Dr Ashwini Alpesh Naik

Tragedy Crime

4  

Dr Ashwini Alpesh Naik

Tragedy Crime

खरंच मी अपवित्र आहे का?..

खरंच मी अपवित्र आहे का?..

8 mins
339


अमोलशी लग्न करून सुरुची पाटलांच्या घरची सून झाली. थाटामाटात लग्न पार पडलं. अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा वाटावे इतके दोघं एकमेकांसोबत शोभून दिसत होते. अमोल अगदी मनमिळावू, बोलक्या स्वभावाचा तर सुरुची थोडी बुजरी, स्वतःतच हरवलेली. अमोलच कुटूंब देखील फार छान होतं. मध्यम वर्गीय कुटुंब .. पैशांनी खुप श्रीमंत नसले तरी मनाची आणि विचारांची श्रीमंती होती त्यांच्याकडे. आपल्याला मुलीला असं घर सासर म्हणून लाभलं त्यामुळे सुरुचीचे आई वडील खुप खुश होते. लग्ना नंतरची सत्यनारायणाची पूजा आटोपली. दोन्ही परिवाराचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम झाला. आता ती वेळ आली होती जेव्हा सुरुची आणि अमोल एकांतात भेटणार होते. एक तर अरेंज मॅरेज, त्यात होकार झाल्यावर एका महिन्यातच त्याचं लग्न झालं , त्यामुळे दोघेही एकमेकांना तसे अनोळखी होते.. सुरुची शी काय बोलायचं , कसं बोलायचं याच विचारात अमोल त्याच्या खोलीत शिरला.. सुरुची आधीच झोपून गेली होती. अमोलला वाटले खुप थकल्यामुळे तिला झोप लागली असेल.. ती रात्र अशीच गेली. सकाळी उठल्यावर बोलू हिच्याशी या विचारात तो ही झोपी गेला. सकाळी उठतो तर सुरुची बाजूला नव्हती.. ती लवकर उठून आईला मदत करायला गेली होती. अमोल सुरुची शी बोलायचा खुप प्रयत्न करत होता.. पण ती संधी काही त्याला मिळेना.


आज तो आधीच खोलीत जाऊन बसला होता. सुरुची आली. दोघांनाही खुप अवघडल्या सारख वाटतं होतं. 

अमोल काही बोलणार तोच सुरुची पटकन त्याला म्हणाली..," मला काय वाटतं आपण ३ दिवसांनंतर उटीला जाणार आहोत ना... तर आपण तो प्लॅन रद्द करावा.. मला थोडं ठीक वाटत नाही आहे. "

अमोल लगेच तिच्या जवळ गेला आणि म्हणाला," काय होतंय? डॉक्टर कडे जाऊया का?"


सुरुची म्हणाला," थोडी दगदग झाली ना लग्नामुळे त्यामुळे त्रास होतो आहे.. मला आराम केल्यावर बरं वाटेल.. मी झोपू का?"

असे बोलून सुरुची जाऊन झोपी गेली. अमोल पुढे काय बोलणार..


दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा त्याने उटीच्या प्लॅन बद्दल विचारले.. तेव्हाही ती तो रद्द करण्यावर ठाम होती. खरंच तिला बरं वाटत नसेल या विचाराने त्यानेही मग नाईलाजाने का होईना प्लॅन रद्द केला.

दिवसा मागून दिवस जातं होते. पण अमोल आणि सुरुची मध्ये काही विशेष संभाषण सुध्दा होत नव्हते. नवीन घर, नवीन माणसं यामुळे ती गोंधळली असेल असा विचार करून अमोल पंधरा दिवस गप्प बसला. इथे सुरुची हळू हळू घरात रुळत होती. ही माणसं चांगली आहेत याची तिला वेळोवेळी प्रचिती येत होती. पण अमोल पासून ती अंतर ठेऊन वागत होती. तिला स्वतःला तिच्या या वागण्यामुळे त्रास होत होता.' मी हे लग्न करून चूक केली. या भल्या माणसांना मी फसवल आहे,' असं काहीसं तिला वाटू लागलं होतं. ती सतत त्याच विचारात हरवलेली असायची. त्याच त्याच गोष्टींचा विचार करत असल्यामुळे सुरुची आता खरंच आजारी पडली.. काम करता करता ग्लानी येऊन पडली. घरच्यांनी डॉक्टरला बोलावले. स्ट्रेसमुळे असं झालं असे डॉक्टर म्हणाले आणि काही औषधं देऊन निघून गेले. 


अमोल तिच्या जवळच बसून होता. विचार करत होता,' नक्की हिच्या मनात काय आहे ? का ही सतत दूर पळत असते माझ्यापासून ? साधं बोलायलाही येत नाही ही माझ्याशी? हे लग्न हिला मान्य तर होत ना? ' या विचारात असतानाच सुरुची बडबडू लागली," मी अपवित्र आहे. मला सोडा , जाऊ द्या, माझी योग्यता नाही" तिची बडबड ऐकून अमोल तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. त्याने तिला स्पर्श करताच ती ताडकन उठून बसली.. ती अमोल वर भलतीच चिडली होती," मला हात कसा लावला तुम्ही,? किती वाईट आहात तुम्ही? माझ्या या अशा अवस्थेचा पण फायदा घेताय? लाज नाही वाटत?" 


आता अमोलचा पारा चढला होता," बसं झालं हा.. वाटेल तस बोलत आहेस तू. फायदा घ्यायचा असता तर कधीच घेतला असता, अगं इतके दिवस उलटून गेले आपल्या लग्नाला साधं बोलणं सुध्दा होत नाही आपल्यात.. नवीन घर, नवीन माणसं या सर्वात गोंधळली असशील , तुला तुझा वेळ मिळवा म्हणून मी तुला समजून घेतो आहे. एका शब्दाने तक्रार केली नाही.. तुझी काळजी वाटते म्हणून इथे तुझ्या उशाशी बसून होतो. आणि तू काय म्हणतेस... शी.. खरंच मला तुझ्या विचारांची कीव येते... काय झालं आहे असं..? आता मला उत्तर देच तू.. तुला हे लग्न मान्य नव्हता का? की तुझ्या आयुष्यात कोणी दुसरी व्यक्ती आहे? हे लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली का तुझ्या घरच्यांनी? मला आज उत्तरं हवी आहेत माझ्या प्रश्नांची.. बोल.."


सुरुची भानावर आली होती.. आपण अमोलला काय बोलून गेलो .. तिला आता पश्चाताप होत होता.. ती रडू लागली.. आणि म्हणाली, "मला माफ करा.. खरंच माझी योग्यता नाही आहे तुमची बायको म्हणून घ्यायची.. तुम्ही सर्वच खुप चांगले आहात.. मी नाहीये.. मी अपवित्र आहे.. मला इथून गेलं पाहिजे.. मी माझ्या घरी जाईन.. उद्याच निघून जाईन.. तुम्हाला त्रास नाही देणार.."


अमोल म्हणाला," अग काय बोलते आहेस तू.. लग्न झालं आहे आपल.. खेळ वाटतो का तुला..हे लग्न कुठल्या दबावाखाली केलं आहेस का तु? नक्की काय झालं आहे? आणि अपवित्र म्हणजे काय? प्लीज सर्व नीट सांग.. त्या शिवाय मी तुला कुठेही जाऊ देणार नाही."


सुरुची खुप रडू लागली. तिला असंही तीच मनमोकळ करायचं होत. तिने सांगायला सुरुवात केली.," माझ्यावर लहानपणी बलात्कार झाला होता..मी अपवित्र आहे." हे ऐकुन अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली.

अमोल ने स्वतः ला सावरलं आणि म्हणाला, "मला नीट काय ते सांग."

सुरुची सांगू लागली," मी बारा वर्षांची होते. एकदा खाली खेळत असताना शेजारी राहणारा एक दादा मला बोलवायला आला.. बाबांचा अपघात झाला आहे म्हणून आई तडक हॉस्पिटलमध्ये निघून गेली आहे आणि तिने मला तिथे बोलावलं आहे असा निरोप त्याने मला दिला.. तो मला तिथे घेऊन जाण्यासाठी आला आहे असे त्याने सांगितले.. मीही लगेच त्याचसोबत गेले.. मग तो मला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला.. आणि... त्याने मला अपवित्र केलं. मी आता कोणाच्याच योग्य नाही.." असे म्हणून ती हुंदके देऊ लागली..


अमोलने तिला शांत केलं.. ,"तू आता झोप.. तुला आरामाची सक्त गरज आहे. कसलाही.. काहीही विचार करू नकोस.. मी इथेच आहे.." असे बोलून त्याने सुरुचीला झोपवले.. आधीच औषधांमुळे तिला गुंगी येत होती.. त्यातच रडल्यामुळे तिला थकल्यासारखे वाटत होते. ती लगेच झोपी गेली.


अमोल तिथेच बसून होता.. काय करावे हे त्याला देखील सुचत नव्हते. सुरुचीची यात काही चूक नाही हे त्याला ही चांगलेच ठाऊक होते. त्याने बराच विचार करून निर्णय घेतला.. आता तो फक्त सुरुची उठायची वाट पाहत होता. रात्र कशी बशी सरली. सुरुचीला सकाळी सुध्दा उशिरानेच जाग आली. तो पर्यंत तिचे सासू सासरे तिची विचारपूस करून गेले होते.' ती उठली की तुम्हांला बोलवतो', असे सांगून अमोलने त्यांना पाठवून दिले. तिला जाग आली तेव्हा अमोल तिच्या समोरचं बसून होता.. ती जरा अवघडूनच उठून बसली..


अमोलने तिला विचारले, "आता कसे वाटते आहे तुला?"

ती म्हणाली," थोडं बर वाटतय".

अमोल म्हणाला," थांब मी चहा नाश्ता घेऊन येतो. काहीतरी खाऊन घे.. काल रात्रीपासून उपाशी आहेस."


अमोलला एवढं नॉर्मल वागताना पाहून ती गोंधळली.. कालच पूर्ण संभाषण तिला आठवत होतं.

ती अमोलला म्हणाली," अमोल थांबा.. खरंच एवढं चांगल नका वागू माझ्याशी. माझी योग्यता नाही आहे. मी आजच माझ्या घरी निघून जाईन कायमची. तुम्ही सर्व खुप चांगली माणसं आहात.. आणि मी तुम्हाला फसवल आहे.."


अमोल ऐकत होता सर्व. सुरुचीच बोलून झालं आहे हे कळल्यावर तो म्हणाला," तुझं झालं असेल बोलून तर मी बोलू शकतो का आता"

सुरुची म्हणाली," बोला ना"


अमोल बोलू लागला..,"एकतर तुझ्या शरीराचा बलात्कार झाल्यामुळे तू अपवित्र होत नाहीस.. हा विचार आधी मनातून काढून टाक. आणि कोण म्हणालं तू योग्य नाही आहे या घरासाठी? ते आम्हाला ठरवू दे. सर्व निर्णय तूच घेणार का? हे बघ तुझ्या सोबत जे झालं ते वाईट आहे. असं कोणाही सोबत होऊ नये.. पण चूक तुझी नव्हती.. कोणाच्या तरी दुसऱ्याच्या गुन्ह्याची शिक्षा तू स्वतः ला का देते आहेस.? पण मला हे जाणून घ्यायचं आहे की तुझ्या आई बाबांनी पुढे काय केलं.. अर्थातच तुझी इच्छा असेल तर.."


सुरुची अमोलला सांगू लागली," आई बाबांना जेव्हा हे कळलं तेव्हा बाबांनी त्या रात्रीच आई आणि मला माझ्या मावशी कडे मुंबईला पाठवून दिलं. मग आठवड्या भराने ते सुध्दा आले. काही दिवस माझ्या मावशी कडे राहिलो आम्ही.. आणि मग कायमचे इथे मुंबईत शिफ्ट झालो.. या आधी मी साताऱ्याला राहायचे.. पण त्या घटने नंतर आम्ही कधीच तिथे गेलो नाही. मी या गोष्टीची कुठेच वाच्यता नाही करायची हे वचन आईने माझ्या कडून घेतलं होतं. कोणाला कळलं तर माझी खुप बदनामी होईल असं तिला वाटायचं.. मला लग्न नव्हतं करायचं. मला कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं नव्हतं.. आई बाबांनी मला पुन्हा वचनात बांधलं आणि हे लग्न झालं. तुम्ही सर्व खुप छान आहात.. पण मी.. माझा भुतकाळ खुप वाईट होता.. त्या आठवणी मला नकोशा आहेत.. पण काहीही झालं तरी मी तो बदलू शकत नाही.. खुप ञास होतो.. अजूनही त्या कटू आठवणी मी विसरले नाही आहे.."


एवढे बोलून सुरुची पुन्हा रडू लागली. या वेळी अमोल तिच्या जवळ गेला.. तिचे अश्रू पुसले . तिच्या केसात मायेने हात फिरवत म्हणाला, "अगं अजुन किती त्रास करून घेणार आहेस स्वतः ला. मी म्हटलं ना चूक तुझी नव्हती.. त्या नराधमचा विचार करूनच माझ्या तळ पायाची आग मस्तकात जाते आहे. तुझ्या आई बाबांनी त्या वेळी पोलिसात तक्रार करायला हवी होती. त्या राक्षसाला शिक्षा व्हायला हवी होती. त्याने या आधी पण असे गुन्हे केले असतील.. कदाचित तुझ्या नंतर सुध्दा त्याने कोणाची अब्रू लुटली असेल.. शी.. खरंच घृणा वाटते अशा लोकांची.. तुझ्या आई बाबांची सुध्दा चूक नाही यात.. आपला समाज पिडीत स्त्रीला दोषी ठरवतो.. शारीरिक बलात्कार एकदा होतो... पण मानसिक बलात्कारच काय.. त्याचा कोणी विचार करत नाही.. पण खरंच तुझी चुक नाही आहे.. उलट ह्या भूतकाळाच्या आठवणी मनात साठवून ठेऊन स्वतः ला किती त्रास दिला आहेस तू. इतके वर्ष अपराध्यासारखे जगली आहेस.. आता तरी मोकळी हो.. तुझी काही चूक नाही आहे यात.. आणि इथून पुढे मी नेहमी आहे तुझ्या सोबत.. तुझ्या सोबत काहीही चुकीचं होणारा नाही हे वचन देतो मी तुला.."


सुरुची अमोल कडे पाहतच होती.. आज पहिल्यांदा खऱ्या अर्थाने कोणीतरी तिच्या जखमांवर फुंकर घातली होती. खुप वर्षांनी तिला मोकळं वाटत होतं. खऱ्या अर्थाने आज ते दोघं आयुष्य भराचे सोबती झाले होते.


( वाचकहो, ही कथा काल्पनिक आहे. पण अशाच कितीतरी सुरुची आपल्या समाजात असतील.. सुरुचीला उशिरा का होईना अमोल सारख्या समजूतदार माणसाची साथ लाभली..त्यामुळे निदान या पुढेच आयुष्य तरी ती आनंदात , स्वतः ला दोष न देत जगेल. पण प्रत्येक पीडितेला असाच अमोल भेटेल असे नाही. शारीरिक बलात्कार हा एकदाच होतो पण मानसिक बलात्कार हा वारंवार होतो. सुरुचीच्या आई वडिलांनी देखील त्या वेळी त्यांना त्यांच्या मुलींसाठी ते योग्य वाटलं ते केलं. पण ते त्यांच्या दृष्टीने योग्य होते. त्यांनी जर त्या वेळी आपल्या मुलीसोबत झालेल्या अन्याया विरूद्ध आवाज उठवला असता तर कदाचित ती अशी बुजरी राहिली नसती..कदाचित ती आयुष्य भर स्वतः ला दोष देत, दुःखात कुढत राहिली नसती. अमोल म्हणाला तसच.. तो नराधम मात्र गुन्हा करूनही मोकाट फिरत असेल, त्याच आयुष्य मजेत जगत असेल. पुन्हा एक नविन सावज शोधत असेल. या राक्षसांना गजाआड करायचं असेल तर आधी पीडित स्त्री कडे बघण्याचा आपला दृष्टिकोन आपण सुधारला पाहिजे. तेव्हा कुठे ती हिम्मत करून तिच्या सोबत झालेल्या अन्याया विरूद्ध लढू शकेल. स्वतः ची रोज होणारी घुसमट थांबवू शकले. शारीरिक जखमा भरून निघतात, पण मनावर झालेले आघात भरून निघायला वेळ लागतो.. त्यासाठी प्रेमाची, आधाराची, समजूतदार पणाची तसेच त्या स्त्रिला पाठबळ देण्याची गरज असते. )


                        समाप्त


वाचकहो.. लेख कसा वाटला ते नक्की सांगा. आपला अभिप्राय नोंदवा. लेख आवडला असेल तर LIKE जरूर करा. आणि हो मला FOLLOW करायला विसरू नका.

माझा लेख माझ्या नावासहित शेअर करायला माझी काहीच हरकत नाही


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy