Prabodh Govil

Abstract Tragedy

4  

Prabodh Govil

Abstract Tragedy

जल तू ज्वलंत तू-3

जल तू ज्वलंत तू-3

12 mins
490


रात्री रस्बीपण सुखी नव्हती. ती घरात एकटी होती. तिने कसेबसे जेवण बनवले. पण जेवली नाही. तिला भूक लागली नव्हती. रात्री तिला लवकर झोप आली पण खरं तर ती झोप नव्हती. ती तंद्रित होती. रात्री उशीरापर्यंत जागी होती. त्या तंद्रित तिला न जाणो कोणकोणती दृश्यं दिसू लागली. एक रजतपट समोर पसरला.

रस्बीला वाटले ती पाय रोवून एका कातळावर उभी आहे. तिच्या पायाखालची जमीन खचत चालली आहे. बघता बघता पायाखालची वाळू पाण्यात बदलली. ती वेगवान प्रवाहात वाहून जाऊ लागली. पाण्याचा वाहता समुद्र तिचे जग सोडवत आहे. एक ठिकाण असे आले, जणू आकाशाच्या उंचीपासून खाली पडत आहे. एखाद्या क्षुल्लक पाण्याच्या थेंबासारखी! रस्बी जीवनाची आशा सोडून जणू पाताळात गेली. खोल पाण्यातील जीवजंतू महाभोजनासाठी तिच्याकडे धावले. रस्बीने आपल्या मुठी आवळल्या. मूठ इतक्या जोराने आवळली की तिच्या नखांनी तिचे तळहात जखमी झाले. एक जोरदार आवाज आला. जणू तारा तुटला असावा. उल्कापाताचा सहसा आवाज येत नाही. पण हा उल्कापात रस्बीच्या मनात इतक्या जोराने झाला की त्याचा आवाज आला. भीतीदायक गुंजारव झाला!

त्यानंतर दुपारपर्यंत रस्बी बेशुद्धीत- झोपेत होती. ती शुद्धीवर आली तेव्हा पलंगाखाली पडलेली होती. पाण्याची चादर मुठीत घट्ट धरण्याच्या प्रयत्नात तिने पलंगाची चादर मुठीत आवळली होती. तळहातावरचे रक्त वाळले होते.

तिला जाणवले, की फिन्जान काही दिवसांसाठी बाहेर गेला आहे. तरी तिच्या विचारांचा झंझावात तिला घुसळून काढत आहे. उद्या आपला हट्ट आणि वेड घेऊन तो या जगातून गेला तर काय होईल? ही कसली परीक्षा आहे? तिला परिणाम माहीत आहे पण ती काही करू शकत नाही.

असं काय आहे, जे फिन्जानच्या मनात जगण्याची इच्छा निर्माण करील? फिन्जानची ती गर्लफ्रेंड, काय नाव आहे तिचे...? तिला तिचे नावसुद्धा माहीत नाही. रस्बीने तिला बोलावून फिन्जानला प्रेमाने समजवायला सांगावे का? रस्बीला आठवले, फिन्जान त्या मुलीबरोबर खुश होता. रस्बी लाजली. तिला आश्चर्य वाटत होते, फिन्जान किती वेळ त्या मुलीबरोबर होता. कोणी शिकवलं फिन्जानला हे सगळं?

तिचे तिलाच आश्चर्य वाटत होते. आई असून ती मुलाबद्दल काय विचार करत आहे. मुलगा आता लहान नाही. ते दिवस गेले जेव्हा ती त्याला अंघोळ घालण्याआधी त्याचे कपडे काढून मालिश करत असे. बघता बघता तो समजूतदार झाला. घाम गाळून त्या मुलीपासून दूर झाला. ती श्वास रोखून दारातून पाहत होती. ती वेळेआधी परत आल्याने तिला हे सगळे पहावे लागले होते.

मग रस्बीने त्या मुलीशी फिन्जानला बांधावे का?

बर्‍याच उत्साहाने आशेने दिवस घालवून फिन्जान व अर्नेस्ट घरी परतले, तेव्हा शेजारी मित्रांच्या देखरेखीखाली रस्बी पडलेली होती. त्याला हेही कळले की तिला हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेला आहे. फिन्जान आल्यामुळे मित्र निघून गेले. फिन्जानने अपराध्यासारखी मान खाली घालून त्यांना निरोप दिला.

मुलगा आल्यामुळे रस्बीमध्ये चेतना आली. ती घरातील काम करण्यासाठी उठू लागली. तिला वाटत होते की, फिन्जान आता आपल्या वेडापासून काही दिवस लांब राहील.

घराच्या वातावरणात जणू एक आवाज येत होता. मृत्यूला साथीदार बनवले. चंद्र-सूर्याला मित्र! मग आम्ही विश्रांती घेणे कोणाकडून शिकणार होतो? दोन दिवस कसेबसे गेले. फिन्जानची स्वप्नं पुन्हा समोर येऊ लागली. रस्बीची आशा पुन्हा निराशेत बदलली.

एकेदिवशी दुपारी रस्बी फिन्जानला न सांगता बाजारात गेली. फिन्जानच्या वडिलांचा एक मोठा फोटो सुंदर फ्रेममध्ये मढवून आणला. फिन्जानची मदत न घेता भिंतीवर लावला. फिन्जान आश्चर्याने पाहू लागला. कारण त्याने हा फोटो यापूर्वी पाहिला नव्हता. त्याला सुचेना की फोटोबद्दल आईला काय विचारायचे? त्याने काही विचारायच्या आत रस्बी म्हणाली, “त्यांनी देशासाठी प्राण दिले. कोणीतरी त्यांची आठवण ठेवली पाहिजे!” फिन्जानने फोटेाकडे पाहिले. एकदा आपल्या छातीला आणि डोळ्यांना हात लावला. त्याला हे कळलेच नाही की, त्याच्या आईच्या बोलण्यात त्याला टोमणा होता. उलट त्याने उत्साहाने वर्तमानपत्रात छापलेले फोटो दाखवायला सुरुवात केली. ते फोटो न्यूयॉर्कमध्ये छापले गेले होते. आईने त्या फोटोंकडे असे पाहिले जणू फिन्जानने ती आजारी असताना काढलेला एक्स-रे दाखवलाय!

बफलोमध्ये, न्यूयॉर्कमध्ये मिडियाने छापलेल्या बातम्यांचा परिणाम दिसून आला. फिन्जानची नाव ओळखून मुलं त्याच्याभोवती जमली.

एके रात्री जेवण झाल्यावर फिन्जान घराबाहेर पडला तेव्हा रस्बीचे माथे भडकले. ती जाणार्‍या फिन्जानला काही बोलली नाही, पण तिचे काळीज धडधडू लागले. तिने आपल्या कपाळाला पट्टी बांधली. काळा चष्मा लावला. आपले अश्रू पुसत त्याच्या मागोमाग चालत जाऊ लागली. फिन्जान सावकाश जात होता. सगळे शहर रंगीबेरंगी दिव्यांनी उजळले होते. लांब पडणार्‍या धबधब्याच्या पाण्याचे शिंतोडे शहराला भिजवत होते.

रस्बीला आता विश्वास राहिला नव्हता. तिने त्याला अडवले तरी तो आपल्या मोहिमेची तयारी करतच होता. आता तो कोणत्याही क्षणी आपल्या मोहिमेवर जाण्याची शक्यता होती. रस्बीला हेही माहीत होते की, फिन्जानची मोहिम सुरू झाली की तिचा अंत जवळ येईल. जगातील शेकडो लोकांनी आतापर्यंत प्रयत्न केले होते. कोणीही त्या आकाशातून पडणार्‍या पाण्यातून जिवंत आला नव्हता. मग फिन्जान हा कारनामा कसा करू शकेल? तो किशोरवयाचा होता. अजून मिशा आल्या नव्हत्या. रस्बीच्या अस्वस्थतेत उदासिनतेव्यतिरिक्त कोणताही रंग मिसळण्याची आशा नव्हती.

रस्बीने फिन्जानचा पाठलाग करायचे ठरवले. ती क्षणभरदेखील त्याला मोकळा सोडू इच्छित नव्हती. कधी काय होईल सांगता येत नव्हते. हा मुलगा अंधारात फिरून, मित्रांना भेटून कुठेही जाऊन काहीही करून परत यावा. फिन्जानला नजरेसमोर ठेवण्यासाठी तिनं आपली गती वाढवली.

धो धो पडणार्‍या पाण्याच्या जवळून जाणार्‍या रस्त्याने फिन्जान हळूहळू जात होता. पण नंतर नदीकडे जाणार्‍या रस्त्यावर येता येता त्याचा वेग वाढला. आता त्याचा पाठलाग करण्यासाठी रस्बीला धावावे लागत होते. थोड्याच वेळात तिला धाप लागली. तिला वाटले टॅक्सी करावी. पण एकतर तिला माहीत नव्हते की, फिन्जान कुठे आणि किती लांब जाणार आहे, शिवाय इतक्या रात्री एका तरुणाचा पाठलाग करताना पाहून टॅक्सी ड्रायव्हर काय म्हणेल? आणि ते सुद्धा या उपक्रमात तिच्यापुढे जाणारा तिला मुलगा तिचा पुत्र आहे.

रस्बीने टॅक्सीचा विचार सोडला आणि हिम्मत करून आपला वेग वाढवला. थोड्या वेळाने एका गल्लीतून एक मुलगा आला आणि फिन्जानला भेटला. रस्बीने अंधारातसुद्धा त्यला ओळखले. तो अर्नेस्ट होता. रस्बीला थोडे समाधान वाटले की येणारा मुलगा फिन्जानचा मित्रच आहे. नदीच्या काठाने जाणारा रस्ता पुढे सामसूम होता. लहान लहान रोपं आणि झाडांनी रस्त्याच्या काठाचा भाग बाग आणि जंगलाचे मिळतेजुळते रूप वाटत होते.

एका मोठ्या झाडाखाली फिन्जान आणि अर्नेस्ट थांबले. रस्बीने सुटकेचा श्वास टाकला. झाडाखालच्या गवत, पालापाचोळ्यातून अर्नेस्टने एक लोखंडी पाईप ओढून आणला. रस्बीला कळले की, ते दोघे यापूर्वी इथे येऊन गेले असावेत. थोड्यात वेळात अर्नेस्टने खिशातून एक रंगीत कापड काढले व ते पाईपच्या टोकाला गुंडाळले. फिन्जान झाडावर चढला होता. त्याने पाईप उंचावरील फांदीवर बांधण्यासाठी वर ओढून घेतला. रस्बी आश्चर्यचकीत झाली. तिने फिन्जानला झाडावर चढताना पाहिले नव्हते.

अमेरिकेचा राष्ट्रीय ध्वज हवेत फडकू लागला. रस्बीने आपले अश्रू पुसले. आता तिला तिथे उभे राहवत नव्हते. तिला फिन्जानला कळू द्यायचे नव्हते की, तिने त्याचा पाठलाग केला होता. 

ती वळून परत जाऊ लागली. तिचा उद्देश पूर्ण झाला होता. तिने ती जागा पाहिली होती जेथून फिन्जान आपली भयंकर यात्रा सुरू करणार होता. या जागेपासून वेड्यावाकड्या रस्त्यांनी जवळजवळ साडेपाच किलोमीटर लांब गेल्यावर अलौकीक नायगारा फॉलच्या रूपाने पडत होता. अतिशय रुंद पात्राच्या पलीकडे अमेरिकेची सीमा होती आणि कॅनडाची सुरुवात होत होती. झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशात दोन्ही शहरे अतिशय सुंदर दिसत होती. मध्ये जंगल होते.

रस्बी गेल्यावर दोघा मित्रांनी आपल्याबरोबर आणलेली काही पोस्टर्स झाडावर लावली.

अर्नेस्टने छोटा टॉर्च काढून पाण्यावर उजेड टाकला. त्याला कदाचित चिंचेच्या आकाराचा केशरी रंगाचा मासा दिसला असावा. फिन्जान आणि त्याच्या मित्राला आपल्या मोहिमेची तयारी करताना सोडून रस्बी परतली तेव्हा ती चिडलेली होती. ती विचार करत होती की तिला तिच्या जीवनात काय मिळाले? तिच्या मनावर लहानपणीच्या त्या दिवसाची छाप अजून होती, जेव्हा एक बादली पाण्यासाठी झालेल्या भांडणात तिच्या आईच्या हातून एका स्त्रीची हत्या झाली होती. या घटनेने तिच्या डोक्यावरचे पित्याचे छत्र पण हरवले. त्यामुळे तिला आईबरोबर जेलमध्ये रहावे लागले होते. रस्बी विचार करू लागली, फिन्जान नेहमीसाठी हरपण्याआधी तिने आपले जीवन संपवावे का? पाण्याच्या काठाने चालताना तिच्या मनात न जाणे कोणकोणते विचार येत होते. पण पाण्याच्या लाटेसारखाच एक विचार दुसर्‍या विचाराला नाहीसा करत होता. जड पावलांनी रस्बी घरी परत येत होती.

धावत पळत घाबरत रस्बी घरी परतली. आल्याबरोबर ती आपल्या अंथरुणावर अशी पडली जणू तिला काही माहीत नव्हते. तिला फिन्जान कधी परत आला, आला की नाही आता काही कळले नव्हते.

ती आढ्याकडे पहात मनातल्या मनात गुणगुणू लागली (सोना होगा सबको, आई पारस पत्थर लेकर रात... रात छुएगी जिसको जिसको, भूल रहेगा दिन को) सगळ्यांना आता झोपले पाहिजे कारण रात्र दगड घेऊन आली आहे. रात्र त्याला ज्याला स्पर्श करील तो दिवसाला विसरेल. रस्बीला झोप येत नव्हती. तिचा थकवा, अस्वस्थता सगळे दूर गेले होते. आता तिला भीती वाटत नव्हती. तिला वाटत होते जणू ती ते ठिकाण पाहून आली आहे, जिथे नियती तिच्या मुलाला फाशी देणार आहे.

रस्बी अचानक जोरजोरात रडू लागली. रडता रडता झोपी गेली.

रस्बीने तो जलप्रपात आपल्या जीवनात अनेकवेळा पाहिला होता. त्या अथांग पाण्याच्या पडणार्‍या वादळाने तिला कधी असा संकेत दिला नव्हता की एक न् एक दिवस तो तिचा मुलगा मागेल. झरा पार केल्यावर विजेच्या ज्वालामुखीसारखे वर्लपुलापर्यंत जाणारे पाणी एकीकडे आणि कापसासारखा मऊ जो अजूनही किशोर होता तो दुसरीकडे. रस्बीला फिन्जानची प्रेयसी भेटली. तिने तिला घट्ट धरले. ती मुलगी पळू लागली. रस्बी तिच्या मागे धावली. रस्त्याने जाणारे लोक तिला वेडी समजू लागले. मुलगी हाती आल्याबरोबर तिने तिला खांद्याला धरून गदागदा हलवले व म्हणाली, “बोल बोल, तू करशील ना एवढे काम? तू माझ्या मुलाला खोटं सांगशील?” मुलीने भीतीने डोळे मिटून घेतले. तिने काही उत्तर दिले नाही. रस्बी पुन्हा ओरडली, “तू त्याला खोटं सांग, तो आता लहान नाही. जग जिंकण्याचे स्वप्न पहात आहे. तो असेही करू शकतो. बोल, सांगशील ना त्याला... सांग की तुझ्या पोटात त्याचे बाळ आहे.” अचानक ती मुलगी आणि रस्त्यावरचे लोक गायब झाले. त्या रात्री रस्बीने अशी अनेक स्वप्नं पाहिली.

सकाळी नाश्ता बनवताना ती फिन्जानला म्हणाली, “जगात यापूर्वी कोणी तरी हे काम केलेले आहे, ज्यासाठी तू स्वत:ची हत्या करायला निघाला आहेस.”

या प्रश्नाने फिन्जान चकित झाला. तो म्हणाला, “आई, हे तू काय बोलत आहेस? सगळी कामं जगात कधी ना कधी झाली आहेत, कोणी ना कोणी केली आहेत.”

“मी तुझ्यावर माझ्या मुलाला मारल्याचा दावा दाखल करीन.”

फिन्जान हसला.

“जर मी माझा उद्देश्य पूर्ण करू शकलो तर तू दावा हारशील. जर पूर्ण करू शकलो नाही... तर...”

“हां हां! बोल, थांबलास का? बोल, पुढे बोल!” रस्बीने ओव्हनमध्ये गरम झालेली प्लेट फिन्जानच्या डोक्यावर फेकून मारली. प्लेटचे तीक्ष्ण टोक फिन्जानच्या कपाळावर लागले. कपाळावरून रक्ताची धार वाहू लागली. फिन्जान ओरडला. पण त्याने तो वार सहन केला. त्याने एका हाताने कपाळ दाबून धरले आणि दुसर्‍या हाताने रुमालाच्या घड्या काढून डोक्याला गुंडाळू लागला. रुमाल रक्ताने माखला. फिन्जानने स्वत: जाऊन प्लेट उचलली. ती अजूनही गरम होती. त्याने पाहिले आईने त्याच्यावर वार तर केला होता, पण आता ती अस्वस्थ झाली होती. तिचे लक्ष फिन्जानच्या कपाळाकडे होते. फिन्जान गप्प बसला. त्याला माहीत होते की आई उद्विग्न अवस्थेत स्वत:ला काही करून घेईल. तो मुकाट्याने हळूच बाहेर पडला.

दारावरची बेल वाजली तेव्हा रस्बी फिन्जानच्या डोक्याला पट्टी बांधत होती. पट्टी बाजूला ठेवून रस्बीने दार उघडले. इतर प्रसंग असता तर ती आनंदाने उत्साहित झाली असती. पण या क्षणी तिच्या मनावर फिन्जानच्या जखमेचा भार होता. ती हसू शकली नाही. पण तिचा चेहरा बदलला. फिन्जानने दाराकडे पाहिले, दारात अतिशय ठेंगणा माणूस उभा होता. त्याने लांब दाढी ठेवलेली होती. बहुधा मुसलमान असावा. त्याने रस्बीला काही सांगितले. मग फिन्जानची जखम पाहिली. जो परत जाऊ लागला. रस्बीने इशार्‍याने फिन्जानला दाराजवळ बोलावले.

रस्बीने काही दिवसांपूर्वी घोडा खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली होती. हे अजून फिन्जानला माहीत नव्हते. आता आलेला माणूस घोडा घेऊन आला होता. घोड्याला एका झाडाला बांधून ठेवले होते. फिन्जान आश्चर्याने पाहू लागला. रस्बीला आश्चर्य वाटले नाही. काही दिवसांपूर्वी तिने त्या अनोळखी माणसाकडून घोड्यावर बसण्याचे प्रशिक्षण घेतले होते.

रस्बीने जवळ जाऊन घोड्याला चुचकारले. त्या घोड्याने जणू तिला ओळखले होते. तो तिचा हात चाटू लागला.

रस्बीला वाटत होते की फिन्जानने विश्रांती घ्यावी. पण थोड्या वेळात येतो असे सांगून फिन्जान निघून गेला. तो गेल्यामुळे तिला समाधानही वाटले. कारण त्यामुळे तिला वाटले की त्याची जखम फार मोठी नाही. ती घरात गेली. आता तिला स्वत: अणि फिन्जानबरोबरच घोड्याचीसुद्धा देखभाल करायची होती.

दुपार झाली तरी फिन्जान परतला नव्हता. रस्बी फार काळजी करत नव्हती. कारण तिला माहीत होते की या वेळी तो कुठे असेल. तरीही तो काही न खाता-पिता गेला होता आणि आता बराच उशीर झाला होता.

घरात नवीन स्कूटर आणली की मुलं ती चालवल्याशिवाय रहात नाहीत. तसेच रस्बीला घोड्यावरून रपेट करावीशी वाटत होती. फिन्जानला बोलावून आणण्याचे निमित्त पण होते. हॅट घालून इकडे तिकडे बघत रस्बी झाडाजवळ गेली. रस्बीने नदीकाठी जाऊन पाहिले. फिन्जानने ज्या झाडावर झेंडा लावला होता तो लांबून दिसत होता. पिवळ्या आणि केशरी रंगांची बॉलच्या आकाराची नाव तिथे होती. फिन्जानचे तीन-चार मित्र अर्नेस्टबरोबर तिथे हजर होते. रस्बी लांब उभी राहून पाहू लागली.

थोड्याच वेळेत दोन महिला तिथे कारने पोहोचल्या. गाडीतून उतरून नावेजवळ आल्या. त्यांच्यापैकी एकीच्या हातात ब्राजीलियन वंशाचा लहानसा कुत्रा होता. कुत्र्याच्या डोळ्यावर काळा चष्मा होता आणि त्याच्या गळ्यात रेशमी स्कार्फ बांधलेला होता. त्या महिलेने फिन्जानच्या हाताचे चुंबन घेतले. रस्बीला त्या महिलांचे तिथे येण्याचे कारण माहीत नव्हते. तिने तोंड वेडेवाकडे केले. एवढे नक्की की त्या महिला फिन्जानला रोखण्यासाठी आलेल्या नव्हत्या. उलट त्या महिला वरचेवर फिन्जानचा हात हातात घेऊन चुंबन घेत होत्या. त्यावरून रस्बीला शंका आली की, फिन्जानची यात्रा सुरू होण्याची वेळ आली की काय? फिन्जानने आपली बॉलसारखी नौका अगोदरच तिथे तयार ठेवली होती. त्याचे मित्र हजर होतेच. त्या महिला त्याला प्रोत्साहन देत होत्या.

फिन्जान यात्रेला निघत तर नाही ना? तिच्या लक्षात आले, फिन्जान दुपारी जेवला नाही. आपल्या शेवटच्या यात्रेवर फिन्जान उपाशीच जाईल का? एक आई असून रस्बी फिन्जानला असे पाठवेल? फिन्जान शेवटच्या क्षणी आईला भेटायला येणार नाही का?

रस्बीचं मन हा:हा:कार करू लागले. पण इतक्या लोकांसमोर त्याला अडवून लज्जित करण्याची तिची हिम्मत झाली नाही. तिने आपले अश्रू आवरले. एका झाडाच्या मागे उभी राहिली. टक लावून पाहू लागली. एकदा तिच्या मनात आले, देवाला तिला काही द्यायचेच असेल तर त्याने फिन्जानला या मोहिमेत यश द्यावे. हा विचार जसा आला तसा नाहीसा झाला. कारण तिच्या डोळ्यासमोर आकाशातून पडणार्‍या पाण्याचा तो दैत्याकार झरा रजतपटासारखा पसरला.

हे काय? रस्बीचं सर्वस्व हरपले.

हातात रंगीत रूमाल घेऊन मित्रांनी आणि त्या महिलांनी फिन्जानला रवाना केले. त्याची पिवळी, सोनेरी, केशरी नौका विशालकाय बॉलसारखी किनार्‍यावरच्या उथळ पाण्यावर डळमळू लागली.

रस्बी किंचाळली. तेथून परतली. घोड्यावर बसून विरुद्ध दिशेने जाऊ लागली. वाहत्या पाण्याच्या गर्जनेत बाकीचे आवाज सामावले. रस्बीच्या आशा-आकांक्षांसारखे!

पाण्याचा वेग काठाला कमी होता. पण मध्ये तीव्र होता. ती शंकरा सारखी निसर्गाशी लढत होती. कोणाला काही माहीत नव्हते. सूर्यापासून तुटून उल्का पडली होती. तिच्या भीषण झोक्याने नवीन ध्रुवीकरण जन्माला येणार होते. काय वाचणार होते, काय जाणार होते, ते काळाच्या गर्भात होते. अथांग पाणी एखाद्या वितरागी संन्याश्यासारखे पडत होते. जणू विधात्याने निर्माण केलेल्या सृष्टीला धुऊन काढण्याचे पवित्र कार्य त्यालाच करावयाचे आहे!

आकाशात उडणारे पक्षीसुद्धा त्या अलौकिक नौकेकडे पाहत होते. जेथून ही मोहीम सुरू झाली होती तेथील झाडांवर पोस्टरच्या रूपाने प्रार्थना, शुभेच्छा, आराधना लिहिलेल्या होत्या. फिन्जानच्या चित्रासोबत लिहिले होते, “आम्ही जेव्हा हे जग सोडून परत जाऊ तेव्हा आकाशात आमचे स्वागत करणारा खुदा ते श्वास मोजणार नाही जे आम्ही इथे घेतले होते. आम्ही आमच्या पावलांच्या निशाण्यांनी धरतीच्या छातीवर ज्या प्रार्थना लिहून जाणार आहोत त्या वाचण्याचा प्रयत्न करील.” तो कागद पतंगासारखा जंगलात उडत होता. काही कागदांवर फिन्जानने आपल्या हाताने लिहिलेल्या शाळेतील प्रार्थना होत्या. सूर्याने त्या भयंकर दृश्याचा फोटो घेऊ नये म्हणून आकाशाने काही ढग सूर्यावर पसरले. सूर्यप्रकाश अंधूक झाला. थोड्या वेळेसाठी आसमंत स्तब्ध झाला.

रस्बी घोड्यावर बसून उद्विग्न अवस्थेत इकडून तिकडे धावत होती. ती काही निष्णात घोडेस्वार नव्हती. रस्ता उंचसखल होता. रस्त्यावर शांतता होती. घोड्याला बहुधा कळले असावे की त्याची मालकीण संकटात आहे. घोडा त्या रंगीबेरंगी नावेच्या दिशेने पळत होता. रस्बीला लगामाची शुद्ध नव्हती ना जीनची. ती समोर पाहत नव्हती. तिची नजर नावेवर होती. थोड्या अंतरावर जाऊन त्या नावेला अतिशय वेगाने पडणार्‍या पाण्याबरोबर पाताळात पडायचे होते. वेगवान लाटांच्या ज्वालामुखीत वाहून जायचे होते. हा निसर्गाच्या परिक्षेचा क्षण होता. फिन्जानला आपले धाडस आणि ब्राजिलियन पपीबरोबर या नौकेत बसताना रस्बीने पाहिले होते.

पडत्या पाण्यात एखादे फुलपाखरू पडावे तशी ती नौका पडताना रस्बीने पाहिले होते. थिजलेल्या डोळ्यांनी पाहिलेल्या त्या दृष्याने रस्बीच्या आतून न जाणो काय नेले.

त्या संध्याकाळी बर्‍याच लोकांना चिंचेच्या आकाराचा केशरी रंगाचा मासा दिसला. तो आपल्या शरीरातून धूर सोडून पाणी गढूळ करतो. त्यामुळे उथळ पाणी आणि खोल पाणी यामध्ये भ्रम उत्पन्न करतो.

जल प्रपातानंतर काही अंतरावर बनलेल्या वर्लपूलच्या उद्दाम लाटांमध्ये रस्बीला तो मासा दिसला. तिचे डोळे थिजले! 

ती कितीतरी तास तिथे एकटी बसली होती. तिची नजर पाण्यावर होती. पिवळ्या-केशरी रंगाच्या धागेदोरे निघालेली चादर पाण्याच्या वेगाने थपडा खाताना दिसली. तेव्हा ती तंद्रितच चालत किनार्‍यावर आली आणि तिने पाण्यात उडी मारली.

रस्बीने जलसमाधी घेतली.

खोल पाण्यातील जीवजंतूंच्या भोजनासाठी नियतीने तिला वाढले होते.

दुसर्‍या दिवशी वर्तमानपत्रात फिन्जानच्या अयशस्वी मोहिमेची लहानशी बातमी आली होती.


Rate this content
Log in

Similar marathi story from Abstract