kanchan chabukswar

Crime

4.0  

kanchan chabukswar

Crime

जळीतकांड आणि आम्ही...

जळीतकांड आणि आम्ही...

9 mins
372


मी केतकी इनामदार, डॉक्टर केशवची मुलगी, गांधी हत्येनंतर हिंदुस्तानमध्ये उसळलेल्या ब्राह्मणांच्या जळीतकांडामध्ये आमच्या कुटुंबाची काय स्थिती झाली याची कथा मी आज तुम्हाला सांगणार आहे. इनामदार कुटुंबाने सोसलेले, दुःख आणि यातना तुमच्यासमोर मांडत आहे.


किती तरी वर्षं झाली तरी पण माई आजी आणि पणजीने सांगितलेली त्या रात्रीची गोष्ट नजरेसमोरून जात नाही.


साताऱ्याजवळ असलेला इनामदारांचा प्रचंड वाडा दंगलखोरांनी कुऱ्हाडीने तोडला आणि मग पेटवून दिला. देश फाळणीच्या दुःखामध्ये होरपळत होता, आणि त्यात गांधी हत्येने भर पडली.

देशासाठी केलेले बलिदान, ब्राह्मण जातीचे उत्थापन, त्यांच्यावरती झालेला अन्याय. चाफेकर बंधू टिळक-आगरकर सावरकर असे अनेक ब्राह्मण कुटुंबांनी केलेले स्वतःचे बलिदान. देश पूर्णपणे विसरला.


पांढऱ्या कातडीचा मोह?

वंशपरंपरागत राहणारे गावकऱ्यांचे मित्र त्यांच्यासाठी मदतीचा हात देणारे ब्राह्मण कुटुंब एकटे पडले. सगळ्यांचे शत्रू झाले, सगळे त्यांचे शत्रू झाले?


नथुराम गोडसेने भारताच्या फाळणीला होकार देणाऱ्या गांधीजींची हत्या केली. आणि देशभर हिंसाचाराला परत एकदा सुरुवात झाली. आधी हिंदू-मुसलमान हिंसाचारामधून देश डोकं वर काढत नाही तर आता ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले. आधी ब्राह्मणांची संख्या कमी, त्यात वेचून वेचून ब्राह्मणांना लक्ष्य केले गेले. त्यांचे घर संपत्ती जाळून टाकण्यात आली. ब्राह्मण देशोधडीस लागले.


हेच का स्वातंत्र्य? हा प्रश्न त्यांना पडू लागला. पुण्या-मुंबईसह किंवा नागपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये ब्राह्मणांच्या वस्त्या होत्या, त्यांच्या एकजुटीमुळे त्यांच्यावर संकट जरी आले होते तरी यांची हानी कमीच झाली. पांढरपेशे लोक पळून जाऊन आपली आणि आपल्या कुटुंबाची रक्षा करत होते. पण सातारा कोल्हापूर कराड औरंगाबाद उस्मानाबाद नांदेड छोट्या शहरांमध्ये मात्र ब्राह्मणांना लक्ष्य केलं गेलं. गोब्राह्मणप्रतिपालक असलेले लोकदेखील ब्राह्मण लोकांचे संरक्षण करू शकले नाही. कुटुंबाच्या कुटुंब देशोधडीला लागली, घरदार जमीनजुमला सगळ्यावर पाणी सोडून जीव वाचवून परागंदा व्हावे लागले.


कालपर्यंतच्या विश्वासाच्या माणसांनी ब्राह्मण लोकांची घरं दंगलखोरांना दाखवली आणि त्याची हानी करण्यामध्ये आनंद लुटला.

आम्ही इनामदार, इनाम घेऊन शिवाजी महाराजांच्या काळापासून स्वराज्याची सेवाचाकरी करणारे. वाडवडिलांच्या कष्टाने दीडशे एकर जमीन आणि भलाथोरला वाडा असं साताऱ्याच्या परिसरात आपला दबदबा ठेवून होता. वाडा म्हणजे एक छोटेखानी काय एक गढीच जणू.


आमचे पणजोबा रावसाहेब, पणजी, माझे आजोबा आणि त्यांचे तीन भाऊ याबरोबर सुखाने इनामदारांच्या वाड्यामध्ये राहत होते. आजोबांना भाऊसाहेब म्हणून ओळखले जात. भाऊसाहेब दादासाहेब अण्णासाहेब रावसाहेब, अशी चार भाऊ त्यांच्या बायका आणि प्रत्येकाची मुले असे जवळजवळ 25 लोकांचे कुटुंब इनामदार यांच्या वाड्यात सुखाने राहत होतो.


माझी आजी आम्ही तिला माई म्हणून हाक मारत असू. गांधी हत्येच्या वर्षापासून आज इतकी वर्ष झाली पण तो काळा दिवस पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवला गेला आणि त्यादिवशी आमच्या घरामध्ये चूल पेटत नाही. इतक्या लोकांचा मृत्यू इतक्या लोकांचे बलिदान बाकीच्या कुटुंबाला सावरण्यासाठी दिलेली आहुती, हे आमचं कुटुंब अजूनही विसरलेले नाही.


इनामदारांचा वाडा भलाथोरला, घरामध्ये वीस एक तरी खोल्या होत्या, चार चौकी वाडा, प्रत्येक चौकामध्ये छोटे कारंजे, स्वयंपाक घराच्या बाजूला मुद्दाम तयार केलेले, पिण्याच्या पाण्याची विहीर, वाळवण घालण्यासाठी तयार केलेले उंचवटे, प्रत्येक चौकांमध्ये एक छोटा झोपाळा उंबराची तुळशीची झाडं. वाडा दोन मजली होता. पणजोबांची खोली खालच्या मजल्यावर होती

माझे आजोबा भाऊसाहेब इनामदारी बरोबर वकिली पण करत, दादासाहेब आणि अण्णासाहेब हे दोघे शेतीचा कारभार बघत, रावसाहेब, आमच्या पिठाच्या गिरण्या होत्या आणि कापड विणण्याचे माग होते, त्याच्यावर देखरेख ठेवून असत. सर्व सुना दागिन्यांनी मढलेल्या असत.


भाऊसाहेबांची पत्नी माई म्हणजे आमची आजी अतिशय करारी स्त्री, सुरेख गोरीपान पायामध्ये मोठाले जोडवे, सोन्याच्या साखळ्या, हातामध्ये पाटल्या, बांगड्या गळ्यामध्ये कायमच दोन पदरी चंद्रहार आणि गंठण केलेले मंगळसूत्र कपाळावर ठसठशीत रेखलेले लालभडक कुंकू कानामध्ये टपोऱ्या मोत्यांची कुडी नाकामध्ये हिऱ्याचे चमकी, इरकली नऊवारी लुगडे नेसून वाडाभर करारी नजरेने वावरत असे. भाऊसाहेबांच्या बरोबर हिशोब यामध्ये देखील भाग, चांगली शिकलेली होती. लिहिता वाचता येत होते. गणिताच्या बेरीज-वजाबाकी यात बरोबर समजत, असं व्यवहारिक ज्ञान पण येत होते त्याच्यामुळे पण आजोबांची तिच्यावरती खास माया.


दादासाहेबांची पत्नी रमाई, नाजूक-साजूक देखणी पण व्यवहार ज्ञान काही जमायचे नाही ही मात्र माईच्या मागे मागे राहत असे.

अण्णा साहेबांची पत्नी अक्का ही पण अतिशय देखणी तालेवार घराण्यातून आलेली इनामदार यांच्या घरामध्ये अतिशय शोभून दिसे.

धाकटे रावसाहेब यांचा अजून लग्न व्हायचं होतं.


त्या दिवशीची काळरात्र स्मरणातून कधीच जाणार नाही.

संक्रांतीचे दिवस असल्यामुळे मोठी आत्या लक्ष्मी तिचा संक्रांत सण करण्यासाठी माहेरी आलेली होती. आदल्याच दिवशी काळी चंद्रकळा नेसून गाव घरच्या स्त्रियांना बोलवून दणक्यात हळदी-कुंकवाचा कार्यक्रम पार पडला होता.


हलव्याचे दागिने घालून लक्ष्मी आणि तिचे पती नारायण यांना दोघांनाही झोपाळ्यावर बसवून खूप लाड आणि कोड कौतुक करण्यात आले होते. गावातल्या समस्त स्त्रियांना हळदी कुंकवाचे बोलावणे होते तसेच गावभरातल्या समस्त पुरुषांना देखील शेतावरच्या घरामध्ये खास जेवणाचे आमंत्रण होते.

त्यांची पद्धत होती तशी ही सगळ्या गावाला एकोप्याने बोलवायचे, गावातलेही इनामदार यांचा मान म्हणून त्यांच्याकडच्या प्रत्येक सण समारंभाला आवर्जून हजेरी लावत.

अतिशय आनंदामध्ये जेवणे झाली आणि लक्ष्मीला काही दिवस तरी माहेरी ठेवून, नारायण राव मात्र इनामदारांच्या वाड्यातच अजून दोन दिवसासाठी का होईना म्हणून थांबले होते. सासरचे आपल्या गावी निघून गेले.


दोन दिवसानंतर घडलेली गांधी हत्येची बातमी वणव्यासारखी देशभरात पसरली. एका ब्राह्मणाने केलेली हत्या म्हणून देशभरातल्या ब्राह्मणांना न्याय शिकवण्यासाठी सगळी जनता आतुर झाली. कोणी किती उपकार केले कोणी आपल्याला किती मदत केली याचा सर्व सर्व विसर पडला.


घरामधील माहेरवाशीण लक्ष्मी आणि नारायण, तसेच मुले सुना नातवंडे भाऊसाहेबांना चिंता वाटून मनामधे काहूर दाटून आले. असे म्हटले तर गावकी सगळी ओळखीचीच होती, कोणीही त्रास दिला नसता, पण नेम काय? ताबडतोब गाडी करून रावसाहेब बरोबर लक्ष्मी आणि नारायण त्यांच्या गावी पाठवून द्यायची व्यवस्था करण्यात आली. आता घरात राहिली पणजोबा, त्यांची तीन मुले सुना आणि त्यांची मुले.

आणि त्यादिवशी काळ रात्र, अमावस्येची रात्र, कोल्हेकुई चालू होती, आणि अचानक गावांमध्ये दंगल उसळली, हाणा मारा, मारा, जाळून टाका, एकच आक्रोश उसळला. देवळातल्या पुजाऱ्यालादेखील बाहेर काढून त्याचे तुकडे करण्यात आले.


वIड्याचा भला मोठा दरवाजा लावून घेण्यात आला, शस्त्र देखील तयार ठेवण्यात आली पण बाहेर आलेल्या 100 माणसांच्या जमावावर तुम्ही किती वेळ तग धरणार? घरात बायका होत्या, त्यांच्या अब्रूचा प्रश्न होता, आतापर्यंत मिळालेले स्वातंत्र्य हे असले? कालपर्यंत मांडीला मांडी लावून जेवणाऱ्यांनी, आज जणू काही सूड सूड उगवला होता. एकत्र जेवलेले, खेळलेले सवंगडी आज वैरी म्हणून हातात शस्त्र घेऊन दरवाजाशी उभे राहिले होते.


भाऊसाहेबांना काहीही सुचेना.

माई पुढे झाली सगळ्या स्त्रियांना आपल्या अंगावरचे दागिने उतरवून पितळी डब्यांमध्ये ठेवण्यास सांगण्यात आले. स्वयंपाक घरामध्ये जी खोल विहीर होती त्याच्यामध्ये ते डबे सोडून देण्यात आले. आपल्याबरोबर जुजबी कपडे लहान बाळांचे कपडे याची गाठोडी पटापट बांधण्यात आली. पणजोबांनी सगळी कागदपत्र घराच्या गुप्त बळदामध्ये नेऊन ठेवली. पणजोबा, अण्णासाहेब आणि दादासाहेब दरवाज्यापाशी बंदुका घेऊन उभे राहिले.


भाऊसाहेबांनी सगळ्या स्त्रियांना घेऊन गुप्त मार्गाने शेतावरती जावे आणि तिथून पुढे वाट फुटेल तिकडे जावे असे ठरविण्यात आले. जगलो वाचलो तर परत भेटू. सगळ्या कुटुंबाने गळाभेट घेतली.


पणजोबांनी त्यांच्या खोलीमध्ये असलेले गुप्त भुयाराचे दार उघडले, हातामध्ये पेटती मशाल घेऊन माई पुढे झाली तिच्या मागोमाग तिच्या दोन्ही जावा आणि सगळ्यात शेवटी भाऊसाहेब येऊ लागली.


किती वेळ चालत होते माहीत नाही पण अचानक वरुन काहीतरी आवाज झाला आणि सगळे जण थांबले. भुयारामधली गर्मी अचानक वाढू लागली. लाकूड तुटण्याचे आवाज येऊ लागले, श्वास कोंडू लागला, माईने सगळ्यांना घाई केली हातात हात धरुन अनवाणी पायांनी सगळ्या स्त्रिया पटापट भुयार ओलांडू लागली दूर अंतरावर गेल्यानंतर जाळी बाजूला करून भुयाराच्या बाहेर पडल्या.


या सुखरूप बाहेर पडल्यानंतर अचानक भाऊसाहेब मागे पळाले ते म्हणाले,” मी असं माझ्या वडिलांना आणि भावांना सोडून येणं बरोबर नाही रावसाहेबांना कळव ते तुमची काळजी घेतील.” असे म्हणून ते पण काही बोलायच्या आत भुयारामध्ये गडप झाले.


आता सर्व बायका एकट्या पडल्या होत्या. पण धीर सोडला नाही, अंधारातून वाट काढत तिने शेतातले घर गाठले आणि शेतातल्या घरामध्ये जाऊन त्या लपून राहिल्या.

दूरवरून दिसत होते इनामदारांच्या घराला लागलेली आग, आकाशापर्यंत भिडलेल्या लाल लाल ज्वाळा, आगीचे उठणारे लोट, आणि घडत असलेल्या हाहाकार.


काय झाले असेल याची तिघींनाही कल्पना आली, मुलांना पोटाशी धरून त्या तशाच बसून राहिल्या.

इनामदारांचा म्हणजे आमचा वाडा जवळ जवळ आठ दिवस जळत होता. गुंडांची नजर शेतामध्ये पडली नाही म्हणून बरे... शेतातल्या घरामध्ये सगळ्या स्त्रिया मुलांना घेऊन लपून राहिल्या... चार दिवस कोणी तोंडात अन्नाचा कण पण टाकला नाही कशा जेवणार, काय जेवणार, काय करणार पुढे?


आठ दिवस असेच गेल्यावर माई आणि रमाई भुयारातून वाड्यामध्ये शिरल्या, काही मिळते का, किंवा जर कोणी जखमी होऊन पडले असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी म्हणून त्या दोघी हिम्मत करून आत मध्ये शिरल्या.


भुयाराचे दुसरे दार पणजोबांच्या खोलीमध्ये उघडत होते, अचानक काहीतरी चमकले,

आजोबांच्या खोलीमधले तिजोरीमध्ये असलेले सोने वितळून बाहेर आले होते आणि त्याची एक लांब तार भुयारात पसरली होती.


माईने आणि रमाईने सोन्याची तार फटाफट धुंडाळायला सुरुवात केली जेवढे जमेल तेवढे सोने तर त्यांनी ओढून बाहेर काढले आणि सोने भरपूर होते ते सगळे गोळा करून दोघीजणी भुयाराच्या बाहेर पडल्या आणि शेताच्या घराकडे आल्या.


शेताच्या घरामध्ये जेवणा खाण्याचे सामान जुजबी प्रमाणात होते त्याच्यावर सगळ्या कुटुंबाने उदरनिर्वाह केला.


लपत-छपत राहून सगळ्यांनी दीड महिना तिथेच काढला. इनामदारांच्या पुरुषांचे अंत्यसंस्कारदेखील व्यवस्थित झाले नाहीत, ना त्यांचे तेरावे घातले गेले.


गोष्ट पणजीच्या मनाला फार लागून राहिली. अजून एका महिन्याने लपत-छपत रावसाहेब शेताच्या घराच्या दिशेने आले. इनामदारांचा एक मुलगा तरी जिवंत होता. शोक करण्यास वेळ नव्हता, रावसाहेब गाडी करून आले होते, त्यांनी आपल्या सगळ्या भावजयांना गाडीमध्ये घातले आणि आईसकट मुंबईच्या दिशेने प्रवास सुरु केला.

मुंबईला आल्यावर पारशी शेठकडे सर्व बायकांची व्यवस्था केली.


पारशी शेठ कापड व्यवसायामध्ये भागीदार होता, त्याला जेव्हा गावातल्या जळीतकांडाची माहिती कळली तेव्हा तो हादरून गेला. स्वातंत्र्यलढ्यामध्ये इनामदार कुटुंबाचे समर्पण त्याला माहिती होते, तरी पण गावातल्या गुंडांनी यांच्या वाड्याला आग लावून दिली होती. कोणी केली गांधी हत्या, आणि कोण भोगतो, त्याची फळ! अजब गजब दुनिया.

मुंबईला पोहोचल्यावर अंथरूण धरले सर्वात धाकट्या वहिनीने. आणि हाय खाऊन त्यातच तिचा अंत झाला.


माईचेचे दोन मुले राघव आणि केशव, रमाईची मुलगी अनुराधा, माई, रमाई आणि पणजी असे सगळेजण मुंबईला राहू लागले. पणजीला काही बरे वाटेना, घरात सापडलेल्या सोन्याच्या तारा विकून तिने लवकरच लहान अशा घराची व्यवस्था केली. आणि सगळेजण तिकडे राहायला गेले.

       

रोज रात्री राम रक्षा झाल्यानंतर पणजी ही कविता म्हणे,"सुरेखा चौरस आरसपानी, खोल खोल त्या जीवन गाणी, त्यात पोहते कांचन राणी. 

वडिलांचे जणू आत्मे फिरती, सांभाळुनी तिलाच बघती, जपुनी जपुनी ठेवावे म्हणती, 

वंशाच्या दिव्या समजती, वाट बघती, केव्हा केव्हा मिळते मुक्ती!”

पणजीच्या या गाण्याचा अर्थ फक्त माईच जाणत होती,

जवळचे थोडे-थोडे सोने विकून, माईने प्रपंच चालवला, मात्र पारशी शेठच्या मदतीने तिने कापड मिल आणि पिठाच्या गिरण्या, विकण्याचा निर्णय घेतला.

पिठाच्या गिरण्या आणि कापड मिलसाठी गिऱ्हाईक शोध चालू केला.


गावाकडे जाण्यात काही अर्थ नव्हता. घरदार सगळे जळाले होते. मात्र तिने मनाशी एक निश्चय केला होता, या सगळ्याचा सूड नक्कीच घेणार होती.


खरंच लवकरच मुंबईच्या एका व्यापाऱ्याने इनामदारांची कापड मील आणि गिरण्या विकत घेण्याची तयारी दाखवली, माईने कागदपत्रासकट सर्व व्यवहार करून दोन्ही गोष्टी विकून दिल्या.


असेच दोन तीन वर्ष गेली, आता रावसाहेब, माई हळूहळू गावाकडे जाऊ लागली, शेतीवाडी इथे राहूनच बघू लागले, पारशी शेठच्या मदतीने कंत्राटी पद्धतीने शेत वहिवाटदारांना कसण्यासाठी देण्यात आले. त्यामुळे घरामध्ये उत्पन्न चालू झाल आणि आता सोने विकण्याची गरज उरली नाही.


पणजोबांच्या बळदामध्ये घराची शेतीची कारखान्यांची सगळी कागदपत्र व्यवस्थित होती, जळीतकांडाचा त्याच्यावरती काहीही परिणाम झाला नव्हता तसेच पणजोबांच्या खोलीच्या खाली असलेली चांदीची भांडी पण सुरक्षितच होती. आता आमच्या कुटुंबाला पैशाची काळजी नव्हती, पण झालेले नुकसान आणि झालेले दुःख अपरिमित होते.


रावसाहेबांच्या मताने तर घर आणि शेती पण विकून टाकण्याचा फायदा होता पण माईचा त्याला विरोध होता. राघव आणि केशव मोठे होऊ लागले, जवळजवळ दहा वर्ष मुंबईत सगळ्या कुटुंबाने वास्तव्य केले.

मध्यंतरीच्या काळामध्ये गयेला जाऊन सर्व इनामदारांचे यथायोग्य असे श्राद्ध करून भरपूर दान दक्षिणा दिली.


अजूनही पणजी जिवंत होती, तिच्या मनामध्ये काहीतरी आस होती, याची पूर्ण कल्पना माईला होती. माईने वचन दिले होते इनामदार यांचे वैभव ती परत मिळवेल. झालेल्या कौटुंबिक नुकसानामुळे काका, रावसाहेब यांचे मन उद्विग्न झालेले होते, त्यांनी पणजीला वचन दिले की ते कधीही लग्न करणार नाहीत आणि आपल्या भावांच्या, कुटुंबाची काळजी घे घेतील, त्यांच्या मुलांना आपले म्हणूनच वाढवतील.


राघव कॉलेज पूर्ण करून आयएएसची परीक्षा देऊन कलेक्टर म्हणून साताऱ्याला रुजू झाला.  तर केशवने मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन डॉक्टरची परीक्षा दिली. अनुराधा पण व्यवस्थित शिकून डॉक्टर झाली. आता सर्व कुटुंबाने परत गावी जाण्याचा निर्णय घेतला.


माईने आपल्या हिमतीच्या जोरावर, वाडा साफ करण्यासाठी माणसे लावली. स्वतः देखरेख करून जळालेले अवशेष तिने बाजूला केले. वाडा तसाच ठेवून तिने वरती बंगला बांधण्यास सुरुवात केली. स्वयंपाकघराची विहीर काळजीपूर्वक बंद करण्यात आली, आणि ती बंगल्याच्या मध्यभागी घेण्यात आली. तसेच पणजोबांच्या खोलीच्या खालचे भुयार तसेच ठेवून त्याच्यावरती तिने स्वतःची मोठी खोली बांधली. वाड्याच्या भरपूर मोठ्या आवारामध्ये, प्रचंड असे मोठे हॉस्पिटलची निर्मिती केली.

केशव आणि अनुराधा समर्थपणे हॉस्पिटल चालवू लागले.


एके दिवशी मध्यरात्री पणजीने  सगळ्या कुटुंबाला आपल्या बाजूला बोलावले, अतिशय वृद्ध झाल्यामुळे ही बराच काळ झोपेतच असायची, झोपेमध्ये रामरक्षा म्हणत शेवटी ती तिची कविता म्हणत असे.


माईच्या सूचनेनुसार पणजीची खाट विहिरीच्या बाजूला घेण्यात आली, आजीचा हात धरून माई म्हणाली,"तुमची धनदौलत सगळी जपून ठेवली आहे, तुमच्याच वंशाच्यासाठी. काळजी करू नका.”


रावसाहेब दोराचा गळ घेऊन आले, स्वयंपाक घराच्या विहिरीमध्ये गळ टाकून एक एक डबा वर काढण्यात आला. पणजीने ते सर्व बघितले आणि समाधानाने डोळे मिटले, सगळ्यांचे हात एकत्र घेऊन पणजी म्हणाली,”सगळे एकत्र आणि सांभाळून राहा वंशाला वाढवा, कोणी आपल्यावर अन्याय केला आहे त्याला माफ करा मी पण माफ केले.”


Rate this content
Log in

Similar marathi story from Crime