Sneha Kale

Horror

3.2  

Sneha Kale

Horror

इच्छा एका अतृप्त आत्म्याची

इच्छा एका अतृप्त आत्म्याची

19 mins
2.0K


सकाळचे 6 वाजले. रियाला जाग आली.थोडा वेळ अजून पडून रहावं अस वाटत होतं..पण विशालसाठी नाश्ता आणि टिफिन ची तयारी करायची होती. ती उठली..आंघोळ वगैरे आटपून देवपूजा करून घेतली..घंटीच्या आवाजाने विशालला जाग आली..तो उठला आणि देवघरात पूजा करत असलेल्या रियाला बघत उभा राहिला..विशाल तिच्याकडे पाहतोय हे तिला जाणवले.रियाचे लक्ष जाताच विशालने तिला smile दिली आणि तो अंघोळीला गेला..रिया कृत्रिमरीत्या का होईना पण हसली.


रिया आणि विशालचे लग्न होऊन 2 महिने झाले होते..या दोन महिन्यात आज रिया प्रथमच इतकं गोड हसली होती.विशाल मनोमन सुखावला होता.विशाल आंघोळ करून येईपर्यंत रियाने त्याचे कपडे आणि टिफिन तयार करून ठेवलं होतं..तो पटापट आवरून नाश्ता करायला टेबलवर बसला. रिया नाश्त्याची प्लेट घेऊन आली आणि टेबलवर ठेऊन जाऊ लागली तेवढ्यात विशालने तिचा हात धरला..तिने चमकून त्याच्याकडे पाहिले..त्याने लगेच तिचा हात सोडला..त्याला खजील झाल्यासारखं झालं..


"माझ्यासोबत नाश्ता करायला बस ना", विशाल म्हणाला.


" तुम्हाला उशीर होत असेल.तुम्ही नाश्ता करून घ्या.मी नंतर करेन", रिया म्हणाली.


या दोन महिन्यात एकदाही दोघांनी एकत्र नाश्ता आणि रात्रीचे जेवण केलं नव्हतं..रिया त्याला टेबलवर नाश्ता किंवा जेवण वाढून बेडरूममध्ये जाऊन बसायची आणि तिथे जेवायची.विशालची खूप इच्छा असायची की दोघांनी एकत्र जेवावं, त्याने कितीतरी वेळा तिला एकत्र जेवण्याविषयी विचारले पण ती कधीच त्याच्यासोबत जेवली नाही.


विशालने नाश्ता केला आणि तो ऑफिसला निघून गेला..


रिया सकाळचा चहा घेऊन गॅलरीत गेली ..आजूबाजूचा परिसर फारच रम्य होता..चहुबाजूंनी आज ऊन असूनसुद्धा थंड वाऱ्याची झुळूक अधूनमधून येत होती..ती तिथेच विचार करत बसली..

काय आयुष्य झालंय माझं..माझ्याबाबतीतच का व्हावं..इतका काय मोठा गुन्हा केला होता मी.. प्रेमच केलं होतं..ते ही मला मिळू नये..आजही कित्येक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत..भूतकाळात घडलेल्या घटनांचा उलगडा आजही झालेला नाही..माझी स्वप्न ,माझ्या इच्छा सारं काही मातीत मिसळलं..

या विचारांनी तिच्या डोळ्यात पाणी तराळलं.


ती उठून जाऊ लागली तेवढ्यात वाऱ्याची थंडगार झुळूक आली.. अंगावर शिरशिरी आणणारी आणि अंगाला झोंबणारी झुळूक रियाच्या अंगाला स्पर्श करताच तिला अस्वस्थ वाटू लागलं.. ती लगेच आत आली.. मे महिन्याच्या गरमी मध्ये इतका थंड वारा कसा काय आला, याचे तिला आश्चर्य वाटले.

आत येऊन तिने अंगावर स्वेटर घातला आणि हॉल मध्ये येऊन बसली..त्यावेळी तिला घरात कोणीतरी वावरतय असा भास होत होता.पण तिने दुर्लक्ष केलं..टीव्ही चालू केला तेवढ्यात गॅलरीच्या खिडकीच्या दरवाजाचा आवाज येऊ लागला..तिने उठून खिडकीचा दरवाजा बंद केला आणि पुन्हा हॉल मध्ये येऊन बसली..तोच तो दरवाजा पुन्हा उघडला.ती दरवाजा बंद करायला जाणार इतक्यात दाराची बेल वाजली..ती दचकली..तिने दाराच्या होलमधून पाहिले.. कामवाल्या मावशी आल्या होत्या.तिने दार उघडले...मावशींनी काम करायला सुरुवात केली..

रियाने स्वेटर घातलेले पाहून त्यांना पण आश्चर्य वाटले..

" ताई, बरं वाटत नाहीये का तुम्हाला", मावशींनी विचारले..

" नाही ओ, तसं काही नाही", रिया म्हणाली..


कामवाल्या मावशींनी सगळी काम आवरली आणि त्या निघून गेल्या..जेवणाची वेळ झाली तशी रियाने जेवण वाढून घेतलं..ती स्वयंपाक घरात गेली..जेवण वाढून घेत असताना एक थंड झुळूक पुन्हा तिला स्पर्श करून गेली.अस जाणवत होतं की तिच्या मागे कोणीतरी आहे..तिने झटकन मागे वळून पाहिलं..भास झाला असेल असं वाटून ती हॉल मध्ये येऊन बसली..टीव्ही चालू केला तर तो चालूच होत नव्हता..तिने रागातच रिमोट कोचवर आपटला..पटापट जेवली.सगळं आवरलं आणि गॅलरीत तिच्या आवडीचं पुस्तक वाचत बसली..पुस्तक वाचता वाचता तिला झोप लागली..झोपेत तिला कोणाचा तरी स्पर्श झाला.तिला जाग आली.. सकाळपासून तिला सारखे भास होत होते..इतक्यात विशाल आला..तिने त्याला सगळं सांगितलं..भास होत असतील असे तो बोलला..खरतर त्यालाही हे विचित्रच वाटलं.पण त्याने त्याचा जास्त विचार केला नाही.


दुसऱ्या दिवशी रियाचा वाढदिवस होता.विशालला तो खूप specially celebrate करायचा होता.पण रियाला आवडेल का, या संभ्रमात तो होता.शेवटी त्याने मनोमन काही ठरवले..

नेहमीप्रमाणे रिया सकाळी उठली.विशालने त्याच वेळी तिला birthday wish केले.. अगदीच कोरडेपणाने तिने thanks म्हटलं..तिला तर आठवणही नव्हती की आज तिचा वाढदिवस आहे..रोजच्या सारखाच तिचा दिवस सुरू झाला.विशालसाठी नाश्ता आणि टिफिनची तयारी केली..

विशालने टेबलवर एक gift ठेवलं होतं आणि त्यावर एक नोट लिहून ठेवली होती.


Happy birthday Riya

आज संध्याकाळी तुझ्या birthday celebration साठी बाहेर जाण्याचा प्लॅन होता..जर तुझी इच्छा असेल तरच..

एक request होती, तुझ्यासाठी एक dress आणला होता..संध्याकाळी बाहेर जाताना तू तो घातलास तर मला आनंद होईल..see u in the evening..


रियाने gift उघडून पाहिले.. त्यात सुंदरसा लाल रंगाचा gown होता..रियाचा आवडता रंग..रियाने तो dress हातात घेतला..

खरंच , विशाल किती करतोय माझ्यासाठी..माझ्या आनंदासाठी..आणि मी..अजूनही भूतकाळाला कवटाळून बसलेय..जे झालं त्यात विशालचा काय दोष..त्यानेच तर मला सावरलय..इतक्या दिवसात त्याच्याशी धड नीट बोलले सुद्धा नाही..यंत्रवत आयुष्य जगतेय..पण आता नाही..विशालला त्याच्या वाटणीचे प्रेम मिळायलाच हवं..

नव्या उमेदीने ती उठली..संध्याकाळी बाहेर जाण्याच्या दृष्टीने तयारी करू लागली..घरातलं सगळं आवरलं..दुपारी थोडा वेळ आराम करायला म्हणून ती बेडरूममध्ये गेली..थोड्या वेळातच तिचा डोळा लागला..


साधारण तासाभराच्या विश्रांतीनंतर ती उठली..तिचं लक्ष सारख घड्याळाकडे जात होतं..आज वेळ लवकर जाता जात नव्हता..इकडे विशालही संध्याकाळ कधी होतेय याची आतुरतेने वाट पाहत होता..शेवटी न राहवल्याने तो हाफ डे घेऊन घरी गेला..रिया फ्रेश होत असताना तिला पुन्हा ती झुळूक जाणवली..तिने गॅलरीत येऊन पाहिले तर खिडकी उघडी होती..तिने लगेच लावून घेतली..इतक्यात दाराची बेल वाजली..यावेळी कोण आलं असेल, असा विचार करत तिने दार उघडले.दारात विशाल..तिने आश्चर्याने पाहिले..

"सहजच लवकर आलो..संध्याकाळी थोडं बाहेर फिरायला गेलो असतो म्हणून..आणि मग dinner..चालेल ना..जाऊया ना..", विशालने बाचकत विचारले..

"चालेल, जाऊया..तुम्ही फ्रेश होऊन घ्या..मी चहा ठेवते.", रिया म्हणाली..

आज विशालचा आनंद गगनात मावत नव्हता...रियाच्या बोलण्याने तो कमालीचा सुखावला..तो बेडरूममध्ये आला तेव्हा रियाने बेडवरच dress ठेवला होता..त्यावर matching ज्वेलरी काढून ठेवली होती..


कपडे बदलून तो बाहेर येऊन बसला..रियाने त्याला चहा दिला आणि तिने पण तिथेच बसून चहा घेतला..रियाला शेजारी बसलेलं पाहुन विशाल खुश झाला..दोघ बराच वेळ गप्पा मारत बसले..


दोघांनाही वेळेचं भान नव्हतं..एव्हाना सात वाजले होते..

रिया उठली आणि तयारी करायला आत गेली.. आत गेल्यावर समोरचे दृश्य पाहून ती जोरात किंचाळली.. तिचा आवाज ऐकून विशाल धावत रूममध्ये गेला..आतमध्ये बेडवर ठेवलेला रियाचा dress जळाला होता..तिच्या दागिन्यांचे तुकडे इतरत्र पसरले होते...हे सगळं पाहून रिया पुरती घाबरली...हे काय होतंय तिला कळत नव्हते..काही दिवसांपासून होणारे भास आणि आता हे सगळं..तिने विशालला पुन्हा सांगितलं.. नक्कीच आपल्या घरात कोणतीतरी शक्ती वावरतेय..विशालचा या गोष्टींवर विश्वास नव्हता..पण तो जे पाहत होता ते खरच भयानक होत आणि जरी दाखवत नसला तरी आतून तो ही घाबरला होता..


विशालने रियाची समजूत काढत तिला बाहेर नेले..दोघांनी रियाचा बिर्थडे celebrate केला..पण रियाच्या मनातून ते दृश्य काही केल्या जात नव्हते.


दोघ घरी आले..बऱ्याच दिवसांनी आज रिया थोडीफार आनंदी दिसत होती..विशालच तिला समजावणं,तिच्यावर प्रेम करणं हे तिला त्याच्याकडे आकर्षित करत होत..रिया फ्रेश होऊन झोपायला आली..विशाल खिडकीजवळ उभा राहून मोबाईल बघत होता.. तेवढ्यात रिया विशालच्या समोर येऊन उभी राहिली.त्याने रियाकडे पाहिलं..आज त्याला रिया वेगळीच भासत होती..तो काही बोलणार इतक्यात रियाने त्याच्या ओठांवर बोट ठेऊन नजरेनेच काही न बोलण्याचा इशारा केला..रियाने विशालला घट्ट मिठी मारली..जे काही घडत आहे ते विशाल साठी अनपेक्षित पण आनंददायी होत..दोघ बराच वेळ एकमेकांच्या मिठीत विसावले होते..इतक्या दिवसाचं मळभ दूर सारून वैवाहिक जीवनाची नव्याने सुरुवात करण्याचा रियाने निर्णय घेतला होता...आपल्या जोडीदाराला आपलं सर्वस्व समर्पित करण्यासाठी आसुसलेले दोन जीव आता एक होणार होते..


तेवढ्यात विजेचा धक्का लागावा तसे ते दोघे एकमेकांपासून दूर फेकले गेले...हे काय होतंय हे कळायच्या आधीच विशाल अचानक हवेत तरंगायला लागला..आणि जोरात जमिनीवर आपटला गेला.विशालच्या डोक्याला जबरदस्त मार लागला होता.डोकं सुन्न झालं..तसच डोकं पकडून आणि बेडचा आधार घेत तो उठण्याचा प्रयत्न करू लागला..रियाने त्याला हाताला धरून उठवले तेवढ्यात रिया लांब फेकली गेली आणि विशालचं डोकं भिंतीवर चार पाच वेळा आपटलं गेलं..रियाकडे हतबल होऊन बघण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. विशालच्या डोक्यातून रक्त वाहत होतं.. तो बेशुद्ध झाला. रिया हे पाहून जोरजोरात ओरडण्याचा प्रयत्न करू लागली पण काही केल्या तिचा आवाज फुटत नव्हता...मोठ्या प्रयत्नाने तिने शेजारच्या काका- काकूंना बोलावलं..ते आले तेव्हा विशाल रक्तबंबाळ अवस्थेत जमिनीवर पडला होता..सर्वांनी ताबडतोब त्याला दवाखान्यात नेलं..रियाला कळत नव्हतं की डॉक्टरांना काय सांगायचं..कारण जे काही घडलं होत ते बुद्धीच्या पलीकडची गोष्ट होती..कोणी तिच्यावर विश्वास ठेवला नसता..तिने वेळ मारून देण्यासाठी विशालचा पाय घसरून तो पडला असे डॉक्टरांना सांगितले..लगेच त्याचे उपचार सुरू झाले..


साधारण आठवड्याभराने विशाल घरी आला..रियाने रात्रंदिवस त्याची सेवा केली..त्या रात्री जे काही घडलं ते गूढच होत.. ती काळी रात्र विसरून जाण्याचा प्रयत्न करूनही शक्य होत नव्हते...


विशाल घरी आला त्या रात्री त्याला झोप लागत नव्हती.तो प्रसंग सतत डोळ्यासमोर येत होता..तो पुरता घाबरून गेला होता..कोणीतरी अज्ञात शक्ती त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करत आहे, याची त्याला खात्री पटली...रियालाही पुन्हा तिला होणाऱ्या भासाची आठवण झाली..बऱ्याच वेळाने तिला आणि विशालला झोप लागली..मध्यरात्री विशालला अस्वस्थ वाटू लागलं..त्याचा श्वास कोंडला जात होता..त्याच्या छातीवर दाब जाणवत होता. त्याचा गळा कोणीतरी दाबत असल्याचा त्याला भास झाला..त्याला ओरडता सुद्धा येत नव्हते.. कोणीतरी हात पाय घट्ट बांधून ठेवल्याप्रमाणे झाले होते..त्याला हालचाल करता येत नव्हते..तो संपूर्ण ताकदीनिशी बेड हलवून रियाला उठवण्याचा प्रयत्न करत होता..रिया शेजारीच होती पण कूस वळवून झोपली होती म्हणून तिला काहीच कळले नाही..बऱ्याच वेळानंतर रियाला जाग आली.घामाघूम झालेल्या विशालची अवस्था पाहून ती घाबरून ओरडलीच..रडू लागली..काही वेळाने सर्वकाही शांत झाल...बराच वेळ चाललेल्या झटापटीनंतर विशालला खूप थकवा जाणवत होता..रियाने त्याला उठवलं..पाणी दिल...या सगळ्या अनपेक्षित गोष्टी आपल्यासोबत का घडत आहेत, हा प्रश्न त्यांना सतावत होता..


दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारचे काका काकू विशालची विचारपूस करायला आले..त्यांनी त्याची अवस्था पाहून नक्की काय घडलं हे विचारलं..पहिल्यांदा काहीही सांगण्यास टाळाटाळ करणाऱ्या रियाने सगळं सुरुवातीपासून सांगण्यास सुरुवात केली..हा काय प्रकार आहे हे काकांच्या लक्षात आले..


"रिया बेटा, मला हे साधं प्रकरण वाटत नाहीये..या घरात नक्कीच कोणत्यातरी अज्ञात शक्तीचा शिरकाव झाला आहे...आमच्या ओळखीचे एक सत्पुरुष आहेत..आम्ही वरचेवर त्यांचा सल्ला घेत असतो..खूप ज्ञानी आहेत ते.त्यांना आम्ही गुरुजी म्हणतो..आपण एकदा त्यांच्या कानावर या गोष्टी घालूया..देवाच्या कृपेने नक्कीच काहीतरी मार्ग निघेल..", काका म्हणाले


"धन्यवाद काका,तुम्ही आहात म्हणून आम्हाला आधार आहे..आपण लवकरात लवकर त्यांची भेट घेऊ", रिया अगदी काकुळतीला येऊन बोलत होती..


"त्यांना आधी सांगावं लागेल..त्यांच्या ध्यानाच्या वेळा असतात..त्यादरम्यान त्यांना भेटता येणार नाही..तू काळजी करू नकोस..मी त्यांच्याशी बोलून भेटण्याची वेळ निश्चित करून घेतो", काका म्हणाले..


रियाला आशेचा किरण दिसत होता..


त्याच दिवशी काकांनी गुरुजींना फोन केला..गुरुजींना सगळी परिस्थिती सांगितली..गुरुजी गावी असून दोन चार दिवसांनी येणार असल्याचे कळले..तोपर्यंत त्यांनी त्यांच्या घरी जाऊन अंगारा घेण्यास आणि जेव्हा विशालला त्रास होईल तेव्हा त्याला लावण्यास सांगितले.त्याप्रमाणे काका रिया आणि विशालला घेऊन गुरुजींच्या घरी गेले..त्यांच्या पत्नीने त्यांना अंगारा दिला..


रिया चिंतेत होती..या दोन चार दिवसांत अजून काय काय पाहावं लागणार आहे या विचाराने तिचा थरकाप उडाला..


हळूहळू विशालच्या तब्येतीत सुधारणा होऊ लागली..पण त्याने अजूनही ऑफिसला जाण्यास सुरुवात केली नव्हती..


त्यादिवशी रिया अंघोळ करून आली आणि कपडे बदलण्यासाठी बेडरूममध्ये आली.. नुकतीच न्हाऊन आलेल्या रियाचा सुगंध रूममध्ये पसरला होता..तिचे मोकळे केस,नितळ त्वचा पाहून विशाल मोहित झाला..तिला मिठीत घेण्यास आतुरलेला होता..तसच तो उठला आणि रियाला बाहुपाशात घेतले..रिया पण त्याच्या मिठीत विसावली..त्याच्या दंडाचा स्पर्श होताच तिचे अंग शहारले... विशालने दोन्ही हाताने तिची मान धरली आणि म्हणाला ," न्हाऊन आल्यावर तू खूपच मोहक दिसते आहेस"..रियाने लाजून मान खाली झुकवली.तिच्या हनुवटीला धरून मान वर केली आणि तिच्या रसरशीत ओठांवर आपले ओठ टेकवले..रियाही प्रतिसाद देऊ लागली..


तेवढ्यात गॅलरीच्या खिडकीचा जोरदार आवाज झाला आणि खिडकी आपटू लागली.इतकी आपटत होती की तिच्या काचा तुटल्या...ते दोघे दचकले..विशालने खिडकी बंद करून घेतली..रियाला आधीचे प्रसंग आठवू लागले...ती खूपच घाबरली होती..विशालने तिला पुन्हा जवळ घेतले पण तिची मनःस्थिती ठीक वाटत नव्हती...काही वेळाने रियाने नाश्ता बनवला..दोघांनी नाश्ता केला...विशालने औषध घेतलं आणि तो विश्रांती घेण्यासाठी रूममध्ये गेला..


रिया स्वयंपाकाला लागली..तिने सगळे पदार्थ विशालच्या आवडीचे बनवले..सगळं उकरून ती बेडरूममध्ये आली.. विशाल तिथे नव्हता..तिच्या काळजात धस्स झालं..तिने इकडे तिकडे पाहिलं..तो गॅलरीत उभा होता...एक उसासा टाकून ती गॅलरीत गेली..


"बर वाटतंय का आता", रियाने काळजीने विचारले...


"I am perfectly alright..",विशाल हसून म्हणाला


रियाला आपली काळजी वाटतेय, या जाणिवेने विशाल खुश होता..त्याचबरोबर घडलेल्या घटनांबद्दल विचलितही.


"रिया, तू काळजी करू नकोस...आपण आहोत ना एकमेकांसोबत", विशालने असे म्हणून रियाला मिठीत घेतलं..


तेवढ्यात रियाने पटकन स्वतःला विशालच्या मिठीतून सोडवलं..आणि जेवणाची वेळ झाली असे म्हणून ती घरात गेली...


दुपारी दोघांनी एकत्र जेवण घेतलं...सगळं आवरून रिया रूममधे आली आणि पुस्तक वाचत बेडवर पडून राहिली..विशाल पण तिच्या शेजारीच पडून मोबाईल बघत होता..पुस्तक वाचता वाचता रियाला झोप लागली...विशाल अजूनही जागाच होता..झोपलेल्या रियाला बघत राहिला..तिच्या अंगावर पांघरूण घातलं आणि तो गॅलरीत गेला..

बाहेरच वातावरण काही अस्वस्थ करणार वाटत होतं..आजूबाजूची झाडझुडप, त्यांची सळसळणारी पाने, दुपार असूनसुद्धा गार वारा सुटला होता..अचानक त्याला एक काळी आकृती दिसली आणि एक हवेचा झोत त्याच्या अंगावर आला...तो झोत एवढा प्रचंड वेगाने आला की विशाल दोन पावलं मागे सरकला.त्या आकृतीने त्याच्या शरीरात प्रवेश मिळवला...आणि विशाल धाडकन खाली कोसळला...


त्या आवाजाने रियाला जाग आली..शेजारी विशाल नव्हता..ती उठून विशालला शोधू लागली..तर विशाल गॅलरीत पडला होता..रियाने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला..धावत जाऊन पाणी घेऊन आली आणि पाण्याचे हबके त्याच्या तोंडावर मारले..विशालने डोळे उघडले...त्याचे डोकं जड झालं होतं...रियाच्या सहाय्याने तो कसाबसा उठला...रियाने त्याला बेडवर झोपवलं.. त्याला थंडी भरली होती...अंग तापाने फणफणल होत..

रिया त्याला विचारत होती की नक्की काय झालं...विशाल काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हता..तो गॅलरीत उभा होता एवढंच त्याला आठवत होतं... त्यानंतर काय झालं हे त्याला आठवत नव्हतं...


संध्याकाळपर्यंत विशाल झोपूनच होता..रिया त्याच्या शेजारीच बसून होती..थोड्या वेळाने विशालला जाग आली..विशालच्या कपाळावर हात ठेवून रियाने त्याला ताप आहे का ते बघितले..त्याच अंग थंड पडलं होतं..त्याने रियाचा हात पकडला आणि तिला स्वतः जवळ ओढले..रियाला त्याचा स्पर्श काही वेगळा जाणवत होता..ती त्याचा हात झटकून किचनमध्ये गेली..तिने दोघांसाठी चहा ठेवला...तेवढ्यात विशालने मागून येऊन तिला जोरात मिठी मारली..तिच्या मानेवर भराभर चुंबन घेऊ लागला..तिच्या शरीराला स्पर्श करत होता.. त्याच्या स्पर्शाने ती कासावीस झाली..

"तुला बर वाटत नाहीये , विशाल...तू आराम करायला हवा", असे म्हणून तिने विशालचे हात सोडवले..


त्याचे वागणे काही विचित्र वाटत होते...


विशाल बाहेर dining table वर जाऊन बसला..त्याच वागणं काहीसं चमत्कारिक होत..अचानक रियाला विशालच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला..ती पटकन बाहेर आली..समोर बघते तर काय विशालच्या एका हातात चाकू होता आणि तो दुसऱ्या हाताच्या पंजावर चाकू भोकसत होता..10-20-50...असे अनेकवेळा तो चाकू चालवत होता..विशाल वेदनेने किंचाळत होता. त्याचा हात रक्तबंबाळ झाला होता..तो चाकू इतक्या वेगाने विशालच्या हाताला भोकसत होता की हे कोण्या सामान्य माणसाचे काम वाटत नव्हते...रिया हे सर्व पाहून बेशुद्ध पडायची बाकी होती..तेवढ्यात धावत जाऊन तिने शेजारच्या काका काकूंना बोलावून आणलं..विशालची अवस्था पाहून ते दोघे ही घाबरले..त्यांनी रियाला अंगारा आणायला सांगितला.. रिया इतकी घाबरली होती की अंगाराबद्दल पूर्णपणे विसरून गेली...तिने पटकन जाऊन अंगारा आणला..काकांनी लांबूनच तो विशालच्या अंगावर फुंकरला...तेवढ्यात एक काळा धूर त्याच्या अंगातून निघाला..आणि विशाल बेशुद्ध झाला..

त्याला सर्वांनी बेडवर झोपवलं..काकांनी त्याच्या कपाळावर अंगारा लावला..त्याच डोकं तापलं होत..रियाने त्याच्या हाताची जखम पुसून काढली आणि त्याला पट्टी बांधली...


विशाल झोपलेला पाहून रिया, काका आणि काकू बाहेर आले...रियाचा रडवेला चेहरा पाहून काका म्हणाले, " मी आजच गुरुजींना फोन करतो..ते एव्हाना आले असतील..या सर्वांतून ते नक्की तुम्हाला बाहेर काढतील.."...


घरी जाऊन सर्वात आधी काकांनी गुरुजींना फोन केला..ते नुकतेच घरी आले होते...काकांनी गुरुजींना आज घडलेला प्रसंग सांगितला.. गुरुजींनी उद्या येणार असल्याचे सांगितले.


" गुरुजी उद्या येणार आहेत..त्यांनी एक निरोप सांगितला आहे..तो असा की गुरुजी येण्याआधी दोघांनी अंघोळ आवरून एकत्रित देवपूजा करून घ्या..आणि घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडून घराची शुद्धी करून घे..", काका म्हणाले..


" पण काका माझ्याकडे गोमूत्र नाहीये", रिया म्हणाली


" अच्छा..मग अस कर एका वाटीत पाणी घे त्यात अंगारा टाक आणि तुळशीच्या पानाने सर्व घरात शिंपड.. थोडं विशालच्या डोक्यावरही शिंपड..", काका म्हणाले..


रात्री अचानक विशालला जाग आली..शेजारी रिया झोपली होती...विशालची नजर तिच्या कमनीय बांध्यावरून फिरू लागली..तिच्या जवळ जाऊन तिच्या शरीरावर आपल्या ओठांचे ठसे उमटवू लागला..विशालचा स्पर्श होताच रियाला जाग आली..ती काहीशी घाबरून विशालकडे बघत होती..एखाद्या श्वापदावर तुटून पडावे तसा तो तिच्यावर तुटून पडला..


रियाला लवकरच जाग आली..तिचे संपूर्ण शरीर ठणकत होतं.. रात्रीचा विशालचा स्पर्श आठवून तिला कसतरी होऊ लागलं..तिच्या शरीरावर त्याच्या स्पर्शाचे ठसे उमटले होते..विशाल अजूनही झोपला होता..तिने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला पण तो उठलाच नाही..गुरुजी येणार म्हणून ती पटकन उठून अंघोळीला गेली..


सकाळी ठरल्याप्रमाणे गुरुजी लवकरच काकांकडे आले..काका आणि काकू त्यांना घेऊन रियाच्या घरी आले.रिया घराची शुद्धी करत होती.विशाल अंघोळीला गेला होता..तो उशीरा उठला म्हणून रियाने एकटीने देवपूजा करून घेतली..

गुरुजींना घरात शिरताक्षणी घरातल्या नकारात्मक शक्तीची जाणीव झाली..गुरुजी आणि काकांना सोफ्यावर बसायला सांगून रिया दोघांसाठी पाणी घ्यायला आत गेली..तेवढ्यात विशाल बाहेर आला..काकांनी त्याच्या तब्येतीची विचारपूस केली...रिया पाणी घेऊन आली..काका रियाशी बोलत असताना गुरुजींची नजर विशालवर होती..तो गप्प होता..

आल्यापासून गप्प बसलेले गुरुजी विशालला म्हणाले,

"कशाला त्रास देतोयस त्याला..??"...

विशालला असे विचारताच तो रागाने गुरुजीकडे बघू लागला..त्याची नजर पूर्ण बदलली...डोळे रक्तासारखे लाल झाले... दात ओठ खाऊ लागला..त्याचा आवाजही बदलला..

"मारून टाकणार..मारून टाकणार..जिवंत नाही सोडणार...",असे म्हणून विशाल जोरजोरात हसू लागला...ओरडू लागला..डोकं आणि हात भिंतीला आपटू लागला.. आधीच जखम झालेल्या हातातून पुन्हा रक्त वाहू लागलं..अचानक विशाल गुरुजींच्या अंगावर धावून जाऊ लागला..तेवढ्यात गुरुजींनी आपल्या झोळीमधून अंगारा काढला आणि मंत्र म्हणत विशालवर फुंकरला...

आगीचा चटका बसावा तसा विशालच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली...आणि तो खाली कोसळला..

त्याला उठवून भिंतीला टेकवून बसवलं आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हणत होते..

काही वेळाने विशालने डोळे उघडले..सर्वांनी त्याला आत नेऊन झोपवले..गुरुजींनी त्याला अंगारामिश्रित पाणी प्यायला दिले आणि आराम करायला सांगितला..


विशालच्या वागण्यावरून गुरुजींना सर्व परिस्थिती लक्षात आली..गुरुजींनी रियाला सांगितले," एका आत्म्याने विशालच्या शरीराचा ताबा घेतला आहे..आणि तो अतृप्त असल्याने त्याची काहीतरी इच्छा नक्कीच आहे ..आपल्याला त्याची ती इच्छा जाणून घ्यावी लागेल..आता तात्पुरता जरी तो आत्मा गेला असला तरी तो पुन्हा विशालला त्रास नक्की देणार.विशालच्या जीवाला ही धोका आहे..तसे जीवघेणे प्रसंग ही बरेच झाले आहेत असे मला कळले आहे..आत्म्याचे म्हणणे ऐकल्याशिवाय मला काहीच उपाय करता येणार नाही.तोपर्यंत विशालची काळजी घ्यावी लागेल..." एवढं सांगून गुरूजींनी घरात आणि विशालच्या रूममध्ये काही वस्तू ठेवून दोन दिवसांनी येणार असल्याचे सांगून ते निघून गेले..


रियाने तिच्या भावाला अमेयला आणि विशालच्या भावाला निशांतला बोलावून घेतलं..कारण विशालला सांभाळणे तिला एकटीला शक्य नव्हते..तिच्या नकळत काहीही घडू शकत होत..विशालच्या शरीरातील आत्म्यापासून विशालचे रक्षण करणे गरजेचे होते..


गुरुजी येऊन गेल्यापासून त्या आत्म्याला त्रास होऊ लागला होता..दोन दिवस आणि दोन रात्री त्याने विशालला खूप त्रास दिला..विशाल रूमच्या बाहेर येत नव्हता..फक्त विचित्र आवाज येत होते..त्याची प्रकृती खूपच खालावली होती..


ठरल्याप्रमाणे दोन दिवसांनी गुरुजी आपले काही सहकारी आणि सर्व साहित्य घेऊन आले..रिया, अमेय, निशांत आणि काका-काकू गुरुजींची आतुरतेने वाट पाहत होते..ते आले तेव्हा विशाल रूमचं दार लावून आतच बसला होता..त्याला हाक मारताच तो म्हणाला, "कशाला आलास परत इकडे..जा..चालता हो इथून"...


"मला विशालशी बोलायच आहे..तुझ्याशी नाही", गुरुजी म्हणाले..


विशाल दार उघडून बाहेर आला आणि गुरुजींच्या अंगावर धावून गेला तसा तो लांब फेकला गेला आणि बेशुध्द झाला..


थोड्या वेळाने तो शुद्धीवर आला..त्याला अंगारा लावला, त्याच्या डोक्यावर हात ठेवून मंत्र म्हटले तेव्हा त्याला थोडं हलकं वाटत होतं..अमेय आणि निशांत पाहून त्याला आनंद झाला..

गुरुजींनी विशालशी बोलायला सुरुवात केली..


"बरं वाटतय का आता" , गुरुजींनी विचारले


"हो थोडं बरं आहे" , विशाल म्हणाला


"मला सांग , काय जाणवत तुला नक्की", गुरुजींनी विचारले..


"साधारण 15-20 दिवसांपूर्वीपासून माझं शरीर जडजड वाटत..जणूकाही ओझं ठेवलं आहे..माझ्या तोंडून कोणी दुसरंच बोलतंय अस जाणवत आणि मला ते कळतही असत पण मी ते थांबवू शकत नाही..मला कोणीतरी इजा पोहोचवू पाहतय..माझा जीव घेऊ पाहतय..गुरुजी, मला हे काय होतंय मला काहीच कळत नाही..कृपा करा माझ्यावर , मला वाचवा", विशालला रडू फुटलं..


" अरे आपल्याला मदत करणारा , वाचवणारा तो परमेश्वर आहे..त्याच्यावर श्रद्धा ठेव..सारं काही नीट होईल..तुला थोडा वेळ त्रास सहन करावा लागेल..आपण नक्कीच मार्ग काढू..उद्या आपण एक पूजाविधी करू त्यासाठी काही समान लागेल.. माझ्याजवळचे समान मी येताना घेऊन येईन..", असे म्हणून गुरुजींनी रियाला एक यादी दिली आणि विशालला व घरातल्या सर्वांना अभिमंत्रित धागा दिला आणि हातात बांधायला सांगितला...दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येणार असल्याचे सांगून गुरुजी निघून गेले..


त्या रात्री विशालच्या हातातील धाग्यामुळे आत्म्याला विशालच्या शरीराच्या आसपासही येता आलं नाही...त्यामुळे चिडून तो घरातल्या वस्तू फेकणे, खिडकीची दार आपटणे याद्वारे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होता..ती रात्र चौघांनी जागून काढली..पहाटे पहाटे त्यांचा डोळा लागला...


रियाला जाग आली तेव्हा सकाळचे 7 वाजले होते..शेजारी झोपलेल्या विशालला पाहून तिला हायस वाटलं..आज बऱ्याच दिवसांनी विशालला शांत झोप लागली होती..तिने मनोमन परमेश्वराचे आणि तिला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले..गुरुजी लवकरच येणार होते म्हणून अमेय आणि निशांतला उठवून ती आवरायला गेली..


सकाळी 8 वाजता गुरुजी त्यांच्या सहकाऱ्यांसह घरी आले..विशाल अजून झोपला होता..रियाने त्याला उठवलं आणि पटकन आवरून यायला सांगितलं..

गुरुजींनी आपल्या पिशवीतून पूजाविधीसाठी लागणाऱ्या सर्व वस्तू बाहेर काढून ठेवल्या..रियाने तिला दिलेल्या यादीप्रमाणे आणलेले सामान गुरुजींच्या पुड्यात आणून ठेवले..यादीप्रमाणे सर्व सामान आले का हे गुरुजींनी तपासले..आत्म्याची शक्ती क्षीण करण्यासाठी घरात सात्विक वातावरण निर्माण गरजेचे आहे , असे गुरुजींनी सांगितले..


गुरुजींनी घरात कुंकवाचे मोठं रिंगण तयार केलं..सर्वांना त्या रिंगणात बसायला सांगितलं..तत्पूर्वी रियाला देवाला दिवा लावायला सांगितल आणि देवाला नमस्कार करून यायला सांगितलं.. सगळे रिंगणात बसल्यावर गुरुजींनी त्यांना रियाला हळदकुंकू आणि तिघांना कुंकू लावले..सर्व गुरुजींच्या पाया पडले आणि रिंगणात ठेवलेल्या पाटांवर हात जोडून बसले..


गुरुजींनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मंत्र म्हणत पूजा सुरू केली..सगळे हात जोडून शांतपणे बसले होते..मंत्राचे शब्द कळत नव्हते पण गुरुजी करत असलेल्या मंत्रोच्चाराने घरातले वातावरण भारावून गेले...देवाला वाहिलेल्या फुलांच्या सुगंधाने प्रसन्न वाटत होते..


काही वेळाने विशालला अस्वस्थ वाटू लागलं..तो उठण्याचा प्रयत्न करत होता..गुरुजींनी डोळ्यानेच इशारा करून त्याला बसायला सांगितले..तो विचित्र हावभाव करत रागाने गुरुजींकडे बघत होता..मधेच ओरडत होता..हात पाय आपटत होता..रिया हे बघून त्याला पकडायला जात होती..पण पुन्हा गुरुजींनी इशाऱ्याने नाही म्हटले..पूजाविधीमुळे आत्म्याची शक्ती क्षीण होत चालली होती..

"बंद कर हे सगळं..मला त्रास होतोय", आत्मा व्हीवळत बोलत होता..


"जोपर्यंत तू कोण आहेस आणि विशालला त्रास देण्याचं कारण सांगणार नाही तोपर्यंत हे बंद होणार नाही..", गुरुजी म्हणाले..


तसा तो शांत बसला.गुरुजींनी त्यांच्या कपाळाला अंगारा लावला तसा तो पुन्हा चवताळला..


अखेर तो बोलू लागला...


"मी अजय आहे.."


अजयच नाव ऐकून रिया दचकली..


"हे कसं शक्य आहे..अजय तर जिवंत आहे..", रिया मधेच म्हणाली..


"तुम्ही शांत राहा...त्याला बोलू द्या..आज फक्त त्याच ऐकायचंय आपण", गुरुजी म्हणाले...


तो पुढे म्हणाला...


"मी, विशाल आणि रिया..आम्ही लहानपणापासून एकत्र होतो..विशाल आणि रिया सधन कुटुंबातील होते आणि मी मध्यमवर्गीय कुटुंबातील..माझे बाबा तर मी लहान असतानाच वारले होते..आई पण नेहमी आजारी असायची. शाळेत असताना स्कॉलरशिप मिळायची..त्यायोगे माझं शिक्षण चालू होतं...वर्गातील बाकीची मुलं माझ्याशी इतकं बोलायची नाहीत पण विशाल आणि रियाने माझ्याशी मैत्री केली..मला आवडायचं त्यांच्याशी बोलायला..शाळा संपल्यावर तिघांनाही चांगले मार्क्स मिळाले..मग आम्ही मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला..कॉलेजमध्ये असताना आम्ही तिघेही एकत्र अभ्यास करायचो.काही विषय मला लगेच clear होत असत..पण त्यांना अवघड वाटे..मग मी त्यांना शिकवायचो...त्या काळात मी आणि रिया कधी जवळ आलो ते आम्हालाही कळलं नाही..विशालला जास्त वेळ अभ्यास करायचा कंटाळा येई..तो हुशार होता..थोडा वेळ अभ्यास झाला की तो निघून जात असे..रिया आणि मी जास्त वेळ एकत्र असायचो..अभ्यास झाला की थोडा वेळ कॉलेजला लागून असलेल्या गार्डन मध्ये बसायचो...प्रेमाच्या आणाभाका घ्यायचो..


कॉलेजनंतर आमचे मार्ग वेगळे झाले..विशाल पुढच्या शिक्षणासाठी विदेशात निघून गेला..रियादेखील पुढचं शिक्षण घेत होती..मी ही पुढे शिकावं अशी तिची इच्छा होती..मग मी नोकरी करत करत शिक्षण घेण्याचे ठरवले..कामामुळे आणि अभ्यासामुळे आम्हाला एकमेकांना वेळ देता येत नसे...पण तरीही थोडा वेळ काढून आम्ही काही काळासाठी तरी भेटायचो..त्याच काळात माझी आई वारली..


दोन वर्षांनंतर आमचं शिक्षण पूर्ण झालं..आणि रियाला नोकरीही मिळाली..मी पण दुसरी चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची खटपट करत होतो..काही काळाने मला नोकरी मिळाली..मग कर्ज काढून एक छोटसं घर घेतलं..एक 2nd hand गाडी घेतली..


तेव्हा रियाने तिच्या घरी आमच्या प्रेमाबद्दल सांगितले...रियाच्या बाबांनी थोडा विरोध केला पण मला भेटल्यावर ते तयार झाले..आम्ही दोघे खूप खुश होतो..सगळं काही आमच्या मनासारखं होत होत..आठवड्यातच आमचा साखरपुडा झाला दोन महिन्यांनंतरचा मुहूर्त निघाला..


त्यादिवशी आम्हाला कळलं की विशाल भारतात परत येतोय..आमचा बालमित्र येणार म्हणून आम्ही खूप आनंदात होतो..त्याला रिसिव्ह करायला आम्ही airport वर गेलो..आपल लग्न ठरल्याची बातमी आपण तिथेच द्यायची अस आम्ही ठरवलं..विशाल भेटला तेव्हा आमचा आनंद गगनात मावत नव्हता..मग रियाने हळूच माझा आणि स्वतःचा हात दाखवून surprise अस म्हणत "we are engaged", अस सांगितलं.. तो देखील खुश झाला..


आमचं लग्न 15 दिवसांवर आलं होतं...पत्रिका वाटपाच काम मी आणि माझा मित्र करत होतो..कधी कधी विशालही सोबत येई..


एक दिवस विशाल म्हणाला चल पार्टी करू..लग्न झाल्यावर तर तू फक्त रियाचा होशील.मग माझ्यासाठी तर वेळच मिळणार नाही..इतक्या वर्षांनी आपला जिगरी दोस्त आपल्या सोबत वेळ घालवू इच्छितो तर नाही कस म्हणायचं म्हणून मी पण तयार झालो...त्या दिवशी संध्याकाळी आम्ही भेटलो..तो मला बार मध्ये घेऊन गेला..आम्ही खूप enjoy केलं..जेवण झाल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो..विशालने खूप घेतली होती..म्हणून मी drive करायचं ठरवलं..गाडीतून जाताना विशालची सतत बडबड चालू होती..तो शुद्धीत नव्हता..मधेच त्याने रियाचा विषय काढला..तो काय बोलतोय हे ऐकायला मी लगेच गाडी थांबवली..विशाल हेलकावत गाडीच्या बाहेर आला..त्याच्या हातात beer चा can होताच.


तो म्हणाला...


"लहानपणापासून माझं रियावर खूप प्रेम आहे..तिला मिळवण्यासाठी आणि खुश ठेवण्यासाठी मी विदेशात गेलो,शिक्षण घेतलं.. भरपूर पगाराची नोकरी मिळवली..expensive गाडी घेतली..भारतात आल्यावर मी रियाला लग्नाचं विचारणार होतो पण ती मूर्ख...तुझ्याशी लग्न करणार बोलली..तुझ्यासारख्या फडतूस माणसात काय पाहिलं तिने...मी तिला तुझ्यापेक्षा जास्त सुखात ठेऊ शकतो...तू आहेस काय माझ्यापुढे..", हे सगळं बोलताना मधे मधे तो beer चा एक एक घोट घेत होता..त्याला काहीच शुद्ब नव्हती..


त्याचे बोलणे ऐकून मला काय बोलावे हे सुचत नव्हते..


"विशाल आपण सकाळी बोलू..मी तुला घरी सोडतो..उद्या येतो मी तुला भेटायला", मी त्याला सांभाळत सांभाळत बोलत होतो..


विशाल काहीच ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता..त्याला माझा एवढा राग होता की तो माझ्या अंगावर धावून आला..आणि माझा गळा दाबू लागला..मी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करत होतो..त्याला लांब ढकलल...तसा तो खाली पडला...आणि अजूनच जास्त चवताळला...हेलकावत उभा राहिला..आणि शेजारी पडलेला एक दगड त्याने माझ्या डोक्यात घातला..तो वार

इतका जोरात बसला की मी क्षणात गतप्राण झालो.".

एवढं बोलून विशालच्या शरीरातील अजयचा आत्मा बाहेर आला..आणि विशाल खाली पडला..

जे काही अजयच्या आत्म्याने सांगितले ते ऐकून रियाला शॉक बसला होता..ती स्तब्द झाली..अमेय आणि निशांत ही आपण काय ऐकलं यावर विश्वास बसत नव्हता..

सर्वांनी विशालला उचलून आतल्या रूममध्ये झोपवलं..गुरुजींनी त्याच्या हातात धागा बांधला..


आत्म्याशी संवाद झाल्यावर अर्ध काम झालं होतं.पण अजूनही त्याची इच्छा जाणून घेणे आणि त्या आत्म्याला मुक्ती देणे बाकी होते...


काही वेळाने विशालला जाग आली..त्याच्या तोंडून अजय बोलत होता तरी त्याला सगळं कळत होतं..त्याने जे कुकर्म केले होते ते आज अशाप्रकारे सर्वांच्या समोर आले होते..आता स्वतःहून गुन्हा कबूल केल्याशिवाय गत्यंतर नव्हते..तो उठून बाहेर आला आणि रियासमोर हात जोडून उभा राहिला..


"मला मान्य आहे माझ्या हातून गुन्हा झालाय..पण ती वेळच तशी होती..मी जाणूनबुजून अजयला नाही मारलं.. रिया, माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं ग...अगदी वेड्यासारखं.पण तुला सांगायचा कधी धीरच झाला नाही...बाबांच्या आग्रहाखातर मला विदेशात जावं लागलं..इथे असतो तर मी तुला कधीच मागणी घातली असती..त्या दिवशी भारतात परत आल्यावर तुझं आणि अजयच लग्न ठरल्याच सांगितलस आणि मी पुरता कोलमडलो ग.. पण तरीही तुम्हाला कधी जाणवू दिल नाही की मी किती दुःखी आहे..तसा अजयचा मला पूर्वीपासूनच राग होता..तुम्ही दोघे सतत सोबत असायचात.. चीड यायची मला त्याची..पण तुला त्याच्यासोबत आनंदी बघून मी समाधानी व्हायचो..त्या दिवशी मला खरच माहीत नाही काय झालं होतं...माझा स्वतःवरचा ताबा सुटला..नशेत अजयला सगळं सांगितलं...मला त्याला मारायचं नव्हतं...तो एक अपघात होता..मी खूप घाबरलो..सगळी नशा उतरली माझी..मी त्याला तिथेच रस्त्याच्या कडेला एका खड्यात पुरलं.. त्याचा मोबाईल, त्याच सगळं समान तिथेच पुरलं आणि माझ्यावर शंका येऊ नये म्हणून तुला खोटं सांगितलं की अजय तुला सोडून गेला", विशालने रडत रडत सर्व सत्य सांगून टाकले...


"का केलस हे तू..माझ्या अजयला मारलं तू...मला मिळवण्यासाठी जीव घेतलास माझ्या प्रेमाचा..आणि मी समजत होते अजयने मला धोका दिला..मला सोडून गेला...तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला मी...मी वेड्यासारखं हेच समजत राहिले की किती मोठं मन आहे तुझं..माझ्याशी लग्न करायला तयार झाला.मला कुठे माहीत होतं माझ्या आणि अजयच्या प्रेमाच्या कबरीवर मी माझा संसार थाटतेय..", रियाला रडू आवरत नव्हतं.. तिला पुढे बोलता येईना...

पुन्हा विशालच्या शरीरात अजयच्या आत्म्याने प्रवेश केला..तो विचित्र हावभाव करत होता..हात पाय आपटत होता..विशालला इजा पोहोचवत होता..

"माझ्या रियापासून मला दूर केलं...मी याला सोडणार नाही..माझ्यासोबत घेऊन जाणार", अजय चवताळून म्हणाला..

सहकार्यांनी आक्रमक विशालला पकडून ठेवले होते.गुरुजींनी त्याच्या तोंडावर अंगारामिश्रित पाणी शिंपडल.."हे बघ अजय, विशालला तुला मारायचं नव्हतं..दारूच्या नशेत त्याच्या हातून तुझा खून झाला..तू रियाला सोडून पळून गेलास हे खोटं मात्र त्याने सांगायला नको होतं..मला वाटते की रियाला सत्य कळावे आणि विशालने त्याचा गुन्हा सर्वांसमक्ष कबूल करावा हीच तुझी इच्छा होती आणि विशालने ते कबूल केल आहे. तुझं रियावर खूप प्रेम होतं हे कळलं आहे आम्हाला पण आता जर तू विशालला त्रास दिलास तर रिया तरी कशी आनंदात राहील..विशालच रियावर खूप प्रेम आहे तो तिला नक्कीच सुखात ठेवेल..याव्यतिरिक्त तुझी काही इच्छा आहे का.."..गुरुजींनी शांतपणे अजयला समजावले..


"माझी रिया सुखात असावी आणि माझ अंत्यसंस्कार व्हावं, हीच माझी इच्छा आहे..मगच मला मुक्ती मिळेल",अजय म्हणाला...

दुसऱ्या दिवशी विशाल, अमेय आणि निशांत जिथे अजयला पुरल होत तिथे गेले.. त्याच्या हाडांचा सापळा झाला होता..त्यावर अंत्यसंस्कार केले.विशालने अजयची मनोमन क्षमा मागितली आणि रियाला सुखात ठेवण्याचे वचन दिले...

त्याबरोबर एक काळी आकृती हवेत विरून गेली..


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror