देवाघरी जाईपर्यंत ) सदैव उघडेच राहील.....


                                                                                                तुझी आई /  तुझी सासू.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi story from Classics