जीवनातील संघर्ष अनुभव
जीवनातील संघर्ष अनुभव
नेहमी माणसांनी गजबजलेल्या घरात राहिले...दिवस रात्र आजूबाजूला माणसांचा घोळका असायचा मग ते मित्र मैत्रिणी असोत की मग घरातले पण एकटी कधी राहण्याचा किंवा एकटी पडण्याचा प्रश्न उदभवलाच नाही.पण जस मागच्या भागात तुम्ही वाचलंत शिक्षणासाठी बाहेर पडले तेव्हापासून एकटेपणाने काही माझी साथ सोडली नाही. "मी आणि माझी तन्हाई" असा सिलसिलाच जणू सुरू झाला. इंजिनियरिंगला ऍडमिशन झालं व त्यानंतर कॉलेजपासून हॉस्टेल फारच लांब असल्यामुळे तिथे राहणं तर माझ्यासह घरच्यांनाही मान्य नव्हतं त्यामुळे सुरुवातीचे काही दिवस चुलत मामांकडेच राहिले...अचानक असं घरापासून दूर राहण्याचा चांगला वाईट अनुभव पहिल्यांदाच मिळाला तो तुम्ही मागील भागात वाचलातच.
जवळ जवळ एक महिना होत आला होता की मी चुलत मामांकडे राहत होते. आता कॉलेजमध्ये बऱ्यापैकी रुळले होते व मैत्रिणीही झाल्या होत्या...प्रत्येकीने सुरुवातीला जस राहायची सोय मिळेल तस बाहेरच्या हॉस्टेल्स मध्ये वगैरे राहिल्या होत्या..पुढील दोन तीन महिन्यांचे पैसे आधीच भरले होते...पण नंतर सर्वानुमते एखादी भाड्याची रूम घेऊन राहायचं असंच ठरलं पण त्याला अजून एक महिना अवकाश होता....म्हणजे अजून पुढचाही एक महिना चुलत मामांकडेच राहायचं???? मला ते कुठेतरी पटत नव्हतं...तस तिथे कोणाचाच काही त्रास नव्हता पण शेवटी आधीच ती सहा माणसं त्यात मी सातवी त्यांच्यात गेलेले...माझं कॉलेज,माझा रात्रभर अभ्यास,सबमिशन्स, त्यांच्या मुलींची शाळा,परीक्षा याचा कुठेतरी मेळ बसत नव्हता व माझ्यामुळे कोणाला त्रास व्हावा अशी माझी बिलकुल इच्छा नव्हती. परीक्षेच्या काळात अभ्यासाला चांगला वेळ मिळणही गरजेचं होतं जो की तिथे मिळत नव्हता त्यामुळे मामांनी रूम शोधणं चालूच ठेवलं होतं. काही दिवसांनी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून एक खोली चांगल्या जागेत हवी तशी मिळाली. त्या खोलीचे मालकही ओळखीचेच असल्याकारणाने विश्वासाने मामांनी ती खोली फायनल केली होती. आता खोली तर मिळाली होती पण राहायला पार्टनर??? ती कुठून आणणार कारण ज्या मैत्रिणी होत्या त्यांचे पैसे आधी भरल्या कारणाने त्या राहती जागा सोडू शकत नव्हत्या. आता एकच पर्याय होता तो म्हणजे काही दिवस एकटे राहण्याचा.
एकट राहायचं तेही अनोळख्या जागी...आजूबाजूला अनोळखी वस्ती..कस शक्य आहे?? मी माझ्या मामांना घाबरतच म्हणाले असं कसं मी एकटी राहू??? दिवस कॉलेजमध्ये जाईल पण रात्र कशी काढू एकटी अख्या खोलीत?? मामांनी जरा हसत विचारलं "घाबरलीस?"
खरंतर मी घाबरले नव्हते पण तरीही आतापर्यंत फक्त एकटी राहण्याचा योग आलाच नव्हता...त्यात अचानक एकटेपणाच्या रोज वेग वेगळ्या पायऱ्या माझ्या वाट्याला येत होत्या आणि सुरुवातीला मला ते स्वीकारण जड जात होतं एव्हढंच. घाबरण,रडणं हे काही आपल्यासाठी बनलेल नाही एवढंच मला कळत होतं.... मी नाही घाबरत अस उत्तर देऊन पुन्हा तो बोरा बिस्तारा आवरला आणि गेले रूमवर. ज्यांची रुम होती ते खाली राहायचे व वरच्या तीन खोल्या त्यांनी भाड्याने दिल्या होत्या...त्यापैकी एका रूममध्ये तीन मुली राहायच्या ज्या डीएड करत होत्या पण नेमकी मी तिथे गेल्यावर त्या सुट्टीवर गेल्या होत्या. दुसऱ्या रूममध्ये मी राहणार होते व राहिली तिसरी रूम तर तिथे टेलरिंग काम चालायचं...म्हणजे शर्ट पॅन्ट शिवून मिळायचे. तिथे काम करणारे सगळे पुरुषच होते...दिवसभर काम करायचे व संध्याकाळी 7 ला घरी निघून जायचे. याचा अर्थ जेव्हा मी तिथे राहायला गेले तेव्हा माझ्या बाजूच्या दोन्ही रूममध्ये कोणीही नव्हतं...आता अशी रूम निवडलीच का असा विचार करत असाल तर एकतर तेव्हा रूम मिळत नव्हत्या आणि हे खोली मालक ओळखीचे व विश्वासातले होते त्यामुळे काही दिवस तिथे राहणं सेफ होतं.
रूमची चावी घेऊन रूम उघडली...खूप दिवस बंद असल्यामुळे जरा कुबट वास येत होता.दहा बाय दहा पेक्षाही रूमचा आकार कमी असावा..कोणतही किचन किंवा कोणतंही कपाट नसलेली ती फक्त चार भिंतींची एक रिकामी खोली होती...डाव्या बाजूला फक्त एक खिडकी होती ज्यातून मंद वारा आत येत होता...सगळीकडे अंधार पसरला होताजो मी लावलेल्या बल्बने नंतर दूर झाला. तसं रूम बघून भकासच वाटलं पण आता तेच माझं निवासस्थान होतं... त्या चार भिंतींना आपलंस करून मला तिथे राहायचंच होतं. सोबत आणलेलं सगळं सामान एका कोपऱ्यात ठेवलं. एकटी राहणार म्हंटल्यावर झाडू,बादली, जग सगळं जे काही आवश्यक साहित्य लागत त्याची खरेदी आधीच केली होती..मामांच्या भाषेत माझा संसारच सुरू झाला होता. फक्त हा संसार शिक्षणासाठी शिक्षणाचा होता. घरच्यांनी,आई बाबांनी सगळ्यांना तशी काळजी वाटत होती मी एकटी कशी राहीन पण सोबत त्यांना माहीतही होतं की सहसा मी हार मानत नाही आणि ठरवलेली गोष्ट पूर्णत्वास नेतेच त्यामुळे त्यांचा माझ्यावरचा तो विश्वास माझ्या सोबत पुरेसा होता. सामान ठेवून...डब्याची सोय करून अखेर इतका वेळ तरी सोबत असलेले मामा "नीट राहा,घाबरू नकोस, काही लागलं तर लगेच फोन कर" अशा बऱ्याच सूचना देऊन गेले.
आता त्या भकास रुममध्ये मी फक्त एकटीच.... मनात काही बाही न आणता सामान नीट जागेवर लावून घेतलं. घरच्यांचे फोन आळीपाळीने चालूच होते त्यामुळे फार काही वाटलं नाही...थोड्या वेळात जेवणाचा डबा आला...एकटीने जेवायची पहिलीच वेळ...घास घशाखाली उतरत नव्हता पण पुन्हा आजारी पडायचं नव्हतं...कॉलेज,शिक्षण महत्वाचं होतं त्यामुळे कसंबसं जेवण संपवलं. त्यावेळी फोनही keypad चा असल्यामुळे आता सारखं नेटपॅक मारून विडिओ बघ,पिक्चर बघ असा टाईमपासही करता येत नव्हता..लॅपटॉपही नव्हता. मोबाईलवर असलेली गाणी ऐकत कसतरी वेळ घालवणं चालू होतं.. थोडा वेळ सबमिशन्सची फाईल खरडण्यात वेळ घालवला पण आपण एकटे आहोत ही जाणीव वारंवार मनाला बोचत होती. बाहेरचा अंधार वाढत होता तस मनातलं काहूरही दाट होत होतं... कोणत्या मैत्रिणींशी फोनवर गप्पा माराव्या तर आतासारखं फ्री कॉल नव्हते..बाहेर राहायचं म्हंटल की प्रत्येक पै पैचा हिशोब ठेवावा लागायचा त्यामुळे आता फक्त मैं और मेरी तन्हाई हे मनाशी पक्क केलं होतं. कधी गाणं गुणगुणत कधी त्या चार भिंतींशी बोलत कधी जुन्या आठवणीत रमत,हसत वेळ घालवणं चालू होतं.
रात्रीचे दहा तर वाजून गेले होते कसेतरी.. झोप येत नव्हती पण झोपणं गरजेचं होतं कारण सकाळी लवकर उठून कॉलेज गाठायचं होतं. अंथरून टाकून कसतरी त्यावर पडले...रुमच छत आकाशा सारख भासवून चांदण्या आणि चंद्र यांची मैफिल सुरू केली. आता त्यांच्याशी गप्पा सुरु झाल्या. कोणी येईल किंवा आपल्याला काही धोका असेल..आपल्यासोबत काही विपरीत घडेल अशी भीती अजिबातच वाटली नाही...कदाचित पोलिसाची मुलगी असल्या कारणाने रक्तातच तो धडाडी पणा जन्मतःच आला होता...काही वाईट प्रसंग ओढवलाच तर कसं सामोरं जायचं याची तयारीही घरच्यांनी करून घेतली होती.. घरापासून लांब एकट राहायचं म्हंटल की ती हिंमत स्वतःमध्ये आणण गरजेचं असतंच..त्यामुळे भीती अशी वाटत नव्हती पण एकटी आहे ही जाणीव मनाला त्रास देत होती. पहिल्याच रात्री आता पुढचा एक महिना मी कस एकटी राहणार?? जमेल का आपल्याला की पळून जावं इथून असे नको नको ते विचारही डोक्यात आले पण माझ्या सकारात्मक विचारांनी यावर ताबा मिळवला. खूप शिकायचं..स्वतःच्या पायावर उभं राहायचं..स्वतःची वेगळी ओळख बनवायची हे स्वप्न उराशी बाळगून मी घराबाहेर पडले होते...तेच स्वप्न डोळ्यासमोर ठेवलं आणि स्वतःला समजावलं संकट येतील आणि जातीलही..स्वप्न पूर्ण करायचंच..घरच्यांना अभिमान वाटेल अशी गोष्ट करायचीच.
बाहेर किड्यांचा किर्रर्र आवाज, मध्येच कुत्र्याचं भुंकण, भेसूर रडणं माझ्या संकल्पाला हरवायचे प्रयत्न करायचे...शेवटी एकटे पणाने झोप तर उडवलीच होती...मन डळमळीत व्हायला नको म्हणून कानात हेडसेट घालून गाणी ऐकत झोपायचा प्रयत्न करू लागले. गाणी ऐकत कधी झोप लागली कळलंही नाही दुसरा दिवस उजाडला.
खिडकीतून सूर्य किरणांची तिरीप चेहऱ्यावर पडून प्रसन्न अशा वातावरणात मला जाग आली. पक्ष्यांची किलबिलाट कानी पडताच रात्रीतल ते एकटेपण कुठेतरी गायब झालं... आरश्यातल्या माझ्याच हसऱ्या चेहऱ्याने माझा दिवस सुरू झाला...एव्हाना स्वतःची काम वेळेत आवरण्याची सवय झाली होती.. सगळं आवरून,डबा घेऊन रोजच्या आनंदात कॉलेज गाठलं. मैत्रिणींना मी नवीन रुममध्ये शिफ्ट झाल्याचं व एकटीच राहत असल्याचं सांगितलं. सगळ्यांचा एकच प्रश्न की कशी राहिलीस??? घाबरली नाहीस??? रडलीस का??? खरच ग तू ग्रेट आहेस. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मलाही काही काळ वाटलं मी ग्रेट आहे..पुढेही नक्कीच मी तिथे एकटी राहू शकते असा विश्वास पटला आणि माझी आणि त्या खोलीची मैत्रीचं झाली.बाजूला मुली राहायला आल्या तरी त्यांचं आणि माझं टायमिंग वेगळं होतं त्यात त्या चार दिवस असणार तर आठ दिवस गायब त्यामुळे माझं "ऐकला चलो रे" हेच चालू होतं. महिना दीड महिना तरी मी तिथे एकटीने वास्तव्य केलं...पाच पर्यंत कॉलेज करून पुन्हा सात साडेसात पर्यंत क्लास करून एकटी अंधाऱ्या रस्त्याने चालत रूमवर पोहचले पण मनात भीती कधीच वाटली नाही. हळूहळू जाणवणारा एकटेपणाही दूर झाला.
तर असा विलक्षण,अविस्मरणीय माझा पहिल्यांदा एकटी राहण्याचा अनुभव पुढे आयुष्यात खूप महत्त्वाचा ठरला व आजही ठरतोय. यासाठी मी माझ्या घरच्यांचच कौतुक करेन की त्यांनी मला इतक्या संकटात शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं.. तुला नाही जमत तर तू परत ये असे कधीच म्कधीच म्हंटले नाहीत किंवा मुलगी आहे म्हणून पायात बेड्या घालून चार भिंतीच जगायलाही नाही शिकवलं. एक माणूस म्हणून स्वतःच अस्तित्व सिद्ध करण्याची वेळोवेळी संधी दिली. माझ्या पंखाना बळ देऊन त्यांना उंचच उंच भरारी घेण्यासाठी सक्षम केलं...स्वावलंबी केलं. काट्यातुनच फुलांचा जन्म होतो तसं यशही काटेरी वळणावरूनच चालत आपल्याजवळ येतं... आपल्याला तुला वळणावर घाबरून न जाता आपलंस करून जिंकता यायला हवं. माझ्या सोबत घडणाऱ्या सगळ्याच पहिल्या वहिल्या गोष्टी मग ते इंजिनिअरिंग साठी घरापासून लांब राहणं असो की एकटी राहण असो किंवा मी घेतलेलं पहिलं education loan असो वा मग ते loan स्वतः फेडल्याचा पहिला अनुभव असो सगळंच खूप भारी होतं आणि वेळोवेळी माझ्यातल्या क्षमतांना विकसित करणार होतं... कदाचित या अनुभवांमुळेच आज कोणततीही कठीण परिस्थिती समोर उभी ठाकली तरी मी माझ्या हिंमतीवर ती दूर करू शकते हा आत्मविश्वास माझ्यामध्ये दृढ झाला. आयुष्यातील नवीन आयाम नवीन रंग निर्भर होऊन जगायला शिकले.
...................
माझा एकटी राहायचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व तुमचेही अनुभव ऐकायला आवडतील. लेख आवडल्यास लाईक कॉमेंट्स नक्की करा आणि शेअर करा फक्त नावासहितच. लेखाच्या वितरण व प्रकाशनाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव. निनावी शेअर केल्यास किंवा लेखिकेचे नाव वगळून शेअर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
