एक अनुभव कथन....
एक अनुभव कथन....
खालील अनुभव दोन-तीन वेळा आल्याने तो सहज म्हणून शेअर करत आहे....
महिला किंवा मुलगी म्हटलं की कमजोरपणाचा किंवा मदतीची गरज पडणारंच असा शिक्का कसा ठेवला जातो ते बघूयात !
मी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी लाईन मध्ये उभे होते. मला थोडा उशीर होत होता त्यामुळे मी गाडीची डिक्की उघडून तयारीतच होते. तिथल्या दादाने कितीचे करू असे विचारले असता मी १०० रुपयांची नोट दाखवून १०० रुपयाचे पेट्रोल टाक म्हणून सांगितले. त्याला स्पष्ट ऐकू जावे म्हणून हेल्मेटची काचही मी वरती केलेली होती. मार्किंग शून्यावर करून त्याने पाईप टाकीत टाकला. ३० रुपयांचे पेट्रोल टाकल्यावर त्याने पाईप बाजूला केला. मी लागलीच म्हटलं आणखी ७० चे करा, मी १०० चे करा असे सांगितले.
तसे त्याने ७० रिडींग आल्यावर पुन्हा पाईप काढून घेतला. आता माझ्यामागे २ गाड्या उभ्या होत्या. आधी मीच शेवटी होते.
त्याने कदाचित व्यवस्थित ऐकले नसावे म्ह्णून मी पुन्हा म्हणाले, "मी तुम्हाला १०० रुपयांचे टाका असे म्हणतेय तर तुम्ही पुन्हा ७० वरच येऊन थांबलात".
तो म्हणाला, "मॅडम बरोबर आहे. आधीचे ३० चे आणि आता ७० चे. झाले ना १०० !"
माझ्या मागचे आता त्याच्यावर ओरडायला लागले, "अरे किती वेळ ?"
माझ्या मागेच असलेले काका काहीतरी गडबड आहे या
शंकेने आम्हां दोघांकडे बघून म्हणाले, "आवर रे.....रिडींग चुकीचे घेतोय का हा.....काय रे बघू का तुझ्याकडे ?"
"अरे, तू आधीच्या ३० पासूनच सुरुवात केली. शुन्यावर नव्हतेच रिडींग. म्हणजे अजून ३० चे नको का करायला", त्या काकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आता मी थोडे रागानेच म्हणाले.
पण खूपच वेळ झाल्यामुळे तसे मागचे लोक आणखीच कल्ला करू लागले.
मग मी नम्रपणे त्या काकांना म्हणाले, "थँक यू काका. पण काही हरकत नाही. आय कॅन हॅन्डल इट. थँक्स वन्स अगेन".
कदाचित त्या दादाने जाणूनबुजून केलेला उर्मटपणा त्याच्या अंगलट येईल आणि मीही माघार घ्यायला तयार नाही म्हटल्यावर तो म्हणाला, "हो, करतो मॅडम"
तरीही त्या काकांच्या मागच्या बाईकवर असलेल्या एका मुलाने त्या दादाकडे रागाने पाहिलेच आणि गुर्मीत म्हणाला, "आवरतो की नाही आता की होऊ पुढे ?"
तसे मी त्याच्याकडेही काहीसे रागानेच पाहिले. कारण मी आताच नम्रपणे केलेली विंनती त्याने ऐकून न ऐकल्यासारखी केली होती.
सांगायचा उद्देश इतकाच की, अन्याय, चुकीचे पायगंडे, मुद्दामहून घेतलेले आढेवेढे इत्यादींना तोंड द्यायला आम्हां स्त्रिया, मुलींनाही जमते. आम्हीही सक्षम आहोत आज. फक्त गरज आहे आमचा आवाज न दाबता किंवा बोलणं दुर्लक्षित न करता तो ऐकावा.