प्रबोधनकार ठाकरे म्हणत की , नुसते शिवारायांचे नाव जरी उच्चारले तरी हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांची फलटण बाद होते. त्या शिवरायांचा जन्म दि. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यात झाला. निजामशाही मोगल साम्राज्याला सर्वात मोठे आव्हान देणारे छत्रपती शिवाजी महाराज .
महाराष्ट्र शासनाने इतिहास तज्ज्ञांची समिती नेमून १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित केल्यानंतरही, तथाकथित जास्त खपाच्या कँलेंडरवर १९ फेब्रुवारीच्या रकान्यात 'शिवजयंती, शासन निर्णयानुसार' असे लिहले जाते व फाल्गुन वद्य तृतीयेच्या दिवशी कालनिर्णय कँलेंडरवर 'शिवजयंती, तिथीनुसार व मान्यवरांच्या मतानुसार' असे लिहून कोणत्या मनोवृत्तीचे दर्शन घडवले जात आहे. आज कोणात्याही महापुरूषांची जयंती तिथीनूसार साजरी होत नाही परंतू लोक शिवजयंती तिथीनूसार साजरी करताना दिसतात ते आपल्या घरातील मुलांचा वाढदिवस तिथीनुसारच साजरा करतात का ?
छ. शिवरायांची किर्ती ऐकून १८६९ जेम्स डग्लस नावाचा इग्रंज पर्यटक शिवरायांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी रायगडावर आला. या संदर्भात प्रा. नामदेवराव जाधव लिहतात; "महाराजांचे दर्शन मिळावे म्हणून त्याने अनेक दिवश रायगडाच्या एका टोकापासून दुस-या टोकापर्यंत अनेक वेळा चकरा मारुन महाराजांची समाधी शोधण्याचा प्रयत्न केला. तरीही त्याच्या पदरी अपयश आले." तेव्हा त्याने खिन्न शिवरायांसारख्या युगप्रवर्तक महामानवाची समाधी सापडत नासल्याची शोकांतिका 'टाइम्स ऑफ इंडिया' या वर्तमानपत्रातून जगासमोर मांडली. हा लेख महात्मा जोतिराव फुलेंनी वाचला. त्यांना शिवरायांचा अपमान सहन झाला नाही. तेव्हा शिवजन्मोत्सव साजरा करावा म्हणून रायगडावरच्या समाधीचा शोध घेऊन त्यावर फुले वाहिली. महात्मा फुले यांनी सन १८६९ मध्ये शिवाजी महाराजांवर सुमारे एक हजार ओळींचा पोवाडा रचला व प्रसिध्द केला." याविषयी पुरूषोत्तम खेडेकर लिहतात; "छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक कामगिरीचा शोध आपल्या देशात प्रथम जोतिबांनी घेतला." तर प्रसिध्द लेखिका गेल आँम्वेट म्हणतात की, "शिवरायांकडे प्रथम लक्ष वेधण्याचे काम ब्राम्हणेत्तर पुढारी जोतिराव फुले या महान व्यक्तीने केले."
शिक्षणाचे आद्यजनक महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिवरायांना 'कुळवाडी भूषण' हा किताब दिला तर सावित्रीमाई फुले आपल्या 'काव्यफुले' मध्ये लिहतात; "छत्रपती शिवरायांचे प्रातःस्मरण करावे, शुद्रातीशुद्रांचा प्रभू वंदू मनोभावे." फुलेंनी शिवरायांना 'कुळवाडीभूषण' संबोधले तर सावित्रीमाईंनी 'शुद्रातीशुद्रांचा प्रभू' मानले. याशिवाय श्रीपाद अमृत डांगे म्हणतात, 'जनतेच्या ध्यासातील आदर्श राजा शिवाजीच्या रुपाने अवतरला.'
महाराष्ट्र शासनाच्या इतिहास तज्ज्ञ समितीने १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीची तारीख निश्चित केल्यानंतरही 'कालनिर्णय' कँलेन्डर चे संपादक जयंत साळगांवकर यांनी शिवजयंती तिथीनुसार साजरी करावी म्हणून मागणी केली व त्यासंदर्भात लेखन केले त्यावेळी त्यांना आजपर्यत शिवरायांविषयी विकृत लिखानारे ते पुरंदरे, मेंहदळे यांनी तिथीचे समर्थन करत साळगांवकर यांना पत्र दिले. शासनाच्या कमिटीत काम करणारे पुरंदरे यांनीच तिथीचा व तारखेचा वाद निर्माण करण्यास मदत केली. याविषयी
मराठ्याचे दासीपुत्र अर्थात पायपोस किंमतीचे पेशवे या पुस्तकात पा.नं. ०१ वर रामचंद्र नारायण लाड हे लिहतात की, "पेशवे आणि पेशवाई म्हणजे स्वराज्याचा प्राण घेणारी जोडगोळी ... मराठ्यांच्या उज्ज्वल इतिहासावर, इमानावर व इभ्रतीवर डांबर फासणारी ही सैतानी शक्ती !"
आमचे तरूण हा मनुवादी विकृतींनी केलेला शिवजयंतीचा घोळ समजून न घेता दोन वेळेस शिवजयंती साजरी होते यामध्येच खुष होऊन मनुवादी विकृतींचा डाव संपन्न करण्यास मदत करतात. मनुवाद्यांनी शिवजयंती तारखेनुसार व तिथीनूसार हा वाद निर्माण केला मात्र त्यापाठीमागचे त्यांचे षड्यंत्र समजून घेणे आवश्यक आहे. जर शिवजयंती तारखेप्रमाणे साजरी केली तर आपआपसातील सर्व वाद समाप्त होऊन संपुर्ण जगात व देशात मोठ्या प्रमाणात शिवजयंती साजरी होईल ही भिती मनुवाद्यांना आहे.
आज संसद, विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, सरकारी कार्यालयातील कार्यभार तारखेनुसार चालतो तर मग शिवजयंतीचा अट्टहास तिथीनुसार का ?
शिवजयंतीच्या तिथीचा आग्रह करणारे कालनिर्णय चे संपादक जयंत साळगांवकर हे त्यांचे कँलेन्डर जानेवारीमध्ये का विक्रीला आणतात त्यांनी पण त्यांचे काँलेंन्डर चैत्र महिन्यात बाजारात आणले पाहिजे. तसे न करता ते स्वतः मात्र तारखेप्रमाणे कार्य करतात अन् शिवजयंतीला तिथीचा आग्रह धरतात हा त्यांचा कपटीपणाच नाही का ?
देशातील कार्यभार तारखेप्रमाणे चालत असताना मनुवादी लोक तिथीचा आग्रह का धरतात. या देशात तिथीनूसार कोणतेच काम होत नाही अन् तिथीकडे कोणी पाहत नाही. तिथी कधी मार्च महिन्यात तर कधी एप्रिल महिन्यात येते. तिथीप्रमाणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा पण चालत नाही. मग शिवाजी महाराज तर विश्ववंदनीय युगपुरूष आहेत. ते तिथीच्या घोळात अडकवण्यासारखे नाहीत. म्हणजेच "तिथीचा आग्रह धरला तर पंचांग आले अन् पंचांग आले तर भटजी आला, भटजी आला तर भटजी ची रोजगार हमी योजना पक्की झाली."
शिवभक्तांचे शिवजयंतीत दोन गट पडतात 'तारखेनूसार अन् तिथीनूसार' त्यामुळे त्यांच्यात संघर्ष निर्माण होतो. छ. शिवाजी महाराज यांची दोन वेळा जयंती साजरी करायला लावून या मनुवाद्यांनी शिवरायांची चेष्टाच केली आहे.
साळगांवकर हे गुरूनानक, महावीर, बुद्ध, डाँ. आंबेडकर यांची जयंती तिथीनूसार साजरी करण्याची मागणी का करत नाहीत. कारण त्यांना माहित आहे या महापुरूषांना मानणारा समाज जागृत आहे म्हणून तिथे साळगांवकरांची हिम्मत होत नाही.
आमचे तरूण शिवजंयती ही तिथीनुसार साजरी करत असतील तर आता आमच्या तरुणांनी ही मनुवादी चाल ओळखली पाहिजे. याविषयी डाँ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज स्वतःच उज्वल भविष्य कधीच घडवू शकत नाही.
आज शिवराय व त्यांच्या इतिहासावर कोणी सत्य सांगत, लिहत असेल तर छातीवरती गोळ्या घातल्या जातात अन् खोटा व विकृत इतिहास तसेच शिवजयंतीचा वाद निर्माण करणाराला पुरस्कार दिले जातात. तरीही आमचा तरूण शांतच का ?
आता आमच्या तरुणांनी या मनुवादी तिथीच्या जोखडातून बाहेर निघून मनात एकच निश्चय केला पाहिजे की, "जगात भारी माझ्या राजाची जयंती १९ फेब्रुवारी"