अनोखी मैत्री...!
अनोखी मैत्री...!


राधा आणि राघव यांची मैत्री म्हणजे एक मिसाल होती. राधा आजी-आजोबा, आई-बाबा यांसोबत तर राघव आपल्या आजीसोबत आनंदाने राहत होते. राधा वाचन, लिखाण, चित्रकला यांत रमे तर राघव क्रिकेट, फुटबॉल अशा मैदानी खेळात. त्यांच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी हेच त्यांच्या मैत्रीचे वैशिष्ट्य होते. दोघेही न कंटाळता एकमेकांच्या आवडीचा मान ठेऊन धम्माल करायचे.
शाळेतून घरी आले की आजोबांना बागकामात मदत करायचे. दोन्ही आजींसोबत भजन, गाणी म्हणायचे. इयत्ता नववी पर्यंत त्यांचा दिनक्रम मजेत चालला होता. पण आता दोघे दहावीत गेले होते. वरच्या वर्गासोबत अभ्यास, गृहपाठ, तासिका यातही वाढ झालेली. मात्र, राघव जुन्या सवयींपासून अलिप्त झालेला नव्हता. असेही नव्हते की त्याला अभ्यास करायला आवडायचे नाही पण त्याला सवय झाली होती या दिनक्रमाची. हे सर्व त्याची आजी जाणून होती. एकटा आई-वडिलांविना मुलगा म्हणून ती त्याला जास्त रागावत नसे पण तिला काहीतरी करायला हवे होते कारण आता प्रश्न राघवच्या भविष्याचा होता आणि दहावी त्याचा पाया होता.
राघवच्या आजीने राधाकडे मदत मागायचे ठरवले. राधाने लगेच होकार भरला. आता राधाच्या मैत्रीची परीक्षा होती. तिला यात यश मिळणे दोघांसाठी महत्वाचे होते. तिला एक भन्नाट कल्पना सुचली. ते दोघे राधाच्या काकांकडे गावी गेले. तिथे ते दोन दिवस राहिले. राधाने राघवला गावातील शाळा दाखवली. तेथील मुले त्यांच्याकडे शहरासारख्या सुविधा नसतानाही अगदी आनंदात होती. एकत्र खेळत, अभ्यास करत, इतरांना मदत करत, आजूबाजूचा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवत, घरच्यांना मदत करत आणि विशेष म्हणजे त्यांनी मिळवलेली बक्षिसे-त्यांच्या उत्तुंग यशाचे प्रतिक म्हणून पूर्ण गाव अभिमानाने मिरवत होते. हे सर्व पाहून राघव भारावून गेला. आता मात्र त्याला आपण केलेल्या मौजमजेचा आणि त्यातून मिळालेल्या क्षणिक आनंदाचा हेवा वाटेनासा झाला. त्याच्या लक्षात आले की क्षणिक आनंदात खूप मोठे सुख असते पण आनंदाबरोबर दुःख हे येणारच याचीही पूर्णपणे कल्पना आली. त्याला आता त्याची चूक उमगली होती. तो राधा आणि आजीला सॉरी म्हणाला.
आपली चूक आपल्या कळत-नकळत सांगणारा कोणीतरी आपल्याला नेहमी हवाच असतो. आणि राघवकडे त्याने कमावलेली मैत्री होती. हा मैत्रीचा धागा राधा-राघवच्या अनोख्या बंधनाला साजेसा होता. आता राघव राधासोबत राजी-खूशी शाळेत जाऊ लागला मन लावून अभ्यास करू लागला आणि स्वारी एकदम खुशीत यशाचे शिखर सर करायला सज्ज झाली! तर बालमित्रांनो, तुम्हीही आपले पहिले पाहून टाकायला सज्ज व्हा राधा आणि राघवच्या मैत्रीप्रमाणे....