Varsha Shidore

Children Stories Fantasy Inspirational

3  

Varsha Shidore

Children Stories Fantasy Inspirational

भावनांची सजीव पणती

भावनांची सजीव पणती

3 mins
326


दिव्या, भारती आणि सुमन या बालपणीच्या तीन मैत्रिणी एका पणतीसाठी भांडता आहेत हे पाहून त्यांच्या शेजारून जात असलेल्या जोशी काकूंनी त्यांना विचारले, “अगं मुलींनो, तुमच्या या मोठमोठ्या गोंगाटाचा त्या बिचाऱ्या पणतीला का म्हणून त्रास ?”


सुमन काहीशी नाराजीतच म्हणाली, “ काकू, खूप सुंदर व आकर्षक आहे खरं ही पणती पण बिचारी वगैरे काही नाही हं...! तिच्यासाठीच तर आम्ही तिघी भांडत आहोत. शेवटची उरलेली होती मग आम्ही तिघींनी ठरवले, की घरी घेऊन जाऊ आणि निर्णय घेऊ, ही कुणाकडे राहील याचा...”


“परंतु गेले दोन तास झाले आमचं काही ठरतच नाहीये. आम्हाला सर्वांना ती हवीये”, दिव्या सुमनला मधेच थांबवून म्हणाली.


“आणि काकू, आम्ही सगळ्या बालमैत्रिणींनी मिळून ही सुंदर पणती अकबर चाचाकडून खरेदी केली आहे. आता तिची विभागणी तिघींमध्ये कशी करणार तो प्रश्न आहे..”, काकूंचा प्रश्नार्थक चेहरा पाहून भारती म्हणाली.


“तुम्ही गेले दोन तास पणतीसाठी भांडण्यात घालवले...?”, जोशी काकूंनी आश्चर्याने विचारले.


“नाही काकू. आम्ही आधी दीड मस्त खेळ खेळलो. खूप मजा केली. पण आता थकलो म्हणून तेवढ्या वेळात पणतीचा वाटणी करू म्हटलं !”, काहीसे हसत आणि निर्वाणीच्या स्वरात भारतीने सांगितले.


“अच्छा...तुमचा संवाद नि भांडण तसे गंभीर आहे. पण मला आधी एक सांगा पणती निर्जीव की सजीव..?”, काकू विचारत्या झाल्या.


“कदाचित निर्जीव असावी का...? कारण आम्ही शिकलो आहोत ना शाळेत, सजीव व निर्जीव म्हणजे काय ते. हो ना गं दिव्या ?”, सुमनने दिव्याला प्रश्न केला.


“हो. सुमन तू बरोबर बोलते आहेस. जसे आपण सगळे सजीव आहोत. आपल्यात प्राण आहेत, हालचाल करतो, एक जीव आहोत. असा या पणतीत तर एकही गुणधर्म नाही. शिवाय वस्तू तर निर्जीवच असतात. आपल्या विज्ञानाच्या सदाफुले बाईंनी शिकवलेला सजीव-निर्जीव धडा मला चांगलाच आठवतोय...”, सुमनच्या मताला दुजोरा देत दिव्याने स्पष्टीकरण दिले.


“अम्म्म... निर्जीव पण हो...ती आपल्याला खूप काही शिकवते त्यामुळे सजीव...”, काहीशी गोंधळून गेलेली दिव्या म्हणाली.


“हो ना... आणि एकदा विशाल दादा म्हणाला होता...

मिटवून अंतर्मनातला अंधकार

प्रवास तिमिरातुनी तेजाकडे...

पेटवून आशेची पणती ज्योत

जाऊ नव्या आत्मविश्वासाकडे...”

दादाच्या या ओळी आठवून सुमन म्हणाली.


“वा...हुशार आहात तुम्ही सर्वच बालसवंगड्या ! बरं... एक काय ते अखेरचं उत्तर...?”, जोशी काकू मिश्किल हसत म्हणाल्या.


“सजीवच असली पाहिजे. कारण जिच्यामुळे आपल्याला भावना कळतात आणि जिच्यासाठी आम्ही भांडलोही मग ती निर्जीव कशी असेल...? तिच्यात लपलेल्या अदृश्य भावना असल्या तरी तिच्याविषयी आपल्या भावना जोडलेल्या आहेतच. आता समजलं. काकू, तुम्ही मघाशी का म्हणाल्या बिचारी पणती असं !”, एवढा वेळ शांत असलेली भारती काकूंकडे पाहून उद्गारली.


“बरोबर...! फक्त आपण शिकलेले पुस्तकी विज्ञानी ज्ञानच सजीव-निर्जीव गुणधर्ण ठरवत नाही. भावनाही बोलक्या असतात. कधी आपल्या तर कधी वस्तूंच्या. आपल्या घरातल्या वस्तू जसे टेलिव्हिजन, फोटोप्रेम, स्वयंपाकघरातल्या वस्तू, आपले कपडे इत्यादी वस्तू निर्जीव असल्या तरी त्यांचे आणि आपल्यातले भावनिक नाते दुसरा कोणी समजू शकत नाही. ‘अनुभवाचे भावुक, भावनिक बोल’ आता तुम्ही शिकलात. मग काय ठरलं पणती कुणाकडे बरं राहणार ?”, काकूंनी उत्साहाने विचारले.


“आम्ही सगळ्या मिळूनच तिला प्रेमाने जपू, तिचा आळीपाळीने योग्य वापर करू, तिला स्वच्छ ठेऊ, कधी वेगळ्या रंगांनी सजवू पण पुन्हा कधीच भांडणार नाही काकू...”’ तिघी जणू एकसुरात आनंदाने किंचाळल्याच.


जोशी काकू खाली ठेवलेल्या हातातल्या भाजीपाल्याच्या पिशव्या उचलून त्यांच्या घरात शिरल्या. तशा दिव्या, भारती आणि सुमन पुन्हा खेळण्यात दंग झाल्या.


तात्पर्य: जशा एक सजीव प्राणी म्हणून आपण अन्य मानव, प्राणी, पक्षी इत्यादींबद्दल आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करत असतो. तशाच भावना निर्जीव वस्तूंबद्दलसुद्धा हळूहळू आपली जवळीकता, आपुलकी वाढत जाते, तशा त्या भावना अधिक प्रकर्षाने जाणवू लागतात आणि त्यांचा आदर आपल्या वागणुकीतून दिसून येणे म्हणजे सजीव असलेल्या माणसाचा निर्जीव वस्तूंबद्दलचा वेगळेपणा साधला जाणे !


Rate this content
Log in