Sneha Kale

Horror

4.6  

Sneha Kale

Horror

भुताटकीच्या गावी

भुताटकीच्या गावी

12 mins
740


कॉलेजचे जीवन काही वेगळेच असते ना. कॉलेजमध्ये आपण एक मोकळे आयुष्य जगत असतो, कसली चिंता नाही की जबाबदारी नाही..फक्त अभ्यास करायचा आणि भविष्यासाठी डिग्री कमवायची कारण एकदा का कॉलेजच्या बाहेर गेले की आयुष्य आपल्याला नाचवते...


असेच एक नामांकित कॉलेज.. डी. एन.कॉलेज... कॉलेजच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा संपत आल्या होत्या..सगळे खूप खुश होते आणि त्यासोबत पुढे काय करायचे याबाबतीत संभ्रमितही..येथेच शिकत होती ती ६ जण..सोहम, राज, आदित्य, अमर, शुभम आणि केतन... त्यांच्यात मित्राचे कमी आणि भावाचे नाते जास्त...कॉलेजमधला सर्वात फेमस ग्रुप...प्रत्येक गोष्टीत अग्रेसर.. मग तो अभ्यास असो की कॉलेजची कोणतीही activity... खात्रीशीर चोखपणे बजावणार...


दरवर्षी परीक्षा संपल्यानंतर हे सहा जण छोट्या ट्रीपला जात असत..थोडं फ्रेश होण्यासाठी...तर यावर्षी कुठे ट्रीपला जायचं, याचा विचार सगळे करत होते..


"यावर्षी काहीतरी वेगळं adventure करायला पाहिजे..नेहमी नेहमी ट्रेकिंग, स्विमिंग करून बोर झालंय यार.." केतन म्हणाला..


"U r right yar, मला तर आता वीट आलाय त्या स्विमिंगचा.. जरा research करूया...काही भन्नाट सापडतंय का..." सोहम म्हणाला..


"मी एक suggest करू का??" आदित्य म्हणाला..


"अरे बोल ना यार, permission कसली मागतोयस.." सगळेच म्हणाले..


"आमच्या गावी झापेगावला जायचं का??" आदित्य...


सगळे हसायला लागतात..


"Are u mad or what??? bro आपण काहीतरी adventure करायचं म्हणतोय... गावी असं काय adventures असणार आहे??" राज म्हणाला..


"आहे म्हणूनच म्हणतोय..लहानपणी आजीकडून बऱ्याच भुतांच्या गोष्टी ऐकल्यात.. ती गावात घडलेल्या घटना सांगायची...तेव्हा आम्ही खूप घाबरून जायचो..पण आता वाटते की साऱ्या भाकडकथा असतील.. जर काही adventures च करायचंय तर सगळे गावी जाऊ..माझ्या आजी-आजोबांचं मोठं घर आहे तिथे..त्यामुळे राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था आहे.." आदित्य म्हणाला..


शुभम थोडासा घाबरट होता..त्याला इच्छा नव्हती अशा भुताटकी असलेल्या गावी जायची..पण मित्रासाठी तो ही तयार झाला..सोहम आणि राजचा भूताखेतांवर विश्वास नव्हता.हे सगळं अंधश्रद्धा आहे असंच तो मानत असे.. अमरही तसा घाबरट होता पण तो दाखवत नसे कारण सगळे त्याला चिडवत असत...आणि केतन असे काही thrill अनुभवायचंच होतं.. तो ही तयार झाला.


पहाटे लवकरच निघायचं होतं म्हणून आदल्या रात्री सगळे आदित्यच्या घरीच झोपायला आले..रात्रभर गप्पा सुरूच होत्या..आदित्य आणि केतन मात्र थोडावेळ गप्पा मारून झोपायला गेले.कारण त्यांना drive करायचं होतं..

आदित्यला पहाटे ४ लाच जाग आली.. त्याने लगेच सगळ्यांना उठवले... पण रात्री उशिरा झोपल्यामुळे कोणीच लवकर उठायला मागत नव्हते. त्यांना उठवता उठवता सकाळचे ६ वाजले...पटापट सगळ्यांनी आवरलं..आदित्यच्या आईने सगळ्यांना चहा आणि नाश्ता दिला..वाटेत खाण्यासाठी snacks पण दिले...गाडीत सामान ठेवलं..आणि त्यांचा प्रवास सुरु झाला...


सकाळचे वातावरण खूप छान वाटत होते..हवेत गारवा होता..गाडीमध्ये बसल्यावर गार वातावरणात सगळेच पेंगायला लागले..झोप पूर्ण न झाल्याने सगळे लगेच झोपून गेले..२ तास गाडी चालवल्यावर आदित्यने एके ठिकाणी गाडी थांबवली..तशी सगळ्यांना जाग आली.पाय मोकळे करायला म्हणून सगळे खाली उतरले... तिथेच जवळ चहाची टपरी होती.. तिथे चहा घेतला आणि परत प्रवासाला सुरुवात केली.आता केतनने गाडी चालवायला घेतली..एव्हाना सगळ्यांची झोप झाली होती..मग काय..गाडीत नुसता कल्ला सुरू होता...एकमेकांची टर खेचणे, jokes सांगणे हे सर्व चालू होते...


प्रवासात वेळ कसा निघून गेला हे कळलंच नाही..गावाच्या वेशीवर पोहोचल्यावर त्यांची गाडी अचानक बंद पडली..केतनने बराच प्रयत्न केला पण गाडी काही चालू होईना..तासभर झाला तरी गाडी जागची हलली नाही आणि रहदारी नसल्यामुळे इतर कोणाची मदतही मिळेना..दुपारचे १२ वाजून गेले होते..सूर्य माथ्यावर आला होता..तहान-भुकेने व्याकुळ झाले होते..गाडीत जेवढं खाण्याचे पदार्थ होते ते केव्हाच संपले होते..


"काय यार आदि... तास झाला आपण उभे आहोत कोणीच कसं येत नाहीये.. एवढं ओसाड रानात आहे का तुझं गाव.." सोहम वैतागून म्हणाला..


आदित्यलाही काय बोलावे सुचत नव्हते.. त्यालाही आश्चर्य वाटत होते..एकही गाडी कशी या रस्त्यावरून जात नाहीये..तो काही न बोलता शांत होता..


शुभम सगळीकडे पाहत होता..त्याला लांब एक झोपडी दिसली...तिथे मदत मिळते का ते पाहूया म्हणून सगळे त्या झोपडीच्या दिशेने निघाले..१५-२० मिनिटे चालून गेल्यावर ते त्या झोपडीजवळ पोहोचले. जी लांबून त्यांना झोपडी वाटत होती, खरं तर ते एक मंदिर होते.. मंदिराच्या बाहेरील नळावर त्यांनी पाय धुतले.. एवढ्या उन्हातही नळाचे पाणी थंडगार होते...तहानेने व्याकुळलेल्या त्यांच्यासाठी ते पाणी म्हणजे अमृतच होते...ते पिऊन सगळे तृप्त झाले..मंदिरात प्रवेश केल्यावर शांत वाटत होतं..आदित्यला आश्चर्य वाटत होते मी हे मंदिर कधी पाहिले कसं नाही..कदाचित हल्ली उभारले असेल असा विचार करून त्याने देवाचे दर्शन घेतले.. सर्व तिथेच थोडा वेळ बसले... तेवढ्यात केतनची नजर मंदिराच्या बाहेर पारावर बसलेल्या वयस्कर व्यक्तीकडे गेली. सदरा आणि धोतर नेसलेली, खांद्यावर घोंगडी, हातात काठी, लांब पिळदार मिशा असलेली ती व्यक्ती त्यांच्याकडेच पाहत होती..केतनने सगळ्यांना इशारा केला..."ते बाबा बसले आहेत तिकडे...त्यांना विचारुया काही मदत मिळते का ते..." केतनने असे म्हटल्यावर सगळेच सहमत झाले आणि ते जायला उठले..


"बाबा, आम्ही मुंबईवरून आलोय..आमची गाडी बंद पडलीये..काही मदत मिळेल का इथे जवळपास..." आदित्यने विचारले..


"मला काय माहीत बाळा..मी तर इथेच असतो..देवाच्या कृपेने गाडी चालू झाली तर झाली.." ती वयस्कर व्यक्ती म्हणाली..


थोडं विचित्र वाटलं सगळ्यांना..म्हणून सगळे निघाले.


तेवढ्यात, "आदित्य बेटा, इकडे ये.." आदित्यने दचकून मागे पाहिले..ते बाबा त्याला नावाने बोलावत होते..


"तुम्हाला माझं नाव कसं माहीत, बाबा??" आदित्यने प्रश्न केला.


"ते एवढं महत्त्वाचं नाहीये..महत्त्वाचं हे आहे की उद्या अमावस्या आहे..गावात सांभाळून राहा..आणि हे घे.." असं म्हणत त्या व्यक्तीने एक पुरचुंडी आदित्यच्या हातात ठेवली...आणि पुन्हा पारावर जाऊन बसले..


सगळे गाडीजवळ जायला वळले तोच तिथेच थांबले... कारण त्यांची गाडी जी थोड्या अंतरावर बंद होती..ती त्यांच्यासमोर होती..ही गाडी इथे कशी आली, या विचाराने सगळ्यांची भीतीने गाळण उडाली..सगळे पटकन गाडीत जाऊन बसले..गाडीत बसल्यावर आदित्यने ती पुरचुंडी उघडून पाहिली.. त्यात ६ गंडे होते..ते त्याने सर्वांना दिले..सोहम आणि राज यांचा यावर विश्वास नसल्याने ते सोडून सगळ्यांनी पटापट हातात बांधले..गाडी सुरू होतेय का म्हणून केतनने प्रयत्न केला आणि गाडी लगेच सुरू झाली..आता कुठेही न थांबता लगेच घरी जायचं, या विचाराने त्याने गाडी पळवली..गाडी सुरू झाल्यावर शुभमचे लक्ष मंदिराकडे गेलं तर ते बाबा तिथे नव्हते..जवळपासही कुठेच नव्हते...तो तर खूपच घाबरून गेला होता...मनातल्या मनात देवाचं नाव घेत होता..


थोडे अंतर जातात तोच वाटेत त्यांना एक ३-४ वर्षांचं बाळ रडत बसलेलं दिसलं..केतनने गाडी थांबवली. एवढ्या उन्हात भर रस्त्यात हे बाळ कोणी ठेवलं असेल, याचे त्यांना आश्चर्यही वाटले आणि त्याच्या आई-वडिलांचा रागही आला.त्याला मदत करण्याच्या उद्देशाने सगळे गाडीतून उतरले आणि ते बाळाच्या दिशेने जाऊ लागले.तसं ते बाळ उठलं आणि पुढे पुढे चालू लागलं..तसे हे सगळे त्याच्या मागे मागे जाऊ लागले..काही वेळाने ते बाळ रडायचं थांबलं आणि मोठमोठ्याने हसू लागलं..त्याचे हसणे एखाद्या मोठ्या माणसासारखं होतं..ते हसत हसत पुढे जात होतं..आदित्यने सगळ्यांना थांबवलं..हे काहीतरी भयानक आहे हे त्याला जाणवलं..त्याने परत सगळ्यांना गाडीत बसायला सांगितलं..केतन गाडी सुरू करणार इतक्यात त्याच्या लक्षात आलं राज तर अजून त्या बाळाकडे बघत त्याच्या दिशेने जात होता...सगळ्यांनी त्याला हाक मारली पण तो काही थांबत नव्हता.तो चालत चालत बराच लांब गेला.अचानक आदित्यला काहीतरी आठवलं आणि गाडीतून उतरला..मघाशी त्या बाबांनी त्याला जी पुरचुंडी दिली होती त्यात विभूती पण होती..त्याने ती बाळाच्या दिशेने फुंकरली आणि त्याक्षणी ते बाळ अदृश्य झालं आणि इकडे राजही भानावर आला..आदित्यने त्याच्या कपाळावर थोडी विभूती लावली..राजचे डोकं जड झालं होतं..तो एवढा लांब कसा गेला हे त्यालाच कळलं नाही..गाडीत बसल्यावर त्याला झोप लागली..


थोड्याच वेळात ते घरी पोहोचले..आदित्यच्या आजी-आजोबांच्या दुमजली घरात प्रशस्त खोल्या होत्या..आदित्य आणि त्याचे मित्र येणार म्हणून त्याच्या आजोबांनी वरच्या खोल्या साफ करून घेतल्या होत्या..त्यांनी सामान खोल्यांमध्ये ठेवलं..

गेल्या काही तासांमध्ये जे काही झालं त्याने ते ६ जण भांबावून गेले होते.घरी आल्यावर त्यांना थोडं relax वाटलं..जेवण वगैरे झाल्यावर ते लगेच आराम करायला गेले.


काही वेळाने अमरला कॉल आला..झोपेतच त्याने कॉल घेतला.. बोलून झाल्यावर तो पुन्हा झोपण्याचा प्रयत्न करू लागला..पण झोप काही लागत नव्हती..त्याने आजूबाजूला पाहिले सगळे अजून झोपले होते...तो उठला..फ्रेश झाला आणि खोलीच्या गॅलरीत येऊन उभा राहिला..सूर्य मावळतीला आला होता..संध्याकाळ होत आली होती.पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होते..हवेत थोडा गारवा जाणवत होता..सगळीकडे शांत वातावरण होत..त्या रम्य वातावरणात देखील त्याला काहीसं विचित्र वाटत होतं..आजूबाजूच्या झाडाझुडुपांमध्ये कसलीतरी हालचाल जाणवत होती.जणू त्याला कोणीतरी आडून पाहत आहे..त्याने दुर्लक्ष करून इतरत्र पाहिले.. तेवढ्यात घराच्या समोरील अंगणातून काहीतरी पटकन निघून गेल्यासारखे वाटले..त्याने इकडे तिकडे पाहिले..पण तिथे कोणीच नव्हते..भास झाला असेल असे वाटून त्याने लक्ष दिले नाही..पण त्याला २-३ वेळा तोच भास झाला..आता मात्र तो खूप घाबरला..मित्रांना सांगावं तर सगळे आपल्यालाच हसतील, चिडवतील म्हणून त्याने कोणालाही सांगितलं नाही..


तो खोलीत येऊन बसला..सगळे हळूहळू जागे झाले..प्रवासाचा शीण थोडाफार कमी झाला होता..तेवढ्यात आजीने चहा पिण्यासाठी खाली बोलावले.. सगळे पटापट उठले..फ्रेश होऊन चहा प्यायला गेले..चहा घेत असताना आदित्यने येताना घडलेल्या घटना आजी-आजोबांना सांगितल्या.. तेव्हा आजोबांनी सांगितले...


"ते मंदिर ४-५ वर्षांपूर्वी बांधले आहे..गावात जो कोणी नवीन येईल त्याला त्या मंदिरात दर्शन घेऊनच गावात प्रवेश करायला लागतो..क्षेत्रपाल देवाचा तसा आदेशच आहे..तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्हाला देवाने दर्शन दिलं आणि वाईट शक्तींपासून वाचवलं.सगळ्यांचंच नशीब एवढं चांगलं नसतं..कधी कधी कोणाला मदत मिळतही नाही.."


गप्पा मारता मारता रात्र कधी झाली कळलंच नाही..गावाला सगळे लवकर जेवतात आणि लवकर झोपतात म्हणून आजी आणि सुमा मावशी (घरकामासाठी येणाऱ्या मावशी) रात्रीच्या स्वयंपाकाला लागल्या..


८ वाजताच सगळ्यांची जेवणं झाली.दुपारी बराच आराम केल्यामुळे कोणाला इतक्या लवकर झोपायचं नव्हतं..थोडा वेळ गच्चीत जाऊन बसू, पत्ते खेळू,असे म्हणून सगळे गच्चीत गेले..मग गप्पा रंगल्या.. डाव मांडले..रात्रीचे १२ वाजून गेले तरी ते खेळतच होते..शुभमने मोबाईल पाहिला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की बराच वेळ झालाय..


"आता बस झालं guys..१२ वाजून गेलेत..आपण गावात आहोत शहरात नाही..आजूबाजूला बघा सगळं शांत झालंय.. चला खाली जाऊन खेळू हवं तर.." शुभम म्हणाला..


"काय यार तू पण..एक नंबरचा फट्टू आहेस..." सोहम त्याला चिडवून हसू लागला..


"सोहम, तो बरोबर बोलतोय..असं जास्त वेळ बाहेर बसणं योग्य नाही..जाऊ आपण खाली.." आदित्य म्हणाला..


तसे सगळे उठले आणि खोलीत येऊन अंथरुणात पडले..तेवढ्यात केतनच्या लक्षात आलं त्याचा मोबाईल सापडत नाहीये..त्याने राजकडून मोबाईल घेऊन त्याच्या मोबाईलला रिंग केली..रिंग तर जात होती..पण मोबाईल काही दिसत नव्हता..गच्चीत राहिला असेल, असे म्हणून तो वर गेला..सगळे जिथे बसले होते मोबाईल तिथेच होता..मोबाईल घेऊन तो खाली जाणार इतक्यात त्याची नजर समोरच्या घराच्या गच्चीत गेली..तिथे कोणीतरी बसलेलं दिसलं..काळोखात त्याला नीट दिसत नव्हतं..त्याने निरखून पाहिलं तर एक पांढरी साडी नेसलेली बाई गुडघ्यात तोंड घालून बसलेली दिसली..तिचे केस मोकळे होते आणि तिचे पाय उलटे होते..तो जे पाहत होता त्यावर त्याचा विश्वास बसत नव्हता..आणि अचानक ती अदृश्य झाली..केतन हे सर्व प्रथमच अनुभवत होता..तो पळत पळत खाली गेला..बाथरूममध्ये जाऊन तोंडावर पटापट पाणी मारले.. काहीच घडले नाही, असे दाखवून तो येऊन अंथरुणात येऊन पडला..


आजचा दिवस सगळ्यांसाठीच अविस्मरणीय होता..आयुष्यात कधीही न अनुभवलेले प्रसंग आज त्यांच्यासोबत घडले होते..


त्या रात्री सगळ्यांनाच खूप उशिरा झोप लागली..सगळेच अस्वस्थ होते..केतनला सतत ती बाई डोळ्यांसमोर दिसत होती..खूप प्रयत्नांनी त्याला झोप लागली..


सोहमला सकाळी लवकर जाग आली..त्याला walk ला जायची सवय होती..आदल्या दिवशीच्या घटनांनंतर त्याला एकटं जायचा धीर होत नव्हता. सगळे गाढ झोपेत होते..तो उठला आणि थोडे अंतर जाऊन येऊ या उद्देशाने घराबाहेर पडला..गावातील लोक आपापल्या कामाला लागली होती..सकाळचं वातावरण खूप छान वाटत होतं..गार वारं सुटलं होतं..चालता चालता त्याला एक छोटी पायवाट दिसली.ती मुख्य रस्त्याकडे जाणारी होती.नकळतच तो तिथे गेला..थोडं अंतर गेल्यावर आता घरी जाऊया, म्हणून तो वळला..त्या पायवाटेवरून चालू लागला..बराच वेळ झाला तरी तो फक्त चालतच होता..येताना तो इतकं चालला नव्हता...झपाझप पाय टाकत चालू लागला..पण घराकडे जाणारी वाट त्याला सापडत नव्हती..येताना रम्य वाटणारी ती पायवाट आता भयावह वाटू लागली होती...पानांची सळसळ,विचित्र आवाज, घोंघावणारा वारा यामुळे वाटेवरचे वातावरण एखाद्या जंगलासारखे वाटत होते..तिथे त्याला एक भलेमोठे पिंपळाचे झाड दिसले..विस्तीर्ण पसरलेल्या त्या झाडाआडून कोणीतरी त्याच्याकडे पाहत आहे, असे त्याला वाटले.त्याने भास समजून दुर्लक्ष केले..चालून चालून तो घामाघूम झाला..तहानेने घसा कोरडा पडला.. तरीही न थांबता तो चालत होता..काही वेळाने तेच पिंपळाचे झाड त्याला दिसले...कोणीतरी पाहत असल्याचा पुन्हा तोच भास..आता मात्र आपलं काही खरं नाही..आपण येथे पुरत अडकलो,या विचाराने तो रस्त्यातच बसला..त्याच्या शरीरात त्राण नव्हते..त्याला आठवलं की गावात येताना देवानेच आपलं रक्षण केलं होतं..त्याचा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसला तरी त्याने डोळे मिटून देवाचा जप करायला सुरुवात केली..काही वेळाने त्याला शांत वाटू लागलं.. डोळे उघडून त्याने सगळीकडे एक नजर टाकली..तो उठला आणि पुन्हा चालू लागला..काही अंतर गेल्यावर त्याला गावातली घर दिसू लागली..आता त्याला हायसं वाटू लागलं. तो घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला..


इकडे घरी बराच वेळ झाला तरी सोहम आला नाही म्हणून सगळेच काळजीत होते..तेवढ्यात सोहम धापा टाकत घरी आला..तहानेने व्याकुळलेल्या त्याने घटाघट पाणी प्यायले..त्याने त्याच्यासोबत काय घडले ते सर्व सांगितले..सगळेच घाबरून गेले होते..


सोहमच्या काळजीने कोणी सकाळपासून काही खाल्लं नव्हतं..तो आला तेव्हा सगळ्यांनी चहा-नाश्ता घेतला..


"चल यार आदि, घरी जाऊ..झालं तेवढं adventure खूप झालं..आता बस..जे काही thrill अनुभवायचं ते अनुभवलं.." सोहम म्हणाला..


"U r right.. actually मला पण असाच अनुभव आला पण मी कोणाला सांगितला नाही..मला वाटलं तुम्ही सगळे मला चिडवाल, माझी खिल्ली उडवाल.." अमर म्हणाला आणि त्याच्यासोबत घडलेला प्रसंग त्याने सांगितला.. मग केतननेही त्याला दिसलेल्या बाई बद्दल सांगितलं...


आदित्यने आजी-आजोबांना ते सगळे मुंबईला परत जात असल्याचे सांगितलं.. तेवढ्यात दुपारच्या जेवणाची तयारी सुरू केली आहे तेव्हा उद्या पहाटे निघा हवं तर, असं आजोबांनी सांगितलं.. एक दिवसाचा तर प्रश्न आहे, असे म्हणून त्यांनी पहाटे लवकर निघण्याचा निर्णय घेतला..


गावात आदित्यचा एक विशाल म्हात्रे नावाचा मित्र होता..त्याला आदित्य आल्याचे कळले तेव्हा तो त्याला भेटायला आला..आदित्य त्याला पाहून खूप खुश झाला..घराच्या अंगणातच ते गप्पा मारत बसले होते...त्याचे मित्र पण आले..आदित्यने सगळ्यांची ओळख करून दिली..आदित्यला आणि त्याच्या मित्रांना विशालने त्याच्या घरी नेले..विशालच्या आई-बाबांनी आजी-आजोबांची चौकशी केली..


"बरेच दिवस आजी भेटल्या नाहीत..आणि आजोबाही दिसले नाहीत.. तब्येत ठीक आहे ना त्यांची.." विशालच्या आईने विचारले..


"हो काकू, एकदम मजेत आहेत. जास्त घराबाहेर जात नाहीत ते...काही हवं असेल तर सुमा मावशी देतात आणून.", आदित्य म्हणाला..


"सुमा आली का माहेराहून??" म्हात्रे काकूंनी विचारले..


"जाऊन आल्या असतील..कारण आम्ही काल आलो तेव्हा तर होत्या घरीच.." आदित्य म्हणाला...


"अरे बुधवारी तर गेली होती..तिचा नवराच म्हणाला आम्हाला..आमच्याकडे तो घरकामाला आहे..अंगण झाडायचं, झाडांना पाणी घालायचं या कामासाठी येतो तो..तोच सांगत होता सुमा माहेरी गेली म्हणून.." म्हात्रे काकूंनी सांगितले..


गप्पा मारता मारता जेवणाची वेळ झाली म्हणून सगळे निघाले..काकूंनी सांगितलेलं आदित्यच्या मनातून काही जात नव्हते..


घरी येऊन सगळे जेवले आणि वर जाऊन आपापल्या मोबाईलमध्ये तोंड खुपसून बसले..बघता बघता सगळे पेंगुळले आणि मग बसल्या जागीच आडवे झाले..


संध्याकाळी सगळे उठले आणि खाली आले.. चहा घेतला आणि अंगणात गप्पा मारत बसले.. आजी-आजोबाही होते..आजोबा आदित्यच्या लहानपणीच्या गोष्टी सांगत होते..हास्यविनोद करत वेळ कसा गेला कळलच नाही..अंधार पडू लागला तसं सगळे वर गेले आणि पहाटे लवकर निघायचंय म्हणून सामान भरू लागले..बाहेर कुठे जायची त्यांची हिम्मत होत नव्हती..सगळे घरातच बसून होते..


अमावस्येच्या रात्री नेहमीपेक्षा जास्त अंधार होता..शरीराला बोचणारा वार वाहत होता..झाडांच्या पानांची सळसळ, रातकिड्यांची किरकिर,दुरूनच कुठूनतरी येणारा कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज रात्रीची शांतता भंग करत होता..


रात्रीच्या जेवणानंतर सगळे लवकर झोपले.. आदित्यला काही केल्या झोप लागत नव्हती..बराच वेळ विचार करत नुसताच पडून होता..मग त्याला झोप लागली..काही वेळाने कोणाच्या तरी ओरडण्याचा आवाज आला आणि त्याला जाग आली.. भास झाला असेल असे वाटून तो पुन्हा झोपला..परत तोच आवाज आला.आता मात्र काहीतरी गडबड आहे म्हणून तो खाली आला..आवाज कुठून येतोय याचा कानोसा घेत तो किचनजवळ आला..तर तिथे सुमाचा नवरा तिला मारत होता..आदित्य त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता..पण त्याचा आवाज फुटत नव्हता..एका जागी उभा राहून ते सगळं तो पाहत होता...त्यांचा आवाज ऐकून आजी-आजोबाही तिथे आले..आदित्य त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला बोलता येत नव्हते की जागचे हलता येत नव्हते..जे चालू आहे ते बघण्याखेरीज काहीच करू शकत नव्हता...आपण चित्रपट पाहताना पडद्यावर जसे scene पुढे जातात तसे जे घडत होतं ते तो केवळ पाहू शकत होता..सुमा आणि तिच्या नवऱ्याची झटापट झाली आणि रागाच्या भरात त्याने सुमाच्या डोक्यात वरवंटा घातला..वार वर्मी लागल्याने ती जागच्या जागी मरण पावली..हे सगळं आजी-आजोबांनी पाहिलं आणि ते आपल्याला पोलिसात देतील म्हणून त्यांनाही त्याने मारून टाकलं..


हे सगळं आदित्य उघड्या डोळ्यांनी पाहत होता..पण एक चकारही काढू शकला नाही..तो काय पाहतोय यावर त्याला विश्वास बसत नव्हता..चित्रपटात जशी स्थान बदलतात तसं त्याचं स्थान बदललं..आता तो घराच्या मागच्या अंगणात होता..


थोड्यावेळाने आपण हे काय करून बसलो, असे वाटून सुमाचा नवरा तिथेच बसला..मग त्याने त्याच्या मित्राला बोलावून घेतले आणि तिन्ही मृतदेह पोत्यांमध्ये भरून त्यांनी घराच्या मागच्या अंगणात पुरून टाकले..


एवढ्यात आदित्य उठला. घामाने अंग भिजलं होतं..आपण जे काही पाहिलं ते खरं होतं की स्वप्न..तो उठला..तोंडावर पाणी मारून तो खाली गेला..अजून उजाडलं नव्हतं..सगळ्यांना निघायचं होतं म्हणून सगळेच उठले..आदित्य खाली जाऊन आजी-आजोबांना हाक मारू लागला..ते दोघे कुठेच दिसले नाही..मग तो मागच्या अंगणात गेला...आदित्यच्या पाठोपाठ त्याचे मित्रही गेले.त्याचे मित्रही दोघांना शोधत होते..त्याने जे काही स्वप्नात पाहिले ते सर्व त्याने सगळ्यांना सांगितले.कोणालाच विश्वास बसत नव्हता..आदित्यला स्वप्नात दिसलेली जागा तो शोधू लागला..बराच वेळ अंगणात शोधल्यावर त्याला एका जागी उकरलेलं दिसलं..तो खणायला जाणार इतक्यात राजने त्याला थांबवले..


"तू जे पाहिलं ते जर खरं असेल तर ही पोलीस केस आहे..मला वाटतं आपण पोलिसांना inform करायला हवं..." राज म्हणाला..


"आम्हालाही तेच वाटतंय.." सगळे एकमताने म्हणाले..


केतनने लगेच पोलिसांना बोलावून घेतले..आदित्यची मनःस्थिती ठीक नव्हती..पोलिसांनी तपास सुरू केला..तेव्हा पोलिसांनी आदित्यला सांगितले की काल रात्री सुमाचा नवरा टॉयलेटच्या बाहेर मृतावस्थेत सापडला..ते सुमाला शोधतच होते..अंगणात खणून पाहिल्यावर आजी-आजोबा आणि सुमाचा मृतदेह सापडला..


पोलिसांचा संदेह त्या ६ जणांवर होता..पण संपूर्ण तपास झाल्यावर आणि मृतदेहांचे postmortem झाल्यावर हे तिन्ही खून मंगळवारी रात्रीच म्हणजे आदित्य आणि त्याचे मित्र येण्याच्या आदल्या रात्रीच झाले होते आणि ते सुमाच्या नवऱ्याने केले असल्याचे आणि सुमाच्या नवऱ्याचा मृत्यू heart attack ने झाला असल्याचे सिद्ध झाले..


हे सर्व होईपर्यंत ते ६ जण तिथेच थांबले होते..याला जवळजवळ महिना निघून गेला...


इतके दिवस आपण आजी-आजोबा आणि सुमा यांच्या आत्म्याबरोबर राहत होतो, या विचाराने सर्वच सुन्न होते..


समाप्त


Rate this content
Log in

Similar marathi story from Horror