तिचे साैंदर्य - भाग २
तिचे साैंदर्य - भाग २
तिने डोळे उघडले तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती. असंख्य वेदना होत होत्या तिला.गुडघ्यापासून ते पोटापर्यंतचा भाग, उजवा हात, तसेच चेहेऱ्याच्या उजव्या बाजूचा थोडा फार भाग भाजला होता. शेजाऱ्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये आणले होते हे तिला डॉक्टर्सकडून कळाले. सध्या घरातल्या कोणालाच भेटायची परवानगी नव्हती. तिने सर्वात आधी विचारले,'माझा नवरा कुठे आहे?' डॉक्टरने सांगितले,"तुमचे सर्व कुटुंबीय बाहेर आहेत. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला थोडं बरं वाटलं की त्यांना भेटायची परवानगी देऊ आम्ही. आता तुम्ही फक्त आराम करा." डॉक्टरने दोन दिवसांनंतर नरेशला अनुराधाला भेटायची परवानगी दिली. त्या आधी सर्व दुरूनच तिला पाहत होते. नरेश आत आला. अनुराधा थोडी गुंगितच होती. औषधांमुळे तिला थोडी गुंगी आली होती. नरेशला पाहून तिला खूप बरं वाटलं.
ती त्याला म्हणाली,"बरं झालं तुम्ही आलात... खूप कंटाळा आला आहे मला इथे.. तुम्ही रागावलात का माझ्यावर? खरच सॉरी..., या पुढे अशी चूक नाही होणार.. मला नाही कळलं नक्की काय झालं ते,.. मी खुप घाबरले होते..., घराचं पण बरंच नुकसान झालं असेल ना.." ती बोलतच होती.. पण नरेश मात्र शांत होता. तिचा चेहरा आता पूर्वीसारखा नव्हता राहिला. त्याला आवडलेली अनुराधा नव्हती आता ती. "काय झालं आहे, बोला ना माझ्याशी.. काही तरी बोला".. अनुराधा म्हणाली त्याला.. त्यावर तो म्हणाला,"तू आराम कर, बोलू आपण नंतर..",आणि तो निघून गेला.. तो गेला तो परत कधी फिरकलाच नाही.. दोन महिन्यानंतर अनुराधाला हॉस्पिटलमधून सुट्टी मिळाली. या दिवसात नरेश तिथे आलाच नाही. अनुराधा सतत आई बाबांना विचारात असे नरेश कुठे आहे. पण ते काही ना काही उत्तर तिला देत असत. हॉस्पिटलमधून निघाल्यावर अनुराधाला आई बाबा माहेरी घेऊन गेले. अनुराधा बुचकळ्यात पडली. ती आईला म्हणाली,"मला इथे का आणले?.. मला माझ्या घरी सोडा.. नरेश वाट बघत असेल माझी." आईला त्यावर रडू आले." आई अचानक काय झाले तू का रडत आहेस?. अनुराधाने विचारले. बाबांनी परत काही तरी वेगळेच उत्तर दिले. पण या वेळी आईला रहावले नाही. आई म्हणाली,"पुरे झाले आता.. खरं काय आहे ते सांगू टाका आता तिला.. किती दिवस अस खोटं बोलणार आहोत आपण".. अनुराधाला काही कळेना. "नक्की काय झालं आहे.?.". तिने दोघांनाही प्रश्न केला..
आई रडत म्हणाली,.." नरेशला आता तुझ्यासोबत राहायचं नाही.. संसार करायचा नाही.."
"पण का अनुराधाने विचारले..?" आई बाबांकडे या प्रश्नच उत्तर नव्हते. अनुराधाला विश्वास बसत नव्हता..
ती आईला म्हणाली," तुमचा काही तरी गैरसमज झाला आहे.. नरेशचे माझ्यावर खूप प्रेम आहे.. तो नाही राहू शकत माझ्याशिवाय.. मला त्याला भेटायचे आहे.. मी जाते आता घरी.. मला माझ्याघरी जायचे आहे.. "आणि ती निघाली..
बाबा तिला अडवायला गेले.. पण आईने बाबांना सांगितले," जाऊ दे तिला.. तिच्या प्रश्नाचं उत्तर तोच देऊ शकेल.. आपण तिच्या मागून जाऊ.. जेणेकरून ती तिथून निघाल्यावर आपण तिच्या सोबत तरी असू.. "
अनुराधा घरी पोहोचली.. तिने दारावराची बेल वाजवली.. नरेशने दार उघडले... तिला पाहून त्याच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.. नरेशच्या देहबोलीमध्ये आलेला फरक अनुराधाला जाणवत होता.. "आत नाही बोलवणार का?.." तिने विचारले."
हो ये ना.." नरेश म्हणाला.
"आई बाबा म्हणत होते तुम्हाला आता माझ्यासोबत राहायचं नाही.. मी त्यांना सांगितलं, तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. नरेश माझ्य
ाशिवाय राहूच शकत नाहीत.. हॉस्पिटलमध्ये तुम्ही आला नाहीत कारण मला माहित आहे तुम्हाला माझी ती अवस्था बघवत नव्हती.. तुमचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की तुम्ही मला त्रासात नाही बघू शकत.. हो ना..?"
नरेशने अनुराधाला बोलताना मध्येच रोखले आणि तो म्हणाला.. "तुझे आई बाबा अगदी बरोबर म्हणाले तुला.." अनुराधाचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता.. ती अवाक् होऊन नरेशकडे पाहात होती.. पुढे तो म्हणाला, "हो अगदी बरोबर ऐकत आहेस तू.. मी ज्या अनुराधावर प्रेम केलं होत तशी तू नाही राहिलीस आता.. ती खुप सुंदर मुलगी होती. लोकं तिच्याकडे वळूनवळून बघायचे.. तिच्या सौंदर्याची स्तुती करायचे.. तू ती नाही राहिलीस आता..."
अनुराधा म्हणाली,.."मी आज ही तीच आहे.. माझ्या सोबत जे झालं त्यात माझा काय दोष.."
नरेश म्हणाला,"मग माझा तरी काय दोष.. माझं तुझ्यावर प्रेम नाही राहीलं.. आता तू....."आणि तो थांबला..
अनुराधा पुढे म्हणाली.. ,"बोला ना पुढे.. ..आता तू काय.. ..आता मी कुरूप झाले हेच ना.. तुमचं खरंच प्रेम होतं माझ्यावर...? प्रेम म्हणजे नक्की काय ते तरी तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही फक्त माझ्या शरीरावर प्रेम केलं माझ्यावर नाही.. मीच मूर्ख होते.. मला समजून जायला हवं होत तेव्हाच, जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये मला इतके दिवस भेटायला आलात नाही.. नरेश प्रेम हे शरीरावर, रंग, रुपावर होत नाही. ते मनावर केलं जातं. आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आपण एकमेकांना साथ देऊ ही शपत घेतली होती आपण सप्तपदी चालताना.. तुम्ही विसरलात ते..?"
नरेश बोलू लागला,"अनुराधा मला तुझा त्रास कळतोय. पण प्रेम मनावर केलं जातं, वैगरे वैगरे हे बोलायला सोप्पं असत.. नवरा म्हणून मी माझं कर्तव्य केलं आहे.. तुझ्या हॉस्पिटलचं सर्व बिल मी भरलं आहे.. या पुढे तुला पैशांची गरज भासली तरी मी मदत करेन.. पण मी तुझ्यासोबत राहू शकत नाही.."
बसं.. आता अनुराधाचा राग अनावर झाला.. आपण चुकीच्या माणसाशी बोलत आहोत हे तिच्या लक्षात आले. आपण संवाद करावा एवढीसुध्दा या माणसाची योग्यता नाही हे तिला कळले.
नरेशला ती म्हणाली, "माझे दागिने मी इथेच ठेऊन जाते आहे.. तुम्ही भरलेल्या बिलाच्या रकमेपेक्षा त्यांची किंमत जास्त आहे.. व्याज म्हणून ठेवून घ्या ते. लवकरच तुम्हाला घटस्फोटाचे पेपर येतील.. माझा चेहरा कुरूप झाला हा तुमचा दोष नाही ना मग त्या बंधनात ही अडकून राहायची तुम्हाला गरज नाही.. तुम्ही मुक्त आहात सर्व बंधनातून." तिने गळ्यातले मंगळसूत्र काढून त्याच्या हातावर ठेवले आणि ती निघाली..
दारातच तिचे आई बाबा उभे होते. त्यांनी या दोघांचं पूर्ण संभाषण ऐकलं होतं. दोघांच्याही डोळ्यात अश्रु होते. अनुराधा आई बाबांना म्हणाली तुम्हाला पण मी ओझं वाटतं असेन तर मी तुमच्या घरातूनसुध्दा निघून जाईन..बाबा मी काहीही करेन.. काम शोधेन.. स्वतःच्या पायावर उभी राहीन.. पण या मनाने कुरूप असलेल्या माणसासोबत नाही राहणार आता...." त्यावर बाबा पटकन म्हणाले,"नाही बेटा तू आमचा अभिमान आहेस.. तुझं ओझं आम्हाला कसं वाटेल. तू जे केलंस ते योग्यच केलं.. "
नरेश अनुराधाचे ते रूप पाहून हादरून गेला होता.. साधीसुधी नाजूकशी अनुराधा आता जमदग्नीचा अवतार वाटू लागली त्याला. त्याला स्वतःची लाज वाटू लागली.. अनुराधा तिच्या आई बाबांसोबत निघून गेली.. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे तो ती दिसेनाशी होईपर्यंत पाहतच बसला होता...
(क्रमशः)