जीव लावजोल ताई
जीव लावजोल ताई


२१ मार्च या जागतिक वनदिना निमित्तान
जीव लावजोल ताई...
आज पाऊस खूप जोरात बरसत होता...
रेडिओवर जूनी गाणी, जाहिराती... एकच लक्ष्य ११ कोटी वृक्ष लागवड वैगरे...३३ कोटी..२०१९.
टिव्हीवर...पावसामुळे लोकल सेवा ठप्प वैगरेच्या बातम्या...
त्यात आमचं ' डिजिटल टेक्नोलाँजी' , 'डिजिटल व्टिन', 'हाऊ इटस् चेंजीग करंट मार्केटिंग ट्रेंड'..वरचा अभ्यास.. हो अभ्यासच चालू होता...
पण अभ्यासात लक्ष कसे लागेल?
पावसात भिजलेल्या मातीचा सुगंध नाकात दरवळत होता!
लहान असताना अशी ओली माती बोटोने श्रीखंड खावे तसे खाल्लेले आठवले!!
मज्जा होतीनं... न लाजता पाहिजे तसे वागण्यात!
खिडकितून बाहेर डोकवले तरं तजेलदार हिरवी पाने, त्यावरुन मोती ओघळत आहे असा भास!
काही पानांत पाण्याचे थेंब अडकलेले..
काही झाडांवर पक्षी किलबील करतात...
हिरव्या पानांच्या वेगवेगळ्या छटा.
मनाने डिजिटल पटलावरच्या खिडकीतून कधीच भुरकन भरारी घराच्या खर्या खिडकी बाहेरचे जग पाहण्यासाठी घेतली होती.
पाऊस थांबण्याचा अवकाश...
पावसाचा जोर थोडा कमी झाला... थेंब थेंब पाऊस पडतच होता...
माझी पाऊले कधी घरातुन आंगणात आली हे कळले पण नाही...
मग प्रत्येक झाडापाशी जाऊन त्यांच्याशी हितगुज सुरू झाले. कधीपासुन ते झाड आपल्या अंगणात आहे, कसे आले कोणी दिले वैगरे...
ऐका झाडापाशी पाऊले आपोआपच थांबली, ते झाड कसे आपल्या घरी आले याची आठवण झाली...
मी वन खात्याच्या सरकारी उद्यानात मी शोधत असलेले एक झाड नक्की मिळेल या आशेने गेली होती...
तिथे असलेल्या अधिकार्यांना मोबाईल मधला फोटो दाखवला.
त्यांना त्या झाडाबद्दल काही माहिती नव्हती...
पण तिथल्या २-३ माळी काकांनी...हळुहळू उद्यानाची माहिती सांगायला व दाखवायला सुरूवात केली...
मला हवे असलेले झाड त्यांच्याकडे नव्हते. ते तीथे मिळणार सुद्धा नव्हते...पण तरी माळी काकांना नाही म्हणता आले नाही...त्यांच्या बरोबर चालु लागले!
आधी एकदाच या उद्यानात बाबांबरोबर आले होते. १९७९-८०साली बाबांनी त्यांच्या सहकार्यांबरोबर ह्या उद्यानाचा अभ्यासपूर्ण आराखडा आखला होता. व छान झाडे लावले होते...विपश्यनेचे गोयंका सर उद्दघटनाला आले होते.
माळी काका एक एक करून झाडे दाखवीत होती व मी पण मला झाडांमधले खूप समजत ह्या अविर्भावात त्यांच्याशी संवाद साधत होती.
नक्षत्रवृक्षांसाठी आधी हे उद्दान नावाजलेले होते...
त्यानी ते पण दाखवले...ताई आता तशी चांगली निगरानी नाही होत. माणस कमी पडतात...लई झाड हायती येथं...त्या वरच्या अंगाला...आन् त्या खालच्या अंगाला झाडच झाडं हायती...हाताच्या इशाराने ते मला समजुन सांगत होते... व मला समजले कि नाही हे काही प्रश्न विचारून पडताळुन पाहत पण होते.
लई काम होतात ... आम्ही दोघच निगरानी करतो... आंब्याचे ५-१० तरी प्रकार असतील बघा...हे अशोकाचे...त्याचे भी ५-१० प्रकार... काही खूप उंच होतात काही नाही...
येथं मोर भी येतात... खूप पक्षी पण...
हा..वन औषधीचा विभाग... हे ह्या रोगावर वापरतात... ते दोघेही माळी काका मन लावुन माहिती देत होते पण माझ्यातलाच त्राण कमी होत होता... जवळपास २-३किलोमीटर फिरले असेल मी आज...
अजुन काही विभाग बघायचे होतेच!
थोड चालल्यावर बोनसाय विभाग लागला... त्यातली वडाची २-३झाडे खूप छान दिसत होती... पारंब्या, लाल लाल छोटी लागलेली फळे...
संत्र, लिंबुची झाडे...
नंतर...
हरित..हिरवी जाळी लावुन तयार केलेले शेड .हा आता नविन केलेला विभाग आहे...ह्यात लैई झाड आहै...जास्त जागा नाही लागत, पाणी भी उलुस लागत...म्हणजे कमी लागत...ते काय म्हणाले हे समजुन मान हलवली...
मनात आलं आज माळी काका स्वतःहुन सगळी माहिती देतात, आपल्या बरोबर फिरत आहे, इतर वेळी जागचे उठत असतील कि नाही कोण जाणे.
छान पण वाटत होत त्यांच्या बरोबर झाडांची माहिती घेतांना!
बोलता बोलता त्यांनी माझी माहिती घेतलीच होती... जमिनीत लावता येणार्या मोठ्या झाडांसाठी माझ्या कडे जागा नाही... छोट घर आहे. कुंडीत लावलेली छोटी झाडे आहे...
दोघेही माळी काका खाली जमीनीवर बसुन गप्पा मारत बसले...मी थोड्यावेळ शांत उभे राहून झाडांवर नजर टाकत होती...
मी ऐका झाडाकडे बघत होती..तर एक माळी काका बसल्याच ठिकाणाहुन माहिती सांगायला लागले. हे झाड जास्त उंच नाही होत १२-१५ फुट, कुंडीत लावता येईल...मी फक्त मान हलवली. चांगल झाड आहे असे त्यांना म्हटले.
जवळपास सगळ बघुन झाले होते. त्यांचे आभार मानुन, मी माघारी फिरले तसे एक माळी काका उठून उभे व मानेन व हाताचा थांबा असा इशारा केला...
मी कुतूहलाने अजून काय राहिले असा प्रश्नार्थी चेहरा केला...
मघा दाखवलेल्या झाडाचे एक रोपटे घेऊन आले व माझ्या हातात दिले... नागकेसराच हाय...कुंडीत लावता येईल..
कितीच आहे म्हणून विचारले तर सांगितले नाही...
तुम्हाला तुमचे साहेब रागवतील नं, मला फुकट झाड दिल तर...
मानेनच नाही म्हटले...
हातात रोपट घेवुन मी १०-१५ पावले पुढे आली तर परत त्यांनी थांबवले... मी थांबले तीथे एक नळ होता मला पहिले दिसला नाही.. माळीकाकांनी माझ्या हातातल रोपट घेतल व त्याला थोड पाणी दिले व रोपटे परत माझ्या हाती देताना एक दिवसा आड थोडं थोडं पाणी द्याल ताई, जीव लावजोल ताई झाडाले...
आपल्या पोरीला दुसर्याच्या हाती देतांना कस वाटत असेल, तसे भाव माळी काकांच्या डोळ्यात दिसले.
मी नको म्हणत असतांना ही दोन्ही माळी काका मला गेट पर्यंत सोडायला आले... गेटच्या त्या दुसर्या भागात नविन झालेले फुलपाखरू उद्यान आहे. पण त्याकडे आम्ही निगरानी नाय करतं, दुसरी माणस ह्या तीकडं...
गाडीवर ते रोपटं ठेवून दिलं, मी त्यांना परत पैसे देवू केले पण नाही घेतले त्यांनी..
त्यांचे परत आभार मानुन, मी गाडी सुरू करून निघाले... रोपटे तर घेतले पण ते लावणार कुठे ह्याचा विचार करत मी घरी पोहचले...
तर आई एका कुंडीतले झाड खराबं झाले होते ते काढून, नविन दुसर झाड लावण्यासाठी कुंडीत नविन माती टाकुन ठेवत होती...
माझ्या हातातलं झाड बघुन तीने पण लागलीच कुंडीत लावलं. झाड मोठ झाले की दुसर्या कुंडीत लावु...
तीला पण माळी काकांचे 'जीव लावजोल ताई झाडाले' हे वाक्य सांगितले... तीने पण फक्त स्मित हास्य दिले व म्हटली हे तत्व सगळ्याच गोष्टींसाठी लागु पडतं...
आता दोन वर्ष होत आले... झाड चांगल वाढले आहे... आईच सगळ्या झाडांची काळजी घेते खरतर...
आता माझ्या नाकात चहाचा वास दरवळत होता... कारण आईने चहा घेण्यासाठी हाक मारली होती!!!
व मनात, आताच्या डिजीटल युगात एवढ्या मायेने, आपुलकीने माहिती कोण देणार?, गुगलले तर खूप सारे माहितीचे स्त्रोत मिळतील, पण त्यात आपलेपणा नसेल... झाडांचा अनुभव त्यांच्या सानिध्यात वेळ घालवला तर नीट समजेल, उमजेल... काय? खरे आहे नं?