इंद्रधनुष्याचं आयुष्यविश्व.....
इंद्रधनुष्याचं आयुष्यविश्व.....


कधी कधी सहज गवसतं
थोडावेळ मनाला सुखावतं
हुरहूर जीवाला नि नाहीसं होतं
आकाशाला जणू पारदर्शक टोपी
कल्पनांचा वेडा महामेरू
लगबगीने राही उभा
नजरेतला नाही धोका
हा तर समुद्र रंगांचा
बहुरंगी सात रंगांचं स्वतःचं
तानापिहिनिपाजा प्रकाशगाणं
आकर्षक स्वर्गमय विश्व
ज्याचा राजा इंद्रधनुष्य
पहिल्या पावसातलं इंद्रधनुष्य
जीवनाचं परिपूर्ण कोलाज
भास असा मोरपिसारा जणू
कधी रंगीत रेलगाडी जणू
आकाशावर झोका रंगेबेरंगी
रंगांचा खेळ घाले माळा अंगी
मोहक रूप जणू हसवणारं
स्वतःत चक्क हरवणारं
लहानथोर अशा सर्वांना
कुतूहलानं भारावून टाकणारं
सौंदर्य नकळत लाजवणारं
पाऊसवेड्यांना प्रेम देणारं
आठवणींची रेखीव नक्षी
उभी डोळ्यासमोर अनोखी
पण प्रेमाचा गुलाबी रंग
सात रंगात जणू गायब
कधी अश्रूंचं चमकणं
मनाला दुःखी करणं
मात्र ओसरल्यावर तयाला
दिसतो चकाकता इंद्रधनुष्य