Dr Ashwini Alpesh Naik

Inspirational

3  

Dr Ashwini Alpesh Naik

Inspirational

एक होता विदुर.

एक होता विदुर.

5 mins
171


महाभारत म्हटलं की सर्वांच्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतो तो श्री कृष्ण,त्या पाठोपाठ पांडव,कौरव,कुंती,कर्ण,द्युत सभा,द्रौपदी, वस्त्रहरण,कुरुक्षेत्र... फारच क्वचित आणि अगदी फार कमी लोकांना विदुर या महाभारतातल्या पात्राची आठवण येते. खरतर मी सुध्दा या विदुराचा एवढा विचार या आधी कधीच केला नव्हता. पण लॉकडाऊनच्या काळात महाभारत पुन्हा एकदा पाहण्याचा योग आला. महाभारतातील पात्र तशी परिचयाचीच होती. कथा सुध्दा माहित होती. पण या वेळी सर्व जुन्या पात्रांची नव्याने ओळख झाली. लॉकडाऊनमुळे खूपच फुरसत होती त्यामुळे अगदी जुने आणि नवीन महाभारत बघता आले. या वेळी विदुर हे पात्र मला अगदी विलक्षण वाटले.अर्थातच कर्ण माझ्या मनात एक वेगळीच जागा आहे, पण विदुर या पात्राची माझ्या मनावर वेगळीच छाप पडली. 


तसे पाहिले तर महाभारतातल्या प्रत्येक पात्रात मानवी स्वभावाच्या वेग वेगळ्या छटा आहेत. पाच पांडवांची पत्नी असलेली द्रौपदी, पाडवांचा स्वतःच्या हक्कांसाठी चाललेला लढा, स्वतःच्या अस्तित्वाच्या शोधत असलेला कर्ण, वेग वेगळे डावपेच रचणारा शकुनी, पुत्र प्रेमात आंधळे झालेले धृतराष्ट्र आणि गांधारी, धर्माचा मार्ग दाखवणारा आणि अधर्माचा नाश करण्यासाठी साम,दाम,दंड,भेद अशा कशाचा ही मार्ग स्वीकारणारा श्रीकृष्ण, ह्या अशा सर्व पात्रांच्या गर्दीत विदुर आणि त्याचे मोठेपण कुठे तरी हरवून गेल्यासारखा भास मला झाला."नेकी कर दर्या मे डाल" ह्या म्हणी प्रमाणेच तो आयुष्य जगला. 


विदुर या नावातच बरच काही आहे. विदुर म्हणजे अर्थ शास्त्रात पारंगत असलेला,अतिशय हुशार,आणि विचारपूर्वक निर्णय घेणारा. विदुरचा जन्म नियोग विधीने झाला होता. अंबिका आणि अंबलिका या विचित्रविर्य राजाच्या बायका. विचित्रविर्यच्या निधनानंतर व्यास ऋषि आणि या दोघींमध्ये नियोग विधी करायचे असे सत्यवतीने ठरविले. व्यास ऋषि दिसायला महाभयंकर होते असे म्हटले जाते. त्यांचे ते महाकाय रूप पाहून त्या दोघीही घाबरल्या होत्या. त्यामुळे नियोगाच्या वेळी अंबिका ने घाबरून डोळे बंद केले, तर अंबालिका घाबरून पांढरी पडली आणि बेशुध्द झाली, त्यामुळे या दोन्हींच्याही पोटी जन्म घेणार बाळ हे कसे असले या बाबत अनेक शंका असल्यामुळे पुन्हा नियोग विधी करायचे ठरले. पण या वेळेला या दोघींनीही परस्पर ठरवून तेथे न जाता त्यांची दासी परिश्रामी हिला नियोगासाठी पाठविले.पुढे या तिघींना ही दिवस गेले. अंबिकाच्या पोटी जन्माला आलेलं बाळ आंधळं होतं पुढे ते धृतराष्ट्र म्हणून नावारूपास आले तर अंबालिकाच्या पोटी जन्माला आलेलं बाळ शारीरिकदृष्ट्या थोड दुर्बल आणि अगदी पांढर होत पुढे ते पांडू म्हणून प्रसिद्ध झाले. हे दोघेही शुर योध्ये होते. आता त्यांची दासी असलेल्या परिश्रामीच्या पोटी जन्माला आलेल्या बाळाचे नाव विदुर असे ठेवण्यात आले. हे बाळ सुदृढ आणि निरोगी होते, पण राणी सत्यवती म्हणजे विचित्रविर्य राजाची आई, विदुरला राजपरिवाराचा हिस्सा मानण्यास तयार नव्हती. केवळ भीष्माच्या हट्टामुळे विदुर याला धृतराष्ट्र आणि पांडू या दोघां प्रमाणेच सर्व शिक्षण दिले गेले. कर्म धर्म संयोगाने का होईना पण तो त्या राज परिवाराचा भाग होता, या दोन राजपुत्रांप्रमाणे राहण्याचा त्याला ही अधिकार होता. पण तरीही तो अधिकार कधीही त्याला मिळाला नाही. भीष्म होता म्हणूनच विदुराच्या हुशारीला न्याय मिळाला.


विदुरला हस्तीनापुरचा प्रधानमंत्री बनविण्यात आले. पण हे ही पद त्याला अगदी सहज मिळाले नाही. राजा बनण्याची कुवत असतानाही हे असे प्रधानमंत्री पद त्याला स्वीकारावे लागले होते. खरे तर त्याला ना राजा बनण्यात आनंद होता ना प्रधानमंत्री. तो नेहमीच एक सामान्य माणसासारखे साधे सरळ आयुष्य जगू इच्छित होता. पण भविष्यात येणाऱ्या संकटांची चाहूल भीष्माला आधीपासूनच लागली होती. त्यामुळे ह्या संकटांवर तोडगा काढण्यासाठी, प्रत्येक परिस्थितीचा तठस्थपणे विचार करून पक्षपात न करता निर्णय घेणाऱ्या व्यक्तीची हस्तीनापुरला गरज होती,आणि ती एकमेव व्यक्ती होती विदुर. म्हणून इच्छा नसतानाही भीष्माला गुरु मानणाऱ्या विदुर ने ती जबाबदारी स्वीकारली.


धृतराष्ट्रच्या राज्याभिषेकाच्या वेळी, शास्त्रानुसार एक आंधळा व्यक्ती कुठल्याही प्रांताचा राजा होऊ शकत नाही हे निर्भिड पणे बोलणाऱ्या विदुराला भविष्यात धृतराष्ट्र तसेच त्याच्या पुत्रांकडून नेहमीच अपमान आणि अवहेलना सहन करावी लागली. तसे असले तरी तो त्याची मते कुठलाही पक्षपात न करता मांडताच आला. पांडू पूत्रांकडून हस्तीनापुरचा प्रधान तसेच त्यांचा काका म्हणून त्याला योग्य तो मान नेहमीच मिळाला, हीच काय ती समाधानाची गोष्ट होती. हस्तिनापुर सारख्या वैभवशाली राज्याचा प्रधान असून ही विदुर नेहमी एका सामान्य माणसासारखा जगला. कुठली ही चैनीची गोष्ट नाही, सोयी सुविधा नाहीत. एका राज्याचा सामान्य नागरिक जसे आपले आयुष्य व्यतीत करतो तसेच त्याने केले. म्हणूनच महाभारत युद्धाच्या आधी जेव्हा श्री कृष्ण पांडवाकडून शांतीचा संदेश घेऊन हस्तीनापूरला गेले होते तेव्हा त्यांनी हस्तीनापुरच्या महालात राहण्या ऐवजी विदुर कडे राहणे पसंत केले.दुर्योधन ने खास श्री कृष्णासाठी आयोजित केलेल्या मेजवानीत न जेवता विदुर कडे साधे जेवण जेवणे पसंत केले. कारण श्री कृष्णाला ही माहित होते विदुर जे काही करेल त्यात खरेपणा, प्रेम आणि कुठलाही डावपेच नसेल. श्री कृष्णाच्या मते विदुर हा धर्मराजचा अवतार होता म्हणजेच तो सत्याची देवता होता. विदुरचा खरेपणा, निःस्वार्थ पणा, स्वतःच्या राज्याबद्दल असलेले प्रेम,लोक हितासाठी झटण्याची वृत्ती,स्वतः च्या काम बद्दल असलेली निष्ठा या सर्वा मुळे तो श्री कृष्णाच्या ही आवडत्या माणसा मधला होता. द्रौपदी वस्त्रहरणच्या वेळी विकर्णा सोबत विदुर च होता ज्याने त्या वस्त्रहरणचा निषेध केला होता. त्या वेळी दुर्योधनाने त्याचा भर सभेत खुप अपमानही केला. त्याने महाभारत युद्धाच्या आधी ते युद्ध न करण्यातच शहाणं पण आहे असे धृतराष्ट्र आणि दुर्योधनला सांगितले,कौरवांची बाजू ही अधर्म आणि असत्याची आहे,पांडू पुत्र हे योग्यच आहेत.अधर्म आणि धर्माच्या युद्धात विजय हा धर्माचाच होतो हे त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते दोघे ही सत्तेच्या गुर्मीत होते. कौरवांची बाजू असत्यची असल्यामुळे युद्धाच्या आधी त्याने हस्तिनापूरच्या प्रधान मंत्री पदाचा राजीनामा दिला. अशा ह्या विदुरचे संपूर्ण आयुष्य अगदी सध्याच्या काळात बोध घेण्यासारखे आहे. विदुर ने नेहमी जे आहे त्यात समाधान मानले, मिळालेल्या संधीचे सोने केले,स्वतः चे शहाणपण आणि मोठेपण त्याने त्याच्या कामातून दाखऊन दिले.समोर कोणीही असले तरी योग्य ते मत मांडताना तो कधीही कचरला नाही.


विदुरच्या संपुर्ण आयुष्याचे सार आणि शिकवण रामदास स्वामींनी लिहिलेल्या या श्र्लोकांमध्ये सामावल्यासारखी मला वाटते.


मना वासना दुष्ट कामा न ये रे।

मना सर्वथा पापबुद्धी नको रे॥

मना सर्वथा नीति सोडूं नको हो।

मना अंतरीं सार वीचार राहो ॥


देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी।

मना सज्जना हेचि क्रीया धरावी॥

मना चंदनाचे परी त्वां झिजावे।

परी अंतरीं सज्जना नीववावे ॥


मना सर्वथा सत्य सांडूं नको रे।

मना सर्वथा मिथ्य मांडूं नको रे॥

मना सत्य ते सत्य वाचे वदावे।

मना मिथ्य तें मिथ्य सोडूनि द्यावें ॥


Rate this content
Log in

Similar marathi story from Inspirational