Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!
Click Here. Romance Combo up for Grabs to Read while it Rains!

Varsha Shidore

Others


3  

Varsha Shidore

Others


घराचं घरपण

घराचं घरपण

5 mins 624 5 mins 624

"घर कसं असावं....? आनंदाने भरलेलं, छोट्या-छोट्या गोष्टींनी माखलेलं, प्रेमाच्या खमंगाने डबडबलेलं, कुटुंबकबिलाच्या गोंधळाने भरभरून येणारं, सुख-दुःखाच्या रंगरंगोटीनं सजलेलं, मायेचं अंगण दारासमोर असणारं, सावरणाऱ्या अंधाराचं छत असणारं, हसऱ्या नि रडवणाऱ्या आनंदानं बहरून जाणारं.....आजोबा असचं म्हणायचे ना नेहमी....अन किती गोड हसायचे ते.....! प्रत्येक दिवस सोन्यासारखा चकाकणारा असायचा. वॉव....अजूनही चौफेर घुमणारा हसण्याचा आवाज कानात गुणगुणत असतो. आजोबा तुमच्या असण्यानेच घराला घरपण होतं हो.....जगण्यातला खरा आनंद तुमच्यासारखा आम्हाला कोणाला नाहीच आला जगता तसेच जगत ठेवता अजून.....तुम्हाला माहितीये, या घरात सगळं अगदीच जशाच्या तसं आहे. फक्त कमतरता आहे ती घर भरून टाकणाऱ्या हसत्या आवाजाची ! आजचा दिवस असा बघावा लागेल कुणीच नव्हती हो केली कल्पना....." असा विचार करत असलेल्या राधिकाला कधी झोप लागली कळलेच नाही.

 

"राधिका, अगं तुला कॉलेजला जायला उशीर होईल. लवकर तयार हो बघू...." सकाळचा असा आजीचा आवाज ऐकून राधिका खडबडून जागी झाली.

 

तशी ती पुन्हा विचारमग्न झाली रात्रीच्या विचारांत. आज आजीची हाक तिला तितकी प्रेमळ वाटलीच नाही जितकं प्रेमळ हास्य रात्रीच्या त्या अशांत पण आनंदी वातावरणात तिने अनुभवलं होतं. याच घरात आनंदाचा, गोंधळाचा नुसता काहूर असायचा आणि प्रत्येकाच्या शब्दात साखरेपेक्षाही गोडवा होता. आपुलकी आजही कायम होती पण त्यात खंत आजोबा सामील नसण्याची होती. २ महिन्यांपूर्वी झालेल्या एका अपघातात पॅरालिसिसमुळे अंथरुणाला खिळलेल्या आजोबाना आज २ महिने झाले होते या अवस्थेत बघून. 

 

खिन्न मनानेच ती कॉलेजला जायला तयार झाली. वडील ऑफिसमध्ये निघाले होते. तिची शिक्षिका असलेली आई घरकाम आवरून सकाळी लवकरच शाळेत जायची. आठवीत असलेला राधिकाचा भाऊ-राहुल आज चित्रकलेची स्पर्धा असल्यामुळे व शिक्षकांनी शाळेतल्या फळ्यांवर रंगेबेरंगी फलक रंगवायची जबाबदारी त्याच्या गटाला दिलेली असल्यामुळे लवकरच शाळेत गेला होता. कधी आपल्या मैत्रिणींसोबत हास्यक्लब नि आजोबाच्या उपक्रमांत रमणारी आजी आजोबांची देखभाल करायला घरीच असायची आता. रोजचं रुटीन रोज फॉलो होत होतं पण खिन्नता होती त्यात !

 

घरातला हा शुकशुकाट पाहून राधिकाला रडूच कोसळलं......जड मनाने ती कॉलेजला जायला निघाली पण हे चित्र पालटण्याच्या निर्धारणेच !

 

सायंकाळी सगळे टीव्ही समोर बसून आपण आनंदी आहोत, सगळे आलबेल आहे असे एकमेकांना भासवत होते. राधिकाने थेट विषयाला हात घालण्याचा निश्चय केला.

"आज मी काहीतरी ठरवलं आहे. आपण आजोबाना एक खास भेट देणार आहोत….." मोठ्या निर्धाराने तिने आपलं म्हणणं मांडायला सुरुवात केली.

"अगं पण ठरवलंय काय ते विस्ताराने सांग पाहू ?" राधिकाचा आत्मविश्वास हेरून वडिलांनी विचारले.

"आपण आऊटहाऊसमध्ये कार्यक्रमांचे नव्याने आयोजन करणार आहोत. अगदी आजोबांच्या आवडीचे काम बरं का !" राधिका म्हणाली.

"म्हणजे आजोबांचे हसणे आपण पुन्हा ऐकू शकू ? ते पुन्हा माझ्यासारखेच खट्याळ आजोबा होतील ? आपली 'बालमित्र मैफल' पुन्हा सुरु होईल ? मी आणि माझे मित्र केव्हापासून वाट पाहत होतो याची....." कान देऊन ऐकणारा राहुल टाळ्या वाजवतंच म्हणाला.

"जर असे होणार असेल तर माझी काहीच हरकत नसणार आहे" आई आनंदाने म्हणाली.

"आता पुढचा प्लॅन ऐका. आता आजोबांमध्ये खूप सुधारणा आहे. तसे डॉक्टर अंकलनेही सांगितलंच आहे. त्यांना खुश ठेवलं, ते पुन्हा त्यांच्या रुटीन मध्ये रमले तर ते नक्कीच लवकरात लवकर बरे होतील असेही ते म्हणालेच होते ना!" राधिकाने डॉक्टरांच्या आशेच्या करून दिलेल्या आठवणीला सगळ्यांनी माना डोलावल्या.

पुढे राधिका उत्साहाने म्हणाली, "आजोबांना लहान मुलांशी गप्पागोष्टी करणं, त्यांच्याशी बोलणं, खेळणं, त्यांना नवनवीन विचारांत गुंतवून ठेवणं, त्यांच्या प्रकल्पांमध्ये त्यांना मदत करणं, त्यांच्या परीक्षेची तयारी करून घेणं, त्यांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा म्हणून वेगवेगळे प्रसंग प्रात्यक्षिकांसह उभं करणं हे सगळं किती आनंद द्यायचं....! त्यामुळे आपण सगळे त्यांच्याशी आधीप्रमाणे वागण्याचा आणखी चांगला प्रयत्न करणार आहोत. त्यांना त्यांचा खरा आनंद परत करणार आहोत आणि प्रत्येक रविवारी त्यांना आनंद देणारे असे कार्यक्रम-उपक्रम राबवणार आहोत. त्यांच्या बालमित्रांशी पुन्हा त्यांची भेट घडवणार आहोत. मी माझ्या काही मित्रमैत्रिणींशी बोललेही आहे, ते त्यांच्या लहान भावंडांना घेऊन येतील आणि पुन्हा नव्यानं उभ्या राहणाऱ्या या उपक्रमात मदतही करतील."

"राधिका, तू आज तुझ्या आजोबांची जागा घेत आहेस बघ. हे सगळं बघून-ऐकून ते खूप खुश होतील….!" इतक्या वेळ शांतपणे ऐकणारी, आनंदाश्रू अनावर झालेली आजी म्हणाली.

"म्हणजे आपला २ महिन्यांपूर्वीचा उपक्रम पुन्हा सुरु होणार तर. आता तयारीला लागायला हवे…." सगळ्यांचीच उत्सुकता शिगेला लागलेली पाहून वडील म्हणाले.

"हो. रविवार अगदीच २ दिवसावर आलाय हं. मी माझ्या शाळेतल्या मुलांना उद्याच सांगून टाकते. राहुल तुही तुझ्या मित्रांना आणि कॉलोनीतले मित्रमंडळ, आजी-आजोबा, काकाकाकू अशा सगळ्यांना सांगायला विसरू नकोस." स्वयंपाक घरात जाता जाता आई म्हणाली.

"हो आई. आणि हो आऊटहाऊस साठी लागणाऱ्या सजावटीच्या सामानाची यादी मीचं करणार बरं का !" राहुल उड्या मारत म्हणाला.

"हो बाळ. आता ओस पडलेल्या या घराला आणि आऊटहाऊसला त्याचं हरवलेलं खरं घरपण मिळणार आहे.....तुमच्या आजोबांचं नि या घरातल्या प्रत्येकाचं हसू खऱ्या अर्थानं परत आणलंत तुम्ही लेकरांनो !" भारावलेली आजी म्हणाली.

"आणि हो मीही उद्या माझ्या मित्रांच्या मुलांना खुशखबर कळवतो. त्यांना त्यांचे लाडके आजोबा परत मिळणार आहेत.....! चला, जेवण करून नव्या कल्पनाला वळण देऊयात" आईला मदत करायला निघालेले वडील म्हणाले.

"बाबा, तुम्ही तर आजोबांसारखेच बोललात एकदम....नव्या कल्पनाला वळण !" टाळ्या वाजवत राहुल म्हणाला.

तसे सगळे मनमोकळे हसले.

"माझ्या लाडक्या बाळांनो..." जेवणाची वेळ झाली हे पाहून आतल्या खोलीत शांतपणे पडून असलेल्या आजोबांनी राधिका व राहुलला प्रेमळ हाक मारली.

 

तसे ती दोघे भावंडं आत जाऊन आजोबाना व्हीलचेअरवर बाहेर घेऊन आले. सगळे जेवण करून सरप्राईसच्या आनंदात झोपी गेले.

 

२ दिवसांनंतर आज रविवार होता. सगळी तयारी झाली होती. सगळी मंडळी ठरलेल्या वेळेत आऊटहाऊसमध्ये जमली होती. आजोबांचे बालसवंगडी आपल्या लाडक्या बालमित्र-आजोबांना भेटायला खूप उत्सुक होती.

 

राहुल आजोबांना घेऊन आला तसे सगळ्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले. आजोबा अगदीच भारावून गेले. आधीच कल्पना असलेल्या आजोबांचे टपोरे आनंदाश्रू मात्र नव्याने ओघळत होते.

 

"आजोबा, तुम्हाला माहित होते ना आमचे हे सरप्राईस ?" खट्याळ राहुलने मुद्दामहून विचारले.

तसे आजोबाही खळखळून हसले आणि म्हणाले, "विसरू नकोस बच्चू, मी तुमच्या सगळ्यांपेक्षा मोठा खिलाडी आहे....आणि माझ्यावर इतकं प्रेम करणाऱ्या तुम्हां सर्वांची मेहनत अशीच थोडी वाया जाऊ देऊ शकतो मी.....!"

"आई, अगं आजोबा खरंच आधीचे आजोबा झालेत. बघ ना, आधीसारखेच हसतायेत आणि माझ्यासारखे खट्याळ पण....." राहुल हसत हसत आईला हळू आवाजात म्हणाला.

"मी ऐकलं हं....खट्याळ नातवाचा खट्याळ आजोबा परत हसायला लागला म्हणे.....!" आजोबा मिश्कीलपणे हसत म्हणाले.

तसे सगळेच खळखळून मनसोक्त हसले.

 

सगळ्यांनी ठरवलेल्या कार्यक्रमांची आपापली भूमिका पार पाडली. कॉलोनीतल्या सगळ्या आजी-आजोबांनीही ठरल्याप्रमाणे हजेरी लावली होती. आपल्या मित्राला परत मिळवल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसत होता.

 

लहान-मोठ्या सगळ्यांनीच 'खास रविवार' आणखी खास बनवला. कुणी बालगीतांची मेजवानी सादर केली, कुणी छान सुरेख गाणी गायली, कुणी कथेचा आस्वाद मांडला, कुणी चित्रकलेचे प्रदर्शन केलं, कुणी आपल्या कलागुणांना वाव देत विनोदाने सगळ्यांना मनसोक्त हसवलं, कुणी जुन्या गोष्टी सांगून नातवंडांना आपले नवनवे पैलू उलगडून दाखवले, कुणी नात्यातलेल्या गोडव्याचं वर्णन करत वातावरण रम्य बनवलं. असा सादरीकरणाचा कार्यक्रम आटोपल्यावर अनेक खेळही खेळून झाले.

 

असा पूर्ण दिवस 'बालमित्र मैफलीत' निघून गेला. जणू या दिवशी सगळ्यांनाच कंठरूपी पाझर फुटला होता. एकमेकांच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य पाहण्यातलं समाधान सगळ्यांनी लुटलं. असा नात्यातला गोडवा जपणाऱ्या आपल्या माणसांचं जवळ असणं कितीतरी लाखमोलाचं असतं हे सगळ्यांनी दाखवून दिलं. त्याचं खरं प्रात्यक्षिक आजोबांच्या डोळ्यात होतं.

 

आज जणू आजोबांसोबत सगळ्यांनाच आपलं हसू परत मिळालं होतं. आजी म्हणायची तसं आज खऱ्या अर्थाने घराचं घरपण पहिल्यासारखं हसरं झालं होतं.....!


Rate this content
Log in