Sneha Kale

Drama

3  

Sneha Kale

Drama

दिसतं तसं नसतं

दिसतं तसं नसतं

6 mins
579


गोविंदराव आणि आशाकाकू गॅलरीत बसून मस्त वाफाळता चहा पित बसले होते.. कृतिकाची ऑफिसला निघायची तयारी सुरू होती..अमर सकाळी लवकर ऑफिसला जात असे..तो गेला की मग कृतिकाची धावपळ सुरू होई..तिने नाश्ता आणि सगळा स्वयंपाक करून ठेवला होता...आणि फक्त चपात्या करायच्या शिल्लक होत्या...त्या आशा काकू करत असत...रोजचा दिनक्रमच तसा होता..


चहा पिल्यावर जरा सोसायटीच्या आवारात एक फेरी मारून येऊया, असे गोविंदरावांना वाटले..आशाकाकूही तयार झाल्या..


थोड्याच वेळात कृतिका ऑफिसला निघून गेली..आणि मग हे दोघेही पाय मोकळे करायला जायला निघाले..तेवढ्यात आशाकाकूंच्या जिवलग मैत्रिणीचा फोन आला...गोविंदरावांनी मनात म्हटलं, आता राहीलं आपलं फिरायला जायचं...या दोघींचं बोलणं काही आता लवकर आटोपणार नाही..आशाकाकूंना त्याच्या चेहऱ्यावरील भावावरून लक्षात आले.. "नाही जास्त वेळ बोलत," असं त्यांनी हसून म्हटले आणि फोनवर बोलू लागल्या..


आशा काकू बोलत असताना गोविंदराव समोरच बसले होते...फोनवर बोलताना आशा काकूंच्या चेहऱ्यावरचे भाव सतत बदलत होते.. चिंताग्रस्त, गंभीर...मध्ये मध्ये गोविंदराव इशाऱ्याने त्यांना विचारत होते..पण आशाकाकू नंतर सांगते असंच म्हणत...


काकूंचे बोलणे झाल्यावर त्या बराच वेळ शांत होत्या..मग गोविंदरावांनीच विचारले तेव्हा आशाकाकू सांगू लागल्या, "सुमतीची सून वेगळं राहायचं म्हणतेय..आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे मंदारपण तयार झाला.."


गोविंदराव हसून म्हणाले, "बस...एवढंच...मला वाटलं खूप काही गंभीर घडलंय की काय..."


"तुम्हाला ही एवढीशी गोष्ट वाटतेय..काही गांभीर्य आहे की नाही..काही नाही ओ.. या आजकालच्या मुली..यांनाच नको असतात सासू-सासरे..त्यांच्यासाठी सासू-सासरे म्हणजे अडगळच..मी सांगते ना त्या निशानेच कान भरले असणार मंदारचे.. नाहीतर मंदार आणि आई-वडिलांना सोडून जाणार..शक्यच नाही..मी लहानपणापासून पाहिलंय त्याला...सुमतीशी खूपच attached आहे तो...आणि तो आता.." आशाकाकूंनी आवंढा गिळला..त्यांना पुढे बोलायला जमेना..


"अगं, या सर्व गोष्टी अगदी बरोबर आहे..पण तू तुझ्या मैत्रिणीची बाजू ऐकून सरसकट दुसऱ्या व्यक्तीला दोषी ठरवलंस हे काही मला पटलं नाही..म्हणजे मंदार तुला मुलासारखा आणि त्याची बायको निशा म्हणजे परकी..आपला मुलगा योग्य आणि दुसऱ्याची मुलगी वाईट, कान भरणारी.. कदाचित उलटही झालं असेल..वेगळं राहण्याचा निर्णय मंदारचा असू शकतो. आणि वेगळं राहणं म्हणजे काही नाती तोडणं नव्हे तर नात्यांना बहरण्यासाठी जागा निर्माण करणं...जवळीक निर्माण होण्यासाठी केलेली तरतूद म्हण हवं तर..आपण फक्त तर्क करू शकतो..पण त्यांच्या घरात नक्की काय झालं असेल याबाबत जाणून न घेता, दोन्ही बाजू ऐकून न घेता एकदम conclusion वर येणं मला पटत नाही." गोविंदराव म्हणाले...


"अहो काय ऐकायचं निशाचं..मला सांगा त्रास आहे तिला..सुमती काय जाच करते तिला की मारझोड करते..किती करते ती सुनेचं...आम्ही भेटलो की सुनेचे गुणगान गात असते...तिच्या आवडीची फळं, मासे, भाजी घेऊन जाते.. शिवाय घरातली बरीच कामं सुमतीच करते, निशा नोकरीला गेल्यावर बाळाला सांभाळते, वाण सामान, भाजी वगैरे सगळं तीच तर आणते..शिवाय सण उत्सव आहेच...त्याची तयारी करते...एवढं सगळं असूनसुद्धा काय दुर्बुद्धी सुचली दोघांना काही कळत नाही..." आशाकाकूंनी सुमतीकाकूंची बाजू मांडली..


"अगं या सर्व गोष्टी वरवरच्या आहेत..पण त्यांच्यात नेमकं काय झालं असेल हे आपण नाही सांगू शकत..मला तरी वाटतं की नक्कीच काहीतरी गंभीर गोष्ट असणार त्याशिवाय इतका मोठा निर्णय का बरं घेतला असेल दोघांनी..असो..आता जरा खाली जाऊन यायचं का.." गोविंदराव म्हणाले


"आता नाही ओ इच्छा मला...तुम्ही जाऊन या.." आशाकाकू म्हणाल्या..


गोविंदराव निघाले..आणि आशाकाकू विचार करत बसल्या होत्या..

"हे म्हणतात ते अगदीच काही चुकीचं नाही..कधी कधी आपल्याला जे दिसत ते सगळंच खरं असेल असं नाही ...


दोन दिवस आशाकाकूंच्या मनातून सुमतीचा विचार जात नव्हता..राहून राहून हाच विचार येत होता की नेमकं काय घडलं असेल..कृतिकाच्या नजरेतून सासूचं असं विचार करणं काही सुटलं नाही..तिने सासूशी बोलण्याचा प्रयत्न केला पण आशाकाकू काही न बोलता गप्प राहत..तिला काहीच कळत नव्हते नेमकं काय झालं आहे..मग तिने सासऱ्यांना विचारले..तेव्हा तिला सासूच्या गप्पगप्प राहण्याचं कारण कळलं..


कृतिका आणि निशा समवयस्क होत्या..आशा काकू आणि कृतिका नेहमी सुमती काकूंकडे जात असत त्यामुळे निशाशी कृतिकाची चांगली ओळख झाली होती..कधी एकत्र शॉपिंगला तर कधी movie ला जात असत..त्यामुळे निशाचा स्वभाव कृतिकाला माहीत होता आणि निशाची स्थितीही कृतिका समजू शकत होती.


"वेगळं राहणं ही आईंना वाटते तितकी गंभीर गोष्ट नाहीये..हल्ली सगळेच स्वतंत्र राहतात..त्यांच्या lifestyle प्रमाणे जगतात..शेवटी privacy महत्वाची..generation gap मुळे एकमेकांच्या काही गोष्टी नाही पटत..वरवर चांगल्या वाटणाऱ्या सगळ्याच गोष्टी तशाच असतील असे नाही.." कृतिकाने विचार करतानाच निशाशी बोलायचे ठरवले..


दोन दिवसांनी ती काहीतरी काम आहे असं सांगून निशाला भेटायला गेली..कारण खरं कारण सांगितलं असत तर आशाकाकूंनी तिला जाऊ दिल नसतं..


बाजूच्याच सोसायटीमध्ये निशा राहत होती..कृतिकाने निशाला फोन करून बाजूच्याच एका coffee shop मध्ये भेटायला बोलावले..निशाच्या घरी सुमतीकाकूंची धुसपूस चालू असायची..थोडा वेळ तरी शांतता भेटेल म्हणून ती कृतिकाला भेटायला गेली..


कृतिका येऊन बसली लगेचच निशा आली.. निशाच्या चेहऱ्यावरून ती खूप त्रासलेली दिसत होती..कृतिकाने दोघींसाठी coffee ची ऑर्डर दिली..इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मग तिने विषयाला सुरुवात केली..


निशाने सांगायला सुरुवात केली..


"काय सांगू ग...8 वर्ष झाली आमच्या लग्नाला..सुरुवातीला सगळं चांगलं चालू होतं..मंदार सांगायचा की त्याची आई खूप मनमिळावू आहे..विचाराने मॉडर्न आहे..हळू हळू मला त्यांचा स्वभाव लक्षात येऊ लागला..गेली 8 वर्ष मी निरीक्षण करत आले.. सतत दुसऱ्यांच्या उणीवा काढायचं, त्यांच्याबद्दल वाईट बोलायचं..सुरुवातीला मी ऐकून घ्यायची पण नंतर नंतर मला कंटाळा यायला लागला..आपण किती त्रास सहन केला, कसं सगळ्यांना खाऊ घातलं, हेच सारखं सांगायच्या..याव्यतिरिक्त मी आणि मंदार बोलायला लागलो की त्या आमचे बोलणे चोरून ऐकायच्या..कधी आमच्यात वाद झाला तर लगेच मंदारची बाजू घेऊन मी कशी चुकीची हेच दाखवून द्यायच्या..या सगळ्या गोष्टींचा माझ्या मनावर खूप परिणाम व्हायला लागला..माझ्या मुलाला कसं सांभाळायचं याबाबतीतही त्यांचा हस्तक्षेप...मी काही अडाणी किंवा त्यांच्यासारखी कमी शिकलेली नाही...माझ्या मुलाला कसं वाढवायचं, कशी शिस्त लावायची हे मला कोणी सांगायला नको...आणि बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेच...त्यांचा मुलगा कसा कष्ट करतो, सकाळी लवकर उठून कामाला जातो...अरे ही काय सगळ्यांना सांगायची गोष्ट आहे का..तुम्ही त्याला शिकवलं मोठं केलं ते घरी बसण्यासाठी का..नाही ना..नोकरी करण्यासाठीच ना...मग त्यात नवल ते काय सगळेच नोकरी करतात...किंबहुना त्याच्यापेक्षा ही लवकर उठून जॉबला जाणारे, लोकलमधून धक्के खात प्रवास करत जाणारे दुनियेत खूप आहेत...

नवरा घरी नसल्यावर बऱ्याच गोष्टी घडतात ज्या बायकोला आवडत नाही पटत नाही सतत त्या गोष्टी घडत राहिल्या तर तिची चिडचिड होते आणि कालांतराने तिचा स्वभावच बनून जातो...तसंच झालं माझंही..

मान्य आहे मला की आई माझा जाच करत नाहीत..मला अर्वाच्य भाषेत शिव्या देत नाहीत..पण जाच करणे म्हणजे टोमणे मारणे, शारीरिक त्रास देणे हेच होत नाही...तर सुनेला कमी लेखण, मुलांच्या आवडीनुसार जेवण बनवणं, त्यांना कसलाही त्रास होऊ न देणं मग सुनेचे काम करून हाल झाले तरी चालतील...अशाप्रकारची वागणुकसुद्धा जाचच..शारीरिक छळापेक्षा हा अशाप्रकारचा मानसिक छळ खूप त्रासदायक आहे..त्या काळात खरंच खूप डिप्रेशन मध्ये गेले..सतत त्यांच्या आणि माहेरच्या मंडळी सोबत माझं camparison करायचं..मी एवढं सहन केलं तू केलं नसतस, कितीही आजारी असलो तरी आम्ही उठून काम करायचो, and so on...


कितीही काम करा, कष्ट करा तोंडातून कौतुक तर कधी येत नाही..याउलट माझ्याबद्दल मागून वाईट वाईट बोलतात..मी स्वतःच्या कानाने ऐकलं आहे त्यांचं आणि त्यांच्या बहिणीचं बोलणं..इतका धक्का बसला होता मला..ज्या व्यक्तीला मी माझी आई मानते ती माझ्याबद्दल असा विचार करते हे जेव्हा मला कळलं त्याचक्षणी आई माझ्या मनातून उतरून गेल्या..घरात काही निर्णय घ्यायचे असतात तेव्हा मला त्या गोष्टीचा थांगपत्ता लागू देत नाहीत..जणूकाही मी त्या घरातली नाहीच..परक्यासारखा व्यवहार करतात माझ्याशी...


किती तडजोड करत जगायचं..आता नाही क्षमता माझ्यात...म्हणून ठरवलं काहीही होऊ दे आता एकत्र राहणं शक्य नाही..मंदारलाही या गोष्टी पटल्या आहेत..तोही तयार झाला..त्यालाही माझी होणारी घुसमट कळत होती..आणि वेगळं झाल्यावर आमच्यातील नात संपणार असं नाहीये ना..मला आई-बाबांपासून त्याला वेगळं नाही करायचं..आम्ही अधून मधून भेटायला जाऊ..कदाचित लांब राहिल्यामुळे आमच्यात जास्त जवळीक निर्माण होईल..' 


निशाने कृतिकाला मनातलं सगळं सांगितलं..तिलाही ते मनोमन पटलं..


तात्पर्य काय तर आपल्याला दिसणाऱ्या किंवा दाखवल्या जाणाऱ्या गोष्टी आणि प्रत्यक्षात असणाऱ्या , घडणाऱ्या गोष्टी या वेगळ्या असू शकतात..दिसत तसं नसत म्हणून जग फसत, अस म्हणतात तेच खरं.. त्यामुळे डोळ्यांना दिसणाऱ्या गोष्टींवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता त्या गोष्टींची शहानिशा करून घ्यावी..कदाचित सत्य खूप वेगळं असेल..


Rate this content
Log in

Similar marathi story from Drama