Nilesh Jadhav

Tragedy

4.0  

Nilesh Jadhav

Tragedy

इच्छा

इच्छा

7 mins
267


     मी पुण्याच्या कोथरूड भागात एका टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी मध्ये काम करत होतो तेंव्हाची ही गोष्ट. खरंतर ही कथा माझी नाही या कथेत मी कुठेच नाही. पण ही घटना ऐकत असताना मी तिथेच कुठेतरी आहे असं का कोणास ठाऊक पण मनापासून वाटत होतं. कसं असतं ना प्रत्येक माणसाची काही ना काही इच्छा असते. मग इच्छा सर्वांचीच पुर्ण होते असं अजिबात नाही. आणि जर ती शेवटचीच असेल तर..... इथे मात्र मी सुद्धा निःशब्द झालो होतो. 

     त्या दिवशी अगदी सकाळीच मला सरांनी फोन केला आणि म्हणाले की आज लवकर ये कारण दोन दिवसांसाठी एका कस्टमर ला घेऊन तुला कोकणात जायचंय. तसा तर एवढ्या लांबच्या ट्रावलिंगचा मला कंटाळाच आलेला पण कोकण म्हंटलं की आपोआप थकवा दूर होऊन जातो. ऑफिस मध्ये गेल्या नंतर मी त्या कस्टमरचा पत्ता वगैरे घेऊन त्यांच्या दारात जाऊन थांबलो. आणि क्षणात माझं मन नाराज झालं. कारण माझ्या समोर उभे होते एक साधारण सत्तर वर्षीय आजोबा. म्हणजे मला यांना घेऊन कोकणात जायचं होतं. संपुर्ण प्रवास हा कंटाळवाणा असणार आहे हे माझ्या लक्षात आलं होतं. पण शेवटी ड्युटीला प्राधान्य देत मला हा प्रवास करावाच लागणार होता.

     प्रवासात श्यक्य तेवढं बोलणं होत होतं. येन मे महिन्याचे दिवस होते. त्यामुळे वातावरणात खुपच गर्मी होती. आम्ही कराड, पाटण, चिपळूण मार्गे आजोबांच्या गावी जाऊन पोहचलो. तसं गाव छोटच होतं. मुंबई-गोवा महामार्गावर असल्याने जास्त आडवाटेने जावं नाही लागलं. जेंव्हा गावात पोहचलो तेंव्हा मनाला एक प्रकारची शांती मिळाली. आंबा फणसाच्या बागा, नारळाची गगनाला भिडणारी झाडं या सर्व वातावरणात दिवसभर आलेला थकवा कुठल्या कुठे नाहीसा झाला. गर्द झाडीत असणारे आजोबांचे दोन मजली पण कौलारू घर त्या समोरचे टुमदार अंगण सर्वच किती मस्त होतं. घरात आणखी कोणी नव्हतं फक्त आजोबांच्या सून होत्या. आजोबांनी त्यांच्याशी माझी ओळख करून दिली होती. रात्रीचे जेवण केल्यावर मला आजोबा म्हणाले तू आता झोप आपल्याला उद्या माझ्या मुलाला आणायला रेल्वे स्टेशन ला जायचं आहे. हे ऐकल्या नंतर खरंतर मी मनोमन खुश झालो आता सर्वच कुटुंब येत आहे म्हंटल्यावर एखादा समुद्र किनारा किंवा बंदर फिरायला मिळणार हा विचार करत मी ताणून दिली. सकाळी लवकरच उठून आम्ही स्टेशनवर गेलो. आजोबांचा मुलगा विजय तिथे आमचीच वाट पाहत उभे होते. त्यांना घेऊन आम्ही घरी आलो. 

     विजय काका म्हणजे बलदंड शरीरयष्टी, पिळदार मिशी, भारदार आवाज, नजर तर अशी की फक्त नजरेनेच समोरचा व्यक्ती चार पावले मागे सरेल. असं सर्व असलं तरी मनातून मात्र ते हळवे होते. त्यांना पहाताच क्षणी मी त्यांच्या मनाचा ठाव घेतला होता. आणि माझा अंदाज अगदी बरोबर निघाला. विजय काका हे आर्मी मध्ये जम्मू काश्मीरला असतात. किती बोलतो हा माणूस त्या दिवसभरात असं मला कैक वेळा वाटून गेलं होतं. तो संपूर्ण दिवस विजय काकांसोबत कसा गेला ते कळलंच नाही. संध्याकाळी साधारण सात वाजता विजय काकांनी मला आवाज दिला. आणि म्हणाले "काय रे उमेश ड्रिंक करतोस का..?" अचानकच विचारलेल्या या प्रश्नावर मात्र मला काय बोलावं ते कळलंच नाही. माझी अवस्था पाहून मोठ्याने हसत ते म्हणाले " मला कंपनी देशील..?" मग मात्र मला हो म्हंटल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. काकांनी सर्व व्यवस्था आधीच करून ठेवली होती. आम्ही मस्त एका आंब्याच्या झाडाखाली बसलो. उन्हाळ्याचे दिवस होते अजून अंधार पडायला अवकाश होता. दिवसभराच्या गरमीने हैराण झाल्यावर या झाडाखाली येणाऱ्या हळुवार हवेने मनाला किती प्रसन्न वाटत होतं. आकाशात सूर्य मावळतीला जाऊन केशरी रंगाच्या रंगछटांची उधळण करत होता. हळूहळू समोर असलेल्या इंग्रजी दारूचा एक एक घोट रिचवत असताना आमच्या गप्पा नुकत्याच रंगत चालल्या होत्या. हीच संधी आहे हे ओळखून मी काकांना उद्या आपल्याला कुठं जायचं आहे हे विचारलं. त्यावर काकांनी जे सांगितलं ते ऐकून माझं मन क्षणात नाराज झालं. कोणाच्यातरी तेरावा विधीला जायचं होतं. पण हे सांगत असताना विजय काका कमालीचे अस्वस्थ वाटले. त्यांच्या चेहऱ्यावरच्या रंगछटा क्षणात बदलून गेल्या. मावळतीच्या सुर्याची रंगांची उधळण थांबून रात्र अंधार घेऊन येत होती अगदी तसंच या माणसाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले. न राहवून मी त्यांना खुप खोदून विचारलं तेंव्हा विजय काकांनी मला सांगायला सुरवात केली.

      समिधा माझी मुलगी सॉरी माझी मेव्हणी.. माझं लग्न झालं तेंव्हा हिच्यासोबत आली होती. त्यावेळी ती फक्त पाच वर्षांची होती. हिच्या पाठीवर ती बऱ्याच दिवसांनी जन्माला आली होती. तिचे ते इवलेशे पाय पैंजनाचा आवाज करत घरभर धावायचे तेंव्हा किती मस्त वाटायचं हे शब्दात नाही सांगता येणार. पाच दिवस आली होती ती पण सगळ्यांनाच लळा लावून गेली होती. माझी नोकरी ही अशी मी एकदा गेलो की टिकडचाच होऊन जायचो. मग वरचेवर समिधा हिला सोबत व्हावी म्हणून आमच्याकडेच असायची. सुट्टीच्या दिवसात मी घरी असायचो तेंव्हा तिला घेऊन यायचो. खरंतर ती माझीच मुलगी आहे असंच मी समजायचो. काही वैदकीय कारणांमुळे मलाही मुल व्हायला उशीर झाला मग मात्र तीच आमची मुलगी आहे हेच आम्ही समजू लागलो. तब्बल दहा वर्षानंतर मला मुलगा झाला. पण एवढं असूनही समिधा बद्दलचं माझ्या मनातील प्रेम कधीच कमी नव्हतं झालं.

     मी समिधाला पोटच्या पोरीसारखीच वागणूक दिली. बदल्यात तिनेही माझ्या मुलाला खुप जीव लावला. मला आजही आठवतंय तिला जेंव्हा पुढील शिक्षणासाठी मुंबईच्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घ्यायचं होतं तेंव्हा मीच माझ्या सासऱ्यांना तिला मुंबईला जाण्यासाठी विनवणी केली होती. मी तिला कधीच कुठल्याच गोष्टीची कमतरता भासू दिली नाही. कधी कधी सासरेच मला हसत-हसत म्हणायचे जावईबापू तुम्हीच सांभाळा तुमच्या मुलीला. तसं तर मी वरचे वर सिमेवरच असायचो घरची, समिधाची माझ्या मुलाची खुप आठवण यायची पण पर्याय नसायचा. समिधा मुंबईला शिकू लागली. ती हुशार होती यात शंकाच नव्हती. तिने तिचं कंप्युटर इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि आता ती चांगल्या जॉबवर काम करू लागली होती. या काळात मला आणखी एक मुलगी झाली. समिधाला जेंव्हा कधी वेळ मिळायचा तेंव्हा ती मुलांना भेटायला यायची. बहुदा मी तिला दिलेल्या प्रेमाची परतफेड करत होती की काय कोणास ठाऊक. नंतर मी माझ्या मुलाला मुंबईला आर्मी स्कुल मध्ये ऍडमिशन घेऊन समिधाजवळ ठेवले. आता सर्व व्यवस्थित चालू होतं तेंव्हा मी जम्मू काश्मीरला पोस्टिंगला होतो.

      एक दिवस मला समिधाला फोन आला. ती खुपच घाबरत घाबरत बोलत होती. तिला काहीतरी सांगायचं होतं पण ती कचरत होती. मग मीच थोडं दरडावून आणि नंतर समजुतीच्या स्वरात तिला विचारलं तेंव्हा तिने मला संकेत बद्दल सांगितलं. ती सांगत होती आणि मी फक्त ऐकत होतो. मनात एकच विचार होता तो म्हणजे आपली मुलगी मोठी झाली आहे आता. संकेत सुद्धा इंजिनिअर होता. मी समिधाकडून त्याचा नंबर घेऊन त्याच्याशी बोललो. मलाही त्यात काही कमी आहे असं जाणवलं नाही. पण या ही वेळी माझ्या सासऱ्यांची समजूत घालायची जबाबदारी माझ्यावरच येऊन पडली. मग आधी सासू सासरे नंतर संकेतचे आई वडील या सर्वांना समज देत एकदाचं समिधा आणि संकेतचं लग्न ठरलं. पण अडचण अशी होती की संकेतच्या घरातील मंडळी ही जुन्या विचारांची होती. हे सर्व मान्य करून कसंबसं लग्न उरकलं. पण लग्नानंतर सगळंच उलट झालं संकेतच्या आईवडिलांची समिधाने जॉब करावा अशी अजिबात इच्छा नव्हती. संकेत ने समिधाला कसतरी समजावून थोड्या दिवसांचा अवधी मागून घेतला होता. काही दिवसांनी ते जाणारच होते मुंबईला पण.....

     इथे येऊन मात्र विजय काका गहिवरून गेले. त्या रात्रीच्या स्वच्छ आणि शितल चांदण्याच्या उजेडात त्यांच्या डोळ्यांच्या कडांवर ओघळण्याची प्रतीक्षा करत असलेला अश्रू मला स्पष्ट दिसला. घोट घेण्यासाठी हातात घेतलेला मदिरेने भरलेला ग्लास मी खाली ठेवला. खरंतर मी काकांसमोर खुपच लहान होतो तरीही मी अलगद त्यांच्या मांडीवर हात ठेवत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. काकांनी त्यांच्या हातातील ग्लास तोंडाला लावून क्षणात रिचवला आणि मोठ्यांदा स्वास घेतला. दुसरा पॅक भरत भरत त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली. 

      समिधाच्या लग्नाला आता सहा महिने लोटून गेले होते. माझ्या दोन्ही मुलांना खरंतर तिची खुप सवय झालेली होती. पण कधीतरी समिधा लग्न करून जाणारच होती ना. संकेत मुंबईला जॉबवर रुजू होता. दर विकेंडला तो गावी येत जात असे. सर्व मजेत चालू होतं. आणि एक दिवस जे नको व्हायला तेच झालं. त्या दिवशी खुप पाऊस पडत होता. कोकणातल्या पावसाचा फक्त अंदाज लावलेलाच बरा. संकेत मुंबईहून गावी येण्यासाठी निघाला त्यावेळी जास्त पाऊस होता म्हणून समिधा त्याला सांगत होती की नका येऊ तरीही तिचं काहीही न ऐकता तो गावी यायला निघाला. पाऊस तर खुप पडत होता. येताना हायवेवर संकेतचा अपघात झाला. आणि त्यातच तो गेला. ह्या अशा अचानक बसलेल्या धक्क्याने सर्वच जण खचून गेले होते. समिधाकडे तर बघवतही नव्हतं. तो आलेला प्रसंग त्या प्रसंगाला समिधाने कसं तोंड दिलं असेल हे तिचं तिलाच ठाऊक. सर्व विधी वगैरे आटोपल्यावर मी समिधाला आणायला तिच्या सासरी गेलो. लग्नाला सहाच महिने झाले होते आपली पोर ही आपल्याकडेच असायला हवी ही माझी प्रामाणिक इच्छा होती. आधी माझ्या मुलांचा दुरावा आणि नंतर संकेतचे अचानकपणे जाणं तिला सहन न होणारं होतं. तरीही तिने ठामपणे सासरी म्हणजे संकेतच्याच घरी रहाण्याचा निर्णय घेतला होता.

       काही दिवसातच समिधा पुर्ण खचून गेली. तिने अन्नाचा त्याग केला होता. किती समजावलं तरी त्या धक्क्यातून सावरायला ती तयारच नव्हती. एक दिवस तिने मला फोन करून माझ्या मुलांना भेटायची इच्छा व्यक्त केली. पण त्यांना पाहून ती आणखी कोसळून जाईल या भीतीने मी त्यांना भेटण्यासाठी टाळत होतो. आणि अखेर त्यांची वाट डोळ्यात ठेऊन बारा दिवसांपूर्वी तिने डोळे बंद केले ते कधीच न उघडण्यासाठी. संकेतला जाऊन अजून वर्ष ही नाही झालं आणि त्याच्या पाठोपाठ समिधाने जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यविधीलाही मी माझ्या मुलांना नाही आणू शकलो. आत्ता पर्यंत समिधाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा मी तिची शेवटची इच्छा पूर्ण नाही करू शकलो. मी माझ्या मुलांना अजून त्यांची मावशी गेल्याचंही नाही सांगितलं. उद्या दोन्ही मुलं मावशीला त्यांच्या भेटायला येणार आहेत या सर्व प्रसंगाला मी कसं तोंड देणार मलाच कळेनासं झालंय.

       आता मात्र तो पहाडासारखा माणूस पार कोसळून गेला होता. विजय काकांना अश्रू अनावर झाले होते ते ताडकन उठले आणि माझ्यापासून दूर अंतरावर जाऊन उभे राहिले. मी तसाच तिथे बसून राहिलो त्या दारूच्या ग्लासकडे एकटक पहात. डोक्यात फक्त मुंग्या येत होत्या. दुसरं काहीच सुचत नव्हतं. एखाद्या पुतळ्यासारखा मी फक्त स्तब्ध होतो. इतक्यात काकांचा आवाज कानावर धडकला "उमेश चल जेऊन घेऊयात उद्या सकाळी लवकर निघायचं आहे".....


Rate this content
Log in

Similar marathi story from Tragedy