Dr Ashwini Alpesh Naik

Romance

3  

Dr Ashwini Alpesh Naik

Romance

झिलमिल सितारों का आँगन होगा...

झिलमिल सितारों का आँगन होगा...

7 mins
242


ही गोष्ट आहे माझी , अल्पेशची ( माझ्या नवऱ्याची ) आणि आमच्या घराची.


मला टीपिकल अरेंज मॅरेज करायचं नव्हत, ' तुम्ही पत्रिका बघा, फॅमिलीशी बोलू घ्या पण तो कांडेपोह्याचा कार्यक्रम होण्याआधी मी मुलाला भेटेन, योग्य वाटलं तरच पुढे जाऊ', हे मी आधीच सांगून ठेवलं होत.. माझ्या घरच्यांना ही या गोष्टीचा काही प्रोब्लेम नव्हता. झी मराठीच्या तुमचं आमचं जमलंच्या माध्यमातून अल्पेशच स्थळ आल. पत्रिका जुळली. फोटोसुद्धा ठीक वाटला. घरच्यांचं फोनवर बोलणं झालं. आता पुढे आम्ही भेटायचं ठरवलं.


मी राहायला सांताक्रुझला तर अल्पेश विरारला. त्यावेळी मी खार वेस्टच्या राम कृष्णा मिशन हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत होते तर अल्पेश ठाण्यात जॉबला होता. अशी सर्व विरुद्ध टोकं असताना विकडेज मध्ये भेटणं शक्य नव्हत. आम्ही रविवारी भेटायचं ठरवलं. भेटण्यापूर्वी चार दिवसांचा काळ मध्ये होता. मेसेज आणि फोन कॉल्स वर थोडफार बोलणं होत होत. रविवारी एखाद तासात उरकेल सर्व अस कुठेतरी आम्हाला मनोमन वाटत होत. आम्ही भेटलो.. चार तास कसे गेले ते आम्हालाच कळलं नाही. पहिल्याच भेटीत मला तो आवडला आणि त्याला मी...


"मला परत भेटायला आवडेल तुला.." तो मला म्हणाला.. 


"मलाही आवडेल.." , मी त्याला सांगितले.. 


आमच्या घराच्या मंडळींनी आमच्या पहिल्या भेटीत नंतरच आमचा होकार गृहीत धरला होता. कारण आम्ही दोघही कुठल्याच दुसऱ्या स्थळा सोबत अर्धा तासाच्या वर भेटून बोललो नव्हतो. दुसऱ्या भेटीपर्यंत तर गाडी गेलीच नव्हती.. अजून दोन भेटी झाल्या.. आणि मग आम्ही आमचा होकार घरच्यांना सांगितला.  


"विरार बरच लांब आहे.. तुझ पक्क ठरलं आहे ना.. नाही तर अजून स्थळ बघू शकतो आपण.. " माझे पप्पा मला म्हणाले..


पण माझं ठरलं होत. माझ्या जोडादरात जे मी शोधत होते ते सार अल्पेश मध्ये होत. पुढे जाण्याआधी माझे पप्पा अल्पेशला भेटले.. आणि त्याची मनाची धाकधूक थांबली. त्यांनाही पहिल्याच भेटीत तो आवडला.. कधीही लोकल ट्रेन मधून ट्रॅव्हल न करणारी मी अगदी विरारसाठी कशी तयार झाले याचं उत्तर त्यांना सापडलं..आमचे पालक एकमेकांशी बोलले.


अल्पेशच्या घरच्यांची अट होती..औपचारिक कांदे पोह्याचा कार्यक्रम होण्याआधी मी त्यांना येऊन भेटावे.. त्याचे आई बाबा माझ्या आई पप्पांशी तस बोलले.. आणि मग फायनली मी विरारला आले. 


खरतर विरारला तस पूर्वी येण्याचा विशेष संबंध नव्हता. विरारची गर्दी.. लांब पल्ल्याचा प्रवास अस सारं ऐकून होते मी.. पण मी जेव्हा इथे आले तेव्हा मला विरार वेगळं वाटलं.. स्टेशन जवळचा परिसर सोडला तर जास्त गर्दी नाही.. मोठे रस्ते.. हिरवळ.. आणि सर्व सुख सोयी पण सोबतच थोडासा गावाकडचा फील.. सांताक्रुझ , खार ,बांद्राच्या गर्दीत सतत फिरणाऱ्या , सगळीकडे गर्दी, धक्का बुक्की, चालयला सुद्धा पुरेशी जागा नाही, छोटे रस्ते.. हे सर्व अनुभवलेल्या मला विरार फार आवडलं.. त्यातच सुंदर अस आमचं कॉम्प्लेक्स.. विरार गार्डन.. इथे पहिल्यांदा आले तेव्हा वाटलं.. खरंच घर अशा ठिकाणी असावं. दिवस भर खूप काम करून थकून घरी आल्यावर अशी शांतता असावी.. 


अल्पेशच्या घरच्यांना भेटले.. मला ते आवडले.. त्यांना मी.. अल्पेशने अमेरिकेहून भारतात परत आल्यानंतर त्यांच्या राहत्या घरासमोरचा फ्लॅट गुंतवणूक म्हणून विकत घेतला होता. तिथे कधी राहायचं की नाही हा विचार कधीच त्याने केला नव्हता. ' लग्नानंतर बोरिवली पर्यंत शिफ्ट होऊ शकतो आपण तुला हवं असेल तर', हे त्याने मला आधीच स्पष्ट केलं होतं. त्याच्या आई बाबांची ही त्यात काहीच हरकत नव्हती. पण मी जेव्हा इथे आले तेव्हा मला हे घर आवडल.. थोडा प्रवास वाढेल.. पण एक शांती असेल.. सोबतच आई बाबा आणि त्याच्या ताईची फॅमिलीही शेजारी असेल मग ' इथून नको शिफ्ट होऊया.. नंतर कधी वाटल तर बघू ', असे म्हणून आम्ही विरारमध्येच राहायचं ठरवलं.. पुढे रीतसर कांदे पोह्याचा कार्यक्रम झाला. श्रावणातल्या पहिल्या दिवशीच आमचा साखरपुडा झाला.. लग्नाचा मुहूर्त चार महिन्यानंतरचा निघाला.. 


रिकामी फ्लॅटच आता घर करायचं होतं. 


"मला तुझ्या आवडीनिवडी नुसार घर तयार करायचं आहे ", अल्पेश म्हणाला.. 


त्याच्या मला तू आवडतेस या वाक्यापेक्षा ही हे वाक्य मला जास्त भावल..


दोघांसाठीही हा अनुभव नवीन होता. मदतीला घरचे होते.. पण तुम्ही ठरवा नक्की तुम्हाला काय करायचं आहे असेच त्यांचे म्हणणे होते. 


दोन बेडरूम , स्टोअर रूम, हॉल , किचनचा फ्लॅट.. पण राहणारे दोघच.. म्हणून मग आता जेवढी गरज आहे तेवढंच फर्निचरच काम करूया हे ठरलं.. मास्टर बेडरूम , किचनच काम पूर्ण करून घ्यायचं हे ठरलं.


अल्पेश खूप व्यवहारी.. प्रत्येक पैशाचा हिशोब असतो त्याच्याकडे.. एक रुपयाही फुकट जाऊ देत नाही... घरच्या कामातही त्याने त्याचे शंभर टक्के दिले.. बजेटमध्ये पण बेस्ट हे त्याचं धोरण.. त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर सोबत तो दिवस दिवसभर फिरायचा. प्रत्येक गोष्ट स्वतः जाऊन सिलेक्ट करायचा. मला शनिवार रविवार वेळ मिळाला की मी इथे यायचे.. फर्निचरच काम झाल.. टॉयलेट बाथरूम तयार झाले.. आता काम होत भिंती रंगवण्याच. रंग निवडायचं, रंग संगती, त्यावर कुठलं स्टेन्सिल वापरायचं , त्या नुसार पडदे.. हे सर्व काम माझ्या वाटणीला आल. 


हे सर्व काम फोन वरून सुरू होत आमचं.. घरासोबत लग्नाची खरेदी ही सुरू होती. कुठे कुठले रंग माराचे , त्यावर काय डिझाईन असावं हे माझे आधीच ठरले होते. 


एके दिवशी गंमत झाली. मी हॉलला मारायला सांगितलेल्या रंगाचा कोड आणि प्रत्यक्ष तो रंग यात फरक होता. अल्पेश त्या दिवशी वर्क फ्रॉम होम करत होता. पेंटरने त्याला विचारले. अल्पेश गोंधळाला.. त्याने मला फोन लावला.. मला पॉसिबल होईल तेवढं मी फोन वरून सांग्याचा प्रयत्न केला. पण पेंटर चा एक वेगळाच गोंधळ सुरू होता. अल्पेश वैतागला.. 


मी म्हटल " मी येऊ का.. ?" 


अल्पेश म्हणाला, " प्लिज शक्य असेल तर येच.. "


"‌माझे डुटी अवर संपले की मी लगेच निघते " असे त्याला सांगितले. आणि माझा फोन बंद झाला. चार्जर घरी होते. घरी कळवल नव्हत. विरार पर्यंत जायचं.. फोन बंद ठेऊन चालणार नव्हत. मी विचार केला घरी जाते. फोन थोडा चार्ज करते. आणि लगेच निघते. मी तसेच केले. घरी जाऊन फोन चार्जिंगला लावला. 


तोच अल्पेश चा कॉल आला." तू निघालीस का.. ?"


मी झालेला प्रकार त्याला सांगितला.. 


तो थोड चिडून म्हणाला.. "एक काम कर आता नको येऊ.. "


मी विचारले " का..? "


तर त्याच एकच सांगणं.. " नको येऊ.. मी कामात आहे फोन ठेवतो.. "


मला पण राग आला. मी म्हटल ठीक आहे नाही जात आता.. मी सरळ झोपून गेले. संध्याकाळी उठल्यावर मलाच वाईट वाटले. ऑफीसच काम, घराचं काम, लग्नाची तयारी.. सर्व गोष्टी तो एकटाच पाहत होता. मी फक्त शनिवार रविवार जात होते आणि फोन वरून सांगत होते. मला समजून घ्यायला हवं होतं हे मला जाणवलं.


मी त्याला फोन केला.. सॉरी म्हणाले. त्याचा आवाजात अजूनही नाराजीचा सुर होता. किती काम झाल मी विचारलं.. आज काहीच झाल नाही .. अस तो म्हणाला. शेवटी त्याची नाराजी दूर करून ज्या दोन कलर कोड मध्ये आम्ही कन्फ्युज होतो.. त्यातला एक फायनल केला. पेंटरसाठी सर्व गोष्टी एका पेपर वर लिहून दुसऱ्या दिवशी अल्पेश ऑफिसला गेला. संध्याकाळी घरी आल्यावर त्याने मला फोन केला. मास्टर बेडरूमच्या कलरच काम झाल. उद्या दुसरा बेडरूम पण पूर्ण होईल अस त्याने मला कळवल. 


त्याच्या पुढच्या दिवशी तो घरूनच काम करणार होता. म्हणून मग मी सरप्राइज विसिट द्यायचे ठरवले. एकतर घरातलं काम बघता येईल आणि दुसर म्हणजे अल्पेश किती ही नॉर्मल वागत असला तरी थोडा नाराज होतच हे मला जाणवत होत. ठरल्या प्रमाणे मी विरारला घरी आले. मला अस अचानक आलेलं पाहून अल्पेश खूप खुश झाला. फ्रेश होऊन मी आमच्या घराचं काम पाहायला गेले. आणि समोरच चित्र पाहून त्या पेंटर वर ओरडलेच. 


जो रंग मास्टर बेडरूमला द्यायचा होता तो रंग दुसऱ्या बेडरूमला दिला होता. आणि दुसऱ्या बेडरूमचा रंग मास्टर बेडरूमला.. खूप वैतागले.. अरे अस कसं झालं.. म्हणून अल्पेश पण गोंधळला. पेंटरने त्याच्य खिशातून अल्पेशने त्याला लिहून देलेले रूम नुसार कलर कोडची चिट्टी काढली. त्याने त्यानुसार काम केलं होत. अल्पेशने चुकून कलर कोड वर खाली केले होते. जो कलर मी मास्टर बेडरूमसाठी निवडला होता त्याच्या जागी अल्पेशने चुकून दुसऱ्या बेडरूमसाठी निवडलेल्या कलरचा कोड लिहिला. मी त्या पेंटरची माफी मागितली.. पण आता चूक दुरुस्त करायची वेळ नव्हती . आधीच आमच्या हातात खूप कमी वेळ होता. आणि काम खूप.


"मी करतो काही तरी.." अल्पेश म्हणाला.. 


"अरे नको आता.. जे आहे ते छान वाटतंय.. पुन्हा जेव्हा पेंट करू तेव्हा बघू.. फक्त आता या नुसार पडद्यामध्ये बदल करावा लागेल.." मी म्हणाले.. 


थोडा वेळ रेंगाळून अल्पेश मला सॉरी म्हणाला.." त्या दिवशी तुला ये म्हणून सांगायला हवं होतं.. हा एवढं गोंधळ नसता झाला.. खरंच सॉरी.. "


"सॉरी अरे.. चूक तुझ्या एकट्याची थोडीच आहे.. तू नाही म्हणाला तरी मला यायला पाहिजे होत. मी पण राग धरून बसले.. "


पण या घटनेनंतर आम्हाला चांगलाच धडा मिळाला.. आम्ही घरातली सर्वच काम एकत्र करतो.. काही पटलं नाही तर एकमेकांना सांगतो.. पण रागावून बसत नाही.


घरात लागणारी एक एक वस्तू आम्ही दोघांनी एकत्र घेतली. झाडू पासून ते साबण पर्यंत.. एसी पासून ते टीव्ही पर्यंत अगदी सर्व.. लग्नानंतर गोंधळ नको म्हणून माझे सामान एक आठवडा आधीच शिफ्ट करायचा सल्ला माझ्या नणंदने दिला. मी तसेच केले. माझ्या माहेराहून सामान आणण्यापासून ते लावण्यापर्यंत सर्व कामात घरातल्या सर्वांनी मदत केली. आमचं घर सेट झाल. 


त्याचं दिवशी अल्पेशने मला घराच्या किल्ल्या दिल्या.. आणि म्हणाला.. " मालकीण बाई हे घ्या .. माझं काम झाल.. आता या घरात काय करायचं ते तुम्ही ठरवा.. मी आता खूप थकलो आहे.. तुमच्या घराचं ताबा घ्या आता.."


त्याचे ते शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आले.. माझ्या मैत्रिणी मला लग्न ठरल्यापासून नेहमी म्हणायच्या," तू खूप लकी आहेस.. तुझ घर लग्नानंतर कस असावं हे तुला लग्नाआधीच ठरवता येत आहे.." 


खरंच मी खूप लकी होते आणि आहे.. 


आठवड्यानंतर आमचं लग्न होत. खूप वेगळ्या आणि समिश्र भावना होत्या.. 


आमचं लग्न होऊन आता अडीच वर्ष झाली.. पण आजही ते क्षण आम्हा दोघांसाठी खूप खास आहेत.


जेव्हा पण मी आमच्या नात्याचा आणि घराचा विचार करते तेव्हा एक गाणं नेहमी माझ्या मनातल्या रेडिओ वर लागतं.


झिलमिल सितारों का आँगन होगा

रिमझिम बरसता सावन होगा

ऐसा सुंदर सपना अपना जीवन होगा

झिलमिल सितारों का आँगन होगा ...


प्रेम की गली में एक छोटा सा घर बनाएंगे

कलियाँ ना मिले ना सही काँटों से सजाएंगे

बगियाँ से सुंदर वो बन होगा

रिमझिम बरसता सावन होगा...


तेरी आँखों से सारा संसार मैं देखूँगी

देखूँगी इस पार या उस पार मैं देखूँगी

नैनों को तेरा ही दर्शन होगा

रिमझिम बरसता सावन होगा...


फिर तो मस्त हवाओं के हम झोके बन जाएंगे

नैना सुन्दर सपनों के झरोखे बन जाएंगे

मन आशाओं का दर्पण होगा

रिमझिम बरसता सावन होगा...


Rate this content
Log in

Similar marathi story from Romance